हिंशेलवुड, सर सिरिल नॉर्मन : (१९ जून १८९७ –९ ऑक्टोबर १९६७). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी रासायनिकविक्रियांची त्वरा व यंत्रणा यांसंबंधी, विशेषतः पाणी तयार करणाऱ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगासंबंधी, संशोधन केले. या मूलभूत रासायनिक संयोग विक्रियेसंदर्भात कार्य केल्याबद्दल त्यांना १९५६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक सोव्हिएटशास्त्रज्ञन्यिकली न्यिकलाएव्ह्यिच स्यिम्यॉनॉव्ह यांच्यासमवेतविभागून मिळाले. 

 

हिंशेलवुड यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वेस्ट-मिन्स्टर स्कूल येथे झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात घेतले आणि तेथेच ते १९३७ मध्ये प्राध्यापक झाले. १९३०च्या सुमारास त्यांनी पाणी कसे तयार होते, यासंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली. या कार्यामुळे स्फोटात घडणाऱ्या शृंखला आणि सशाख शृंखला असलेल्या रासायनिक विक्रिया समजण्यास फार मोठी मदत झाली. त्यांनी तापमान आणि दाब यांचा रासायनिक प्रक्रियांच्या त्वरेवर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण केले. स्फोटासाठी आवश्यक परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी शृंखला विक्रियेची यंत्रणा सुचविली. 

 

हिंशेलवुड यांनी सूक्ष्मजंतू कोशिकेमधील रेणवीय गतिकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पर्यावरणातील बदलाप्रमाणे सूक्ष्मजंतूदेत असलेल्या प्रतिसादांचे निरीक्षण केले. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, औषध सतत दीर्घकाल देत राहिल्यास कोशिकांकडून होणाऱ्या प्रतिकारामुळे त्यांच्यामध्ये जास्त किंवा कमी प्रमाणात कायमचे बदल प्रवर्तित होतात. हा शोध प्रतिजैविके आणि इतर रासायनिक चिकित्साकारके यांना होणाऱ्या जैविक प्रतिकारासंबंधी महत्त्वाचा ठरला. 

 

हिंशेलवुड यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : द कायनेटिक्स ऑफ केमिकल चेंज इन गॅसीअस सिस्टिम्स (१९२६) द केमिकल कायनेटिक्स ऑफ द बॅक्टिरियल सेल (१९४६) द स्ट्रक्चर ऑफ फिजिकल केमिस्ट्री (१९५१) ग्रोथ, फंक्शन अँड रेग्युलेशन इन बॅक्टिरियल सेल (१९६६). त्यांना ‘सर’ ही उपाधी १९४८ मध्ये मिळाली. त्यांना केमिकल सोसायटीतर्फे लाँगस्टाफ पदक (१९४८) व फॅराडे पदक (१९५३) आणि रॉयल सोसायटीतर्फे डेव्ही पदक (१९४३) व लीव्हरह्यूम पदक (१९६०) देऊन गौरविण्यात आले. ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते (१९५५–६०). 

 

हिंशेलवुड यांचे लंडन येथे निधन झाले. 

साळुंके, प्रिती म.