संगजिरे : (टाल्क). मॅग्नेशियमाचे एक खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार स्फटिक विरळाच आढळतात. ते बहुधा वडीसारखे आणिबाह्य रूपरेषा समभुज चौकोनी वा षट्‌कोणी असते.[⟶ स्फटिकविज्ञान]. ते पर्णित, संपुंजित, घट्ट, कधीकधी अरीय पर्णित गट या रूपांत आढळते.पाटन : ( 001) उत्कृष्ट.याचे पातळ पत्रे काहीसे लवचिक असून प्रत्यास्थ (स्थितिस्थापक) नसतात. छेद्य. वि. गु. २८२ कठिनता १ (कठिनतेच्या मोस मापकमातील ही सर्वांत कमी प्रमाण कठिनता आहे). याची कापडावर रेघ उमटते व ते सुरीने सहज कापता येते. नखाने यावर ओरखडा काढता येतो. चमक मोत्यासारखी किंवा गिजासारखी. रंग सफरचंदी हिरवा, करडा, पांढरा असतो. याच्या कणमय गूढस्फटिकी संपुंजित प्रकाराला सोपस्टोन (स्टिॲटाइट) म्हणतात. सोपस्टोनाचा रंग पुष्कळदा गडद करडा वा गडद हिरवा असतो. हे दुधीकाचे प्रमाणे पारभासी असून याचा स्पर्श ग्रिजासारखा किंवा साबणासारखा (म्हणून सोपस्टोन) वैशिष्ट्यपूर्ण असतो [⟶ खनिजविज्ञान]. रा.सं.Mg3 (Si4O10) (OH)2 या सूत्राला जवळचे असून यात अल्पसे निकेल, टिटॅनियम, मँगॅनीज इ. असू शकतात. हे सहजपणे वितळत नाही. यावर अम्लांचा परिणाम होत नाही (सोपस्टोनाच्या रेसेलिराइट या प्रकाराचे अम्लाने अपघटन होते). हे बंद नळीत उच्च तापमानापर्यंत तापविल्यास पाणी मिळते. ते पेटविल्यास मंद जांभळा रंग दिसतो (पायरोफिलाइट मात्र निळे होते ). कोबाल्ट नायट्रेटाने हे दमट होते.

संगजिरे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी तयार होणारे) खनिज असून ते ऑलिव्हीन, पायरोक्सिने, अँफिबोले यांसारख्या मॅग्नेशियम सिलिकेटी खनिजांत बदल होऊन बनते. या खनिजांच्या छद्म रूपांत म्हणजे स्फटिकाकार तोच पण संघटन भिन्न असलेल्या रूपांत ते आढळू शकते. अशा रीतीने ते पेरिडोटाइट, पायरोक्सिनाइट, ग्रॅ बो यांसारख्या अग्निज खडकांत आढळते. सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ते रूपांतरित खडकांत आढळते. पेक्टोलाइट खनिज सहज बदलून हे बनते. सोपस्टोन हा जवळजवळ पूर्ण खडक संगजिऱ्याचा बनलेला असून त्याला चांगले पॉलिश करता येते. पॉटस्टोन हा याचा अशुद्घ प्रकार आहे. टाल्क शिस्टसारख्या सुभाज (सहज भंग पावणाऱ्या) खडकात संगजिरे प्रमुख घटक असतो. ट्रेमोलाइट, एन्स्टॅटाइट, सर्पेंटाइन, कोमाइट इ. खनिजे याच्या बरोबर आढळतात.

संगजिरे अम्लरोधी, तसेच उष्णता आणि विजेचे मंद वाहक असते. तसेच त्याच्यावर चांगले कोरीव काम करता येते. यामुळे याच्या (सोपस्टोनाच्या) कापलेल्या फरश्या प्रयोगशाळेतील टेबलांचे माथे, विद्युत्‌ स्विच बोर्ड, भट्ट्यांचे अस्तर, अम्लकुंड, धुलाईचे टब, स्वच्छतागृहातील साधने, उष्णता निरोधक व विद्युत्‌ रोधक इत्यादींसाठी वापरतात. संगजिरे व सोपस्टोन यांचे चूर्ण रंगलेप, रबर, कीटकनाशके, मृत्तिका उदयोग, अस्फाल्ट, छताची सामग्री, कागद, वंगण, खडू, कातडी निर्मिती इत्यादींत मुख्यत: भरणद्रव्य म्हणून वापरतात. कापडाला लागलेले ग्री ज काढण्यासाठी, नायट्रोग्लिसरीन शोषण्यासाठी, खास प्रकारचे पोर्सलीन, उच्चतापसह पदार्थ म्हणून, तसेच रडार, रेडिओ, दूरचित्रवाणी संच व संबंधित उपकरणांत याचा उपयोग होतो. सोपस्टोन कापून व कोरून भांडी, वाडगे, बश्या, मूर्ती, सुशोभनासाठीच्या वस्तू, दौती, वायुज्वालकाचा प्रोथ (जेट) इ. बनवितात. पूर्वी भारत, चीन, ईजिप्त येथे व अमेरिकी इंडियन लोक असा वापर करीत. शिंपी कामात कापडावर खुणा करण्यासाठी याचा प्रकार (टेलर चॉक वा फ्रेंच चॉक) वापरतात. याचा पाटीच्या दगडासारखा प्रकार यापेक्षा अधिक कठिण असतो. संगजिरे दळून टाल्कम पावडर बनवितात व इतर सौंदर्य प्रसाधनांतही ती वापरतात.

अमेरिका, जपान, फिनलंड, दक्षिण कोरिया, इटली, फ्रा न्स, नॉर्वे, ऑस्ट्रिया, ब्राझील, रशिया इ. देशांत संगजिरे आढळते. भारताच्या द्वीपकल्पातील आर्कीयन व धारवाडी खडकांत संगजिरे (स्टिॲटाइट) विस्तृतपणे आढळते. आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, ओरिसा, राजस्थान, प. बंगाल इ. राज्यांत याचे साठे आहेत.

संगजिऱ्यासाठी असलेल्या टाल्क या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती जुनी व शंकास्पद असून तो बहुधा अरबी शब्दावरून आला असावा.

ठाकूर,अ.ना.