ब्लैनी थर : सिमला व गढवाल भागातील हिमालयात आढळणारा सु. ३ – ३० मी. जाडीचा पिंडाश्मांचा थर आणि त्यावरील सु. ३ ते ६ मी. जाडीचा चुनखडकांचा थर दोन्ही थरांच्या गटाला ब्लैनी थर वा शैलसमूह असे नाव आहे. सोलन शहराच्या वायव्येस असलेल्या बॅलॅन्या या नदीच्या जुन्या वा चुकीच्या उच्चारानुसार रूढ झालेल्या ब्लैनी (ब्लिनी) या नावावरून एच्. बी. मेडलिकॉट यांनी ब्लैनी थर हे नाव दिले आहे (१८६४). ह्या गटातील खडक सिमला स्लेट किंवा जैंसर गटातील खडकांवर वसलेले असून ब्लैनी थरांवर क्रोल गटातील खडक वसलेले आहेत. ब्लैनी गटातील पिंडाश्मांच्या थराला ‘ब्लैनी पिंडाश्म’ अथवा ‘ब्लैनी गोलाश्म’ संस्तर असे नाव आहे. हा थर कमी जाडीचा असला, तरी तो वायव्येस कुनीहार व आग्नेयीस नैनिताल असा सु. ३५० किमी. लांब पट्ट्यात आढळतो शिवाय या खडकांना घड्या पडलेल्या आहेत व त्यांच्या विभंगही (तडेही) आढळतात. या वैशिष्ट्यांमुळे सूचक थर (काळ अथवा परस्परसंबंध सूचित करण्याच्या दृष्टीने सहज ओळखू येईल असा खडकांचा थर) म्हणून हा उपयोगी आहे व त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे.

इतर गोलाश्म संस्तरांप्रमाणे हाही बारीक माती व तिच्यात रुतलेले रेखांकित (पृष्ठावर ओरखडे पडलेले) गोटे यांचा बनलेला आहे. हे गोटे क्वॉर्टझाइट, गाळवटी खडक, पाटीचा दगड, चर्ट इ. खडकांचे तुकडे असून १ मी. पर्यंत लांबीचे गोटे आढळतात. हा गोलाश्म संस्तर हिमानी क्रियेने (हिम बर्फाच्या हालचालीद्वारे झीज भर होऊन) बनलेला आहे व तो उत्तर कारबॉनिफेरस (सु. ३१ ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात निर्माण झाला असावा, असे सर्वसाधारण मत आहे. हा थर भारतीय द्वीपकल्पातील तालचेर गोलाश्म संस्तराचा [→ तालचेर माला] समकालीन मानला जातो परंतु याविषयी मतभेद आहेत. काहींच्या मते हा जरी हिमानी क्रियेने बनलेला असला, तरी तो उत्तर कारबॉनिफेरस कालातील हिमयुगाशी संबंधित  नसून तो  कँब्रियन पूर्व (सु. ६० कोटी वर्षांच्या आधीच्या) काळात निर्माण झाला असावा. काहींना हा थर हिमानी क्रियेने निर्माण झाल्याचे मान्य नाही. भूकवचातील खडकां घड्या पडणे, त्यांच्यात विभंग निर्माण होणे इ. भूसांरचनिक क्रियांद्वारे हा बनला असावा, असे काहींचे मत आहे.

ठाकूर, अ. ना.