स्टिल्बाइट : झिओलाइट गटातील हे सिलिकेटी खनिजआहे. याचे एकनताक्ष [⟶ स्फटिकविज्ञान], प्रचिनाकार, वडीसारखे व पातळ स्फटिक जुडग्यांच्या रूपात आढळतात. याचे क्रूसाकार जुळे स्फटिकही आढळतात. ⇨ पाटन : (010) परिपूर्ण असून पाटनपृष्ठाची चमक मोत्यासारखी असते. यावरून चमक अर्थाच्या ग्रीक शब्दावरून स्टिल्बाइट हे नाव पडले आहे. स्फटिकांची चमक काचेसारखी असते. रंग पांढरा, पिवळा तसेच उदी व तांबडा दुधी काचेप्रमाणे पारभासी कठिनता ३.५ — ४ वि. गु. २.१-२.२ [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. Ca(Al2Si7O18).7H2O. यात थोडे सोडियम व पोटॅशियम असते. हायड्रोक्लोरिक अम्लाने याचे अपघटन ( रासायनिक दृष्ट्या तुकडे होण्याची क्रिया ) होते तसेच बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते.
स्टिल्बाइट हे बेसाल्ट व संबंधित खडकांतील पोकळ्यांत आढळते. क्वचित ग्रॅनाइट, पट्टिताश्म व धातुयुक्त शिरा यांतही हे आढळते. झिओलाइट, डॅटोलाइट, प्रेहनाइट व कॅल्साइट ही स्टिल्बाइटाबरोबर आढळणारी इतर खनिजे आहेत. आइसलँड, स्कॉटलंड, नोव्हा स्कोशा, अमेरिका, फेअरो बेटे इ. ठिकाणी स्टिल्बाइट आढळते. महाराष्ट्रातील पुणेभोवतीच्या परिसरात हे आढळते. याला डेस्माइन असेही म्हणतात.
पहा : झिओलाइट गट.
ठाकूर, अ. ना.