फर्ग्युसनाइट : (ब्रॅगाइट, टायराइट). खनिज. स्फटिक चतुष्कोणीय-प्रसूच्याकार स्फटिकांचा आकार प्रचिन वा प्रसूचीप्रमाणे [⟶ स्फटिकविज्ञान]. पाटन : (111) लेशमात्र [⟶ पाटन]. भंजन उपशंखाभ [⟶ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५·५ — ६. वि.गु. ५·८, पाणी असल्यास खनिजाचे वि.गु. ४·३ पर्यंत. दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी ते अपारदर्शक. चमक मंद, मात्र ताज्या पृष्ठाची चकचकीत काचेसारखी. रंग उदसर काळा ते उदी. कस उदसर ते करडा. रा. सं. (Y, Er) (Nb, Ta) O4. यात बहुतकरून पाणी असते. मात्र ते खनिजाचा मूळ घटक म्हणून नसते. पाण्याशिवाय कधीकधी याच्यात इतर ⇨विरल मृत्तिका तसेच युरेनियम, झिर्कोनियम, थोरियम, कॅल्शियम, लोह, टिटॅनियम इ. अल्प प्रमाणात असू शकतात. हे विरळाच आढळणारे खनिज सामान्यपणे पेग्मटाइट खडकांत आढळते. हे ग्रीनलंड, स्वीडन, नॉर्वे, श्रीलंका, जपान, मॅलॅगॅसी, आफ्रिका इ. भागांत सापडते. भारतात तमिळनाडू, राजस्थान व बिहार येथील काही अभ्रकी पेग्मटाइटांमध्ये समर्स्काइटाच्या जोडीने हे आढळते. विरल मृत्तिका मूलद्रव्यांच्या निष्कर्षणाच्या दृष्टीने हे खनिज उपयुक्त आहे. स्कॉटिश डॉक्टर रॉबर्ट फर्ग्युसन (१७९९-१८६५) यांच्या नावावरून याला फर्ग्युसनाइट हे नाव देण्यात आले आहे.

ठाकूर, अ. ना.