लॅब्रॅडोराइट : प्लॅजिओक्लेज फेल्स्पार मालिकेतील सर्वात सामान्यपणे व सर्वत्र आढळणारे खनिज. यात अल्बाइट (NaAlSi3O8) घटकाचे प्रमाण ३० ते ५० टक्के तर ॲनॉर्थाइट (CaAl3Si2O8) घटकाचे प्रमाण ७० ते ५० टक्के असते. स्फटिक त्रिनताक्ष, पातळ, चापट व काही मी. पर्यंत लांब यमलन (जुळे स्फटिक) सामान्य [⟶ स्फटिकविज्ञान]. यांच्या संपुंजित वा पाटनक्षम [⟶ पाटन] स्फटिकांच्या राशी आढळतात. पाटन : (001) उत्कृष्ट, रंग करडा, तपकिरी ते काळा. काही नमुन्यांत तेलाच्या तवंगात आढळतो त्याप्रमाणे वर्णविलास (वा रंगदीप्ती) आढळतो व त्यात मुख्यत्वे हिरवा, निळा, तसेच तांबडा हे रंग दिसतात. क्वचित रंगहीन. चमक काचेसारखी, कधीकधी रेझिनासारखी व पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. अपारदर्शक पातळ कडा मात्र दुधी काचेप्रमाणे पारभासी. भंजन काहीसे शंखाभ ते ढलपीप्रमाणे खडबडीत. ठिसूळ. कठिनता ६. वि.गु.२.७- २.८ चूर्ण गरम अम्लात विरघळते.

विशेषतः अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) ग्रॅब्रो, नोराइट, डोलेराइट, बेसाल्ट इ. खडकांत पायरोक्सिने व अँफिबोले यांच्याबरोबर आद्य घटक म्हणून हे आढळते. ॲनॉर्थोसाइट या खडकातील हे प्रमुख खनिज असून ते खडक घडीच्या पुष्कळ पर्वतांमध्ये आढळतात. याचे वर्णविलास दाखविणारे नमुने झिलई देऊन व मदारघाटी (बाह्य गोलाकार) पद्धतीने कापून रत्न म्हणून वापरतात. अशा काही नमुन्यांना चंद्रकांत म्हणतात. या खनिजामुळे काही खडकांचे सौंदर्य खुलते व म्हणून असे खडक शोभिवंत कामांसाठी वापरतात. हे खनिज कॅनडातील लॅब्रॅडॉर किनाऱ्यावर प्रथम आढळले व तेथील नमुन्याचेच प्रथम वर्णन करण्यात आले, म्हणून याला लॅब्रॅडोराइट (किंवा लॅब्रॅडोर स्पार) हे नाव देण्यात आले आहे.

पहा : फेल्स्पार गट. 

ठाकूर, अ. ना.