प्राउट, विल्यम : (१५ जानेवारी १७८५–९ एप्रिल १८५०). इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ. अणुभारांसंबंधीच्या गृहीतकाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म ग्लॉस्टरशरमधील हॉर्टन येथे झाला. एडिंबरो येथे १८११ मध्ये एम्‌. डी. ही वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी लंडन येथे वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. तेथे त्यांनी एक प्रयोगशाळाही स्थापन केली. १८१४ मध्ये त्यांनी प्राणिरसायनशास्त्रावर यशस्वीपणे जाहीर व्याख्याने दिली.

‘मूलद्रव्याचे अणुभार हे हायड्रोजनाच्या अणुभाराच्या पूर्ण पटीतच असतात’ हा त्यांचा शोध व द्रव्याच्या एकत्वासंबंधीची त्यांची संकल्पना हे दोन्ही मिळून ‘प्राउट गृहीतक’ म्हणून प्रसिद्ध आहे. या त्यांच्या गृहीतकामुळे अणुभार व नंतर अणू सिद्धांत, तसेच मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची पद्धती यांच्या संशोधनास चालना मिळाली. १८१५-२७ या काळात त्यांनी मूत्र व पचन यांसंबंधी महत्त्वाचे निबंध प्रसिद्ध केले. त्यांनी मूत्रापासून शुद्ध यूरिया मिळविला. रक्त व मूत्र यांचा त्यांनी रसायनशास्त्र दृष्ट्या अभ्यास केला. जठररसात हायड्रोक्लोरिक अम्ल असते, असे १८२४ मध्ये त्यांनी दाखवून दिले. वसा (स्निग्ध पदार्थ), कार्बोहायड्रेटे व प्रथिने हे अन्नाचे घटक असतात असे प्रथम प्रतिपादन करणाऱ्यांपैकी ते एक होते. संवेदनांचे एकत्व (१८१०) आणि चव व स्वाद यांतील भेद (१८१२) यांविषयीही त्यांनी विचार मांडले होते. हवेची घनता ठरविण्याविषयी त्यांनी १८२२-२३ मध्ये संशोधन केले.

‘ब्रिजवॉटर प्रबंध’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आठ प्रबंधांपैकी केमिस्ट्री, मिटिऑरॉलॉजी अँड द फंक्शन्स ऑफ डायजेशन कन्सिडर्ड वुइथ रेफरन्स टू नॅचरल थिऑलाजी हा प्रबंध त्यांनी १८३४ मध्ये लिहिला. १८३१ मध्ये मूत्रासंबंधी आणि १८४० मध्ये मूत्र व पचन यांच्याशी संबंधित असलेल्या रोगांविषयी त्यांनी पाठ्यपुस्तके प्रसिद्ध केली. फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्येही त्यांनी बरेच लेखन केले. ते रॉयल सोसायटी (१८१९) व रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स (१८२९) या संस्थांचे फेलो होते. १८२७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीच्या कॉप्ली पदकाचा बहुमान मिळाला. ते लंडन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.