ब्रुकाइट : (जुरिनाइट). खनिज, समचतुर्भुजी [⟶ स्फटिकविज्ञान]. याचे पातळ वडीसारखे स्फटिकच आढळतात. ⇨ पाटन : (110) अस्पष्ट. भंजन अर्धशंभाख ते खडबडीत [⟶ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५.५ – ६. वि. गु. ३.९ – ४.१. रंग तांबूस, पिवळा, उदी ते लोखंडासारखा काळा. कस रंगहीन, करडसर किंवा पिवळसर. चमक धातूसारखी ते हिऱ्यासारखी.पारदर्शक ते अपारदर्शक. रा. सं. TiO2रूटाइल व ⇨ ॲनॅटेज या खनिजांचे रासायनिक संघटनही हेच आहे मात्र त्यांचे स्फटिक चतुष्कोणीय असल्याने त्यांचे भौतिक आणि स्फटिकीय गुणधर्म भिन्न असतात. काही अग्निज व रूपांतरित (तापमान व दाब यांचा परिणाम होऊन बदललेल्या) खडकांमधील इतर टिटॅनियमयुक्त खनिजांपासून ब्रुकाइट द्वितीयक (नंतरच्या) क्रियांनी बनते. त्यामुळे काही बदललेले खडक व स्फटिकी सुभाजा (सहज भंग पावणारा रूपांतरित खडक) यांच्यातील पोकळ्यांत हे रूटाइल, ॲनॅटेज, क्वॉर्ट्‌झ इ. खनिजांबरोबर आढळते. कधीकधी प्लेसरांत डबरातील मूल्यवान धातूंचे कण एकत्र गोळा होऊन जमिनीच्या पृष्ठभागी बनलेल्या कणमय साठ्यात याचे लहान स्फटिक विखुरलेले आढळतात. वेल्समध्ये ट्रेमॅडॉकजवळ (ब्रिटिश बेटे), स्वित्झर्लंड, टायरॉल (आल्प्स), उ. कॅरोलायना व आर्‌कॅन्साँ (अमेरिका) या भागांत याचे विपुल स्फटिक आढळतात. यांशिवाय रशिया (उरल पर्वत), ब्राझील व फ्रान्समध्येही हे आढळते. हेन्री जेम्स ब्रुक (१७७१ -१८५७) या इंग्रज खनिजवैज्ञानिकांच्या नावावरून या खनिजाला ब्रुकाइट हे नाव देण्यात आले आहे. ब्रुकाइटाचा दुसरा एक प्रकार काळ्या रंगाचा व अपारदर्शक असून त्याचे स्फटिक षट्‌कोनी द्विप्रसूच्याकार दिसतात [⟶ स्फटिकविज्ञान]. हे खनिज मॅग्नेट कोव्ह, आर्‌कॅन्सॉ (अमेरिका) येथे आढळत असल्यामुळे त्याला ‘आर्‌कॅन्सॉइट’ हे नाव देण्यात आले आहे.

पहा : टिटॅनियम रूटाइल.

ठाकूर, अ. ना.