स्कँडियम : धातुरूप मूलद्रव्य.रासायनिक चिन्ह डल अणुक्रमांक ( अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या ) २१ अणुभार ४४.९५६ ⇨ आवर्त सारणीच्या ( इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीच्या ) ३ ब गटातील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूमधील मांडणी ) 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d1 4s2 वि.गु. २.९८९° (२०° से. तापमानास ) वितळबिंदू १,५३९° से. उकळबिंदू २,८३२° से. नैसर्गिक स्थिर समस्थानिक [ अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याचा प्रकार ⟶ समस्थानिक ] स्कँडियम (४५) व किरणोत्सर्गी समस्थानिक स्कँडियम (४६).पृथ्वीच्या शिलावरणातील ( कवचातील ) प्रमाण ५ x १०-४ % संयुजा [ अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता ⟶ संयुजा ] ३ रंग करडा, पांढरी रुपेरी व काहीशी मृदू धातू लवणे रंगहीन.

इ. स. १८७१ मध्ये ⇨ दमित्री इव्हानव्ह्यिच मेंडेलेव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञांनी प्रथम या धातूचे अस्तित्व असल्याचे भाकित केले होते आणि त्यांनी या मूलद्रव्याला एका-बोरॉन असे नाव सुचविले तसेच आवर्त सारणीमध्ये तिसर्‍या गटात या मूलद्रव्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती.त्यानंतर १८७९ मध्ये लाझ फ्रेडरिक निल्सॉन यांनी गॅगेलिनाइट व यूक्सेनाइट या ⇨ विरल मृत्तिका खनिजांमध्ये स्कँडिया या नावाचे ऑक्साइड शोधले. त्यांनी मातृभूमीच्या नावावरून या मूल-द्रव्यास स्कँडियम हे नाव दिले. त्यानंतर पर टिओडोर क्लीव्ह यांनी परिकल्पित एका-बोरॉन म्हणजेच स्कँडियम असल्याचे ओळखले. स्कँडियमाच्या व विरल मृत्तिका गटातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साम्य असल्यामुळे स्कँडियमाचा विरल मृत्तिका गटातच समावेश करतात.

स्कँडिनेव्हिया येथील जड विरल मृत्तिका धातुकांमध्ये ( कच्च्या रूपातील धातूंमध्ये ) अगदी थोड्या प्रमाणात, तर कथिल व टंगस्टन मूलद्रव्यांच्या या धातुकांमध्ये काही प्रमाणात स्कँडियम आढळते. तसेच अणुकेंद्रीय भंजन विक्रियेच्या उत्पादांमध्येही ते आढळते. स्कँडियमाची वैश्विक विपुलता सापेक्षतः उच्च आहे. विपुलतेच्या प्रमाणात पृथ्वीच्या कवचात आढळणारे ते पन्नासावे व सूर्यामध्ये आढळणारे तेविसावे मूलद्रव्य आहे. स्कँडियमाची आयनीय त्रिज्येची (०.७३ अँगस्ट्रॉम ) इतर विरल मृत्तिका मूलद्रव्यांच्या सरासरी त्रिज्येशी (०.९६ अँगस्ट्रॉम ) तुलना करता अधिक लहान असल्यामुळे स्कँडियम आयन (Sc३+) सापेक्षत: प्रबल अम्लीय असते आणि तिची जटिल आयन निर्माण करण्याची प्रवृत्ती अधिक जास्त असते. स्कँडियम आयन सम- चुंबकीय असतात.

स्कँडियम ही धातू अविद्राव्य पोटॅशियम-स्कँडियम सल्फेटाच्या अवक्षेपणाने किंवा डायएथिल ईथराने स्कँडियम थायोसायनेटाचे निष्कर्षण करून सहज रीत्या विलग करता येते. ⇨ द्रवणक्रांतिक मिश्रणातील पोटॅशियम, लिथियम आणि स्कँडियम-क्लोराइडांच्या विद्युत् विच्छेदनाने प्रथमतः स्कँडियम धातू तयार करण्यात आली (१९३८). सुमारे ०.०२% स्कँडियम ऑक्साइड असलेल्या डेव्हिडाइट या खनिजामधील युरेनियमाचे निष्कर्षण करताना अगदी अत्यल्प प्रमाणात उपउत्पादक म्हणून ही धातू मिळवितात. स्कँडियमाची घनता कमी व वितळबिंदू उच्च असल्यामुळे हलक्या वजनाच्या मिश्रधातूचा उपयोग अनुप्रयुक्त्यांमध्ये करतात.

आणवीय चितीमधील अर्धायुकाल ८५ दिवस असलेले स्कँडियमाचे किरणोत्सर्गी समस्थानिक प्रबल गॅमा प्रारण उत्सर्जित करतात, म्हणून त्याचा उपयोग प्रारण चिकित्सेमध्ये आणि मार्गण मूलद्रव्यांकरिता करतात.

पहा : संक्रमणी मूलद्रव्ये.

खोब्रागडे, स्नेहा दिलीप