फूके, फेर्दिनांद आंद्रे : (२१ जून १८२८ – ७ मार्च १९०४). फ्रेंच भूवैज्ञानिक. ज्वालामुखी व अग्‍निज खडक यांच्याविषयी त्यांनी महत्त्वाचे संशोधन कार्य केले आहे. त्यांचा जन्म मॉर्‌तँ (मांश व फ्रान्स) येथे व शिक्षण पॅरिसला झाले. काही काळ पॅरिस येथे एका प्रयोगशाळेत आणि नंतर काही काळ रासायनिक उद्योगात काम केल्यावर त्यांनी वैद्यकाच्या अभ्यासाद्वारे डॉक्टरेट पदवी मिळविली (१८५८). ते काही काळ कॉलेज द फ्रान्स येथे प्रकृतीविज्ञानाचे प्राध्यापक होते. १८८० साली त्यांची फ्रेंच भूसर्वेक्षण आयोगामध्ये नेमणूक झाली. १८६१ साली त्यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीला भेट दिली व त्यातूनच त्यांना ज्वालामुखीच्या अभ्यासाची गोडी लागली. नंतर तीस वर्षे सर्वत्र हिंडून त्यांनी निर्दिस्त व जागृत ज्वालामुखींचा व धूममुखांचा [ वाफ वा तप्त वायू बाहेर टाकणाऱ्या भूपृष्ठावरील छिद्रांचा → धूममुख] अभ्यास केला. त्यांनी एटना (१८६५) व सांतोरिनी (१८६६) ज्वालामुखींचे उद्रेक पाहिले होते. तसेच लिपारी बेट, व्हीस्यूव्हिअस, सोल्फाटेरा व कँटल येथील ज्वालामुखींचा त्यांनी रसायनशास्त्राच्या दृष्टीने काळजीपूर्वक अभ्यास केला. त्यांनी ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणाऱ्या) द्रव्यांचा व ज्यालामुखीच्या कटाहनिर्मितीचाही अभ्यास केला. [⟶ ज्वालामुखी-२].

खडकांच्या अध्ययनासाठी त्यांनीच प्रथम फ्रान्समध्ये सूक्ष्मदर्शक वापरला. अग्‍निज खडकांतील खनिजे तयार होण्याच्या वेळी कोणती परिस्थिती असते, हे समजून घेण्यासाठी त्यांनी आणि मीशेल लेव्ही यांनी निसर्गातील ज्वालामुखी खडकांप्रमाणे रासायनिक संघटन व संरचना असलेले विविध अग्‍निज खडक कृत्रिम रीतीने तयार केले. भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये स्फटिकीभवन झाल्यास एकाच शिलारसापासून निरनिराळे खडक निर्माण होऊ शकतात, हेही त्यांनी दाखवून दिले. खनिज व रासायनिक संघटन आणि संरचना यांच्यावर आधारलेली ज्वालामुखी खडकांच्या वर्गीकरणाची पद्धती या दोघांनी रूढ केली तसेच आधुनिक शिलावर्णनविज्ञानाचा (प्रत्यक्ष क्षेत्रात, प्रयोगशाळेत डोळ्यांनी व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करून खडकाचे पद्धतशीर वर्णन करणाऱ्या शास्त्राचा) पाया घातला. या दोघांनी मिळून एक पुस्तकही लिहिले आहे. फूके यांनी काही खनिजेही कृत्रिम रीतीने बनविली होती. त्यांनी पुष्कराज (टोपॅझ) या खनिजावर उष्णतेचा काय परिणाम होतो हेही, अभ्यासिले होते. १८८४ साली अँडलूझीया येथे झालेल्या भूकंपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तुकडीचे ते मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १८७६ साली त्यांना क्यूव्ह्ये पदक मिळाले व १८८१ साली त्यांची ॲकॅडेमी डेस सायन्सेसवर निवड झाली आणि १९०१ साली ते तिचे अध्यक्ष झाले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना