पुराण महाकल्प व गण : टी. एच‌‌. हॉलंड यांनी भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाचे जे विभाग केले त्यांपैकी दुसऱ्या म्हणजे ⇨ आर्कीयननंतरच्या व द्रविड महाकल्पाच्या [→ द्रविड महाकल्प व गण] आधीच्या विभागाचे नाव. या महाकल्पाची कालमर्यादा सु. ६० ते सु. १२० कोटी वर्षे एवढी मानतात. या गणाच्या तळाशी असलेल्या विसंगतीला आर्कीयन कालोत्तर महान विसंगती असे म्हणतात आणि ही विसंगती भारतीय स्तरविज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आर्कीयन खडकांवर विसंगतपणे वसलेले ⇨ कडप्पा (कडप्पा) संघातील व ⇨ विंध्य संघातील खडक या गणात येतात. म्हणजे भारताच्या द्वीपकल्पातील तीव्रपणे रूपांतरित झालेल्या आर्कीयन व धारवाड संघांचे पट्टिताश्म आणि जीवाश्मयुक्त (शिळारूप झालेल्या जीवांच्या अवशेषांनी युक्त) पुराजीव (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडक यांच्यातील हा संक्रमणी गट आहे. उत्तर अमेरिकेतील ⇨ अल्गाँक्वियन गटाशी हा तुल्य असून याच्याशी तुल्य असे खडक फिनलंडमध्येही आहेत. आता चीन मधील सिनियन शैलसमूहाशीही याचे सहसंबंध आहेत. याला सामान्यतः सुपुराकल्प(प्रोटिरोझोइक) म्हणत असले, तरी पुराण महाकल्प व गण ही संज्ञाही वापरात आहे.

आर्कीयन व धारवाडी जटिल समूहांवर वसलेले भारताच्या द्वीपकल्पातील सर्व जीवाश्महीन शैलसमूह पुराण गणात येतात. यातील खडकांचे रूपांतरण सापेक्षतः कमी प्रमाणात झालेले असून  ओळखू येतील असे जीवांचे निश्चित पुरावे त्यांच्यात आढळत नाहीत परंतु यातील काही ठिकाणचे खडक क्षुब्ध झालेले व घड्या पडलेले आहेत, तर कोठे कोठे घड्या व क्षुब्धतेची क्रिया तीव्र झालेली आढळते उदा., छोटा नागपूरजवळील भागात. या काळात ज्वालामुखी क्रिया झाली असून परिणामी या खडकांत भित्ती  व ट्रॅप (जवळजवळ आडव्या थरांच्या राशीतील अग्निज खडक) आढळतात. थोडेसे आदिम जीवांचे अवशेष व जीवक्रिया निःसंशयपणे सुचित करणारे पुरावे असलेले खडकांचे काही गट विंध्य संघात आढळले असून त्यावरून पुराण महाकल्पाचा काळ पूर्व कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या)  काळाइतका अलीकडील असावा, असे काहींचे मत आहे.

आंध्र प्रदेश, ओरिसाचा छत्तीसगढ भाग व बिहारमधील ससराम पासून आग्रा ते चितोडपर्यंतचा भाग हे पुराण गणातील खडकांचे महत्त्वाचे प्रदेश आहेत. द्वीपकल्पात याचे पुढील शैलसमूह आहेत: कडप्पा, कलादगी,पाखाल व छत्तीसगढ द्रोणी मुनेर खोरे पैनगंगा थर विझगापट्टम‌् व बस्तर येथील दृश्यांश (उघडे पडलेले भाग), अंपानी व गुजरातमधील पृथक्णस्थित (अलग स्थितीत) पडलेले खडक ग्रॅनाइट, दिल्ली संघ, कोहलन माला (सिंगभूम) इत्यादी. महाराष्ट्रात चांदा, यवतमाळ, भंडारा व रत्नागिरी जिल्ह्यांत या काळातील खडक आढळतात. व्दीपकल्पाबाहेरील संभाव्य पुराणकालीन खडक पुढील भागांत आढळतात. आसाम (मिजू माला) पेशावर व हजारा भाग (अटक स्लेट) काश्मीर (डोग्री स्लेट) हिमालयीन भाग (सिमला स्लेट, बक्सा व देवबन माला, हैमंता व वैक्रिता समूह, चैल, चांदपूर व ताला माला) इ. हिमालयातील पुराणकालीन शैलसमूहासुद्धा जीवाश्महीन असून त्यांत काही ठिकाणी  तीव्र रूपांतरण झालेले आहे मात्र त्यांना घड्या पडलेल्या नाहीत.

पहा : द्रविड महाकल्प व गण.

ठाकुर, अ. ना.