क्षारीय धातु : इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप ⇨ आवर्त सारणी या मांडणीतील गट १अ मधील मूल-द्रव्यांना क्षारीय धातू म्हणतात. लिथियम (ङळ), सोडियम (छर), पोटॅशियम (घ), रुबिडियम (ठल), सिझियम (उी) व फ्रान्सियम (ऋी) या सहा क्षारीय धातू आहेत. जेव्हा या धातू इतर धातूंशी संयोग पावतात, तेव्हा क्षार म्हणजे अम्लांचे उदासिनीकरण करू शकणारे तीव्र क्षारक तयार होतात. म्हणून त्यांना क्षारीय धातू म्हणतात. [क्षार–१].

क्षारीय धातूंपैकी भूकवचात सापेक्षतः विपुल प्रमाणात आढळणाऱ्या धातू सोडियम व पोटॅशियम होत. याच धातू सर्वप्रथम अलग करण्यात आल्या (१८०७). रासायनिक दृष्ट्या या सर्व धातू अतिशय विक्रिया-शील असल्याने त्या निसर्गात नेहमी साध्या किंवा जटिल संयुगांच्या रूपातच आढळतात. भूकवचाच्या सरासरी नमुन्यात सु. २.८% सोडियम, २.६% पोटॅशियम, ०.०३४% रुबिडियम, ०.०३४% सिझियम व०.००७% लिथियम आढळते. फ्रान्सियम ही सर्वांत जड क्षारीय धातू किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण उत्सर्जन करणारी) असल्याने ती निसर्गात युरेनियमाचा क्षय होताना अल्प प्रमाणात आढळते.

अधिक परिचयाच्या तांबे, लोखंड इ. धातूंशी यांचे अगदी थोडेचसाम्य आहे. मात्रक्षारीय मृत्तिका धातूंशी त्यांचे अनेक बाबतींतसाम्य आहे. क्षारीय धातूंचा रंग रुपेरी पांढरा असून त्या वर्धनशील वसुरीने कापता येण्याइतपत मऊ असतात. त्यांचे वितळबिंदू कमी आहेत. सर्व धातूंमध्ये क्षारीय धातू सर्वाधिक विक्रियाशील असल्याने त्यांचे एक विद्युत् भार असलेले अणू म्हणजे आयन तयार होतात. कारण त्यांच्या अणूमध्ये सर्वांत बाहेरच्या कक्षेत एक अतिशय चल इलेक्ट्रॉन असतो.या धातूंची ऑक्सिजन आणि पाणी यांच्याबरोबर जलदपणे व कधीकधी स्फोटकपणे (जोराने) विक्रिया होते. पाण्याबरोबरच्या स्फोटक विक्रियेतून हायड्रॉक्साइडे तयार होतात व हायड्रोजन वायू व उष्णता बाहेर पडतात. वितळलेल्या संयुगांच्या किंवा हायड्रॉक्साइडांच्याविद्युत् विच्छेदनाद्वारे शुद्ध रूपातील क्षारीय धातू मिळवितात. ऊष्मीय क्षपण या दुसऱ्या प्रक्रियेने लिथियम व सिझियम मिळवितात. क्षारीय धातूंची विक्रियाशीलता जास्त असून ती सर्वसाधारणपणे अणुभारानुसार लिथियम ते सिझियमअशी वाढत जाते. या गुणधर्मामुळे इतर धातूंप्रमाणे यांचा संरचनात्मक कामांत उपयोग होत नाही. क्षारीय धातू रासायनिक उद्योगात विक्रिया-कारक म्हणून वापरतात. त्यांची संयुगे मात्र मोठ्या प्रमाणात कच्चा माल म्हणून वापरली जातात.

क्षारीय धातूंची सिलिकेटे वगळता बहुतेक संयुगे पाण्यात सहजपणे विरघळतात (उदा., मीठ). पावसामुळे जमिनीतील या संयुगांची धूपहोते व नंतर अशी विरघळलेली संयुगे निर्गम मार्ग नसलेल्या समुद्रात वा सरोवरांत साचतात. उदा., उटामधील ग्रेट सॉल्ट लेक. प्राचीन समुद्र व सरोवरे यांच्या बाष्पीभवनाने जगभर या धातूंच्या संयुगांचे मोठे निक्षेपमागे राहिले आहेत.

मराठी विश्‍वकोशात प्रत्येक क्षारीय धातूवर स्वतंत्र नोंद असूनमूलद्रव्ये या नोंदीतही त्यांची माहिती आली आहे.

पहा : क्षार–१  क्षारीय मृत्तिका धातु.

संदर्भ : 1. Borgstedt, H. V. Matthews, C. K. Applied Chemistry of the Alkali Metals, 1987.

          2. Bowser, J. Inorganic Chemistry, 1993.

          3. Cotton, F. A. et al., Advanced Inorganic Chemistry, 1999.

         4. Dickson, T. R. Introduction to Chemistry, 1995.

         5. Kertes, A. S. Vincent, C. A., Eds., Alkali Metal, Alkaline Earth Metal and Ammonium Halides in Amide Solvents, 1980.

         6. Mackay, K. Introduction to Modern Inorganic Chemistry, 2002.

 

ठाकूर अ. ना.