चांदी : धातुरूप रासायनिक मूलद्रव्य. चिन्ह Ag. अभिजात धातू. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ४७ अणुभार १०७.८६८ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) पहिल्या गटातील ब विभागात तांबे आणि सोने यांच्या मधे स्थान वि. गु. १०·५ कठिनता (मोस मापक्रमानुसार) २·५ ते ३ (तांबे व सोने यांच्या मधे) वितळबिंदू ९६०·८ से. उकळबिंदू २,१९३ से. समस्थानिकांची (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्यांच्या प्रकारांची) संख्या २५ सामान्य व्यवहारातील चांदी १०७ व १०९ अणुभार असलेल्या समस्थानिकांचे मिश्रण काही समस्थानिक किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारे) कमीत कमी अर्धायुकाल (किरणोत्सर्गी मूलद्रव्याची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) ५ सेकंद (११४ अणुभार) व जास्तीत जास्त ५ वर्षे (१०८ अणुभार) सामान्य संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक)+१ विद्युत्‌ विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १८, १८, १. पृथ्वीच्या शिलावरणातील प्रमाण प्रती दशलक्ष भागांत चार भाग असते. एक हजार भागांत किती भाग चांदी आहे यावरून चांदीची प्रत (फाइननेस) ठरवितात. शुद्ध चांदी ९९९ फाइन असते. चांदीचा वर्ण पांढरा असून तिला झळाळी चांगली असते. ती नरम, तन्य (तार काढता येण्याजोगी) व वर्धनशील (ठोकून पत्रे करता येण्याजोगी) आहे. ती उत्तम उष्णता व विद्युत्‌ संवाहक आहे.

इतिहास : सोने, तांबे आणि चांदी यांचा उपयोग मानव अगदी सुरवातीपासून करीत आला आहे. असा क्रम ठरविण्याचे कारण सोने बऱ्याच वेळा शुद्ध स्वरूपात आढळते, तर तांब्याची खनिजे विपुल प्रमाणात सर्वत्र विखुरलेली आढळतात, चांदीचा क्रम तिसरा ठेवण्याचे कारण एकतर चांदीची खनिजे सर्वत्र पसरलेली नाहीत व ती सल्फाइडांच्या रूपात शिशात दडलेली आढळते. अरण्यातील वणव्यामुळे अथवा वस्त्यांना लागलेल्या आगीत चांदीच्या धातुकामधील (कच्च्या स्वरूपातील धातूमधील) चांदी वितळून बाहेर आली असावी व मानवाला तिचा शोध लागला असावा.

उपलब्ध पुरातन पुरावे व जुने कागदपत्र यांवरून असे म्हणता येईल की, दक्षिण यूरोप व आशिया मायनर या भूभागांत चांदीचा उपयोग दागदागिन्यांसाठी व त्याचप्रमाणे व्यापाराच्या देवघेवीसाठी केला जात असे. हा काळ इ.स.पू. ४००० वर्षाच्या सुमाराचा येतो. त्या काळापासून सोने व चांदी यांची नाणी वापरात आली असावीत. इ.स.पू. २००० वर्षे कॅपाडोशियाचे व्यापारी ॲसिरियाला चांदी पाठवीत असत. इ.स.पू.५०० च्या सुमारास ग्रीसमधील लॉरियम येथील चांदीची खाण प्रसिद्ध होती व पर्शियाचे अथेन्सशी युद्ध झाले त्यावेळी अथेन्सला या खाणीचा भरभक्कम आर्थिक आधार होता. रोमन लोकांनी प्रथम अग्नीचा उपयोग करून चांदी मिळविली व तिचा दागिने तयार करण्यासाठी उपयोग केला. शिशाची अशुद्धी असलेली चांदी तापवून तिच्यातील शिसे बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) ऑक्साइडाच्या रूपाने काढून टाकण्याच्या क्युपेलीकरण या क्रियेचा प्लिनी (इ.स. २३ – ७९) यांच्या लेखनात उल्लेख आढळतो.

भारतीयांना या धातूचे फार प्राचीन काळापासून ज्ञान होते. ऋग्वेदात चांदी व सोने यांच्या मौल्यवान दागिन्यांचा उल्लेख आहे. भारताबरोबर स्पेनचा मसाल्याचा व्यापार होता त्यावेळी स्पेनमधून भारतात चांदी येत असे. स्पेनवर मूर लोकांचे आक्रमण झाल्यानंतर हा व्यापार थंडावला. तेव्हापासून पंधराव्या शतकापर्यंत बोहीमिया व ट्रान्ससिल्व्हानिया येथे चांदीच्या खाणींचा विकास झाला. त्यानंतरचा चांदीच्या साठ्यांचा फार मोठा शोध म्हणजे स्पेनच्या पश्चिमी साम्राज्यातील मेक्सिको, पेरू व बोलिव्हिया या देशांतील चांदीच्या खाणी होत. सोळाव्या शतकानंतरच्या तीनशे वर्षांत चांदी मिळविण्यासाठी पारदमेल (पाऱ्याबरोबर त्या धातूचे मिश्रण करण्याची) पद्धती वापरात होती. १९०० च्या सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये चांदीच्या खाणी सापडल्या व तेथे चांदीचे उत्पादन सुरू झाले.

या वेळेपर्यंत चांदीचे उत्पादन, प्रमुख उत्पादन म्हणून होत असे. पण नंतर चांदीच्या चांगल्या खनिजाचे साठे कमी होत गेल्यामुळे सोने, तांबे, शिसे व जस्त यांच्या धातुकांपासून त्या त्या धातू मिळविताना एक उप-उत्पादन म्हणून चांदीची निर्मिती होऊ लागली. कित्येकदा त्यांमध्ये असणाऱ्या चांदीमुळेच त्या धातूंचे उत्पादन करणे फायद्याचे होते. क्युपेलीकरण पद्धत एकोणिसाव्या शतकापर्यंत वापरात होती. १८५० पासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ७०% चांदी क्युपेलीकरण पद्धतीने उप-उत्पादन म्हणून मिळविली जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी चांदी मिळविण्याच्या सायनाइड पद्धतीचा शोध लागला.

चांदीचा आणि सोन्याचा उपयोग विनिमयासाठी, नाण्यांसाठी त्याचप्रमाणे दागदागिने व शोभेच्या वस्तू यांसाठी होऊ लागल्यावर चांदीची मागणी वाढली. औद्योगिक क्षेत्रात व तंत्रविज्ञानात चांदीचा उपयोग माहीत झाल्यावर ही मागणी फार वाढली. त्यामुळे चांदीच्या शुद्धतेवर नियंत्रण आवश्यक झाले. शुद्ध चांदी अतिशय नरम असल्यामुळे तीवर काम करण्यासाठी तीत थोडे तांबे मिसळावे लागते. ही भेसळ साधारणपणे १० टक्क्यांच्या आत असते. इंग्लिश स्टर्लिंग या मिश्रधातूत ९२५ भाग चांदी व ७५ भाग तांबे असते. स्टर्लिंगची सुरूवात इ.स. १२०० मध्ये झाली. स्टर्लिंग हा शब्द ईस्टलिंग या शहराच्या नावाचा संक्षेप आहे. पूर्व जर्मनीतील काही शहरांत ही मिश्रधातू बनविली जात असे. प्रमाणीकरण कचेरीतून चांदीच्या प्रत्येक पाटावर त्याच्या प्रतीचा शिक्का मारून घ्यावा लागतो. या शिक्क्यात मिश्रचांदी बनविणाऱ्या कंपनीचे नाव व वर्ष ही लिहिलेली असतात.

उपस्थिती : नॉर्वे, चिली व पेरू हे देश चांदीबद्दल प्रसिद्ध आहेत. इतर धातूंच्या मानाने चांदीची शिलावरणातील उपस्थिती अल्प आहे आणि ती बरीच विखुरलेली आहे. इतर धातूंबरोबर मिश्ररूपात बहुधा ती आढळते तर क्वचित मुक्तावस्थेतही आढळते, नॉर्वेमध्ये ७०० किग्रॅ. वजनाचा चांदीचा गोळा सापडला होता अशी नोंद आहे.

भारतात बिहारमधील टण्डू, कर्नाटकातील कोलार व हुट्टी येथील सोन्याच्या खाणींतून व राजस्थानमधील झवार येथील जस्त-शिशाच्या खाणीत थोडी चांदी सापडते. हिमाचल प्रदेशात सतलजच्या खोऱ्यात ३,३०० मी. उंचीवर नैसर्गिक शुद्ध रूपात चांदी मिळते. उंचीमुळे व इतर अडचणींमुळे हा भाग अद्याप अशोधित राहिला आहे.

चांदीची प्रमुख धातुके पुढील होत : अर्जेटाईन अथवा सिल्व्हर ग्लान्स (Ag2S ८७·१% चांदी), सेरार्जिराइट अथवा हॉर्न सिल्व्हर (AgCl ७५·३% चांदी), पायरार्जिराइट अथवा रूबी सिल्व्हर (Ag3SbS3 ५९·९% चांदी), पॉलिबेसाईट (Ag16Sb2S11 ७५·६% चांदी), प्राउस्टाइट (Ag2AsS3 ६५·४% चांदी). यांशिवायही चांदीची इतर धातुके आहेत. उदा., स्टेफानाइट, टेल्यूराइट, अर्जेंटिफेरस टेट्राहाइड्राइट, स्टोमायराइट व पियरसाइट. अँटिमनी व आर्सेनिक या धातूंच्या सल्फाइडांबरोबर घन विद्रावांच्या (ज्यांतील एका प्रकारच्या अणूंच्या अथवा रेणूंच्या जागी दुसऱ्या प्रकारचे अणू वा रेणू आलेले आहेत व ज्यांची मूलभूत स्फटिक रचना बदललेली नाही अशा एकजिनसी घन पदार्थांच्या) रूपात आणि शिसे, सोने व तांबे यांच्या बहुतेक धातुकांत चांदी थोडीफार असतेच.


चांदीचे बहुतेक सर्व धातुक निक्षेप (साठे) एकतर निरनिराळ्या खडकांमध्ये शिलारसातील जलतापीय विद्रावांनी प्रतिष्ठापन होऊन वा खडकांत असणाऱ्या पोकळ्या या विद्रावांनी भरल्या जाऊन व त्यांचे स्फटिकीभवन होऊन तयार झालेले असतात. प्रतिष्ठापनाच्या प्रक्रियेने तयार झालेले चांदीचे घन आणि शिरांच्या स्वरूपातील निक्षेप असंख्य आहेत. परंतु जगातील बरीचशी चांदी खडकातील कमी व मध्य खोलीवरील पोकळ्या जलतापीय विद्रावांनी भरून तयार झालेल्या निक्षेपातून मिळते. मेक्सिको व चिली येथे सल्फाइडांचे द्वितीयक समृद्धीकरण होऊन तयार झालेले [ ऑक्सिडीकरण होऊन चांदीचे प्रमाण वाढलेले, ⟶ऑक्सिडीभवन] निक्षेप आढळतात.

प्राप्ती : धातुकापासून चांदी मिळविण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. (१) शिशाबरोबर मिश्रधातू बनवून नंतर शिशाचे ऑक्सिडीकरण करून (क्युपेलीकरण पद्धतीने) शिसे काढून टाकणे वा पॅटिन्सन यांच्या पद्धतीनुसार मिश्रधातू वितळवून शुद्ध शिसे स्फटिकीकरणाने निराळे करणे वा पार्केस यांच्या पद्धतीने वितळत्या जस्ताबरोबर चांदी एकत्र करून नंतर जस्त काढून टाकणे. (२) मेक्सिकोमधील पद्धतीनुसार पाऱ्याशी चांदीचा पारदमेल घडवून नंतर पारा ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून) निराळा करून चांदी मिळविणे. (३) विरल सोडियम वा पोटॅशियम सायनाइडामध्ये ऑक्सिजनाच्या उपस्थितीत चांदी विरघळवून नंतर जस्ताच्या साहाय्याने तिचे अवक्षेपन करणे (न विरघळणाऱ्या घन पदार्थात रूपांतर करणे). या पद्धतीला सायनाइड पद्धती वा ओली पद्धती असे नाव आहे. पहिल्या दोन पद्धती आता वापरात नाहीत.

पारदमेल पद्धती : मेक्सिकोमध्ये १५५७ साली बार्तोलोमे ओ द मेदिना यांनी जळणाच्या कमतरतेमुळे या पद्धतीचा शोध लावला.

या पद्धतीत धातुकामधील चांदीचे प्रथम तिच्या क्लोराइडात रूपांतर करतात. मूळ धातुकात चांदी, तिचे क्लोराइड व सल्फाईड आणि बराचसा खडक असतो. त्याचे सूक्ष्म चूर्ण करून त्यात भाजलेल्या क्युप्रिक व फेरिक सल्फेट असलेल्या पायराइटांचे चूर्ण व पारा मिसळून सर्व मिश्रण एकत्र मळतात. या मळणीमुळे सिल्व्हर क्लोराइड व सूक्ष्मकणी पारा यांच्या विक्रियेने चांदी निराळी होते आणि पारा व चांदी एकत्र येऊन त्यांचा पारदमेल तयार होतो. हे करताना पारदमेलाची सूक्ष्म भुकटी तयार होते व ती धुण्यात वाहून जाऊ नये यासाठी पाऱ्यात एक टक्का सोडियम मिसळतात. पारदमेल होऊन उरलेला जादा पारा जाड कापडाच्या पिशव्यांत घालून दाबल्यानंतर बाहेर पडतो. अवशिष्ट पारदमेल लोखंडाच्या पात्रांत तापविला जातो. त्यामुळे पाऱ्याची वाफ होते आणि चांदी मुक्त होते. पाऱ्याची वाफ इतरत्र नेऊन थंड करून पारा परत मिळविता येतो. १९०४ पासून या पद्धतीऐवजी सायनाइड पद्धती प्रचलित झाली आहे.

सायनाईड पद्धती : या पद्धतीत धातुकाचे सूक्ष्म चूर्ण करून त्याचे ०.४ टक्के सोडियम सायनाइडाच्या विद्रावाने अपक्षालन केले जाते. अपक्षालन याचा अर्थ विद्राव्य (विरघळणारा) घटक धुण्याच्या क्रियेने विरघळून निराळा करण्याची क्रिया. अपक्षालनाची क्रिया चालू असता हवेच्या प्रवाहाने अवपंक (म्हणजे गाळ) घुसळता ठेवावा लागतो. या प्रक्रियेत सोडियम अर्जेंटो सायनाइड [NaAg (CN)2] हे विद्राव्य संयुग बनते. त्याचा विद्राव गालन क्रियेने निराळा करून त्यातून जस्ताच्या साहाय्याने चांदीचे ⇨ क्षपण केले जाते.

रजत-संहतिवर्धन पद्धती : शिशाच्या धातुकात एक टक्क्याहून कमी प्रमाणात चांदी असेल, तर तिची संहती (प्रमाण) वाढवावी लागते. त्याकरिता एका पद्धतीत धातुक तापवून व वितळवून थंड केले जाते. शिशाच्या गोठणबिंदूच्या थोड्या खालच्या तापमानास शिशाचे स्फटिक वेगळे होतात. शिशात चांदीची अशुद्धी असल्यामुळे शुद्ध शिशाच्या गोठणबिंदूपेक्षा हा गोठणबिंदू कमी असतो. हे शिशाचे स्फटिक काढून घेतले जातात. अशाप्रकारे शिसे निराळे होत होत ३०३ से. तापमानास शिसे व चांदी निराळी होऊ लागतात. त्यावेळी चांदीचे त्या धातु-विद्रावातील प्रमाण २.२५ टक्के इतके असते. अशाप्रकारे / शिसे वेगळे केले जाते. रजत-संहती वाढल्यावर क्युपेलीकरण पद्धतीचा उपयोग करून चांदी निराळी केली जाते. शिशामधील रजतवर्धन करण्याच्या या पद्धतीला पॅटिन्सन पद्धती असे नाव आहे.

शिसे व जस्त या धातू एकमेकींत अल्प प्रमाणात विरघळतात. वितळलेल्या शिशात १.६ टक्के जस्त विरघळते, तर वितळलेल्या जस्तात १·२ टक्के शिसे विरघळते (९३५ से. तापमानास या धातू एकमेकींत पूर्णपणे मिसळू शकतात). ५४० से. तापमानास जितकी चांदी शिशात विरघळते त्याच्या तीनशे पट चांदी त्याच तापमानास तितक्याच वजनाच्या जस्तात विरघळते. पार्केस यांनी १८५० मध्ये शोधून काढलेल्या पद्धतीत रजतसंवर्धनासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो. चांदी असलेल्या वितळलेल्या शिशात एक ते दोन टक्के जस्त मिसळतात. या जस्तात शिशातील चांदी (व थोडेसे शिसे) विरघळते, व ही जस्त- चांदी मिश्रधातू वितळलेल्या शिशाच्या पृष्ठभागी तरंगू लागते. थंड केल्यावर ती घनरूप होते. पुन्हा एकदा जस्त मिसळले जाते. पृष्ठभागावरील पापुद्रा एका लांब दांडा असलेल्या सच्छिद्र पात्राने काढून घेऊन कोळशाच्या भुकटीबरोबर मिसळून बकपात्रात भरपूर तापवतात. या जागी जस्ताची वाफ होऊन जाते व खाली ३.५ ते ४ टक्के चांदी असलेला शिशाचा विद्राव शिल्लक राहतो. अशाप्रकारे शिशामधील चांदीचे प्रमाण वाढविले जाते. यानंतर क्युपेलीकरण पद्धतीने शिशापासून चांदी निराळी केली जाते किंवा विद्युत्‌ विच्छेदनाने (विद्रावातून विद्युत्‌ प्रवाह नेऊन घटक वेगळे करण्याच्या पद्धतीने) चांदी वेगळी करता येते.

अवपंक प्रद्रावण पद्धती : विद्युत्‌ विच्छेदनाने तांबे शुद्ध केल्यानंतर धनाग्राजवळ जो गाळ जमतो त्यापासून प्रद्रावण पद्धतीने चांदी मिळवता येते. प्रद्रावण म्हणजे इतर द्रव्यांपासून वितळलेल्या स्वरूपात धातू वेगळी करणे. ही एक महत्त्वाची पद्धती आहे. हा गाळ सल्फ्यूरिक अम्लात घालून त्यात हवा प्रवाहित केली म्हणजे तांबे विरघळून जाते. तांब्याबरोबर थोडे सेलेनियम व टेल्युरियमही त्यात विरघळतात.

गाळावर वरील प्रक्रिया केल्यानंतर तो सुकवून त्यात कॅल्शियम कार्बोनेट, वाळू व टाकणखार यांपैकी योग्य अभिवाह (धातूमधील किंवा तिच्या पृष्ठावरील अशुद्धी विरघळवून धातू वितळविण्यास सुलभ करणारा पदार्थ) घालून छोट्या परावर्तन भट्टीत (जळणाशी प्रत्यक्ष संबंध न येता त्याच्या ज्योतीच्या उष्णतेशी संबंध येईल अशा रचनेच्या भट्टीत) गाळाचे प्रद्रावण केले जाते. प्रद्रावणानंतर हलक्या धातू मळीत जातात व खाली सुवर्णयुक्त चांदी-हेमरज अथवा रजसु-मिळते. हेमरज थंड होण्याच्या आधी साच्यात ओतून तिची धनाग्रे बनवितात. ती वापरून योग्य विद्युत्‌ प्रवाह घनता राखल्यास ९९·९ टक्के शुद्ध चांदी ऋणाग्राशी मिळते. ती सुईच्या आकाराच्या स्फटिकरूपात असते. या स्फटिकांपासून शुद्ध चांदीचे पाट बनवितात.

वरील पद्धतींशिवाय अलीकडे चांदीची नाणीही व्यवहारातून काढून घेतली जात असून त्यांतील चांदी तसेच चित्रपट उद्योगात निरुपयोगी झालेल्या फिल्मवरील चांदीच्या संयुगांपासूनही चांदी परत मिळविली जात आहे.


रासायनिक गुणधर्म : शुद्ध चांदीवर शुद्ध हवेचा वा शुद्ध ऑक्सिजनाचा काही परिणाम होत नाही. परंतु नेहमीच्या वातावरणातील ऑक्सिजनासह असलेल्या हायड्रोजन सल्फाइडामुळे तिचा पृष्ठभाग काळसर होतो. केवळ हायड्रोजन सल्फाइडाचा चांदीवर परिणाम होत नाही, परंतु ऑक्सिजनाच्या उपस्थितीत तो होतो. अंड्यातील कार्बनी गंधक संयुगामुळे चांदीचे चमचे काळे पडतात.

ऊर्ध्वपातित पाण्यात ऑक्सिजन विरघळलेला असला, तर त्या पाण्यात प्रती लिटर ०·०३७ मिग्रॅ. चांदी विरघळते व हेच पाणी जर काचपात्रात असेल, तर ०·००३ मिग्रॅ. इतकी जास्त चांदी विरघळते.

चांदीवर क्लोरीन वायूचा विशेष लवकर परिणाम होतो. त्यामानाने ब्रोमीन, आयोडीन व गंधक यांचा परिणाम सावकाश होतो. चांदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचा तसेच विरल सल्फ्यूरिक अम्लाचा परिणाम होत नाही. परंतु उकळत्या संहत सल्फ्यूरिक अम्लात तसेच विरल नायट्रिक अम्लात ती विरघळते. उकळत्या सल्फ्यूरिक अम्लाबरोबरच्या चांदीच्या विक्रियेत सिल्व्हर सल्फेट व सल्फर डाय-ऑक्साइड वायू हे बनतात व सौम्य नायट्रिक अम्लात सिल्व्हर नायट्राइट आणि नायट्रिक ऑक्साइड वायू हे तयार होतात.

हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया न होण्याचे कारण असे की, चांदीच्या पृष्ठभागावरच तिच्या क्लोराइडाचा थर बसतो आणि पुढील विक्रिया (सिल्व्हर क्लोराइड हायड्रोक्लोरिक अम्लात अथवा पाण्यात अविद्राव्य असल्यामुळे) थांबते. गरम संहत हायड्रिआयोडिक अम्लात चांदीचे चूर्ण विरघळविल्यास सिल्व्हर आयोडाइड आणि हायड्रोजन वायू तयार होतात. पण हायड्रोफ्ल्युओरिक अम्लाचा चांदीवर मुळीच परिणाम होत नाही.

उपयोग : चांदीचे अनेक उपयोग आहेत. दागिने, पात्रे तसेच नाणी बनविण्यासाठी आणि विनिमयासाठी चांदीचा उपयोग होतो. तसेच औषधांसाठी व निर्जंतुक पात्रे बनविण्यासाठीही चांदीचा उपयोग होतो. चांदीच्या तौलानिक दुर्मिळतेमुळे व किंमतीमुळे सोन्याबरोबरच तिलाही अभिजात धातू म्हणून मान्यता मिळालेली आहे. चांदीच्या संयुगांचा उपयोग औषधांत करतात. छायाचित्रणात, विद्युत्‌ आणि इलेक्ट्रॉनीय उपकरणांत तसेच मिश्रधातूंत व डाख देण्यासाठी लागणाऱ्या मिश्रधातूंत चांदीचा फार उपयोग होतो.

विद्युत्‌ व इलेक्ट्रॉनीय उपकरणांत चांदीचा उपयोग तिच्या उत्तम विद्युत्‌ संवाहकता, उत्तम उष्णता संवाहकता व क्षरण (झीज) आणि ऑक्सिडीभवनास विरोध या गुणांमुळे होतो. चांदीचा नरमपणा, उच्च विद्युत्‌ प्रवाहामुळे वितळणे आणि यांत्रिक भंगुरता हे चांदीचे अवगुण योग्य मिश्रधातू बनवून टाळता येतात.

उत्तम चकाकी असलेल्या चांदीच्या पृष्ठभागावरून ९५% प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे धातूवर चांदीचा मुलामा देऊन आरसे केले जातात. त्याचप्रमाणे चांदीच्या संयुगाचे क्षपण करून काचेवर चांदीचा थर देऊनही आरसे बनवितात. चांदीच्या संयुगावर प्रकाशीय परिणाम होत असल्यामुळे छायाचित्रण फिल्मवर चांदीच्या आयोडाइड, क्लोराइड किंवा ब्रोमाइड या संयुगाचा पातळ थर दिलेला असतो. पिचलेले हाड जोडण्यासाठी हाडांतील सांध्यासाठी चांदीचे पत्रे, सळ्या वगैरेंचा उपयोग होतो. काही ऑक्सिडीकारक विक्रियांमध्ये व अमोनियापासून खते तयार करण्यासाठी चांदीचा उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून वापर करतात. विद्युत्‌ संचायक घटमालेत व विद्युत्‌ विलेपनात चांदीचा उपयोग होतो. चांदीच्या दोन तारांच्या टोकांमध्ये पाण्याखाली विद्युत्‌ प्रज्योत पाडून कलिलरूप (अतिसूक्ष्म कणांच्या रूपातील) चांदी मिळवता येते. कलिलरूप चांदीचा औषधात उपयोग करतात.

मिश्रधातू : चांदीच्या मिश्रधातू चांदीपेक्षा कठीण असतात. चांदी उत्कृष्ट विद्युत्‌ व उष्णतावाहक आहे, पण फार मऊ असल्यामुळे तीच्यामध्ये १०% तांबे व थोडे कॅडमियम ऑक्साईड मिसळून बनविलेली मिश्र धातू विद्युत्‌ उपकरणात वापरणे सोयीचे असते. २८% तांबे मिसळून केलेली मिश्रधातू ७७९ से. ला वितळते. शुद्ध चांदी ९६० से. ला वितळते.

सोने किंवा पॅलॅडियम व चांदी यांच्या मिश्रधातू मऊ व तन्य असतात. त्या रत्नजडित अलंकार करण्यासाठी व विद्युत्‌ संपर्ककारी (एका संवाहकामधून दुसऱ्या संवाहकात विद्युत्‌ प्रवाह वाहून नेताना ज्यांचा स्पर्श होतो असे संवाहकांचे भाग) म्हणून वापरतात. ४०-५० पॅलॅडियम किंवा यापेक्षा जास्त प्रमाणात सोने असलेल्या मिश्रधातू सल्फाइड निरोधक असतात.

विमानांच्या इंजिनात वापरण्यात येणारे धारवे (फिरते दंड योग्य स्थितीत राखण्यासाठी दिलेले आधार, बेअरिंग) बनविण्याच्या मिश्रधातूंचा एक घटक चांदी असते. चांदी, कथिल व थोड्या प्रमाणात तांबे व जस्त यांची बारीक पूड पाऱ्याबरोबर मिसळली तर ते मिश्रण कोठी तापमानास (सर्वसाधारण तापमानास) थोडा वेळ मऊ राहून नंतर कठीण बनते. असे मिश्रण किडलेले दात भरण्यासाठी वापरतात.

विषबाधा : चांदीची विरघळणारी संयुगे अविद्राव्य संयुगांपेक्षा विषारी असतात. चांदीच्या संयुगांच्या कारखान्यात काम करणाऱ्यांना सततच्या संपर्कामुळे ‘अर्जेरिया’ नावाचा रोग होण्याचा संभव असतो. यात कातडीचा रंग राखी, निळा आणि काळासुद्धा पडतो. हा फरक सूर्यप्रकाशामुळे अधिक उठून दिसतो. बाह्यतः निरूपद्रवी वाटणारी ही स्थिती कायमची होऊन बसते. जठर-आंत्रीय ऊतकांचा (पोट व आतडे यांतील समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा) दाह हे विषबाधेचे लक्षण होय. याला उपाय म्हणून मिठाचे पाणी रोग्याला देतात. चांदीच्या विद्राव्य लवणांचे रूपांतर अविद्राव्य सिल्व्हर क्लोराइडात होते व विषबाधेस उतार पडतो.

संयुगे : रासायनिक दृष्ट्या चांदी हा एक मूलधातू पहिल्या गटाच्या व विभागातील आहे. त्याची संयुजा एक आहे. Br, I यांसारख्या वर्णहीन धनायनांबरोबर (विद्युत्‌ विच्छेदनात धनाग्राकडे जाणारे ऋण विद्युत्‌ भारित अणू, रेणू व अणुगट यांच्याबरोबर) त्याची रंगीत लवणे बनतात. या त्यांच्या रंगामुळे ही लवणे काही प्रमाणात सहसंयुजी (अणूंमध्ये एक वा अधिक इलेक्ट्रॉन समाईक होऊन तयार झालेली) असतात, या दृष्टीकोनाला पुष्टी मिळते. चांदीची फक्त तीन साधी लवणे नायट्रेट, फ्ल्युओराईड व परक्लोरेट ही पाण्यात विरघळणारी ॲसिटेट, क्लोरेट, नायट्राइट व सल्फेट पाण्यात काहीशी विरघळणारी आणि इतर सर्व पाण्यात अविद्राव्य आहेत. बरीचशी अविद्राव्य लवणे अमोनिया, सायनाइड किंवा थायोसल्फेट वा हॅलाइडांबरोबर जटिल आयन (विद्युत्‌ भारित अणुगट) बनवून पाण्यात विरघळतात. फ्ल्युओराइड, परआयोडेट व परक्लोरेट ही लवणे सजल आहेत.

चांदीची काही संयुगे व त्यांचे गुणधर्म आणि उपयोग खाली दिले आहेत.

सिल्व्हर नायट्रेट : AgNO3. याला ल्यूनर कॉस्टिक असेही नाव आहे. शुद्ध चांदी विरल नायट्रिक अम्लात विरघळवून तयार झालेल्या विद्रावाचे सावकाश बाष्पीभवन केल्यास सिल्व्हर नायट्रेटाचे स्फटिक मिळतात. हे संयुग महत्त्वाचे असून पाण्यात सहज विरघळते. तापविल्यास त्याचे अपघटन होऊन (रेणूचे तुकडे पडून लहान रेणू वा अणू बनणे) चांदी, नायट्रोजन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन हे तयार होतात. या संयुगावर प्रकाश किरणांचा परिणाम होतो म्हणून ते व त्याचा विद्राव रंगीत बाटलीत ठेवतात. ते वर्णहीन असते. कातडीला तसेच कार्बनी संयुगाच्या सान्निध्यात आल्यास काळा डाग पडतो. पोटात गेल्यास विषारी असून प्राणघातक ठरण्याची शक्यता असते. याचे सहज क्षपण होऊन चांदी धातुरूपात मिळू शकते. नेत्रविकारावरील औषधांत, आरसे बनविण्यासाठी, कपड्यावरील खुणेची शाई तयार करण्यासाठी आणि चांदीची इतर संयुगे बनविण्यासाठी याचा उपयोग हातो.


सिल्व्हर ऑक्साइड : Ag2O. चांदीचे तपकिरी रंगाचे हे संयुग पाण्यात जवळजवळ अविद्राव्य आहे. चांदीचे चूर्ण पंधरा वातावरणात दाबाखाली ऑक्सिजनाच्या वातावरणात ३०० से.पर्यंत तापविल्यास हे संयुग मिळते. हे बनविण्यासाठी सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात सोडियम, पोटॅशियम किंवा बेरियम हायड्रॉक्साइडाचा विद्राव मिसळतात. व मिळणारा तपकिरी साका गालन क्रियेनंतर ६० ते ८० से. तापमानास सुकवितात. साका कोरडा झाल्यावर बराच काळपट तपकिरी होतो (जल विद्रावात चांदीचे हायड्रॉक्साइड तयार होत नाही).

सिल्व्हर ऑक्साइड तापविल्यास चांदी व ऑक्सिजन मिळतात. ते ओलसर असताना हायड्रॉक्साइडाप्रमाणे त्यांची विक्रिया होते. अमोनियम हायड्रॉक्साइडात त्याचे डायअमाइन सिल्व्हर हायड्रॉक्साइड, [Ag (NH3)2] OH बनते. हे विद्राव्य आहे. बराच वेळ ठेवल्यास ते स्फोटक बनते. रंग व काचेचे पॉलिश बनविण्यासाठी, पाणी शुद्ध करण्यासाठी, उत्प्रेरक म्हणून, विद्युत्‌ घटातील अग्रांसाठी व औषधांत सिल्व्हर ऑक्साइडाचा उपयोग होतो.

सिल्व्हर हॅलाइडे : चांदीची क्लोराइड, ब्रोमाइड व आयोडाइड ही हॅलाइडे महत्त्वाची आहेत.

सिल्व्हर क्लोराइड : AgCl वर्ण पांढरा. निसर्गात आढळणाऱ्या या संयुगास हॉर्न सिल्व्हर असे नाव आहे. सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात कोणत्याही जलीय क्लोराइडाची भर घातली की, ताबडतोब सिल्व्हर क्लोराइडाचा पांढरा साका मिळतो. अमोनिया, पोटॅशियम सायनाइड वा पोटॅशियम थायोसल्फेटाच्या विद्रावामुळे जटिल आयन तयार झाल्यामुळे सिल्व्हर क्लोराइड विरघळते. हायड्रोजन वायूच्या प्रवाहात सिल्व्हर क्लोराइड तापवून पुन्हा चांदी मिळविता येते.

याचा उपयोग छायाचित्रणात होतो. त्याचप्रमाणे विश्वकिरणांच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या अतिशय भेदक किरणांच्या) अभ्यासामध्ये आयनीभवन अभिज्ञातक (आयन निर्माण झाल्याची क्रिया निदर्शित करणारा) म्हणून उपयोग होतो.

सिल्व्हर ब्रोमाइड : AgBr. वर्ण फिक्कट पिवळा. सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात जलीय ब्रोमाइडाची भर घातल्यावर सिल्व्हर ब्रोमाइडाची निर्मिती होते. या संयुगावर प्रकाशाची विक्रिया झाल्यास ते काळे पडते. पाणी व विरल नायट्रिक अंमलात ते मोठ्या प्रमाणात विरघळते. विरल अमोनिया विद्रावात अंशतः विरघळून [Ag (NH3)n]+ Br हे जटिल संयुग निर्माण होते. सिल्व्हर ब्रोमाइडाचा छायाचित्रणात उपयोग होतो.

सिल्व्हर आयोडाइड : AgI. वर्ण पिवळा. सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात पोटॅशियम आयोडाइटाच्या विद्रावाची भर घातल्याने हे संयुग बनते. निसर्गात आयोडिराइट नावाच्या खनिजात आढळते. या संयुगावर प्रकाशाचा परिणाम होऊन ते काळे पडते. विरल नायट्रिक अम्ल व अमोनियम हायड्रॉक्साइडामध्ये ते विरघळत नाही, पण सोडियम थायोसल्फेट आणि पोटॅशियम सायनाइड यांच्या विद्रावात ते विरघळते. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांवर सिंचन करण्यासाठी तसेच छायाचित्रणात त्याचा उपयोग होतो.

सिल्व्हर हॅलाइडांचा छायाचित्रणात उपयोग : छायाचित्रणासाठी वापरावयाच्या फिल्मवर (वा काचेवर) सिल्व्हर हॅलाइडमिश्रित जिलेटिनाचा अतिशय पातळ थर दिलेला असतो. कॅमेऱ्यातील भिंगामधून या फिल्मवर ज्यावेळी बाह्य दृश्यापासून येणारे प्रकाश किरण पडतात त्यावेळी तेथील हॅलाइड रेणूवर प्रकाशाच्या कमी जास्त तीव्रतेनुसार, कमीजास्त परिणाम घडतो. ही फिल्म नंतर काळोख्या खोलीत विकाशकाच्या (प्रकाशित फिल्मवरील चित्र दृश्यमान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या) विद्रावात ठेवतात. त्यामुळे प्रकाशाच्या कमी जास्त प्रमाणानुसार हॅलाइडांचे कमीजास्त क्षपण होऊन त्या जागी चांदी अवक्षेपित होते. ज्या भागावर जास्त प्रकाश त्या भागावर जास्त चांदीचा थर व कमी प्रकाशाच्या भागावर कमी चांदीचा थर बसतो. नंतर ही फिल्म पाण्याने धुवून स्थिरकारकात (फिल्मवरील प्रकाशसंवेदी रसायन काढून टाकून चित्राचे स्वरूप कायम करणाऱ्या रसायनात) बुडवून ठेवतात. हे रसायन म्हणजे सोडियम थायोसल्फेट (हायपो) हे होय. सोडियम थायोसल्फेटात सिल्व्हर हॅलाइडे विरघळतात. पण चांदी विरघळत नाही. यामुळे या क्रियेनंतर काचेवरील पूर्ण झालेले व्यस्त चित्र दिसते.

या प्रकाश – रसायन विक्रिया कशा होतात हे अद्याप फारसे नीट समजलेले नाही. ‘सबहॅलाइड’ परिकल्पनेप्रमाणे हॅलाइडांतील ब्रोमाइड अणू संवेदकाकडे पाठविल्यामुळे Ag2Br सारखी ‘सबहॅलाइडे’ तयार होतात. पण शेले यांच्या प्रयोगानुसार बराच काळ प्रकाश विक्रिया होऊ दिली, तर हॅलाइडामधून क्लोरीन सरळ निघून जातो.

दुसऱ्या एका परिकल्पनेप्रमाणे सिल्व्हर हॅलाइडामधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि प्रकाशविद्युत्‌ परिणामाप्रमाणे प्रकाशसंवेदन AgBr &gt AgCl &gt AgI याक्रमाने होते [ ⟶ छायाचित्रण].

सिल्व्हर सल्फेट : Ag2SO4. चांदी संहत सल्फ्यूरिक अम्लामध्ये विरघळविली म्हणजे सिल्व्हर सल्फेट तयार होते. तसेच चांदीचे ऑक्साइड किंवा कार्बोनेट विरल सल्फ्यूरिक अम्लामध्ये विरघळून हे संयुग मिळू शकते. सिल्व्हर सल्फेट पाण्यात जवळजवळ अविद्राव्य आणि विरल नायट्रिक अम्लात व संहत सल्फ्यूरिक अम्लात विद्राव्य आहे. खूप तापविले असता त्याचे अपघटन होऊन चांदी मिळते.

सिल्व्हर सल्फाइड : Ag2S. हे सिल्व्हर ग्लान्स किंवा अर्जेंटाइट या रुपात निसर्गात आढळते. सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावातून हायड्रोजन सल्फाइड वायू प्रवाहित केला असता सिल्व्हर सल्फाइडाचा काळा अवक्षेप (साका) मिळतो. हा पाण्यात अविद्राव्य असून क्षारीय (अल्कलाइन) सायनाइडामध्ये विरघळतो.

सिल्व्हर सायनाइड : AgCN. चांदीच्या लवणाच्या विद्रावात पोटॅशियम सायनाइडाची भर घातली असता सिल्व्हर सायनाइडाचा पांढरा अवक्षेप मिळतो. तो पाणी, विरल अम्ले आणि अमोनिया यांमध्ये अविद्राव्य आहे. पोटॅशियम सायनाइड अतिरिक्त प्रमाणात घातले असता त्याचे विद्राव्य जटिल लवण K [Ag(CN)2]+ तयार होते. विद्युत्‌ विच्छेदनाने इतर धातूंवर चांदीचा मुलामा देण्याकरिता ह्या जटिल लवणाचा उपयोग होतो.

सिल्व्हर कार्बोनेट : Ag2CO3. सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात सोडियम कार्बोनेटाचा विद्राव मिसळला असता सिल्व्हर कार्बोनेटाचा पिवळसर पांढरा अवक्षेप मिळतो. प्रकाशात तो काळा पडतो. २२० से. तापमानाला त्याचे अपघटन होऊन चांदी बनते.

सिल्व्हर नायट्राइड : नुकतेच तयार केलेले सिल्व्हर ऑक्साइड अमोनियात विरघळते आणि हा विद्राव हवेत तसाच राहू दिल्यास सिल्व्हर नायट्राइडाचा काळा अवक्षेप (फल्मिनेटिंग सिल्व्हर) मिळतो. त्याची घटना Ag3N किंवा Ag2NH असावी. तो कोरडा असताना फार स्फोटक असतो.

काही कार्बनी संयुगे : अमोनीय सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावातून ॲसिटिलीन वायू प्रवाहित केला असता सिल्व्हर ॲसिटिलाइड (Ag2C2) या स्फोटक संयुगाचा पांढरा अवक्षेप मिळतो.

ॲसिटेट, बेंझोएट, सायट्रेट, ऑक्झॅलेट, पामिटेट, सॅलिसिलेट, टार्टरेट इ. चांदीची कार्बनी संयुगे विद्युत्‌ विच्छेदनाने चांदीचा मुलामा देण्यासाठी किंवा छपाईतील निरनिराळ्या प्रक्रियांत वापरतात.


गुणात्मक विश्लेषण : (१) चांदीचे घनरूप संयुग, सोडियम कार्बोनेटाबरोबर मिसळून ते मिश्रण कोळशाच्या खाचेत घालून क्षपणकारक ज्वालेत तापविले असता चांदीचा पांढरा वर्धनशील मणी मिळतो. (२) चांदीच्या लवणाच्या विद्रावामध्ये विरल हायड्रोक्लोरिक अम्ल व विद्राव्य क्लोराइडाची भर घातली, तर सिल्व्हर क्लोराइडाचा दह्यासारखा पांढरा अवक्षेप मिळतो. हा अवक्षेप विरल नायट्रिक अम्लामध्ये अविद्राव्य असून अमोनियम हायड्रॉक्साइडामध्ये विरघळतो. शिशाचे क्लोराइड व मर्क्युरस क्लोराइड अविद्राव्य असते म्हणून या रीतीने चांदीचे वेगळे अस्तित्व ओळखता येते. (३)चांदीच्या लवणाच्या विद्रावात पोटॅशियम आयोडाइडाची भर घातली, तर सिल्व्हर आयोडाइडाचा पिवळा अवक्षेप मिळतो. (४) पोटॅशियम क्रोमेटाबरोबर चांदीच्या लवणाचा विद्राव तांबड्या रंगाच्या सिल्व्हर क्रोमेटाचा अवक्षेप देतो व तो विरल नायट्रिक अम्लामध्ये विद्राव्य आहे. (५) अमोनियम हायड्रॉक्साइडाबरोबर चांदीच्या लवणाचा विद्राव काळ्या तपकिरी वर्णाचा सिल्व्हर ऑक्साइडाचा, अतिरिक्त अमोनियम हायड्रॉक्साइडात विरघळणारा अवक्षेप देतो.

परिमाणात्मक विश्लेषण : (१) वजनी परिमाणात्मक विश्लेषणात चांदीच्या लवणाच्या विद्रावापासून सिल्व्हर क्लोराइडचा किंवा सिल्व्हर ब्रोमाइडाचा अवक्षेप मिळवितात. तो गाळून काळजीपूर्वक वाळविला व त्याचे वजन केले म्हणजे नमुन्याच्या पदार्थातील चांदीची मात्रा ठरविता येते. (२) आकारमानी विश्लेषणात पोटॅशियम थायोसायनेटाचा ज्ञातमूल्य (ज्यांमध्ये विरघळलेल्या पदार्थाचे वजन किती आहे हे माहीत आहे असा) विद्राव वापरतात [ ⟶ अनुमापन]. (३) विद्युत्‌ विच्छेदनाने क्षपन करून धातुरूपात मिळालेल्या चांदीचे वजन करून नमुन्याच्या पदार्थातील चांदीची मात्रा ठरवितात.

पहा : जस्त तांबे शिसे सोने.

संदर्भ : 1. Abbot, D. Inorganic Chemistry, London, 1965.

           2. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.

देशपांडे, ज्ञा. मा. ठाकूर, अ. ना.