अल्जिनिक अम्ल : कार्बन (सेंद्रिय) रसायन. सूत्र (C6H8O6)n. हे अम्ल किंवा याची कॅल्शियम लवणे पिंगल ⇨शैवले या सागरी शैवलांमध्ये आढळतात. सोडियम अल्जिनेटाला किंवा पाण्यात विरघळलेल्या अल्जिनिक अम्लाच्या कोणत्याही लवणाला कधी-कधी ‘अल्जिन’असे म्हणतात. पण कित्येक वेळा अल्जिनिक अम्लाचाच उल्लेख ‘अल्जिन’असा करतात. मॅक्रोसिस्टिस पायरीफेरा, फ्यूकस सेरॅटस, लॅमिनेरिया सॅकॅरिना या सागरी शैवलांपासून अल्जिनिक अम्ल तयार करतात. ते मॅन्युरोनिक अम्लाचे बहुवारिक (एकापेक्षा जास्त रेणू एकत्र येऊन बनलेला मोठा रेणू असलेले) असून त्यात मुक्त कार्बॉक्सिलिक गट असतात.
कृती : सागरी शैवले (उदा., मॅक्रोसिस्टिस पायरीफेरा) सोडियम कार्बोनेटाच्या गरम विद्रावात प्रथम बराच वेळ ठेवतात. त्यामुळे वनस्पतीतील अल्जिनिक अम्ल सोडियम अल्जिनेट बनून विरघळते. सेल्युलोज व इतर अविद्राव्य पदार्थांपासून सोडियम अल्जिनेटाचा विद्राव नंतर वेगळा करतात व त्याचे विरंजन (रंग नाहीसा करणे) करतात. ह्या विद्रावात कॅल्शियम क्लोराइड मिसळल म्हणजे कॅल्शियम अल्जिनेटाचा अवक्षेप (साका) मिळतो. त्यावर हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केली, म्हणजे अल्जिनिक अम्ल मिळते.
दुसऱ्या पद्धतीत अल्कोहॉल, पाणी व हायड्रोक्लोरिक अम्ल यांच्या मिश्रणाने प्रथम शैवलांचे निष्कर्षण (अर्क काढणे) करतात. त्यामुळे विद्राव्य घटक विरघळतात. पण अल्जिनिक अम्ल अविद्राव्य असल्यामुळे तसेच राहते. नंतर सोडियम कार्बोनेटाच्या विद्रावात ते विरघळवून आनुषंगिक अविद्राव्य द्रव्ये गाळणक्रियेने काढून टाकतात. गाळलेल्या विद्रावात हायड्रोक्लोरिक अम्ल व अल्कोहॉल मिसळले म्हणजे अल्जिनिक अम्ल अवक्षेपाच्या रूपाने मिळते.
गुणधर्म व उपयोग : हा एक पांढरा घन पदार्थ आहे. तो मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेऊ शकतो. पाण्यात तो अत्यल्प प्रमाणात विद्राव्य व अल्कोहॉलात अविद्राव्य आहे. सोडियम कार्बोनेटात विरघळून त्यापासून अल्जिन तयार करतात. अल्जिन पाण्यात विरघळते व त्याचा घट्ट विद्राव बनतो. त्याच्या अंगी पदार्थ संधारित (न विरघळणाऱ्या कणांच्या तरंगत्या) अवस्थेत किंवा पायसी अवस्थेत (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांच्या मिश्रणाच्या अवस्थेत, →पायस) राखण्याचा गुण आहे. म्हणून ज्या ठिकाणी उपयुक्ततेकरिता पदार्थ संधारित किंवा पायस-रूपात टिकविणे अवश्य असते अशा ठिकाणी‘अल्जिन’उपयोगी पडते. ते अपायकारक नसल्यामुळे आइसक्रीम, चॉकोलेट इ. खाद्य पदार्थांत, त्याचप्रमाणे औषधे, दंतमंजन, त्वचेला लावण्याची सौंदर्यप्रसाधने यांमध्ये वापरले जाते.
जोशी, पां. ह.