कार्‌बॉनिफेरस : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला कार्‌बॉनिफेरस कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला कार्‌बॉनिफेरस संघ म्हणतात. कार्‌बॉनिफेरस कल्पाची कालमर्यादा सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीपासून ३५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत ठरविण्यात आली आहे. या संघाचे अध्ययन प्रथम इंग्लंडमध्ये झाले व त्याच्यात दगडी कोळशाचे थर असल्यामुळे त्याला कार्‌बॉनिफेरस हे नाव दिले गेले (१८२२). यूरोपातील कार्‌बॉनिफेरसाशी तुल्य अशा अमेरिकेतील खडकांचा तेथे एकच संघ न मानता त्यांचे मिसिसिपीयन व पेनसिल्व्हेनियन असे दोन संघ केले जातात. मिसिसिपीयन हा स्थूल मानाने यूरोपातील पूर्व कार्‌बॉनिफेरसाशी व पेनसिल्व्हेनियन हा उत्तर कार्‌बॉनिफेरसाशी तुल्य आहे.

सागरी प्राणी : या कल्पात ब्रॅकिओपोडांपैकी प्रॉडक्टस, स्पिरिफर ऱ्हिंकोनेला यांसारखे वंश अत्यंत विपुल व टेरेब्रॅट्‌युलासारखे वंश विपुल होते. प्रवाळ विपुल, मुख्यत: रूगोजांपैकी टॅब्युलाटा त्यांच्यापेक्षा कमी. या कल्पाच्या पूर्व भागात क्रिनॉयडिया व उत्तर भागात प्रोटोझोआ संघातील फ्युस्युलिना हे विपुल असत व मुख्यत: त्यांच्या अवशेषांपासून बनलेले चुनखडक आढळतात. इतर कोणत्याही संघापेक्षा या संघात अधिक ब्लॅस्टॉयडियांचे जीवाश्म (जीवांचे अवशेष) आढळतात. सेफॅलोपोडांपैकी अधिक महत्त्वाचे म्हणजे गोनियाटाइट व सरळ कवचे किंवा घट्ट चिकटलेल्या वळशांची सर्पिल कवचे असणारे नॉटिलॉयडिया हे होत. सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यांचे डेव्होनियन (सु. ४२ ते ३६⋅५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील बहुतेक गट याही कल्पात होते व काही खडकांत मत्स्यांच्या दातांचे व कंटकांचे पुष्कळ जीवाश्म सापडतात. ऑस्ट्रॅकोडर्म मात्र निर्वंश झाले होते.

जमिनीवरील जीव : उत्तर गोलार्धातील जमिनीच्या पुष्कळशा क्षेत्रांत दलदली होत्या. त्या दलदलींत लहान झुडपांपासून तो तीस मीटरांपर्यंत उंची असणाऱ्या वृक्षांची दाट वस्ती आहे. त्यांच्या अवशेषांपासून तयार झालेले दगडी कोळशाचे साठे उत्तर गोलार्धातील पुष्कळशा देशांत आढळतात. एक्विसीटेलीझ, लायकोपोडिएलीझव टेरिडोस्पर्मी हे त्या काळातल्या वनस्पतींचे प्रमुख गट होत. दगडी कोळसा असलेल्या मृत्तिकाश्मात आणि वालुकाश्मात त्यांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या अखेरीस व त्याच्या नंतरच्या पर्मियन कल्पाच्या (सु. २७⋅५ ते २४⋅५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी भारतात व दक्षिण गोलार्धातील देशांत वाढणाऱ्या वनस्पती या उत्तर गोलार्धातील (भारताशिवाय इतर) देशांत वाढणाऱ्‍या वनस्पतींहून वेगळ्या असत. दक्षिणेकडील जमिनींवर आणि भारतात ग्लॉसोप्टेरीस वनश्री व उत्तर गोलार्धातील जमिनींवर सिजिलॅरिया, लेपिडोडेंड्रॉन, कॅलॅमाइट्‌स व ग्लॉसोप्टेरिसाशिवाय इतर टेरिडोस्पर्मी असत.

त्या काळच्या वनात राहणाऱ्या उभयचरांचे (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचे), कोळ्यांचे व कीटकांचे जीवाश्मही दगडी कोळसा असलेल्या खडकांत सापडतात. उभयचर अनेक प्रकारचे पण सामान्यत: लहान असत. आदिम सरीसृपांचा (आद्य सरपटणाऱ्या प्राण्यांचा) उदय झाला होता, पण जमिनीवरील प्राण्यांत उभयचर प्रमुख होते. कीटकांचे जीवाश्म विरळाच पण क्वचित पुष्कळ आढळतात. पंखांची झेप ७५ सेंमी असणाऱ्या चतुरांचे जीवाश्म मिळालेले आहेत. आजच्या झुरळांसारखी पण अधिक मोठी झुरळे त्या काळी विपुल असत. म्हणून उत्तर कार्‌बॉनिफेरस कल्पाला कधीकधी झुरळांचे युग म्हणतात.

कार्‌बॉनिफेरस कल्पाचे सागरी आणि असागरी खडक सर्व खंडांत आढळतात. वायव्य हिमालयातील स्पिटीच्या खोऱ्यात व काश्मिरात पूर्व आणि मध्य कार्‌बॉनिफेरस कल्पाचे सागरी खडक आहेत. विंध्य प्रदेशातील उमारिया येथे या कल्पाच्या अखेरच्या कालात तयार झालेल्या प्रॉडक्टस चुनखडकाचा पातळ थर आहे. पण त्याच काळी जमिनीवर तयार झालेले खडक द्वीपकल्पाच्या अनेक भागांत आहेत. [→ गोंडवनी संघ].

या कल्पाच्या अखेरच्या कालात दक्षिणेकडील खंडांचे हवामान अतिशीत होते.  

पहा : पर्मियन.      

       

                                                                                                                                                    केळकर, क. वा.