हेल, स्टीफन डब्ल्यू. : (२३ डिसेंबर १९६२). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अतिविभेदनक्षम अनुस्फुरक सूक्ष्मदर्शिकी या सूक्ष्मदर्शका-विषयीच्या विशेष अध्ययन शाखेत मूलभूत स्वरूपाचे कार्य केल्याबद्दल त्यांना एरिक बेटझिग व विल्यम ई. मेर्नर यांच्याबरोबर २०१४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले. रूढ सूक्ष्म-दर्शकांच्या विभेदनाची मर्यादा पार करण्यात हेल यशस्वी झाले. त्यामुळे जीवविज्ञान व वैद्यक यांच्या संशोधनात नवीन महत्त्वपूर्ण शोध लागले. 

 

हेल यांचा जन्म रूमानियातील आराद येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण १९६८–७८ दरम्यान रूमानियात झाले. नंतर ते अभियंते असलेले वडील व शिक्षिका असलेली आई यांच्याबरोबर पश्चिम जर्मनीला स्थलांतरित होऊन, हे कुटुंब लुड्व्हिग्जहाफेन येथे स्थायिक झाले. पुढील शिक्षणासाठी १९८१ मध्ये हेल हायडल्बर्ग विद्यापीठात दाखल झाले वतेथून त्यांनी १९९० मध्ये भौतिकीतील डॉक्टरेट पदवी संपादन केली.या पदवीसाठी त्यांनी ‘इमेजिंग ऑफ ट्रान्स्फरंट मायक्रोस्ट्रक्चर्स इन ए कॉनफोकल (एकच वा तेच केंद्र असलेला) मायक्रोस्कोप’ हाप्रबंध लिहिला होता व त्यासाठी त्यांना घन अवस्था भौतिकीविदझेकाफ्रिट हंक्लिंगर यांनी मार्गदर्शन केले होते. यानंतर काही काळहेल यांनी कॉनफोकल सूक्ष्मदर्शिकीमध्ये अक्षीय (वा गाढ) विभेदनअधिक चांगले करण्यासाठी काम केले. नंतर त्याला फोर पाय् (४ झळ) सूक्ष्मदर्शक म्हणण्यात येऊ लागले. अगदी निकट असलेले सारखेपदार्थ (वस्तू) अलग पाहण्याची शक्यता म्हणजे विभेदन होय आणिम्हणून विभेदन हा सूक्ष्मदर्शकाचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म आहे, असेत्यांनी सुचविले. 

 

हेल यांनी १९९१–९३ दरम्यान हायडल्बर्ग विद्यापीठातील यूरोपियन मॉलिक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरीत संशोधन केले. तेथे त्यांनी फोरपाय् सूक्ष्मदर्शिकीची तत्त्वे विशद करण्याचे काम यशस्वी रीतीने केले. १९९६ सालापर्यंत फिनलंडमधील तुर्कू विद्यापीठात वैद्यकीय भौतिकी विभागात त्यांनी वरिष्ठ संशोधक म्हणून काम केले. तेथे त्यांनी उद्दीपित उत्सर्जन अवक्षय (स्टिम्युलेटेड एमिशन डिप्लेशन एसटीईडी) सूक्ष्म-दर्शिकीचे तत्त्व विकसित केले. १९९३-९४ दरम्यान सहा महिने इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी अभ्यागत वैज्ञानिक म्हणून काम केले. हायडल्बर्ग विद्यापीठातून त्यांनी भौतिकीतील पात्रता वा अर्हता (हॅबिलिटेशन) मिळविली. १९९७ मध्ये त्यांची गटिंगेन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिकल केमिस्ट्री येथे नियुक्ती झाली. १५ ऑक्टोबर २००२ रोजी ते सदर संस्थेचे संचालक झाले. तेथे त्यांनी नॅनोबायोफोटॉनिक्स विभाग सुरू केला. २००३ सालापासून ते हायडल्बर्ग येथील जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरमधील ऑप्टिकल नॅनोस्कोपी (प्रकाशकीय सूक्ष्मातीत निरीक्षण) विभागाचे व हाय रिझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोपी रिसर्च ग्रुपचे (उच्च विभेदन प्रकाशकीय सूक्ष्मदर्शिकी संशोधन गटाचे) प्रमुख आहेत. तसेच ते हायडल्बर्ग विद्यापीठात भौतिकी व ज्योतिषशास्त्र विद्याशाखेत प्राध्यापकही आहेत. ते गटिंगेन विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे सन्माननीय, तर हायडल्बर्ग विद्यापीठात भौतिकीचे साहाय्यकारी प्राध्यापक आहेत. 

 

एसटीईडी सूक्ष्मदर्शिकीचा शोध व नंतरचा संबंधित सूक्ष्मदर्शिकीपद्धतींचा विकास यांच्यामुळे अनुस्फुरक सूक्ष्मदर्शकाची विभेदनक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारणे शक्य झाल्याचे त्यांनी दाखवून दिले. पूर्वी ही विभेदनक्षमता मर्यादित म्हणजे वापरलेल्या प्रकाशाच्या अर्ध्या तरंग-लांबीएवढी ( २०० नॅनोमीटर) होती. अनुस्फुरक सूक्ष्मदर्शकाचे विभेदनाचे विवर्तनापासून कसे वियुग्मीकरण करता येऊ शकेल हे सैद्धांतिक व प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी तसेच विभेदन प्रकाशाच्या तरंगलांबीच्या भागाएवढे (नॅनोमीटर मापाचे) वाढविता येऊ शकेल, हे त्यांनी प्रथम दाखविले. ⇨ अर्न्स्ट कार्ल ॲबे यांच्या १८७३ मधील संशोधनापासून सूक्ष्मदर्शकीविषयीचे महान कार्य शक्य होईल, असे मानले जात नव्हते. हेल यांची प्रकाश सूक्ष्मदर्शिकीविषयीची ही क्रांतिकारक कामगिरी आणि जीवविज्ञान व वैद्यकीय संशोधन अशा इतर वैज्ञानिक क्षेत्रांसाठी त्यांच्या संशोधनाचे महत्त्व (उदा., सजीव कोशिकेचे – पेशीचे –निरीक्षण शक्य झाले) यांमुळे त्यांना जर्मन फाउंडेशन प्रेसिडेंटचे दहावे इनोव्हेशन (नवप्रवर्तन) ॲवॉर्ड २३ नोव्हेंबर २००६ रोजी मिळाले. विविध संदर्भ ज्ञानपत्रिकांमधून त्यांचे शंभराहून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते अनेक ॲकॅडेमींचे सदस्य आहेत. 

 

हेल यांना पुढील अनेक मानसन्मान मिळाले आहेत : प्रकाशकीविषयक इंटरनॅशनल कमिशनचे पारितोषिक (२०००), मापनविज्ञानाचे हेल्महोल्ट्स पुरस्कार (संयुक्तपणे, २००१), कार्ल झाइस संशोधन पुरस्कार (२००२), बेर्थोल्ड लायबिंजर इनोव्हेशन पारितोषिक (२००२), कार्ल हाइन्झबेकुर्ट्स पुरस्कार (२००२), बर्लिन ब्रांडेन बुर्गिश ॲकॅडेमीचा सी.बेन्झ यू. जी. डाइमलर पुरस्कार (२००४), रॉबर्ट बी. वुडवर्ड स्कॉलर (हार्व्हर्ड विद्यापीठ, २००६), अनुप्रयुक्त भौतिकीसाठीचा युलिउसस्प्रिंगर पुरस्कार (२००७), अकादमी डेर विसेशाफ्टन झू गटिंगेनचे सदस्यत्व (२००७), गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स पारितोषिक (२००८), लोअर सॅक्सनी स्टेट पारितोषिक (२००८), यूरोपियन पेटंट (एकस्व) ऑफिसच्या २००८ सालच्या यूरोपियन इन्व्हेंटर म्हणूननामांकन (२००८), नेचर मेथड्समधील २००८ ची मेथड, ओटो-हान–पुरस्कार (२००९), एर्न्स्ट हेल्मट-व्हिट्स पारितोषिक (२०१०), हॅन्सन फॅमिली पुरस्कार (२०११), कार्बेर यूरोपियन सायन्स पारितोषिक (२०११), द गॉथनबर्ग लिझे माइटनर पारितोषिक (२०१०/२०११), माइअनबर्ग पारितोषिक (२०११), फ्रिट्झ बेरन्स फाउंडेशनचे विज्ञान पारितोषिक (२०१२), सन्माननीय डॉक्टरेट पदवी (वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ आराद, २०१२), रूमानियन ॲकॅडेमीचे सन्मान्य सदस्यत्व (२०१२), झुरिक विद्यापीठाचे पॉल कारर सुवर्णपदक (२०१३), लिओपोल्डिनाचे कारस पदक (२०१२), कावली पारितोषिक (२०१४) इत्यादी. त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत आणि ते ज्ञानपत्रिकांचेसंपादन व सल्लागार मंडळावरील सदस्यही आहेत. 

ठाकूर, अ. ना.