कॅल्व्हिन, मेल्व्हिन:(८ एप्रिल १९११       ). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.  १९६१ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.  त्यांचा जन्म सेंट पॉल मिनिसोटा येथे झाला. १९३१मध्ये त्यांनी मिशिगन कॉलेज ऑफ माॅर्निंग अँड टेक्नॉलॉजीमधून बी. एस. पदवी मिळविली व १९३५ मध्ये ते मिनिसोटा विद्यापीठातून पीएच. डी. झाले. १९३५–३७ या काळात ते मॅंचेस्टर इंग्लंड विद्यापीठातून फेलो होते.  त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे त्यांची निर्देशक म्हणून नेमणूक झाली. १९४६मध्ये ‘लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी’च्या जैव-कार्बनी रसायनशास्त्र विभागाचे ते संचालक झाले. १९४७मध्ये त्यांची कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

जीवरासायनिक विक्रियांमध्ये प्रकाशसंश्लेषण फार महत्त्वाचे आहे. हरितद्रव्य असलेल्या वनस्पती, कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाणी यांपासून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बोहायड्रेटे तयार करतात. हे प्रकाशसंश्लेषणाचे एक उदाहरण आहे. या संश्लेषणामध्ये होणाऱ्या विक्रिया कोणत्या आहेत व त्या कोणत्या अनुक्रमाने घडून येतात हे शोधून काढण्याचे महत्त्वाचे कार्य कॅल्व्हिन यांनी केले.  त्याकरिता त्यांनी कार्बन (१४) हा किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणारा) कार्बनचाचा समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) व क्लोरेला हे शैवल यांचा उपयोग केला. या कामगिरीबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्टस्‌ अँड सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन इ. विद्वत्‌संस्थांचे सभासद आहेत. मिशिगन कॉलेज ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजी व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी त्यांना डी. एस्‌सी. ही बहुमानाची पदवी बहाल केली.

त्यांनी जी. इ. के. ब्रांच यांच्या सहकार्याने थिअरी ऑफ ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री (१९४०), इतरांच्या सहकार्याने आयसोटोपिक कार्बन (१९४९), मारटेल यांच्या सहकार्याने केमिस्ट्री ऑफ मेटल चिलेट कांपाउंड्स  (१९५२), जे. ए. बाशम यांच्या मदतीने पाथ ऑफ कार्बन फोटोसिंथेसिस (१९५७), केमिकल इव्होल्यूशन (१९६१) व फोटोसिंथेसिस ऑफ कार्बन कांपाउंड्स (१९६२) हे ग्रंथ लिहिलेले आहेत.

ठाकूर, अ. ना.