ॲसिलीकरण : एखाद्या कार्बनी संयुगात ॲसिल गटाचा प्रवेश घडवून आणण्याच्या प्रक्रियेस ‘ॲसिलीकरण’ असे म्हणतात. ही संज्ञा ⇨  फ्रीडेलक्राफ्टविक्रियेखेरीज इतर विक्रियांनी घडवून आणलेल्या ॲसिल गटाच्या प्रवेशास लाविली जाते. एखाद्या कार्बनी अम्‍लातील हायड्रॉक्सिल (OH) गट काढून टाकल्यावर जो कार्बनी गट उरतो त्याला ॲसिलगट म्हणतात. उदा., R.COOH याचा

हा व R.SO2OH याचा       हा ॲसिल गट होय. ॲसिल गटाला अम्ल गट असेही म्हणतात.

यातील R हा ॲलिफॅटिक (उदा., CH3), असेही म्हणतात. ॲरोमॅटिक (उदा., C6H5) किंवा ॲलिसायक्लिक संयुगांपासून आलेला गट असू शकतो. [⟶ ॲरोमॅटिक संयुगे; ॲलिफॅटिक संयुगे; ॲलिसायक्लिक संयुगे].

ॲसिलीकरण घडून येण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. ज्या संयुगाचे ॲसिलीकरण इष्ट आहे, त्याच्या रेणूत एक तरी सक्रिय किंवा ज्याचे सहज प्रतिष्ठापन (एक अणू काढून तेथे दुसरा अणू किंवा अणुगट बसविण्याची क्रिया) होऊ शकेल असा हायड्रोजन अणू असावा लागतो व दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिलीकरण घडविणारा विक्रियाकारक (इष्ट रासायनिक विक्रिया घडविणारा पदार्थ) उपलब्ध असावा लागतो.

अल्कोहॉले, फिनॉले, थायोले, प्राथमिक व द्वितीयक अमाइने [→अमाइने], ॲमिनो अम्‍ले, मॅलॉनिक एस्टरे, →—कीटो एस्टरे, →—डाय कीटोने इत्यादींमध्ये वर उल्लेख केल्यासारखे सक्रिय हायड्रोजन अणू असतात. विक्रियाकारक म्हणून सामान्यतः त्या त्या अम्‍ल हॅलाइडांचा विशेषतः अम्‍ल क्लोराइडांचा व अम्‍ल ॲनहायड्राइडांचा उपयोग केला जातो.

ॲसिलीकरणाची विक्रिया : ॲसिलीकरण ही संज्ञा व्यापक आहे. ॲसिटिल गटाचा प्रवेश होत असेल, तर त्या ॲसिलीकरण प्रकारास ⇨ ॲसिटिलीकरण व बेंझॉइल गटाचा प्रवेश होत असेल, तर ‘बेंझॉइलीकरण’ म्हणतात. R.COCl या ॲसिलीकारकाच्या विक्रियेने अल्कोहॉलांपासून एस्टरे बनतात. अमाइनावर R.COCl ची विक्रिया केल्याने प्रतिष्ठापित → अमाइने मिळतात. बेंझॉइलीकरण करण्याच्या शॉटेन-बोमेन या प्रसिद्ध विक्रियेमध्ये हायड्रॉक्सी (OH), ॲमिनो (NH2) किंवा इमिनो (=NH हा एक अथवा दोन कार्बन अणूंना जोडलेला असतो) गट असलेली संयुगे ही बेंझॉइल क्लोराइड या विक्रियाकारकाबरोबर सोडियम हायड्रॉक्साइडाच्या विद्रावात घेऊन हलवितात.

उपयोग : उद्योगधंद्यात कृत्रिम तंतू, औषधे, रंजकद्रव्ये इ. तयार करण्याच्या प्रक्रियांत, तसेच प्राथमिक व द्वितीयक अमाइनांच्या अध्ययनात आणि कार्बनी अम्‍ले, अल्कोहॉले, फिनॉले व अमाइने ही ओळखून काढण्यासाठी ॲसिलीकरणाचा उपयोग होतो.

पहा : तंतू, कृत्रिम तंतू, नैसर्गिक.

संदर्भ : Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.

मिठारी, भू. चिं.