पाटन : खनिजांमध्ये व खडकांमध्ये ठराविक प्रतलाला (पातळीला) समांतर असणाऱ्या दिशेत सहज भंग पावण्याचा गुणधर्म आढळतो, त्यास पाटन असे म्हणतात. काही खनिजांमध्ये व खडकांमध्ये अशा म्हणजे पाटनाच्या दोन किंवा अधिकही दिशा असतात. खनिजे व खडक यांच्यात पाटन निर्माण होण्याची कारणे भिन्न असतात. खनिजातील पाटन त्याच्यातील आणवीय संरचनेमुळे निर्माण झालेले असते. खनिजांतील अणू सामान्यतः नियमित रीतीने मांडलेले असतात. त्यामुळे अणूंच्या निरनिराळ्या थरांच्या पातळ्यांची पत्रके किंवा पृष्ठे तयार झालेली असतात. अणूंच्या थरांमधील बंध जेव्हा दुर्बल असतात तेव्हा पाटन निर्माण होते. अणूंची पृष्ठे सामान्यतः स्फटिकातील सममितीच्या पृष्ठांना समांतर असतात. त्यामुळे पाटन स्फटिकातील पृष्ठांनाही समांतर असते [⟶ खनिजविज्ञान]. यामुळे पाटनाचे वर्णन स्फटिक पृष्ठांना अनुसरून देतात. उदा., अभ्रकातील पाटन त्यातील उभ्या म्हणजे c – अक्षाला छेदणारे व पायाला समांतर असते, त्यास (001) पाटन म्हणतात. याचप्रमाणे पाटन घनीय (001), अष्टफलकीय किंवा प्रसूचीय (111), प्रचिनीय (110), समांतर षट्‌फलकीय (10ᚂ) इ. असते [⟶ स्फटिकविज्ञान]. भंग पावण्याच्या सहजतेनुसार पाटनाचे उत्कृष्ट वा उत्तम, चांगले, मध्यम, बेताचे किंवा अस्पष्ट असे वर्णन करतात.

खडकातील पाटन वेगळ्या प्रकारचे असते. सहज भंग पावण्याच्या गुणधर्माच्या व्याख्येनुसार खडकांत आढळणाऱ्या मूळ संरचनाचा देखील, उदा., अवसादी (गाळाच्या) खडकांतील स्तरणतले (थरांच्या पातळ्या), शिलारस वाहून तयार झालेल्या ज्वालामुखी खडकांतील थरांची पृष्ठे यांसारख्या संरचनांचा समावेश पाटन या संज्ञेत होईल परंतु सामान्यपणे तसा या संज्ञेचा वापर करीत नाहीत तर दाब, ताण इ. कारणांनी खडकात निर्माण झालेल्या द्वितीयक संरचनांचाच समावेश खडकाच्या पाटनात करतात. खडकातील पाटनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाठीचा (स्लेट) दगड होय. या सूक्ष्मकणी खडकातील पाटनाची पृष्ठे गुळगुळीत, सपाट व अगदी जवळजवळ म्हणजे ०·२५ सेंमी. हून कमी अंतरावर असतात. त्यामुळे पातळ पाट्या तयार करता येतात, अशा पाटनाला स्लेटी पाटन म्हणतात.

दाब व ताण यांच्यामुळे खडकातील घटक खनिजे एका ठराविक पद्धतीने ठराविक दिशेत मांडली जाऊन एकमेकांना समांतर अशी पाटनपृष्ठे तयार होतात. असे पाटन निर्माण होण्यास विशेषकरून अभ्रकासारखी चपटी खनिजे साहाय्यभूत होतात. अशा खनिजांत त्यांची स्वतःचीही पाटनपृष्ठे असतात. त्यामुळे पाटनास समांतर दिशेने अशी अनेक पत्रके, पापुद्रे, धलप्या ही सहज भंग पावतात. सुभाजा या खडकातील सहज भंग पावण्याचा गुणधर्म हाही पाटनाचा एक प्रकार आहे. 

काही विशिष्ट प्रकारच्या दाबांमुळे उदा., कर्तरी प्रतिबलामुळे (ज्यामुळे एखाद्या पदार्थातील समांतर प्रतले स्वतःला समांतर असलेल्या दिशेतच पण सापेक्षतः स्थलांतरित होतात अशा प्रेरणेमुळे) खडकांमध्ये भंजनाची प्रतले निर्माण होतात. त्या प्रतलांना अनुसरून खडक सहज भंग पावू शकतो. या पाटनाला भंजनामुळे निर्माण झालेले पाटन म्हणतात. हे पाटन म्हणजे जवळजवळ असणाऱ्या संधिरेषा असतात. या प्रकारात खडकातील खनिजे पाटनाला समांतर नसतात. जर भंजनपृष्ठांतील अंतर काही सेंमी. पेक्षा अधिक झाले, तर त्यास संधिरेषा म्हणतात. 

ठराविक दिशेने पडणारा दाब व ताण यांच्यामुळे खडकात आणखी एका प्रकाराने पाटन निर्माण होते. खडकांमध्ये एकमेकांना समांतर अशी अनेक सूक्ष्म विभंगतले (तड्यांच्या पातळ्या) निर्माण होऊन त्या विभंगतलांना अनुसरून खडकाचे भाग थोडे थोडे घसरतात. ही विभंगतले दुर्बल असल्यामुळे त्यांना अनुसरून खडक सहज भंग पावतो व ती पाटनतले ठरतात. 

आगस्ते, र. पां.