रेह : (कालार). सिंधु-गंगेच्या गाळाच्या मैदानातील अधिक शुष्क प्रदेशात आढळणारे लवणयुक्त पांढरट द्रव्य. हे रवाळ द्रव्य जमिनीच्या पृष्ठभागी पुटाप्रमाणे आच्छादल्यासारखे आढळते. मुख्यतः सोडियमाचे कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट व क्लोराइड तसेच थोड्याफार प्रमाणात कॅल्शियम व मॅग्‍नेशियम यांची लवणे यांचे हे मिश्रण असते. हे मुख्यत्वे पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार यांच्या उत्तर भागात, तसेच मध्य प्रदेशातही आढळते. सिंध व पंजाबात यालाच कालार म्हणतात. रेहमुळे खराब झालेल्या जमिनीला उसर म्हणतात. महाराष्ट्रात अशा जमिनीला चोपण म्हणतात.

डोंगर-पर्वतांवरून वहात येताना नद्यांच्या पाण्यातून लवणे विरघळलेल्या रूपात वा निलंबित कणांच्या रूपात वाहून आणली जातात. नद्या सखल भागात आल्यावर ही लवणे पाणी झिरपताना सु. ८ मी. खोलीपर्यंतच्या भागात साचतात. कमी पर्जन्यमान, भूमिगत पाण्याचा अपुरा निचरा आणि कोठे कोठे जमिनीच्या आत असणारा अप्रवेश्य मृत्तिकेचा अडथळा यांमुळे ही लवणे इतरत्र वाहून न नेली जाता साचत रहातात. अशा तऱ्हेने तळमृदेत एका विशिष्ट पातळीपर्यंत यांचे प्रमाण वाढते आणि त्यांच्यात व आधीच्या संयुगांत आंतरक्रिया होऊन नवीन लवणे बनतात. नंतर झिरपणाऱ्या पाण्यात अधिक विरघळणारी लवणे विरघळतात व केशाकर्षणाने पृष्ठभागी आणली जातात. विशेषतः पंजाब व राजस्थान येथील कालव्यांच्या पाण्यामुळे या क्रियेला मदत होते. उन्हाळ्यातील उच्च तापमान, तसेच जोराचे वारे यांच्यामुळे या विद्रावाचे पृष्ठभागी बाष्पीभवन होऊन लवणांचे पांढरे उत्फुल्लन वा पूट साचत जाते. या लवणांतील सोडियम क्लोराइडाचे कण वाऱ्याने वाहून आणले गेले असण्याचीही शक्यता असून असे कण टप्प्याटप्प्याने किनाऱ्यापासून अधिक आतील भागात वाहून नेले जातात.

काही भागांत रेहचे प्रमाण इतके जास्त होते की, तेथील जमीन शेतीलायक रहात नाही. यामुळे एके काळी सुपीक व दाट वस्तीचे असलेले काही प्रदेश नापीक व उजाड झाले आहेत. ही लवणे काढून टाकून अशा जमिनींची सुधारणा केल्यास सिंधु-गंगा खोऱ्यातील लाखो हेक्टर जमीन लागवडीखाली आणता येऊ शकेल. रेहमुळे काही भागांतील पाणीही पिण्यालायक रहात नाही व त्यामुळे वनस्पतिप्राण्यांना अपाय पोचतो. मात्र रेहच्या खालील भागात सामान्यपणे गोडे पाणी लागते.

 

रेहमधील प्रमुख लवणांचा वापर त्या भागातील छोट्या उद्योगधंद्यात करून घेण्यात येत असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेण्याचे प्रयत्‍न करण्यात येत आहेत. सज्‍जी माती (खार) मुख्यत्वे उत्तर प्रदेशात आढळते व सोडियम कार्बोनेट हा हिचा मुख्य घटक असतो. हिचा धुलाईसाठी व साबणामध्ये वापर करतात. खाऱ्या मातीमध्ये सोडियम सल्फेट हा मुख्य घटक असून ती मुख्यतः बिहारमध्ये आढळते. तिचा कातडी कमावण्यासाठी उपयोग करतात व तिच्यामुळे अधिक मऊ चामडे मिळते. जनावरांसाठी तीव्र रेचक म्हणून, तसेच पाणी थंड करण्यासाठीही तिचा उपयोग करतात.  

ठाकूर, अ. ना.