हिंगूळ : पाऱ्या चे महत्त्वाचे खनिज [→ पारा]. स्फटिक षट्कोणीय-समांतर षट्फलकीय समूहाचे, बहुधा समांतर षट्फलकीय किंवा जाड वडीसारखे, पुष्कळदा अन्योन्यवेशी यमल (एकमेकांत घुसलेले जुळे) स्फटिक वा सुईसारखे प्रचिन [→ स्फटिकविज्ञान]. बहुधा कणमय संपुंजित राशीच्या तसेच खडकातील पुटे वा विकीर्ण (फैलावलेल्या) मातकट पापुद्य्राच्या रूपातही ते आढळते. ⇨ पाटन (10To0) उत्कृष्ट कठिनता २.५ वि.गु. ८.१० चमक शुद्ध रूपाची हिऱ्यासारखी व अशुद्ध प्रकारची मंद मातकट भंजन उपशंखाभ काहीसे छेद्य (कापता येण्यासारखे), रंग शुद्ध प्रकाराचा व्हर्मिल्यन (किरमिजी) लाल ते अशुद्ध प्रकाराचा उदसर लाल कस शेंदरी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी हेपॅटिक सिनॅबार ( हिंगूळ) हा ज्वालाग्राही प्रकार असून त्याचा रंग यकृतासारखा उदी व काही बाबतींत कस उदसर असतो. तो बहुधा कणमय वा संहत (घट्ट) असतो. रा. सं. Hgs (मर्क्युरिक सल्फाइड). पुष्कळदा मृत्तिका, लोह ऑक्साइड व बिट्युमेन अधिमिश्रित होऊन हिंगूळ अशुद्ध होते. बंद नळीत हिंगूळ एकटे तापविल्यास मर्क्युरिक सल्फाइडाचे संप्लुत (संप्लवनाने म्हणजे द्रव अवस्थेतून न जाता घन पदार्थाचे सरळ वाफेत वा उलट रूपांतरण होऊन बनलेले पुट) तयार होते. बंद नळीत कोरड्या सोडियम कार्बोनेटाबरोबर हिंगूळ तापविल्यास धातुरूप पाऱ्याच्या गोळ्या तयार होतात. लाल रंग, शेंदरी कस, उच्च घनता आणि पाटन ही हिंगूळ वेगळे ओळखण्याची वैशिष्ट्ये आहेत.
हिंगूळ हे पाऱ्याचे सर्वांत महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. मात्र, ते पुरेशा प्रमाणात सापेक्षतः थोड्याच ठिकाणी आढळते. अलीकडच्या काळातील ज्वालामुखी खडक व उन्हाळी यांच्याजवळील संसेचितांच्या व शिरांमधील भरलेल्या द्रव्याच्या रूपात ते आढळते. पायराइट, मार्कॅसाइट, स्टिब्नाइट व तांब्याची सल्फाइडे या खनिजां-बरोबर ओपल, कॅल्सेडोनी, कॉर्ट्झ, बराइट, कॅल्साइट व फ्ल्युओराइटया खनिजांच्या मलखनिजांत ते आढळते. तसेच ते कृत्रिम रीतीने तयार करता येते.
आल्मादेन (स्पेन), ईद्रीया (इटली), हुवांकाव्हेलीका (पेरू), कायचाउ व हूनान प्रांत (चीन) आणि कॅलिफोर्निया (अमेरिका) हे हिंगूळ आढळणारे महत्त्वाचे प्रदेश आहेत. हिंगूळ हा पाऱ्याचा एकमेव असा महत्त्वाचा स्रोत आहे. पारदमेल प्रक्रिया, तापमापके, दाबमापके, विविध प्रकारची वैज्ञानिक व विद्युत् उपकरणे (उदा., पाऱ्याचा विद्युत् घट) औषधे, दंतवैद्यकातील पारदमेल, आरशाला लावणे इत्यादींमध्ये पारा वापरतात. अमेरिकेतील अनेक संयंत्रांमध्ये वीजनिर्मितीसाठी वाफेऐवजी पाऱ्याचेबाष्प वापरतात. उच्च विस्फोटक द्रव्यांसाठी विस्फोटक (चेतक) म्हणून वापरण्यात येणारे मर्क्युरी फल्मिनेट तयार करण्यासाठी तसेच जहाजाचे तळ रंगविण्याचे रंगलेप बनविण्यासाठी पारा वापरतात.
पहा : पारा.
ठाकूर, अ. ना.
“