लिग्‍निन : काष्ठमय वनस्पती व गवते यांच्यातील एक प्रमुख घटक. वरवर पाहता लिग्‍निन हे बहुवारिकासारख्या (साधे रेणू जोडले जाऊन बनलेल्या मोठ्या रेणूसारख्या) वाटणाऱ्या संयुगांचे मिश्रण असते. यामुळे याचा रेणूभार उच्च (२,००० ते १५,०००) असतो. लिग्‍निन हे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे जटिल (गुंतागुंतीचे) अकार्बोहायड्रेटी रसायन असून याचे रासायनिक संघटन (रा. सं.) ठराविक नसते ते वनस्पतीच्या जातीनुसार बदलते. वाळक्या मऊ शंकुमंत वृक्षांच्या लाकडात २४ ते २५ टक्के आणि वाळक्या कठीण पानझडी वृक्षांच्या लाकडात १७ ते २५ टक्के लिग्‍निन असते. लिग्‍निनाची संरचना पूर्णपणे समजलेली नाही. मात्र शंकुमंत वृक्षांच्या लिग्‍निनात कॉनिफेरील हा तर पानझडी वृक्षांच्या लिग्‍निनात सिरिंजीन हा मुख्य घटक असतो. लिग्‍निन व सेल्युलोज मिळून लाकडाचा मोठा भाग बनलेला असतो तसेच फळांच्या कवचातही लिग्‍निन असते. पृथ्वीवर सेल्युलोजानंतरचे लिग्‍निन हेच सर्वांत विपुलपणे आढळणारे जैव द्रव्य आहे. लिग्‍निनातील घटक सेल्युलोजातील घटकांसारखे असतात. तसेच सेल्युलोजाप्रमाणे लिग्‍निनातूनही वायू व पाणी आरपार जातात. तथापि लिग्‍निनावर सल्फ्यूरिक अम्‍ल व आयोडीन यांची प्रक्रिया केल्यास ते पिवळे होते तर सेल्युलोज या प्रक्रियेमुळे निळे होते.

लाकडाच्या कोशिकाभित्तींमधील (पेशींच्या भिंतींमधील) थरात किंवा तंतुकोशिकांभोवतीच्या पट्‍ट्यात लिग्‍निन एकवटलेले असते, तर तंतूच्या आतील भागाकडे लिग्‍निनाचे प्रमाण घटत जाऊन १२ टक्क्याइतके कमी झालेले असते. सेल्युलोज, अर्धसेल्युलोज व कोशिकाभित्तींवरील इतर द्रव्ये ही लिग्‍निनामुळे चिकटविली जाऊन दृढ होतात. यामुळे झाडाला बळकटी येऊन ते ताठ उभे राहू शकते. परिपक्व होईपर्यंत झाडातील लिग्‍निनाचे प्रमाण वाढत जाते. 

लिग्‍निनाचा रंग सामान्यतः तपकिरी असून त्याच्या अगदी फिकट छटाही असतात. उष्णेतेने हे वितळत नाही पण प्रथम मऊ होऊन नंतर काळे पडते. याचे वि. गु.१.३ ते १.४ असून याचा सहजपणे भुगा होतो. पाणी, तीव्र अम्‍ले (उदा., ७२ टक्क्यांपर्यंतचे सल्फ्यूरिक अम्ल) व हायड्रोकार्बने यांच्यात हे विरघळत नाही.

वनस्पतिघटकांपैकी अपघटनाला (रासायनिक व्रिक्रियेद्वारे रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेला) लिग्‍निनाकडून सर्वाधिक विरोध होता. यामुळे उच्च कोटीच्या कवकांसारखे (हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींसारखे) थोडेच सूक्ष्मजीव लिग्‍निनावर हल्ला करू शकतात. लिग्‍निनाचे जलीय विच्छेदन (पाण्याने रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) व ⇨ ऑक्सिडीभवन सावकाशपणे होते. लिग्‍निनाचा ऱ्हास (क्षय) होऊन निर्माण होणाऱ्या द्रव्यांविषयी पुरेशी माहिती मिळालेली नाही. जसजसा वनस्पतीद्रव्यांचा ऱ्हास होत जातो, तसतसे लिग्‍निन एकत्र साचत जाते आणि ते ⇨ ह्यूमसाचा मुख्य घटक बनते. मात्र ह्यूमसातील लिग्‍निनाचे स्वरूप बदललेले असते. ह्युमसाची निर्मिती होताना सूक्ष्मजीवांकडून प्रथिने निर्माण केली जातात. लिग्‍निनाचा या प्रथिनांशी संयोग होऊन लिग्‍निन-प्रोटिनेट जटिल बनते. त्याच्यामुळे प्रथिने सूक्ष्मजीवांच्या हल्लाला तोंड देऊ शकतात. अशा तऱ्हेने ह्यूमसातील नायट्रोजन त्यात टिकून राहतो किंवा अगदी सावकाशपणे बाहेर पडतो.

विशेषतः उच्च दर्जाचा, पांढरा शुभ्र कागद तयार करताना लाकडाच्या लगद्यातून लिग्‍निन काढावे लागते. त्यासाठी लगद्यावर सल्फर डाय-ऑक्साइड, सोडियम सल्फेट, सोडियम बायसल्फाइट किंवा दाहक (कॉस्टिक) सोडा या विक्रीयाकारकाच्या विद्रावाची प्रक्रिया करतात. परिणामी कागद वा लगदानिर्मितीच्या उद्योगांत सल्फाइट लिकर नावाचा लिग्‍निनयुक्त टाकाऊ पदार्थ निर्माण होतो. लगद्याच्या परिकरणाची व विरंजनाची (रंग घालविण्याची) सुधारलेली तंत्रे वापरात आल्याने लिग्‍निन जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागले. या लिग्‍निनयुक्त टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे हे या धंद्यांतील एक अडचणीचे काम आहे. त्यामुळे लिग्‍निनाचे व्यापारी उपयोग शोधून काढण्याचे प्रयत्‍न करण्यात येऊ लागले. सल्फाइट लिकरमधून निष्कर्षणाने लिग्‍निन मिळविताना त्यात बदल होतात, म्हणून निष्कर्षणाच्या निरनिराळ्या प्रक्रियांद्वारे निरनिराळ्या प्रकारचे लिग्‍निन मिळते.  

पूर्वी जळणाशिवाय लिग्‍निनाचा इतर काही उपयोग होत नसे. अजूनही इंधन म्हणून त्याचा थोड्या प्रमाणात उपयोग केला जातो. मात्र आता त्याचे अन्य महत्त्वाचे उपयोग पुढे आले आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत. कणयुक्त फलक व त्यांसारखे पत्रित फलक, लाकडी वस्तू वगैरेंत बंधक द्रव्य, मृत्तिका उद्योगात फुसफुशीतपणा घालविणारे द्रव्य आणि लिनोलियममध्ये आसंजक (चिकटवणारे) द्रव्य म्हणून लिग्‍निन वापतात. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, फिनॉलिक रेझिनांत इष्ट गुणधर्म आणण्यासाठी, व्हॅनिलिन (व्हॅनिला) हे स्वादकारक, मिथिल मरकॅप्टन व डायमिथिल सल्फाइट मिळविण्यासाठी अस्फाल्ट पायसांच्या स्थिरीकरणासाठी, रबर प्रबलित करण्यासाठी, रंजकद्रव्य एकसारखे पसरले जाण्यासाठी, प्रथिनांचे अवक्षेपण करण्यासाठी, कातडी कमाविण्यासाठी. सफाईकारक द्रव्ये, खते, सौंदर्यप्रसाधने. अग्‍निशामक द्रव्य, लॅकर, प्रक्षालके, कवकनाशके, कीटकनाशके, शाणनाची सामुग्री, वंगणे, व्हार्निशे वगैरे द्रव्ये बनविण्यासाठी लिग्‍निनाचा उपयोग होतो. खनिज तेलाच्या विहिरी खणताना वापराव्या लागणाऱ्या चिखलांत धातूकांच्या (कच्चा रूपातील धातूच्या) निष्कर्षणात करण्यात येणाऱ्या प्लवनामध्ये, विद्युत् विलेपनात व संचायक विद्युत् घटमालांत लिग्‍निन वापरतात. लिग्‍निनापासून मिळणाऱ्या डायमिथिल सल्फॉक्साइडाचा उपयोग कार्बनी द्रव्ये बनविताना मध्यस्थ पदार्थ म्हणून, कृत्रिम तंतूंच्या कताईत व काही औषधीद्रव्यांमध्ये होतो.

लाकूड अर्थाच्या लिग्‍निम या लॅटिन शब्दावरून याचे लिग्‍निन हे नाव पडले असून यालाच झायलोजेन असेही म्हणतात.

पहा : लाकूड सेल्युलोज.

ठाकूर, अ. ना.