बॉक्साइट : ॲल्युमिनियमाच्या जलीय ऑक्साइडांच्या मिश्रणाचा बनलेला खडक. हा चूर्णरूप व बहुधा अंदुकाश्मी ते कलायाश्मी (गोलसर सूक्ष्म कणांच्या पुंजक्यांप्रमाणे) संरचनेचा असतो. सामान्यपणे हा कणमय तर कधीकधी संपुंजित घट्ट, मृण्मय इ. राशींच्या रूपात आढळतो. हा बहुतकरून सच्छिद्र असतो मात्र याचा पोत, संरचना व रंग यांत विविधता आढळते. हा कसा उत्पन्न झाला व कशा स्वरूपात आढळतो, यांवर त्याचे भौतिक गुणधर्म अवलंबून असतात. याची कठिनता १ ते ३ व वि. गु. २-२.५५ इतके असते. याची चमक मंद ते मातीसारखी असून याच्यातील लोहाच्या ऑक्साइडांच्या प्रमाणानुसार याचा रंग असतो. याच्या मळकट पांढरा, करडा, पिवळा, गुलाबी, तांबडा, गडद उदी इ. रंगछटा आढळतात. नुसत्या डोळ्यांनी व सुक्ष्मदर्शकानेही यातील घटक खनिजे ओळखणे अवघड असते. क्ष किरणांद्वारे केलेल्या परीक्षणानूसार गिब्साइट [AI(OH)3], बोहेमाइट [AIO (OH)], व डायास्पोर (A1O2) ही यातील प्रमुख घटक खनिजे असून त्यांच्यापैकी कोणते तरी एक विपुल प्रमाणात असते. औद्योगिक बॉक्साइटात बहुधा पहिले दोन घटक प्रामुख्याने असतात व त्यात किमान ३२% ॲल्युमिना (AI2O3) असते. अशा प्रकारे याचे रासायनिक संघटन अनिश्चित असते. याच्यात लोहाची ऑक्साइडे व मृद् खनिजे या प्रमुख अशुद्धी असून बेसाल्टापासून बनलेल्या बॉक्साइटात टिटॅनियमाचे ऑक्साइडही बऱ्याच प्रमाणात असते. अशा तऱ्हेने यात लिमोनाइट, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, गोएथाइट, सिडेराइट, केओलिनाइट, क्लायाकाइट, ल्युकॉक्झीन, रूटाइल, ॲनॅटेज, इ. खनिजे गौण रूपात असतात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम व मँगॅनीज यांची ऑक्साइडे अल्प प्रमाणात असू शकतात. यांशिवाय कधीकधी निओबियम, क्रोमियम, व्हॅनेडियम, झिर्कोनियम, फॉस्फरस, कोबाल्ट, निकेल, कथिल, सोने यांची खनिजे व हिरेही यात आढळले आहेत. बॉक्साईट अगलनीय (वितळण्यास कठीण, वितळबिंदू १,८२०° से.), अनाकार्य (आकार देता येणार नाही असे) व पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) असून बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते.

सी. एस्. फॉक्स यांनी १९२७ साली बॉक्साइटाचे जांभ्याच्या प्रकारचे व टेरा रोसाच्या प्रकारचे असे दोन गट पाडले परंतु सर्व प्रकार यापैकी एका गटात सहजपणे समाविष्ट करता येत नाहीत. बॉक्साइट हे उर्ध्वजनित म्हणजे पावसाच्या जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याच्या क्रियेने बनलेले असून ते विविध प्रक्रियांद्वारे बनते. ॲल्युमिनियमाचे प्रमाण जास्त असणाऱ्या सिलिकेटी खडकांवर एकाआड एक उन्हाळा व पावसाळा असणाऱ्या जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) परिस्थितीत (उष्ण व उपोष्ण कटिबंधांत) दीर्घकाळ वातावरणक्रिया होऊन व निक्षालनाने (विरघळून निघून जाण्याने) त्यांच्यातील सिलिका व इतर घटक निघून जाऊन बॉक्साइट तयार होते. अशा तऱ्हेने बेसाल्टापासून बनलेल्या बॉक्साइटात टिटॅनियम ऑक्साइडाचे प्रमाण जास्त असते उदा., मध्य प्रदेशातील बॉक्साइट. स्फटिकी खडकांपासून अशा तऱ्हेने जागच्या जागी बनलेले बॉक्साइट सामान्यपणे पहिल्या म्हणजे लॅटेराइट गटात येते. त्यामध्ये सामान्यतः गिब्साइटाचे प्रमाण जास्त असते व त्याची संरचना बहुधा कलायाश्मी असते. अशा बॉक्साइटाचे उघडे पृष्ठ खंगराप्रमाणे दिसते व त्याचा उभा छेद कृमीच्या वा अळींच्या मार्गाप्रमाणे नागमोडी वळणाच्या रेषांसारखा दिसतो. उघडे पडल्यास असे बॉक्साइट घट्ट व कठीण होते व त्यामुळे त्या विटांसारखा उपयोग होऊ शकतो. मृत्तिकायुक्त चुनखडक, डोलोमाइट वा मृत्तिका यांवर वातावरणप्रक्रिया होऊनही बॉक्साइट तयार होते. अशा प्रकारे बनलेले चुनखडक व डोलोमाइट यांच्यावरील बॉक्साइट सामान्यतः दुसऱ्या गटातील असते उदा., फ्रान्स व इटली येथील, त्यामध्ये बोहेमाइटाचे प्रमाण जास्त असून ते कणमय वा मातीसारख्या रूपात आढळते मात्र त्याची कलायाश्मी संरचनाही असू शकते. काही वेळा मूळ खडकांवरून वाहून नेले जाऊन बॉक्साइट गाळाच्या खडकांत निक्षेपित झालेले (साचविले गेलेले) असते. डायास्पोर हे बहुधा वातावरणक्रियेने नव्हे, तर रूपांतरणाने (तापमान व दाब यांचा परिणाम होऊन) बनलेले असते. जगात सर्व खंडांत बॉक्साइट आढळत असून याचा जागतिक साठा २ अब्ज टन असावा, असा अंदाज आहे. अमेरिका, फ्रान्स, हंगेरी, युगोस्लोव्हाकिया, रशिया, जमेका, गियाना, ब्राझील, सुरिनाम, मोरोक्को, इंडोनेशिया, मलेशिया, ग्रीस, इटली, गिनी, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, ईस्ट इंडीज, गोल्डकोस्ट, हैती, डोमिनिकन प्रजासत्ताक इ. प्रदेशांत बॉक्साइट आढळते.

भारतामध्ये बिहार (पालामाऊ, रांची, राजमहाल), कर्नाटक (बेळगांव, कॅनरा, चित्रदुर्ग, बाबा बुढण डोंगर), ओरिसा (कालाहांडी, संबळपूर, बोलांगिर), मध्य प्रदेश (जबलपूर, कटनी, शहाडोल, सरगुजा, जशपूर, बिलासपूर), आंध्र प्रदेश (विशाखापटनम्, पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्हे), तमिळनाडू (शेवराय व निलगिरी टेकड्या), गुजरात (जामनगर, खेडा, कच्छ, भडोच, सुरत), केरळ (क्विलॉन, त्रिवेंद्रम, पलनी टेकड्या) जम्मू व काश्मीर (पूंच, नंदागली), महाराष्ट्र व गोवा या राज्यांत बॉक्साइट आढळते. महाराष्ट्रात कोल्हापूर (राधानगरी, उदगीर, रांगेवाडी, धनगरवाडी, वाकी), ठाणे (सालसेट बेट, मालाड टेकड्या, तुंगार टेकड्या), रायगड (मुरूड, रोहा, श्रीवर्धन), सातारा (वाई, महाबळेश्वर), सांगली, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत बॉक्साइट आढळते.भारतात असणारे बॉक्साइटाचे साठे ३६ कोटी टनांपर्यंत असावेत, असा १९६० सालापर्यंत अंदाज होता पण त्यानंतरच्या काळात ओरिसा व आंध्र प्रदेशातील साठ्यांचा विशेष शोध घेतला गेल्याने हे साठे २०० कोटी टनांहूनही अधिक असावेत, असे मानले जाते. त्यांतील निम्मे साठे आंध्र प्रदेश व ओरिसात असून त्यांना पूर्व किनारपट्टीचे साठे असे म्हणतात. महाराष्ट्रात सु. १५ कोटी टनांचे साठे आहेत. भारतात आढळणारे साठे सामान्यतः जांभ्यासमवेत आढळतात व पूर्व किनारपट्टीचे साठे सोडल्यास बाकी सर्व साठे बहुधा बेसाल्टापासून तयार झालेले आहेत. पूर्व किनारपट्टीचे साठे मात्र खोंडालाईट नावाच्या खडकापासून बनलेले आहेत. भारतात १९७७ मध्ये १५, १८, ६८५ टन आणि १९७८ मध्ये १६, ५९, ३६४ टन बॉक्साइटाचे उत्पादन झाले होते.

महाराष्ट्रात १९३४ पासून बॉक्साइटाचे उत्पादन सुरू आहे परंतु रासायनिक संघटनाची अनिश्चितता, मुख्य मार्गापासून दूरवर असणारे साठे व विद्युत् पुरवठ्याच्या अडचणी यांमुळे या उद्योगाची म्हणावी अशी प्रगती होऊ शकली नाही. ॲल्युमिनियमाचे व्यवहारातील महत्त्व वाढत असल्याने व बॉक्साईट हे त्याचे महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असल्याने बॉक्साइटाचे जागतिक उत्पादन वाढत आहे. बॉक्साइटाचे बहुतेक साठे पृष्ठालगत असल्याने त्याच्या जवळजवळ सर्व खाणी उघड्या प्रकारच्या आहेत. सामान्यपणे बॉक्साइटावरील माती, खडक, केरकचरा व वनस्पती राक्षसी यांत्रिक फावड्यांनी काढून टाकतात व नंतर ते सुरुंगाच्या साहाय्याने फोडतात. असे बॉक्साइट नंतर वाहक पट्ट्यांवरून नेऊन साठवितात. पुष्कळदा धुवून व भाजून ते शुद्ध करून घेतात. शेवटी सामान्यतः बेयर पद्धतीने यापासून ॲल्युमिना मिळवितात [→ ॲल्युमिनियम ].

बॉक्साइट हे ॲल्युमिनियमाचे सर्वात महत्त्वाचे धातुक असून ते मुख्यत्वे ॲल्युमिनियम धातू मिळविण्यासाठी वापरले जाते. तसेच तुरटी व ॲल्युमिनियमाची इतर संयुगे बनविण्यासाठी आणि खनिज तेल, पाणी, साखर इत्यादींच्या परिष्करणातील (शुद्धीकरणातील) गाळण्याच्या क्रियेतही ते वापरतात. यांशिवाय अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ), उच्चतापसह (जास्त तापमानाला न वितळता टिकणारे) पदार्थ (उदा., विटा, मुशी), कृत्रिम कुरुविंद, उष्णतारोधी पोर्सलीन व सिमेंट इ. तयार करण्यासाठी बॉक्साइट वापरतात. पोलादाच्या मिश्रधातू, सौंदर्यप्रसाधने, इलेक्ट्रॉनिकी, काच, कागद, कापड, रंगद्रव्य, प्लॅस्टीक, रबर, मृत्तिका इ. उद्योगांमध्ये बॉक्साइटापासून मिळविलेले ॲल्युमिना वापरले जाते. सक्रियित (अधिक क्रियाशील केलेले) बॉक्साइट सच्छिद्र असून ते वायू व द्रव कोरडे करण्यासाठी आणि उत्प्रेरक-वाहक (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता ती कमी तापमानास वा जलदपणे घडवून आणण्याच्या क्रियेत एका संयुगातून मूलद्रव्य अथवा अणूंचा गट दुसऱ्या संयुगात वाहून नेण्यास मदत करणारा) पदार्थ म्हणून वापरतात.  फ्रान्समधील लेस बॉक्स (ले बो) येथे हे प्रथम आढळले व पी. बेर्त्ये यांनी त्याचे प्रथम विश्लेषण केले (१८२१). या गावावरून ए. द्युफ्रेन्वा यांनी त्याला ब्यूक्साइट (beauxite) असे (१८४५-४७) व नंतर आंरी सॅन्त क्लेअर दव्हिल यांनी स्पेलिंगमध्ये सुधारणा करून बॉक्साइट (bauxite) हे नाव दिले.

पहा : ॲल्युमिनियम जांभा-२.

ठाकूर, अ. ना.