पर्मियन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला पर्मियन कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला पर्मियन संघ म्हणतात. हा कल्प सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीचा कालविभाग दर्शवितो. रशियातील पर्म नावाच्या प्रदेशातील खडकांपासून आर्. आय्. मर्चिसन यांनी हे नाव १८४१ मध्ये दिले. हा ⇨पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शेवटचा कल्प आहे. जर्मनीत पर्मियनऐवजी डायस हे नाव दिले जाते. पर्मियन कल्पातील खडकांचे मुख्यतः पुढील प्रकारचे गट आढळतात.

(१) उघड्या समुद्रात साचलेले वालुकाश्म, मृत्तिकाश्म, चुनखडक इत्यादींचा गट. याच्यात विविध सागरी प्राण्यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात. त्यांच्यापैकी प्रमुख म्हणजे ब्रॅकिओपोडा, फोरॅमिनीफेरांपैकी फ्युस्युलिनांचा गट, ब्रायोझोआ व ॲमोनॉइडियांपैकी गोनियाटाइट हे होत. गोनियाटाइटांचा विकास होऊन जटिल सीवन्या (शरीराच्या भागांमधील गुंतागुंतीचे जोड) असणारे वंश निर्माण झाले होते. या गटाचे खडक जिब्राल्टरपासून इंडोनेशियापर्यंत पसरलेल्या आल्प्स, हिमालय इ. पर्वतांच्या प्रदेशांत व उत्तर अमेरिकेतील पश्चिम टेक्ससात व मेक्सिकोत आढळतात. मिठाच्या डोंगरातील प्रॉडक्ट्स–चुनखडक, वायव्य हिमालयातील कुलिंग संघ, काश्मिरातील झेवान संघ, काश्मिरपासून निघून गढवाल आणि कुमाऊँ यांच्यातून आसामी हिमालयात गेल्यावर तेथे दक्षिणेकडे वळून पुढे ब्रह्मदेशात गेलेले प्रॉडक्ट्स–शेलांचे थर याच गटातले आहेत.

(२) खंडांच्या जमिनीवर किंवा जमिनीने वेढल्या गेलेल्या समुद्रात साचलेले वालुकाश्म, मृत्तिकाश्म इत्यादींचे लाल थर व चुनखडक आणि डोलोमाइट व समुद्राचे पाणी सुकून तयार झालेले जिप्सम, ॲनहायड्राइट आणि लवणांचे निपेक्ष (साठे) इत्यादींचा गट. उत्तर गोलार्धात भारताशिवाय पुष्कळ प्रदेशांत असे खडक आढळतात. त्या प्रदेशांचे हवामान रूक्ष होते व त्यांच्यापैकी कित्येकांत वाळवंटे होती, असे त्यांच्यातल्या अशा खडकांवरून दिसून येते. लाल थरात जमिनीवरील वनस्पतींचे, उभयचरांचे (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्‍या प्राण्यांचे) व सरीसृपांचे (सरपटणाऱ्‍या प्राण्यांचे) जीवाश्म सापडतात. वनस्पती एकंदरीत कारबाॅनिफेरस कालीन वनस्पतींसारख्याच होत्या, पण त्यांची संख्या खूपच कमी होती. चुनखडकात व डोलोमाइटात ब्रॅकिओपोडाचे, बायव्हालव्हियांचे व गॅस्ट्रोपोडांचे जीवाश्म आढळतात पण उघड्या समुद्रात साचलेल्या खडकांच्या मानाने या खडकांत अगदी थोड्या प्रकारांचेच जीवाश्म आढळतात. जिप्सम, ॲनहायड्राइट, सैंधव इत्यादींच्या प्रचंड राशी रशियात, जर्मनीत, ब्रिटनमध्ये व उत्तर अमेरिकेच्या मधल्या प्रदेशात आढळतात.

(३) भारताच्या द्वीपकल्पातले व दक्षिण गोलार्धातल्या खंडातले पर्मियम खडक मुख्यतः जमिनीवर साचलेल्या गाळांचे आहेत. त्यांच्या तळाचे खडक गोलाश्म संस्तर म्हणजे हिमनद्यांनी आणून टाकलेल्या डबराचे आहेत. उरलेले खडक मुख्यतः वाहत्या पाण्याने आणून टाकलेल्या गाळांचे असून दगडी कोळशाचे थर आणि वनस्पती, उभयचर, सरीसृप इत्यादींचे जीवाश्म आढळतात (उदा.,भारतातील गोंडवनी संघ, दक्षिण आफ्रिकेतील कारू संघ आणि दक्षिण अमेरिकेतील व आग्नेय ऑस्टेलियातील तत्सम संघ यांच्या तळविभागाचे खडक). प्राणहिता–गोदावरी खोऱ्‍याच्या उत्तर भागात अलीकडेच गोंडवनी संघातील पर्मियन कालीन थरांत गोंडवनसॉरसऱ्‍हाइनसूचस हे उभयचर जीवाश्म आढळले आहेत. पर्मियन  कल्पाच्या प्रारंभी वरील प्रदेशांचे हवामान शीत होते. नंतर ते दमट व उबदार होऊन त्यांच्या अनेक भागांत दलदली, तळी व दाट वने होती. या प्रदेशांत दगडी कोळशाचे  प्रचंड साठे आहेत. या प्रदेशांतील वनश्री ग्लॉसोप्टेरीस आदी वनस्पतींची व उत्तर गोलार्धातील वनश्रीपेक्षा वेगळी होती. उत्तर गोलार्धात उष्ण, रूक्ष हवामान असताना भारतात व दक्षिण गोलार्धात प्रारंभी शीत व नंतर दमट उबदार हवामान का असावे व त्याच्यावरील वनश्री का भिन्न असावी, याची कारणे कळलेली नाहीत [→ गोंडवनभूमि]. गोलाश्म संस्तरांच्या (म्हणजे हिमकालाच्या) वयाविषयी मतभेद आहेत. ते पर्मियन कल्पाचा प्रारंभ होण्याच्या किंचित आधीचे असणे शक्य आहे.

या कल्पात उभयचर पुष्कळ व मुख्यतः लॅबिरिंथोडोंटांपैकी होते. सरीसृपांचे महत्त्व वाढत होते. बरेचसे सरीसृप सरपटणारे होते, पण सस्तन प्राण्यांप्रमाणे धड उंच उचलून चालणारे किंवा पळणारे सरीसृपही अवतरले होते. कीटकांचाही पुष्कळ विकास झाला होता. वनस्पतींपैकी कॉनिफेरेलीझ गणाची प्रगती झाली होती.

केळकर, क. वा.