पथ्या पथ्य : (आयुर्वेद). शरीराला परिणामी सुखावह असणाऱ्या आहारविहारास पथ्य व असुखावह असणाऱ्या आहारविहारास अपथ्य असे म्हणतात. रोगाच्या कारणांच्या विपरीत गुणांचा, रोगांतील दोषांच्या विपरीत गुणांचा, रोगाच्या विपरीत गुणांचा, देश-काल व आत्मगुणाच्या विपरीत गुणांचा आहारविहार नेहमी पथ्यकर असतो. आत्मगुण  म्हणजे दोषप्रकृती गुण व विकारगुण होत. इंद्रियार्थांचा इंद्रियांशी समयोग हाही पथ्यकर असतो.

पथ्य हा शब्द सर्वत्र प्रसिद्ध आहे. ‘पथ्य काय?’ या एकाच प्रश्नात पथ्याबरोबर अपथ्याच्या उत्तराचीही जिज्ञासा असते.

पथ्यापथ्य शब्दाची व्याख्या आणखी व्यापक केली आहे. ‘पथ’ म्हणजे (आरोग्याचा) मार्ग. म्हणून आरोग्याच्या मार्गाला सोडून जे नाही ते आणि प्रायः मनाला प्रिय असेल ते सर्व पथ्य होय. याउलट आरोग्याला विघातक व मनाला अप्रिय ते सर्व अपथ्य होय. निरनिराळ्या विकारांमध्ये अधिक झालेली विकारकर द्रव्ये कमी करणे व शरीरातील कमी झालेली द्रव्ये बाह्यसृष्टीतून शरीराला पुरविणे या तत्त्वानुसार पथ्यापथ्य प्रयोग सांगितले आहेत.

चिकित्सेच्या औषध व उपचार यांना साहाय्यभूत होणाऱ्या आहारविहाराला पथ्य व विकारवर्धक आहारविहाराला अपथ्य असे समजावे. तसेच स्वस्थ मनुष्याच्या स्वास्थ्यरक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या आहारविहाराचा विचारही पथ्यापथ्य विषयात येतो.

औषध व पथ्य यांच्या मर्यादा समजणे आवश्यक आहे. कित्येक वेळा औषध व पथ्य यांची मर्यादा इतकी जवळ असते की, पथ्य कोठे संपते व औषध कोठे सुरू होते, हे समजत नाही. दूध हे कित्येक वेळा औषध म्हणून तर कित्येक वेळा पथ्य म्हणूनही दिले जाते. नेहमी दुधाचा आहार घेणाऱ्या अतिसारी मनुष्याला दाह व तहान असेल, तर त्याला दूध हे पथ्य होते आणि जीर्णज्वरामध्ये दाह असताना धारोष्ण दूध हे औषध म्हणून उपयोगी होते.

जनपदाध्वंसनाच्या (साथीच्या) विकारांमध्ये सृष्टीतील उदक–देश–काल–वायु या सामान्य भावांची दुष्टी झालेली असते. अशा वेळी या उदकादि सामान्य भावांचा संपर्क मनुष्यांवर सारखाच होतो परंतु पथ्याने राहणाऱ्यास तो विकारकर होत नाही. झालाच तर तो सौम्य प्रमाणात होतो आणि चिकित्सेने आरोग्यलाभही लवकर होतो. तसेच सर्वच अपथ्यकर आहारविहार तुल्यदोषकर होत नाहीत. सर्व दोष तुल्यबल होत नाहीत आणि प्रत्येक शरीराची व्याधिप्रतिबंधक शक्ती सारखी असत नाही वेगवेगळी असते म्हणून प्रत्येक शरीरही पथ्यापथ्यासाठी बारकाईने विचारात घ्यावे लागते.

सामान्यतः पथ्य हे धातूंचे साम्य व शुद्धी राखते आणि औषधाच्या कार्याला मदत करते तर औषध हे दुष्ट दोषांची शरीरातील आक्रमकता (जोराचा आघात) दूर करण्यास उपयोगी पडते व तो आघात दूर झाल्यावर रोगाचा पुनर्भाव होऊ नये म्हणून पथ्य अधिक उपयोगी पडते. बारकाईने पाहिले तर असे आढळून येईल की, सर्वांना सर्व ठिकाणी व संपूर्णतः पथ्यकारक वा अपथ्यकारक असा पदार्थ नाही. तरी प्रत्येक आहार अगर विहार आपल्या स्वाभाविक गुणांमुळे व इतर पदार्थांच्या संयोगामुळे एकांत हितकर म्हणजे पथ्यकर अगर अहितकर म्हणजे अपथ्यकर होतो.

मात्रा–काल–संस्कार–क्रिया–भूमी–दोषादींना अनुरूप ते ते पथ्यकारक भाव अपथ्यकारक होतात किंवा अपथ्यकारक भाव पथ्यकारक होऊ शकतात. असे एकांत पथ्यकर तूप हे द्रव्य अधिक मात्रेने खाणे वसंत ऋतूत खाणे, मधासारख्या द्रव्याबरोबर समपरिमाणाने एकत्र खाणे, आनूप प्रांतात खाणे, कफ-प्रकृती असणाऱ्यांनी कफज विकारांत खाणे अपथ्यकारक ठरते. म्हणून पथ्यकारक आहार किंवा विहार याचा उपयोग त्याचा स्वभाव-मात्रा-देश-कालादि गोष्टी यांचा विचार प्रत्येक व्यक्तीत स्वतंत्रपणे करणे जरूर आहे.

अपथ्यकर आहारविहार यामुळे शरीरात संचित होणारे दोष विवक्षित प्रमाणापेक्षा अधिक झाले की, ते रोगाच्या स्वरूपात व्यक्त होतात. अपथ्य चालू ठेवले, तर रोग वाढतच राहील रोगनाश होणार नाही. फार तर तीव्र वा विषारी अशा औषधांनी तो काही काळ दबविता येईल रोग गेल्याचे तात्पुरते समाधानही मिळेल परंतु या तीव्र औषधांचा परिणाम संपताच तोच विकार उफाळून वर येईल. शिवाय औषधांचे दुष्मपरिणामही त्याच्या जोडीला व्यक्त होतील.

पथ्यापथ्याचा विचार आणखी एका दृष्टिकोनातून करता येतो. शीत-उष्ण-वर्षा या कालांचा शरीराला सम्यक्‌ योग होणे पथ्यकर आणि असम्यक् योग अपथ्यकर होय. इंद्रिये व इंद्रियांचे विषय यांचा सम्यक् योग पथ्यकर व असम्यक् योग अपथ्यकर होय. कर्मेंद्रियाच्या बलाला योग्य इतके कर्म पथ्यकर आणि अति-हीन व मिथ्या योग ही अपथ्यकर होत. शारीरवेग (उदा., क्षुधा-निद्रा-तृष्णा इ.) निर्माण होताच ते पुरे करणे पथ्यकर व वेग धारण करणे हे अपथ्यकर अगर मुद्दाम उदीरित करणे हे अपथ्यकर होते. याचे विपरीत मानसिक वेगांबद्दल (उदा., लोभ-ईर्षा-द्वेष इ.) म्हणता येते. जितेंद्रिय होऊन मनाचे वेग धारण करणे पथ्यकर व उत्पन्न होणे अपथ्यकर होय.

सामान्यतः जो आहार आणि विहार, ज्या काळात ज्या देशात शरीराला इष्ट ठरतो तो पथ्यकारक व अनिष्ट तो अपथ्यकारक असतो. ज्या आहारविहाराचा शरीर द्वेष करते तो अपथ्यकारक होय. कित्येक वेळा जिभेला हवे असणारे पदार्थ किंवा विहार अपथ्यकारक असतात. ज्वरासारख्या विकारात शीत वारा, शीत जलपान हवेसे वाटते व तात्कालिक सुखकरही होते परंतु मागाहून विकारवर्धक होते म्हणून अपथ्यकर होय. एखाद्या घरात तिखट अधिक खाण्याचा प्रघात असल्यामुळे त्या घरातील पित्तप्रकृतीच्या मुलाच्या जन्मापासून तिखट खाण्यात येते व तेच त्याला सवयीचे होते. मात्र त्याला ते तिखट निश्चितपणे अपथ्यकर असते. त्यापासून रोग होतात.

पथ्याचे सेवन व अपथ्याचा त्याग करावयाचा असेल, तर त्यासाठी काही विशिष्ट क्रम आहे. यायोगे नवीन पथ्यकर द्रव्याच्या सेवनामुळे किंवा सवयीचे अपथ्यकर एकदम सुटल्यामुळे शरीरावर होणारा दुष्परिणाम होऊ शकत नाही. पथ्यकारक सेवनाचा किंवा अपथ्यकारक त्यागाचा क्रम प्रायः एक–दोन–तीन दिवसांच्या अंतराने चौथ्या–आठव्या–अगर सोळाव्या हिश्श्याने ठेवावा. म्हणजे पथ्य ४–८–१६–३२ इतक्या दिवसांत क्रमानुसार पूर्ण सुरू होईल. तसेच अपथ्य पूर्ण सुटेल.

याप्रमाणे क्रम राखला असताना पथ्यकारक पदार्थांचे गुण शरीराला हलके हलके सवयीचे व उपकारक ठरून अपथ्यकारक पदार्थजन्य दोषही शरीराला काही आघात न करता हळूहळू शमन पावतात. नवीन पथ्यकारक द्रव्य पचविणारा अग्नी तयार होऊन तो वाढत जातो. त्यामुळे ते द्रव्य पचते, शरीरगुणाचे होते आणि रोगनाश करते.

अपथ्य हे विकारकर व विकारवर्धक असले, तरी सवयीचे असते. ते एकदम सोडले, तर त्यापासूनही विकार होतात म्हणून अपथ्य क्रमाने सोडावे. या उपक्रमामुळे शरीरावर जो चांगला परिणाम होतो, तो स्थिर स्वरूपाचा होतो व असात्म्यज विकार होत नाहीत. 

देश–काल–अग्नि–मात्रा–सात्म्यादि अठरा कारणांनी द्रव्य विरुद्ध बनते [⟶ स्वस्थवृत्त].


 दोषानुसार पथ्यापथ्य : मिथ्या आहारविहारानुसार व ऋतु कालानुसार दोष प्रकुपित होऊन त्या त्या दोषाचे विकार होतात. अशा वेळी त्या विकारकारी दोषाच्या विपरीत आहारविहार हा दोषदुष्टी घालविण्यास मदत करतो. वातदोषाच्या गुणांशी समान असणारे आहारविहार हे वातदोषाचे अपथ्य होते आणि वातदोषाच्या गुणांशी विपरीत असणाऱ्या गुणांचे आहारविहार हे वातदोषांचे पथ्य होते. याप्रमाणे पित्त व कफ दोषांबद्दलचे पथ्यापथ्य समजावे.

 वातदोषावरील पथ्ये: नेहमी स्नेहन–स्वेदन करणे करंजेल–तिळेल–बिब्ब्याचे तेल इ. अनेक प्रकारची तेले घोरपडी–वाघ–खेकडे–मासे इत्यादींची चरबी डुकराची चरबी, मज्जा, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ काजू, चारोळ्या, बदाम, पिस्ते, अक्रोड, गोडांबी वगैरे बिया खाणे गरम पाण्याचे स्नान, गरम व उबदार वस्त्रे पांघरणे किंवा त्या त्या शरीरावयवाला गुंडाळणे उटी, केशर, अगरू इ. अंगाला लावणे गुळाची–पिठाची सौम्य दारू, जुन्या तांदळाचा भात, जोंधळे-बाजरी–गव्हाचे पदार्थ, शेवया, फळभाज्या, तूप–लोणी–ताक घातलेली कढणे, मांसरस, अंडी हे पदार्थ पथ्यकर होत. वातावरण आनंददायी ठेवणे, सुखाची राहणी असणे, चिंता–भीती–शोक–त्रास वगैरे नसणे इ. सर्व पथ्यकर होत.

पित्तदोषावरील पथ्ये: पित्तदोषावर तूप हे सर्वांत पथ्यकर आहे. गोड–कडू व तुरट रसाचे पदार्थ गहू–मूग–मसूर–दूध–लोणी–माठ चवळई–पोकळा–नारळाचे पाणी–साखर–आवळकठी–मनुका हे पदार्थ पथ्यकर आहेत. बसणे-झोपणे यासाठी मऊ गादी, सभोवती मंदनिळसर प्रकाश, आल्हाददायक व मनाला शांतता देणारे वातावरण असणे, थंड व सुवासिक वात वाहत असणे, श्रवणमधुर संगीत, गोड बोलणारी मुले सभोवती असणे, आजूबाजूची माणसे नेहमी मनासारखी वागणे, रात्री लवकर झोपणे, दुपारी वृक्षांच्या शीतल छायेत राहणे किंवा वाळ्याचे पडदे खोलीत असणे, कापूर–चंदन–वाळा, सुगंधी फुले यांचा उपयोग पित्तदोषाला पथ्यकर आहे. थोडक्यात, पित्ताला राजासारखी वागणूक पथ्यकर होय.

 कफदोषावरील पथ्ये: कफदोषाला मध हा पदार्थ सर्वांत उत्तम पथ्यकारक आहे. कडू–तुरट–तिखट रसांची द्रव्ये कफदोषाला पथ्यकर आहेत. सुंठ–मिरी–पिंपळी–मोहरी–लसूण–जिरे–हिंग–जुने गहू–सातू–नाचणी–वरई–बाजरी, कढणे, भाजके, हलके, रुक्ष पदार्थ आणि लंघन, भरपूर व्यायाम, पर्वतावर चढणे, अंगाला उटणी लावणे, दिवसा न झोपणे ही पथ्यकर होत. सामान्यतः शरीरसुखाचे जे नसेल ते सर्व कफदोषाला पथ्यकर-सुखकर असते. थोडक्यात कफदोषाला शत्रूप्रमाणे वागणूक पथ्यकर होते.

  

दोषावरील अपथ्ये: प्रत्येक दोषाचा प्रकोप करणारी कारणे ही त्या त्या दोषाची अपथ्ये होत. स्थूलमानाने पाहू जाता वातदोषाची पथ्ये ही तदितर गुणांच्या दोषांची अपथ्ये होत. याप्रमाणेच इतर दोषांचे समजावे.

प्रकृत्यनुसार पथ्यापथ्य: मनुष्याच्या प्रकृत्यनुसार प्रकृतीच्या दोषाच्या विपरीत गुणांचा आहार आणि विहार हा त्या प्रकृतीच्या माणसाला पथ्यकारक होतो. याउलट प्रकृतीच्या दोषांच्याच गुणांचा आहारविहार त्या प्रकृतीच्या माणसास अपथ्यकारक होतो. रोगामधील दुष्ट दोष व प्रकृतीचे दोष हे कधीकधी भिन्न असतात. अशा वेळी ह्या दोनही दोषांना न बिघडविणारे पथ्यापथ्य असावे लागते. एकाच विकारावर वेगवेगळी पथ्ये प्रकृत्यनुसार योजावी लागतात. मूल जन्मल्यानंतर दहा दिवसांत त्याचे प्रकृति-परिक्षण करून त्या त्या प्रकृतीच्या दोषानुरूप मुलाचे आहारविहार निश्चित करावेत.

मानवाच्या जन्मापासून त्याच्या शरीर-इंद्रिये व मन यांवर भोवतालच्या दृश्यादृश्य सृष्टीतील पदार्थांचे अनुकूल-प्रतिकूल परिणाम सतत होत असतात. उष्ण हवा, कडक उन्ह, कष्टकारक व्यायाम, निःसुखत्व, उपास, शोधनक्रिया, रुक्षतीक्ष्णोष्ण आहार कफप्रकृतीच्या माणसाला पथ्यकारक असतो. याच्या विपरीत इतर प्रकृतींच्याबद्दल समजावे. वर सांगितलेले दोषावरील पथ्यापथ्य त्या त्या दोषांच्या प्रकृतीचे पथ्यापथ्य होय.

दूष्यानुसार पथ्यापथ्य: शरीराच्या रसरक्तादि सात धातूंबरोबरच सिरा-धमनी-त्वचा तसेच हृदय-फुप्फुसादि कोष्ठांगांचा विचार या विषयात येतो. दूष्यानुसार पथ्यापथ्य ठरविताना दोष व दूष्य यांचा आश्रयाश्रयी भाव लक्षात घ्यावा लागतो. तसेच दूष्य वृद्धी होऊन क्षीण होऊन व दूष्य व्याप्त होऊन विकारनिर्मिती होते, ही गोष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे पथ्यापथ्य ठरवावे लागते.

दूष्य वृद्धी झाली असता त्या त्या दूष्याच्या गुणांच्या विपरीत गुणांचे आहारविहार सेवन करणे पथ्यकर असते. म्हणजे रसादि स्निग्धगुर्वादि गुणयुक्त धातूंची वृद्धी झाली असता रुक्षादि गुणांच्या द्रव्यांचे सेवन पथ्यकर होईल.

रसधातुजवृद्धिविकारावर कफाप्रमाणे म्हणजे लंघन, उष्णोदक, उष्ण-तीक्ष्ण-लघू आहार ही पथ्यकारक होतात. याविरुद्ध आहारविहार अपथ्यकर होतो.

रक्तधातूसाठी लंघन, शरीरशुद्धी राखणे, तिक्तरसाची द्रव्ये, शीत गुणाचा आहारविहार, रक्तप्रसादन करणारे मनुका, आवळकठी, तूप, साळीच्या लाह्या, डाळिंब, आमसूल, गोदुग्ध हे पदार्थ तसेच मन शांत ठेवणे व आल्हाददायक वातावरणात राहणे पथ्यकर होते. याउलट पित्तप्रकोपक आहारविहार, तीक्ष्णोष्ण मद्ये, तेले, मुळे, रायती, आंबलेले पदार्थ, संताप, अजीर्ण, अध्यशन, शरद ऋतूचा काल ही सर्व रक्तधातूला अपथ्यकारक होतात.

मांसधातू हा कफदोषाच्या गुणसमान असल्याने कफदोषाचे पथ्यापथ्य मांसधातूसाठी आवश्यक आहे. रुक्ष-तीक्ष्ण-उष्ण-लघू गुणांचा आहार, व्यायाम-श्रम-उपवास इ. विहार पथ्यकर आहे. अभिष्यंदि-गुरुस्थूल गुणांचे दही-गहू-मांस इ. पदार्थ तसेच दिवास्वाप (दिवसा निजणे), केवळ बसून राहणे इ. विहार अपथ्यकर होतो.

मेदधातू हा प्रामुख्याने स्निग्ध गुणाचा व कफसदृश गुणाचा असल्यामुळे कफदोषाचे पथ्यापथ्य मेदोवृद्धीसाठी असतो. खास मेदासाठी म्हणून कुळीथ, मूग, जोंधळा, सातू, नाचणी, मध, गरम पाणी, रुक्ष भाजके व लघू गुणाचे पदार्थ, उपवास, चिंता, संताप, जागरण, अधिक श्रम इ. विहार पथ्यकारक असून याउलट गुरु-स्निग्ध-शीत गुणांचे पदार्थ, थंड पाणी, अचिंता, सौहित्य, आराम, दिवास्वाप, अध्यशन इ. सर्व अपथ्यकर होते.

अस्थिधातुवृद्धीवर अम्ललवणकटू रसांच्या, तसेच लघु-रुक्ष-विशद गुणांच्या द्रव्यांचा उपयोग प्राधान्याने पथ्यकर होतो. याउलट मधुर-स्निग्ध-गुरु-पार्थिव गुणांच्या द्रव्यांचा उपयोग अपथ्यकर होतो.

मज्जा व शुक्र धातू यांची वृद्धी झाली असता रक्ष-कटु-उष्ण-लघू गुणांचे आहारविहार पथ्यकारक आहेत. याउलट मज्जा आणि शुक्र धातूंच्या गुणांचे पदार्थ म्हणजे, गुरु-स्निग्ध-शीत-मधुर पदार्थ किंवा साक्षात मज्जा-शुक्र या पदार्थांचे सेवन अपथ्यकर होते.

रसरक्तमांसादि दूष्ये क्षीण झाली असता त्या त्या क्षीण दूष्यसमान गुणांचे आहारविहार सेवन पथ्यकर असते. रसरक्तादि क्षीण झाली असता क्रमाने दूध-रक्त-मांसरस-मेद-अस्थिसंलग्न मांस, हाडांतील मज्जा व वृषणरस अगर शुक्र ही द्रव्ये तसेच त्या त्या धातूच्या गुणांच्या समान अन्य द्रव्यांचे सेवन पथ्यकर होते. याच्या विपरीत गुणांचा आहारविहार अपथ्यकर होतो.


रसधातू क्षीण झाला असता स्निग्ध-शीत-गुरु-द्रव गुणांचा आहार तसेच दूध-साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे, मन प्रसन्न ठेवणे, अचिंता ही पथ्यकर व रुक्ष-कटु-लघु आहार, उपवास, शोक, चिंता, व्यायाम, जागरण इ. अपथ्यकर होते. रक्तधातू क्षीण झाला असता किंचित अनुष्णशीत, अम्ल-मधुर रसाचे पदार्थ, तसेच साक्षात पित्त व रक्त हे पदार्थ पथ्यकर होतात. तीक्ष्णोष्ण-कटु-विदाही हे पदार्थ, क्रोध-उपवास-आतपसेवा इ. विहार हे अपथ्यकर होतात. मांसघातू क्षीण झाला असता साक्षात मांसभक्षण तसेच गुरु-स्निग्ध-स्थूल-शीत-मधुर अशा गुणांचे पदार्थ आणि विश्रांती ही पथ्यकारक असून याच्या विपरीत क्षार-उष्ण-तीक्ष्ण-कटु-लघु या गुणांचे पदार्थ तसेच अतिश्रम-जागरण इ. सर्व अपथ्यकर होत. मेदधातू क्षीण झाला असता गुरु-स्निग्ध-शीत गुणांचे पदार्थ, दिवास्वाप, सौहित्य, अचिंता, आराम ही सर्व पथ्यकारक असून याच्या विपरीत अपथ्यकारक होतात. अस्थिधातू क्षीण झाला असता स्निग्ध-गुरू खर शोषण द्रव्यांचे, तिक्तरससिद्ध अशा क्षीर घृतांचे बस्तिप्रयोग हे पथ्यकारक होत व याउलट ते सर्व जसे रुक्ष आहार, जागरण, संक्षोभ, अस्थिविघट्टन, अतिव्यायामादि कर्मे ही अपथ्यकारक होत. मज्जाधातू क्षीण झाला असता वा शुक्रधातू क्षीण झाला असता मधुर-स्निग्ध-शीत-गुरू गुणांचे तसेच साक्षात मज्जा वा शुक्र हे पदार्थ आणि याच गुणांचे विहार पथ्यकारक होतात. याउलट कटु-रुक्ष-उष्ण-लघू गुणांचे आहारविहार अपथ्यकारक होतात.

दूष्य-व्यापत् होऊन विकार झाले असता दुष्ट झालेले दूष्य शरीराबाहेर काढून टाकणे किंवा ज्या दोषामुळे दूष्यदुष्टी असेल त्या दोषानुसार आहारविहार सेवन हे पथ्यकर असते.

वातादि दोषांचा प्रकोप होऊन त्या त्या दूष्यामध्ये दोषांचा स्थानसंश्रय झालेल्या विकारात दोषदूष्यसंमूर्च्छनेनुसार पथ्यापथ्यांत बदल होतो. जसे रसगतवात, रक्तवात, मांसगतवात अशा विकारांत केवळ सामान्य वाताचे पथ्यापथ्य अमलात न आणता त्या धातूवरील वातदोषाला अविरोधी असे पथ्यापथ्य अमलात आणावे लागते. याप्रमाणेच शरीरातील ज्या ठिकाणचा धातू वृद्ध झाला  असेल त्या स्थानानुसार पथ्य पाळावे लागते. जसे-गुदभागी अर्श होणे व गळ्याच्या ठिकाणी मांसग्रंथी होणे यासाठी वेगवेगळी पथ्यापथ्ये आहेत. अर्शविकारात ताक हे पथ्य तर गळ्यातील ग्रंथीला ते अपथ्य ठरते.

मलानुसार पथ्यापथ्य: पुरीष, मूत्र व स्वेद हे तीन प्रमुख मल आणि दुष्ट कफ, पित्त, आर्तव, कर्णनासादिगत मल वगैरे धातूंचे मल दुष्ट होऊन होणाऱ्या विकारांवर त्या त्या धातूच्या तसेच मलाच्या दोष दूष्यानुसार पथ्यापथ्य करावे लागते. मलांची वृद्धी व मलांच्या क्षीणतेनुसार मल कमी करणारा व मलवृद्धी करणारा आहारविहार पथ्यकारक असतो. पुरीषवृद्धी झाली असता शालिवर्ग, साळीच्या लाह्या, मुळा, पुदिना, शेळीचे दूध, ताक, लघु-रुक्ष आहार, लंघन इ. पथ्यकर असून याच्या विपरीत गुणांचा आहारविहार अपथ्यकर होय. पुरीष क्षीण झाले असता सातू-उडीद, चवळी, मेंढा-बकरी यांच्या आतडे, यकृत इत्यादींचे मांस, मेथी इ. पदार्थ पथ्यकर आहेत. याच्या विपरीत आहारविहार अपथ्यकर होय.

मूत्रवृद्धी झाली असता त्यातील दोषानुबंधाचा व लक्षणांचा विचार करून प्रमेह विकारावरील पथ्यापथ्ये योजणे योग्य होते. मूत्र क्षीण झाले असता याप्रमाणेच दोषानुबंध व लक्षणे यांचा विचार करून मूत्रकृच्छ्रावरील पथ्यापथ्ये योजणे योग्य होते.

स्वेदमलाच्या वृद्धीवर मेदोविकारावरील पथ्यापथ्य योग्य होते. स्वेद क्षीण झाला असता व्यायाम, अभ्यंग, उटणी, उद्धर्तन, वाफारा, शेक, अवगाह-स्वेद इ. सर्व पथ्यकर होत. याच्या विपरीत गुणांचा आहारविहार अपथ्यकर होतो.

देशानुसार पथ्यापथ्य: जांगल देश कफप्रधान प्रकृती व विकारांना, आनूप देश वातप्रधान विकारांना व साधारण देश प्रायः तीनही प्रकारच्या प्रकृती व विकारांना पथ्यकर आहे. याचप्रमाणे शरीरस्थ प्रकृती दोषांची परीक्षा करून पथ्यकारक देश ठरवावा. पित्तप्रधान व्याधीमध्ये उन्हाळ्यात थंड प्रेदशात राहणे पथ्यकर तर उलट उन्हाळ्यात उष्ण प्रदेशात राहणे अपथ्यकर होय. शरीरस्थ व विकारस्थ दोषांना अनुलक्षून असे देश बदलणे शक्य नसेल, तर त्याप्रमाणे व जरूर तेवढे पथ्यकारक देशाचे गुण व्यक्तीभोवतालच्या वातावरणात निर्माण करावेत. जसे कफाच्या विकारावर तळमजल्यावरील वा ओल असलेली जागा अपथ्यकारक आहे, तर त्याच घरात तिसऱ्या मजल्यावर कोरडी उजेडाची तसेच भिंतींना चुना लावलेली अशी जागा पथ्यकारक होते.

काही विकारांत देशाच्या पथ्याबाबत वैचित्र्य आढळते. जांगल देशात असलेल्या श्वासाच्या रोग्यास आनूप देश पथ्यकारक वाटतो, तर आनूप देशात असलेल्या श्वासाच्या रोग्यास जांगल देश पथ्यकारक वाटतो. हिवताप, क्षय, संग्रहणी यांसारख्या विकारांत देश बदलल्यामुळे लवकर बरे वाटते व असा देश पथ्यकारक होय. रोगी ज्या देशात जन्मलेला असेल त्या देशात त्याच्या शरीराची वाढ झालेली असते व त्यामुळे लहानपण गेलेला हा देश त्याला पथ्यकारक असतो. देशावर आलेल्या कोकणातील लोकांना कोकणात गेल्याने लवकर बरे वाटते. महाराष्ट्रात आलेला मारवाडी रोगी मारवाडात गेल्यास त्याला लवकर बरे वाटते.

सध्याच्या काळात निर्माण होत असलेली बकाली शहरे निरनिराळे कारखाने, गिरण्या, सांडपाण्याची गटारे इत्यादींच्या संपर्कामुळे अपथ्यकारक होतात. याउलट खेड्यातील मोकळी हवा व स्वच्छ वातावरण पथ्यकारक होते.

बलानुसार पथ्यापथ्य: रोग्याचे व रोगाचे जसे दोन्ही प्रकारांनी बल विचारात घेऊन पथ्यापथ्य ठरवावे लागते. रोग्याचे सहज, युक्तिज व कालज असे तीन प्रकारचे बल असून त्याच्या काम करण्याच्या शक्तीवरून ते ठरवावे लागते. बल चांगले असणाऱ्या माणसाला शारिरीक कष्ट, तीव्र उपचार-औषध देणे पथ्यकारक आहे, तर दुर्बल माणसास थोडेही श्रम व तीव्र औषधोपचार अपथ्यकर आहेत. धातुक्षीणतेमुळे तसेच दोषसंचयामुळे येणाऱ्या अबलत्वावर त्या त्या कारणानुसार पथ्यापथ्य ठरवावे लागते. विकार शमनानंतर धातुक्षीणतेमुळे आलेल्या अबलत्वावर तो तो धातुवृद्धीकर आहार व विहार पथ्यकारक वाटतो. जसे विश्रांती, बृंहणकारक पदार्थ व रसायने पथ्यकारक होतात तर याच्या  विपरीत अपथ्यकारक होतात. विकारातील दोषांच्या वृद्धीमुळे येणाऱ्या अबलत्वावर ते ते दोष क्षीण करणारे आहारविहार हे पथ्यकारक होतात. जसे उपवास, व्यायाम, शरीरशुद्धी आणि वाढलेल्या दोषांच्या विपरीत गुणांचा आहारविहार पथ्यकारक होतो. याच्या विपरीत आहारविहार अपथ्यकारक होतो. चिकित्सेमुळे येणाऱ्या अबलत्वावर साठेसाळी, मांस, गहू, घृत इ. बृंहण व सुपाच्या आहार तसेच अभ्यंग, उद्वर्तन, स्नान, विश्रांती इ. पथ्यकर होत. याच्या विपरीत अपथ्यकर होते.

कालानुसार पथ्यापथ्य: ऋतुमान व दिवसमान यांनुसार सृष्टीमध्ये फरक पडून त्याच्या परिणामी शरीरातील दोषांचे चय-प्रकोप-प्रशम हे होतात. त्यामुळे कालानुरूप दोषांची पथ्यापथ्ये पाहणे आवश्यक ठरते. जसे कफकालात सकाळी थंड पेये वा पदार्थ सेवन करणे, पोटभर जेवणे पित्तकालात दुपारी उष्ण-तीक्ष्ण-कटू मद्यादि पदार्थ सेवन करणे, उपाशी राहणे वातकालात सायंकाळी अतिश्रम करणे, उपवास करणे ही अपथ्यकर होत. याच्या उलट सकाळी कफकालात मेहनत करणे, दुपारी पित्तकालात भोजन करणे, सायंकाळी वातकालात विश्रांती घेणे ही पथ्यकारक होत.


अग्न्यनुसार पथ्यापथ्य: अग्न्यनुसार पथ्यापथ्य ठरविताना दोषानुसार म्हणजे विषमाग्नीला वातदोषाचे, तीक्ष्णाग्नीला पित्तदोषाचे, मंदाग्नीला कफदोषाचे पथ्यापथ्य असते. अग्नी अबल असेल तर आहारात रुचकर, अम्लोष्ण, दीपन-पाचनात्मक हिंग, हुलगे, लसूण, कढणे, गरम पाणी असे पदार्थ पथ्यकर होतात. पित्तामुळे अग्नी रुक्षकटु-रसात्मक, ग्राही असे पदार्थ पथ्यकारक होतात. तीक्ष्णाग्नी असेल तर (जसे भस्मक विकारात) गुरु-शीत-मधुर-स्निग्ध व अतिमात्रेत असे पदार्थ तसेच दिवास्वाप, विश्रांती हे विहार पथ्यकर आहेत. याउलट असणारे आहारविहार तीक्ष्णाग्नीला अपथ्यकर होतात.

वयानुसार पथ्यापथ्य: अगदी तान्ह्या मुलास त्याच्या आईचे दूध पथ्यतम आहे. त्याच्या अभावी गायीचे वा शेळीचे दूध आईच्या दूधाच्या समान गुणाचे केलेले पथ्यकर होते. घृत, मध हेही पथ्यकर आहेत. मूल दोन वर्षाचे होईपर्यंत गुरु-शीत-स्निग्ध पदार्थ पचणे कठीण असल्यामुळे तसेच लंघन, पंचकर्मे इ. कर्मे बालकास अपथ्यकर होतात.

तरुण वयात रसायन घेणे, सर्व रसाभ्यास असणे, नेहमी कार्यमग्न असणे हे पथ्यकर असून याउलट अतिसाहस, अजीर्ण भोजन, अतिभोजन, अध्यशन, संताप इ. अपथ्यकर आहे.

वृद्धांना नियमित आणि अल्प आहारविहार, विश्रांती, दिवसा अल्प निद्रा, लघू स्निग्धोष्ण पदार्थ, रसायने, चिंता न करणे, मन शांत ठेवणे ही सर्व पथ्यकर होत. याउलट लंघन, शोधन, अतिश्रम, गुरु-शीत-रुक्ष-उष्ण पदार्थ, जागरण, व्यायाम इ. अपथ्यकर होत.

सवयीनुसार पथ्यापथ्य: मनुष्याच्या नेहमीच्या सेवनातील आहार्य पदार्थ व वागणूक ही त्या त्या मनुष्याला बहुधा मानवतात. प्रकृतीच्या विपरीत गुणांची मानवतात पण समगुणी द्रव्ये बहुधा मानवत नाहीत. जी मानवतात ती पथ्यकर समजावीत व जी मानवत नाहीत ती अपथ्यकर समजावीत. ज्या माणसाला जो पदार्थ नेहमी सवयीचा असतो, त्याला त्याच्या बदली त्याच गुणाचा दुसरा पदार्थ दिला, तरी तो सवयीचा नसल्यामुळे त्या द्रव्याचा अग्नी तयार नसतो म्हणून अपथ्यकर असतो. उदा., मांस गुरु-स्निग्ध गुणाचे आहे तसेच गहूसुद्धा गुरु-स्निग्ध गुणाचे आहेत. म्हणून गहू खाण्याची सवय असणारा माणूस एकदम मांस खाऊ लागल्यास मांस पचविणारा अग्नी बलवान नसल्यामुळे ते पचत नाही व अपथ्यकर होते.

मारवाडी लोकांना तुपाची, गुजराती लोकांना गव्हाची, कोकणी लोकांना भाताची, कानडी लोकांना तिखटाची, शेतकऱ्यांना कष्टाची, गवई लोकांना जागरणाची सवय असते व तेच त्यांना पथ्यकर असू शकते. याच्या विपरीत आहारविहार अपथ्यकर असते. कित्येक सवयी केवळ मानसिकच असतात. त्यांचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. रोगाच्या सवयीनुसार आहारविहार ठरविणे म्हणजे केवळ रोग्याला पसंत पडेल तेच ठरवावयाचे असे नव्हे, तर जेणेकरून शरीराचे आरोग्य बिघडणार नाही, असा विचार करून व योग्य संस्कार करून ठरवावे म्हणजे तो पथ्यकारक होतो.

व्याध्यवस्थानुसार पथ्यापथ्य: व्याधीच्या साम-पच्यमाननिराम-मृदु-मध्यम-दारुण-नवीन-जुनाट (जीर्ण) संवत्सरातीत इ. अशा अवस्था लक्षात घेऊन पथ्यापथ्य ठरवावे लागते. व्याधीच्या आमावस्थेत उपवास-लघुरुक्षोष्ण दीपनपाचन द्रव्ये, गरम पाणी, शेकविणे इ. पथ्यकर असून शीत-गुरु-स्निग्ध द्रव्ये अपथ्यकर होतात निरामावस्थेत त्या त्या विकारानुसार पथ्यापथ्य करावे. मृदू व्याधीला थोडेसे श्रम पथ्यकर तर दारुण व्याधीला थोडेही श्रम अपथ्यकर होतात.

औषधानुसार पथ्यापथ्य: औषधी द्रव्यांची शरीरावर कार्य करण्याची विशेष रीत असते. औषधाचे  उष्ण-तीक्ष्णादि विशेष गुण किंवा त्या त्या द्रव्याचे कार्य होत असता आहारातील द्रव्यांमुळे अगर विहारामुळे औषधिद्रव्याच्या कार्यांला विरोध होता कामा नये, अशी अपेक्षा असते. जसे काही ठराविक भस्मांचे (उदा., ताम्र-मोरचूद) उत्थापन करणारे दही ती भस्मे पोटात घेत असता खाऊ नये. थोडक्यात औषधाच्या शरीरातील कार्याशी विरोध न करणारा पदार्थ पथ्यकर व औषधाचे शरीरातील कार्य बिघडविणारा पदार्थ अपथ्यकर होय. अशा प्रकारच्या औषधानुसार पथ्यकर वा अपथ्यकर द्रव्यांची काही उदाहरणे कोष्टक क्र. १ मध्ये दिल्याप्रमाणे आहेत.

कोष्टक क्र. १. औषधिद्रव्यानुसार पथ्यापथ्य 

औषधिद्रव्य 

पथ्यापथ्य 

शिलाजित 

कुळीथव कुळिथापासून बनविलेला कोणताही पदार्थ अपथ्यकर. 

हरताल सोमल कल्प 

तेल-तिखट-मीठ-उष्ण पदार्थ अपथ्यकर. 

बिब्बा 

तूप अधिक प्रमाणात खाणे पथ्यकर व पित्तदुष्टी असताना उन्हाळ्यात घेणे आणि उष्णतीक्ष्णादि पदार्थांबरोबर घेणे अपथ्यकर. कोथिंबीर सेवन विशेषरूपाने अपथ्यकर. 

पिंपळी 

दूध-भात पथ्यकर. 

मध 

उष्ण स्पर्शात्मक असा पदार्थ अपथ्यकर. ओकारी व विरूह बस्तीला उष्ण मध चालतो. 

लशुन (लसूण) 

मांस-मध-तक्र यांसारखी तसेच अम्ल द्रव्ये पथ्यकर व व्यायाम, आतप, संताप आणि अधिक पाणी पिणे, दूध-गूळ घेणे अपथ्यकर. 

पारद कल्प 

सैधव, धान्यक, जिरे, आले, तांदुळजा, पडवळ, साळीच्या लाह्या, जुने तांदूळ, गहू, गोदुग्ध, तूप, मुगाचे पाणी, मनुका, डाळिंब, खजूर हे पदार्थ पथ्यकर. कुळीथ, तीळ, पावटे, आनूप मासे, गुरु-विष्टंभी भोजन,‘क’ कार असलेले करीर, कर्टोली, कोहळा, काकडी, करमर्दक इ. पदार्थ अपथ्यकर. 

पर्पटी कल्प 

केवळ दूध पथ्यकर. 

गंधक रसायन 

दूध-तूप, विश्रांती, जांगल मांस, छगल मांस हे पथ्यकर होत. खारट-अम्ल-पालेभाजी-द्विदल धान्य, स्त्रीसेवन, उंचावर चढणे (जिना-डोंगर इ.) वाहनातून प्रवास करणे, क्रोध, शोक हे अपथ्यकर होत. 

याप्रमाणे इतरही अनेक औषधांनुसार निरनिराळी पथ्ये पाळावी लागतात. म्हणजे औषधाचे कार्य व परिणाम योग्य तो होतो.

व्यवसायानुसार पथ्यापथ्य: रोजच्या व्यवसायाच्या अनुसार शरीराच्या घटकांत जी लाभहानी होते, तिला अनुसरून पथ्यापथ्ये ठरवावी लागतात. सामान्यपणे शारीरिक मेहनतीचा व्यवसाय करणाऱ्यांना स्निग्ध-मधुर-गुरू असे पदार्थ आणि विश्रांती ही पथ्यकर होत. याउलट तिखट-तीक्ष्ण-उष्ण-रुक्ष पदार्थ, उपवास, जागरण ही अपथ्यकर आहेत. बैठे व्यवसाय करणाऱ्यांना याच्या विपरीत पथ्यापथ्य समजावे. याप्रमाणे इतर अनेक व्यवसायांनुसार पथ्यापथ्य पाळावे. गवई, वक्ते, अध्यापक इ. वाक् इंद्रियाला अधिक श्रम देणाऱ्यांनी ‍‌जेवण झाल्यावर पाणी पिऊ नये प्याल्यास ते कंठ व उर यांतील आहारज स्नेह नाहीसा करून फार दोष निर्माण करते.


रोगानुसार पथ्यापथ्य: प्रत्येक रोगाची संप्राप्ती वेगवेगळी असल्यामुळे किंबहुना दोषादींच्या वेगवेगळ्या तऱ्हांनी शरीराच्या निरनिराळ्या ठिकाणी दोषादि राहिल्याने वेगवेगळे विकार होतात. शिवाय विकारांची अवस्थाप्रभाव यांच्या प्रत्येक विकारात वेगवेगळे पथ्यापथ्य पाळावे लागते. असे पथ्यापथ्य पाळल्याने औषधोपचारास मदत मिळून संप्राप्तिभंग होऊन रोगोपशम लवकर होतो. शिवाय रोगाला अपुनर्भवत्वही प्राप्त होते. रोगांची कारणे पुनःपुन्हा घडू न देणे हे त्या त्या विकाराचे पथ्यच होते.

या दृष्टीने मुख्य विकारांवरील पथ्यापथ्य येणेप्रमाणे आहेत.

ज्वर: (अ) तरुण ज्वर : उपवास, वमन, स्वेदन, उष्णोदक, यवागू, तिक्त व पाचन गुणांची द्रव्ये, विश्रांती इ. पथ्यकर होत आणि स्नान, मैथुन, व्यायाम, अभ्यंग, दूध, डाळीचे पदार्थ, गुरु-स्निग्ध-शीत पदार्थ इ. अपथ्यकर होत. (आ) विषमज्वर : तरुण ज्वराप्रमाणे व तप, होम, दान, नियमन, जप, रत्नौषधी धारण करणे इ. पदार्थ पथ्यकर असून तरुण ज्वराप्रमाणेच अपथ्यही समजावे. (इ) जीर्ण ज्वर : तूप, दूध, गहू, ताजे ताक इ. पौष्टिक व हलके भोजन, शक्तिवर्धक पाक (बदाम-कूष्मांड इ.), अभ्यंग, उटी, उष्णोदक इ. पथ्यकर असून अधिक श्रम, जागरण, तरुण ज्वरात सांगितलेली अपथ्ये तसेच उपवास, वातवर्धक आहार इ. अपथ्यकर आहेत. (ई) आगंतु-ज्वर : यामध्ये निजरूप येण्यापूर्वी तूप, मांसरस, स्निग्धोष्ण लघू आहार ही व इतर इष्ट गोष्टींचा लाभ, आश्वासने, मनःशांती ठेवणे, होम, तप, दान इ. पथ्यकर होत. वरील इतर ज्वरांतील अपथ्ये हीच आगंतु-ज्वरातीलही अपथ्ये होत.

अतिसार: दीपन-पाचन-लघू गुणाचा आहार, लंघन, जुने तांदूळ, लाजमंड, मसूर, ताक, लिंबू, आले, कवठ, कोवळे बेलफळ, डाळिंब, जिरे, धने, कोथिंबीर, कढणे, उष्णोदक इ. पथ्यकर असून गुरू गुणाचा आहार, नवे तांदूळ, शीत-गुरु-स्निग्ध-पिष्टमय पदार्थ-गहू-पावटे-इक्षु-विकृती द्राक्षे, थंड व दुष्ट पाणी, रुक्ष व असात्म्य पदार्थ, वेगावरोध, अभ्यंग, अवगाह, स्वेदन व्यायाम इ. अपथ्यकर होत.

ग्रहणी: लघु-दीपन – पाचन गुणाचे पदार्थ, साळीचा भात, ताक, मूग, अजाक्षीर लोणी, डाळिंब, लिंबू, मोसंबी, कवठ, कोवळे बेलपळ, पक्क सोनकेळे, लाजमंड, हरीण-तित्तिर-लावा-ससा इत्यादींचे मांसरस, गोड रसाळ आंबा, दूध इ. पथ्यकर असून गुरू गुणाचा आहार वगैरे  अतिसार विकारातील अपथ्ये ही ग्रहणी विकारांतीलही अपथ्ये समजावीत.

अर्श: दीपन-पाचन, लघु, अनुलोमन करणारे पदार्थ, साठेसाळीचा भात, ताक, लोणी, तूप, दूध, गहू, जोंधळा, तीळ, हुलग्याचे कढण, सुरण कंद, चाकवत, कंदर्प (कांदा), आवळकठी, मोसंबी, काळ्या मनुका, लिंबू, सैंधव, पुदिना, हरिणाचे मांस इ. पदार्थ पथ्यकर व हरभरे, वाटाणे, तेल, तिखट, आंबट पदार्थ, थंडगार पाणी, मैथुन, अश्वारोहण, कठीण आसनावर बसणे, उत्कटासन, जागरण, मलमूत्रादिकांचे वेग धारण करणे इ. सर्व अपथ्यकर होय.

अग्निमांद्य अजीर्ण: लंघन, उष्णोदक, लघू, उष्ण गुणांचे पदार्थ तसेच त्या त्या अजीर्ण करणाऱ्या पदार्थानुसार त्याला पचविणारे पदार्थ जसे केळ्याच्या अजीर्णावर तूप, तुपाच्या अजीर्णावर ताक, हरभऱ्याच्या अजीर्णावर मुळा, मुळ्याच्या अजीर्णावर आवळकठी इ. पदार्थ पथ्यकर असून विरुद्ध पदार्थ जसे अम्ल पदार्थाशी दूध, दूध व फळे यांचा संयोग, असात्म्य तसेच गुरु-विष्टंभि-शीत अभिष्यंदी असे पदार्थ अपथ्यकर आहेत.

कृमी: सर्व रसात्मक आहार, लघू गुणाचे पदार्थ, गरम पाणी पिणे, नेहमी मलप्रवृत्ती साफ ठेवणे इ. सर्व पथ्यकर असून अतिमधुर किंवा एकरसात्मक आहार, दही, पालेभाज्या, गुरू गुणांचे पदार्थ, थंडगार पाणी, माती खाणे, अध्यशन ही सर्व अपथ्यकर आहेत.

पांडूरोग: साठेसाळी, गहू, सातू, जांगलरस, मूग, मसूर, साळीच्या लाह्या, मनुका, आवळकठी, डाळिंब, गाजर, गायीचे दूध व लघू गुणांचा आहार पथ्यकर असून तिखट, आंबट, उष्ण-तीक्ष्ण व पित्तकर असा आहारविहार, मैथुन, संताप, फार दूर चालणे, विस्तवाजवळ शेकणे, अतिश्रम, लंघन इ. सर्व अपथ्यकर होय.

रक्तपित्त: जुने तांदूळ, रक्तशाली, मूग, मसूर, मटकी यांचे कढण डाळिंब, आवळा, आमसूल, इ. फळे माठ, पडवळ, पोकळा, तांदुळजा यांच्या तुपाच्या फोडणीच्या भाज्या गायीचे किंवा शेळीचे दूध, तूप वाळा-चंदन-पित्तपापडा इ. द्रव्ये घालून  उकळलेले पाणी पिणे हरिण-ससा-पारवा इत्यादींचे मांसरस तसेच थंड हवेत राहणे, घरात वाळ्याचे पडदे लावणे, मन आनंदी व शांत राखणे, प्रकृतीस सोसवेल त्यानुसार थंड पाण्यात अवगाहन करणे, चंदन-कापूर-गुलाब-वाळा इ. मंद सुवासिक पदार्थांची उटी व पुष्पमाला धारण करणे इ. पथ्यकर असून पित्तप्रकोपक आहारविहार, विशेष अतिश्रम, जागरण, मनस्ताप, अतिद्रव पदार्थ, अम्ल-तीक्ष्ण व उष्ण असे पदार्थ हे अपथ्यकर आहेत.

राजयक्ष्मा: हळव्या व जुन्या तांदळाचा भात मुगाचे वरण दूधभोपळा, मुळा, तांदुळजा, मेथी, पडवळ, घोसावळे, दोडका यांच्या कमी तिखटाच्या भाज्या गायीचे अथवा शेळीचे दूध, तूप, लोणी मध खडीसाखर आमसूर, लसूण, पुदिना, ओले खोबरे यांच्या चटण्या द्राक्षासव, मधूकासव हरीण, बकरी, साप यांचे मांसरस कोंबडीची अंडी बेदाणा, मनुका, काळा खजूर, गोड आंबा, मोसंबी, पपई ही फळे पिण्यासाठी श्रृतशीत जल किंवा जरूरीप्रमाणे वाळा, चंदन, गुलाब, जेष्ठमध, मनुका यांनी सिद्ध केलेले जल नियमित व मित आहार इत्यादीचे सेवन तसेच स्वच्छ पांढरे हलके रेशमी अगर मलमलीचे कपडे, बैठकीस मऊ गादी व सुखकर साधनांनी सज्ज अशी खोली, जांगल देशांत-माळावर-गावाबाहेर बांधलेले टुमदार घर, राहण्याच्या जागेभोवती शेळ्या बांधणे तसेच मन नेहमी उल्हसित व आनंदी विचारात मग्न असणे, शारीरिक व मानसिक ब्रह्मचर्य पाळणे, आचार रसायने पाळणे इ. सर्व पथ्यकर असून विषमासन, अध्यशन, विरुद्धाशन, गुरु-विष्टंभी गुणांचे पदार्थ, वेगावरोध, साहसकर्मे, अतिमैथुन, शोक, दुःख, चिंता, मनस्ताप, राजयक्ष्मा झालेल्या रोग्याचा संसर्ग हे सर्व अपथ्यकर होय.

श्वास: जुने धान्य, जोंधळा, बाजरी, पडवळ, कारले, दूधभोपळा, मेथी, शेपू, मुळा, सुरण, लसूण, गोवारी, पुदिना, आले, मनुका, उकळलेले पाणी, शुंठी-दालचिनी यांनी  सिद्ध केलेले पाणी, तसेच उबदार कपडे, उंच उसे, झोपण्याची मोकळी जागा तसेच ती प्रशस्त व प्रसन्न असणे, प्राणायामादि आसने करणे इ. सर्व पथ्यकर असून नवे अभिष्यंदी धान्य शीत-गुरु-स्निग्ध गुणांचे श्रीखंड, बासुंदी, थंड पेये, कलिंगड, खरबुज, केळी, अंजीर, द्राक्षे, सिताफळ, काकडी, पेरू, हरभऱ्याचे पदार्थ, मासे इ. पदार्थ तसेच गार वारा, थंड पदार्थ, वर्षा व शीत ऋतू, श्रम, अतिव्यायाम, पुरोवात, जागरण, दिवास्वाप, मनस्ताप, रात्री उशीरा जेवणे, धूळ, धूर तीक्ष्ण अत्तरे, रंगांचे-औषधांचे वगैरे तीक्ष्ण-दुर्गंधी वास इ. सर्व अपथ्यकर होत.

कास (खोकला): साठे तांदूळ, गहू, मूग, मसूर, कुळीथ, बकरीचे दूध, मुळा, मेथी. टाकळा, मनुका, लसूण, लाह्या, मध, गरम पाणी, आले, पुदिना, विडा हे पदार्थ तसेच शौचाला साफ ठेवणे, उबदार कपडे घालणे, विश्रांती घेणे इ. विहार पथ्यकर असून दही, दूध, मधुरस्निग्ध-कफकर पदार्थ, पिष्टान्न, थंड पाणी, थंड हवा तसेच अतिव्यायाम अती बोलणे, धुराच्या व धुळीच्या जागेत राहणे, वेगावरोध, मैथुनातिसेवन इ. अपथ्यकर आहेत.


ओकारी (छर्दी): साळीच्या लाह्या, मूग, साठे तांदूळ, सातू, गहू ससा, तित्तिर, लावा, हरीण यांचे मांसरस निरनिराळे रुचकर पदार्थ कोशिंबिर, द्राक्षे, मनुका, डाळिंब, संत्रे, मोसंबी पथ्यकर असून ओकारी निर्माण करणारे नाना मनोविकार अगर बीभत्स हेतू, असात्म्य, विषारी, अतिलवणयुक्त पदार्थ इ. सर्व अपथ्यकर आहेत.

अपस्मार: रक्तशाली, मूग, गहू, तूप, जांगलरस, कासवाचे मांस, ब्राह्मी, वेखंड, पडवळ, कोहळा, चाकवत, डाळिंब, शेवगा, द्राक्षे, आवळकठी, बोरे हे पदार्थ तसेच विश्रांती, आश्वासन, मनोनुकूल वातावरण इ. सर्व पथ्यकर असून मासे, मद्य, विरुद्धान्न, तीक्ष्णोष्णगुरु-विष्टंभी भोजन, थंडगार पदार्थ, अतिव्यवाय, पूज्य व्यक्तींचा अवमान करणे, श्रम, अती झोपणे, वेगावरोध करणे, जलाशय-अग्नी-खोल खड्डा इ. ठिकाणी एकट्याने जाणे तसेच रुग्णाला त्याच्या विकाराची जाणीव करून देणे इ. सर्व अपथ्यकर होय.

उन्माद: रक्तशाली, गहू, मूग, धारोष्ण गोदुग्ध, तूप, पंजगव्य, जांगल मांसरस, कासवाचा मांसरस, कोहळा, पडवळ, ब्राह्मी, मनुका, वेखंड इ. पदार्थ तसेच मनःशांती, आश्वासन, देवादिकांचे पूजन इ. विहार पथ्यकर असून मद्य, मासे, विरुद्धान्न, तीक्ष्णोष्ण-गुरू-विष्टंभी भोजन, थंडगार पदार्थ, अतिव्यवाय, पूज्य व्यक्तींचा अवमान करणे, श्रम, अती झोपणे, वेहगावरोध करणे, जलाशय, अग्नी, खोल खड्डा इ. ठिकाणी एकट्याने जाणे इ. अपथ्यकर आहे.

वातरोग: वातदोषावर सांगितलेली पथ्ये (पहा : वातदोषावरील पथ्ये), स्निग्धोष्ण पदार्थ, रक्तशाली, गहू, उडीद, मूग, तूप, दूध, फळभाज्या, ताजे गोड ताक, शेवगा, उकळलेले पाणी, मांसरस, गोड फळे हे पदार्थ तसेच विश्रांती घेणे, चिंता न करणे, शोक न करणे इ. विहार पथ्यकर असून थंड हवा, रुक्षकटुतिक्तकषाय रसात्मक द्रव्ये तसेच अतिचिंता, अती बोलणे, अतिश्रम, मैथुन इ. विहार अपथ्यकर आहे.

शूल : साळीच्या लाह्या, मूग, पटोल, चाकवत, कारले, गोड शेवगा, सैंधव, लिंबू, मनुका हे पदार्थ तसेच नियमित व वातानुलोमक आहार विहार पथ्यकर असून रुक्षतिक्तकटुकषायंशीतगुरुअभिष्यंदी तसेच विरुद्ध पदार्थ–दही-मध-डाळी, पावटे, कुळीथ इ. पदार्थ तसेज अतिव्यायाम, वेगावरोध, मैथुन, शोक, चिंता, जागरण इ. अपथ्यकर होय.

हृद्रोग: साठे साळीचे तांदूळ, सातू, पटोल, कारले, चाकवत, सुरण, जांगल मांस इ. अनुलोमक द्रव्ये, उकळून गार केलेले पाणी, केवल (निराम) वातज हृद्रोगावर दूध, दही, तूप, गूळ इ. पथ्यकर असून अत्युष्ण गुरु-कषाय-तिक्त-शीत-स्निग्ध आहार  तसेच मुख्यत्वे तैल, अम्ल पदार्थ (दही, मद्य, अम्लविपाकी पदार्थ जसे कुळीथ, पावटे वगैरे), कृमिवर्धक पिष्टमधुर मृत्तिकादि द्रव्ये तसेच शोक-संताप-उन्ह, चिंता, वेगावरोध इ.  आणि एका प्रकारच्या वातज हृद्रोगाखेरीज इतर चार प्रकारच्या हृद्रोगांवर दूध, दही, गूळ, तूप, पाण्यातील व दलदलीच्या प्रदेशांतील प्राण्यांचे मांस इ. पदार्थ अपथ्यकर आहेत.

मूत्राघात: जुने रक्तशाली, जांगल मांसरस, मद्य, ताक, मांषयूष, जुना कोहळा, पडवळ, खजुर, नारळ, ताड यांची फळे तसेच मूत्राघात विकारातील दोषदूष्यांनुसार पथ्यकर द्रव्ये ही पथ्यकर असून विरुद्धाशन, रुक्ष, विदाही, कटु अम्ल, तीक्षोष्ण, विष्टंभी पदार्थ, व्यायाम, व्यवाय, जागरण, वेगविधारण, मार्गशीलन इ. अपथ्यकर होत.

मूत्रकृच्छ्र: शालिवर्ग, जुने तांदूळ, मूग, मसूर, कढण, खडीसाखर, ताजे ताक, कोहळा, काकडी, उसाचा रस, नारळाचे पाणी, पड़वळ, जवखार, सैंधव, मेंढीचे दूध, खजूर, तांदळाचे पाणी, आवळकठी, तूप तसेच अवगाह स्वेद, विश्रांती इ. पथ्यकर असून कटू, रुक्ष, उष्ण, विदाही, तीक्ष्ण पदार्थ मासे, मोहरीचे तेल, अतिमद्य, श्रम, यानावरोहण, शोक, जागरण, मैथुन, वेगावरोध इ. अपथ्यकर होत.

अश्मरी – शर्करा: कुळिथाचे कढण, मूग, जुने सातू, तांदूळ, जांगल मांस, कोहळा, आले, जवखार, ताक, दूध, साखर, उसाचा रस, काकडी, मेंढीचे दूध, अवगाह स्वेद इ. पथ्यकर असून रुक्ष, उष्णतीक्ष्ण-कटू द्रव्ये, मद्य, मोहरीचे तेल, वाटाणा, हरभरा, दही, मासे व अभिष्यंदी पदार्थ तसेच जागरण, मैथुन, घोड्यावर बसणे, वेगविधारण करणे इ. सर्व अपथ्यकर होत.

प्रमेह: मेदोघ्न, मूत्रवृद्धी कमी करणारे, धातुसाम्य राखणारे, बलवर्धक असे पदार्थ, सातू, वरई, सावे, हरीक, नाचणी, वेळूचे बी, गहू, पालेभाज्या, ताक, हुलगे, मूग इ. पदार्थ व लाकडे फोडणे, पळणे, डोंगर चढणे, खूप चालणे, विहीर खणणे, पायांत न घालणे, छत्र न वापरणे, निर्धन असणे वगैरे कष्टकारक विहार ठेवणे, रुक्ष उटणी अंगाला लावणे, वारंवार स्नान करणे, यतेंद्रिय ऋषिमुनींप्रमाणे दिनचर्या ठेवणे इ. सर्व पथ्यकर असून शीत-कुरु-स्निग्ध व अभिष्यंदी पदार्थ, नवे अन्न, मध, दही, ऊस, गुळापासून बनविलेले पदार्थ तसेच स्वेदन, रक्तमोक्षण, बसून राहणे, दिवास्वाप, स्नान न करणे ही अपथ्यकर होत.

उदर: दोषसंचयानुसार लघू पदार्थ, गायीचे दूध, रक्तशाली, मूग, कुळीथ, मृगादींचे जांगल मांसरस, मध, सैंधव, ताक, लसूण, एरंडेल, आले पुनर्नवा, शेवगा या भाज्या, दीपन-पाचन करणारे पदार्थ तसेच अवस्थेनुसार संसर्जनाचा पथ्योपक्रम ठेवावा लागतो. उदा., जलोदरातील विरेचनोपक्रमाने दोषसंचय व शोथ (दाहयुक्त सूज) नाहीसा झाल्यावर सहा महिने केवळ गोदुग्ध तीन महिने थोडी पेज, साळीच्या लाह्या, मध, आवळकठी हे पदार्थ त्यापुढील तीन महिने मऊ भातकुळिथाचे कढण, ताजे ताक, आले, सार, पुदीना, लसूण हे पदार्थ त्यापुढे तीन महिने हलके पदार्थ घेऊन मग क्रमाने नेहमीचे पदार्थ खाऊ घालावेत. दरवर्षी पावसाच्या सुरुवातीस काही दिवस गायीच्या दुधावर रहावे.

गुरु-स्निग्ध-शीत-अभिष्यंदी गुणांचे पदार्थ, मलिनान्न, अत्यंबुपान, शीतजलपान, दिवास्वाप, अध्यशन, विषमांसन, अधिक श्रम, जागरण, मैथुन, अजीर्ण इ. तसेच जलोदरात स्नान, पाणी पिणे इ. कोणत्याही प्रकाराने शरीराला पाण्याचा स्पर्श होणे, ढगाळ व कुंद हवेत राहणे, वर्षाऋतुकाल इ. सर्व अपथ्यकर होत.

शोथ: जुने धान्य, सातू, दशमूल-सिद्ध पेज, कुळीथ, मूग, गहू, जुने तूप, ताजे ताक, घेटुळी, पडवळ, मुळा, आवळकठी, लघुरुक्षोष्ण अनभिष्यंदी पदार्थ, आले जुना गूळ हे पदार्थ पथ्यकर असून पिष्टान्न, उष्णतीक्ष्ण पदार्थ, लवण, मध, दूध व दुधाचे पदार्थ, तेल, ग्राम्य आनूप व शुष्क मांस, शुष्कभाज्या, नवे अन्न, दही, बव्हशन, दिवास्वप्न, असात्म्य आणि अतिशीत गुणाचा आहारविहार, मैथुन इ. अपथ्यकर होत.

कुष्ठ: जुने तांदूळ, गहू, नाचणी, सातू, तूप, गोड फळे, दूध फळभाज्या, आवळा, मूग, आमसूल, कटुकषाय द्रव्ये, जांगल मांस, तसेच नियमित व नियंत्रित आचारण व आहार इ. पदार्थ पथ्यकर असून तीळ, उडीद, मासे, दही, मुळा, हरभरा, तीक्ष्ण-उष्ण-लवण-अम्ल-रसात्मक, अभिष्यंदी पदार्थ, उन्ह, शेक, जागरण, अनवाणी चालणे, अतिव्यायाम, दिवास्वाप, साधुनिंदा, दुसऱ्यांचे धनवित्तादि हरण करणे, कुष्ठी रुग्णाचा संसर्ग इ. गोष्टी अपथ्यकर होत.

अम्लपित्त: गव्हाचे हलके पदार्थ, खाकरा, शेवगा, मुगाचे वरण, उडीद दूधभोपळा, पडवळ, घोसाळे इ. भाज्या दूध, तूप, गोड फळे, मनुका, मध, आवळकठी, आमसूल, डाळिंब, साळीच्या लाह्या, शृतशीतजल, तसेच लवकर व नियमित भोजन घेणे, मलप्रवृत्ती साफ ठेवणे, नियमित व्यायाम करणे व कामात मग्न असणे इ. पथ्यकर असून कुळीथ, पावटे, नवा तांदूळ, तूर, मध असे अम्लविपाकी पदार्थ, कटु-अम्ल-उष्ण-विदाही-तीक्ष्ण लवण पदार्थ गुरु-अभिष्यंदी-रुक्ष असे पोहे, दही, हरभरा, गूळ, तेल, शीतजल इ. तसेच जागरण, ऊन, चिंता, अध्यशन, वेगावरोध, रिकामे बसणे, आसवारिष्टे इ. अपथ्यकर होत.

गुल्म: एक वर्षाचे जुने रक्तशाली, उडीद, गहू, दूध, पालेभाज्या, पुदिना, मुळा, लसूण, आले, आंबा, पपई, मोसंबी, संत्री, सफरचंद इ. फळे, ताक, तूप, उकळलेले पाणी, बस्ती, विश्रांती इ. गोष्टी पथ्यकर असून हरभरा, वाटाणे, मटकी, शिंबी धान्ये (शेंगायुक्त धान्ये), वरई, बाजरी, नाचणी, शूक धान्ये, शुष्क मांस, मासे, थंड पाणी, मलमूत्रादिकांचे वेगधारण, अतिश्रम, व्यायाम, चिंता, जागरण इ. गोष्टी अपथ्यकर आहेत.


भगंदर:जुन्या रक्तशाली, मूग, कढणे, पडवळ, शेवगा, वेताचे कोंब, कोवळा मुळा, उकळलेले पाणी इ. पदार्थ पथ्यकर असून रुक्ष-कटु-तीक्ष्णोष्ण आहार, मलावरोध करणारे पदार्थ, व्यायाम, मैथुन, उकिडवे बसणे घोड्यावर, कठीण आसनावर बसणे, जास्त चालणे इ. अपथ्यकर आहेत.

आमवात: जुने सातू, कुळीथ, रक्तशाली, शेवगा, आले, लसूण, पुदिना, कारली, दूधभोपळा, पडवळ, घेटुळी इ. भाज्या जांगल मांस, उकळलेले पाणी इ. पदार्थ पथ्यकर असून दही, मासे, गूळ, उडीद, आनूप, शुष्क मांस, थंड पाणी, समोरचा वारा, अजीर्ण, जागरण आणि वेगावरोध इ. अपथ्यकर होत.

ऊरुस्तंभ: कोद्रव, रक्तशाली, सातू, कुळीथ, श्यामाक, उद्यालक, जुनी धान्ये, शेवगा, कारले, पडवळ, चाकवत, काकमाची, मीठ न घातलेल्या भाज्या, जांगल मांसरस, उकळलेले पाणी, रुक्ष-आहार-विहार, नदीत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे इ. गोष्टी पथ्यकर असून गुरु-शीत-द्रव-स्निग्ध, प्रधान गुणांचा आहारविहार, विरुद्ध असात्म्य भोजन इ. अपथ्यकर होत.

वातरक्त: सातू, साठे तांदूळ, रक्तशाली, गहू, चणक, मूग, मकुष्ठ इ. धान्ये शेळी, मेंढी, म्हैस व गाय यांचे दूध उपोदिका, काकमाची, वेत्राग्र, चाकवत, कारले, तांदुळजा, पडवळ, सुरण, सुंठ, साखर, आवळकठी, मनुका, कोहळा लोणी, तूप लावा-तित्तिर, कोंबडा, पारवाचिमणी इ. व कटु द्रव्ये पथ्यकर असून उडीद, कुळीथ, पावटे, क्षार, आनूप मांस, विरुद्धान्न, दही, मुळा, उस, मध विडा, कांजी, तीळ, कटुतीक्ष्ण उष्ण-गुरु-अभिष्यंदी लवण रसांची द्रव्ये तसेच पाय खाली सोडून बराच वेळ बसणे, जागरण, मैथुन, उन्हविहार हे अपथ्यकर होत.

कामला: (कावीळ). सातू, गहू, रक्तशाली, मूग, मसूर, दूधभोपळा, पडवळ, मनुका, आवळकठी, साखर, मध, तूप, साळीच्या लाह्या, भरपूर दूध, विश्रांती इ. पथ्यकर असून तिखट, मसाला, तेल, मीठ, आंबट फळे, अतिथंड-गुरु-पदार्थ तसेच शेक, उन्ह, श्रम, संताप जागरण, मैथुन इ. आहारविहार अपथ्यकर होय.

स्त्रोतोरोधजन्य कामलेत तिखट-आंबट-खारट-उष्ण-क्षार हे पदार्थ मात्र पथ्यकर असून गोड – थंड व जड हे पदार्थ अपथ्यकर आहेत.

शीतपित्त: जुने तांदूळ, मूग, गहू, मसूर, कारली, उपोदिका, वेताचे कोंब, उकळलेले पाणी व इतर कफपित्तघ्न द्रव्ये, चारोळी हे पथ्यकर असून गुरु-शीत-स्निग्ध-आंबट-तिखट पदार्थ तसेच थंड पाण्याचे स्नान, समोरचा वारा, वेगावरोध, जागरण इ. गोष्टी अपथ्यकर होत.

दाह: साठे साळी, मूग, मसूर, जांगल मांस, लाजमंड, सातू, शतधौतघृत, दूध, कोहळा, काकडी, केळे, गोड डाळिंब, पडवळ, खजूर, तोंडले, भोपळा, मनुका, शिंगाडा इ. पदार्थ तसेच शीत वारा, विश्रांती, सौम्य सुगंधी जसे वाळा, चंदन इ. द्रव्यांचे ओले पडदे सभोवती ठेवणे, चांदण्यात बसणे, निद्रा, शांत व सात्त्विक प्रकृती इ. पथ्यकर होत. कटु-तीक्ष्ण-रुक्षोष्ण व अम्ल पदार्थ, ताक, विडा, मद्य, मध, हिंग, मोहरी, इ. तसेच व्यायाम, मैथुन, जागरण, संताप इ. अपथ्यकर होत.

मूर्च्छा: जुने सातू, रक्तशाली, तूप, मूग, लाजमंड, जांगल मांस, साखर, गायीचे दूध, कोहळा, पडवळ, केळी, डाळिंब, नारळ, मोहाची फुले, तांदुळजा, उपोदिका, फार मोठ्याने बोलणे, अभूत दर्शन, मंगल-सुस्वर वाद्ये व गायन, श्रुतिचिंतन, आत्मबोध, धैर्य, आश्वासन, प्राणायाम इ. पथ्यकर असून विरुद्धान्न, ताक, दंतघर्षण, उन्ह, स्वेदन, मलमूत्रावरोध, जागरण इ. अपथ्यकर होत.

वृद्धी: जांगल मांस, लघु-कोष्ण आहार, शृतशीतजल, विश्रांती इ. पत्थकर असून आनूप मांस, दही, उडीद, पिष्ट पदार्थ, दुष्टान्न, उपोदिका, गुरु-अतिशीत पदार्थ, वेगावरोध, व्यायाम, मैथुन, अती चालणे, चढणे-उतरणे, ओझे उचलणे, थंड पाण्यात पोहणे इ. अपथ्यकर होत.

गलगंड – गंडमाला – अपचि – ग्रंथि – अर्बुद : रक्तशाली, शृतशीतजल, वेत्राग्र, रुक्ष-कटु-दीपक पदार्थ, तसेच गुग्गुल, शिलाजित, गोमूत्र इ. द्रव्ये पथ्यकर असून गुरु-मधुर-अतिशीत पदार्थ, दूध व उसाचे पदार्थ, आनूप मांस, पिष्ट पदार्थ, दही, अम्ल पदार्थ, अभिष्यंदी पदार्थ इ. अपथ्यकर होत.

श्लीपद: जुने साठे तांदूळ, सातू, कुळीथ, लसूण, पटोल, वार्ताक, शेवगा, कारले, पुनर्नवा, मुळा, उपोदिका, एरंडेल, सुरभिजल, कटुतिक्त-दीपक पदार्थ पथ्यकर असून पिष्टान्न, दुग्धविकृती, गूळ, आनूप मांस, स्वादु-अम्ल पदार्थ तसेच, पारियात्र-सिंधु-विंध्य या प्रदेशांतील नद्यांचे पाणी, पिच्छिल-गुरु-अभिष्यंदी असे पदार्थ अपथ्यकर होत.

विद्रधी: आमावस्थेत जुने तांदूळ, कुळीथ, लसूण, शेवगा, कारले, पांढरी वसू, बेल, चित्रक, मध व शोफ व्याधीतील इतर सर्व पथ्ये. पक्कावस्थेत जुने रक्तशाली, तूप, तेल, मूग, विलेपी, जांगल मांसरस, कदली, पटोल, चंदन, शृतशीतजल तसेच व्रणविकारातील इतर सर्व पथ्ये.

अपथ्य : शोफ व्याधीमध्ये सांगितलेले अपथ्य आमावस्थेत व व्रणविकारातील अपथ्य पक्कावस्थेसाठी समजावे.

व्रण-व्रणशोथ-नाडीव्रण-सद्योव्रण : साठे तांदूळ, जुने सातू, गहू, पांढरे साळ, मसूर, तूर, मूग यांची कढणे, मध, साखर, विलेपी, लाजमंड, जांगल मांस, मृगपक्षी, तूप, तेल, पडवळ, वेताचे कोंब, कोवळा मुळा, वार्ताक, कारले, कार्कोट, तांदुळजा, शृतशीतजल, विश्रांती, स्वच्छ व आनंदी असे सभोवतालचे वातावरण असणे इ. सर्व पथ्यकर असून विरुद्धान्न, अतिशीत जलपान, विडा, पालेभाज्या, अजांगल मांस, असात्म्य अन्न, रुक्ष-अम्ल-शीत-लवण पदार्थ, व्यवाय, अतिश्रम, मोठ्याने बोलणे, अप्रिय व वेडेवाकडे पाहणे, दिवसा झोपणे, जागरण, खूप हिंडणे, अतिशोक करणे, भोवतालची अस्वच्छ व कृमिकीटकार्दींचे वातावरण असणे इ. सर्व अपथ्यकर होय.

भग्नव्रण : मांस, मांसरस, दूध, तूप, मुगाचे कढण, बृंहण अन्नपान, अविदाही पदार्थ, विश्रांती, अचिंता, हर्ष, बाल-तरुण वय, हेमंत ऋतू इ. सर्व पथ्यकर असून लवण-कटु-क्षार-अम्ल-रुक्षोष्णविदाही द्रव्ये, मैथुन, उन्ह, अतिव्यायाम, वृद्धत्व, ग्रीष्मवर्षाऋतू इ. सर्व अपथ्यकर होय.

मेदोरोग: जुने सातू, साळी, मूग, कुळीथ, उद्दालक, कोद्रव, मध, शृतजल, श्रम, चिंता, व्यवाय, पायी चालणे, व्यायाम, प्राणायामादि आसने, तसेच कफदोषावरील पथ्ये ही सर्व पथ्यकर असून मधुर-स्निग्ध-शीत-पिष्ट द्रव्य, अतिभोजन, अध्यशन, दिवास्वाप, केवळ बसून राहणे इ. सर्व अपथ्यकर होय.

मुख-रोग: सातू, तृणधान्य, मूग, जांगल मांसरस, शेवगा, कारले, पटोल, कापराचे-खैराचे-वाळ्याचे पाणी, कफपित्तनाशक द्रव्ये तसेच गंडूष, प्रतिसारण, कवलादींनी मुखशोधन वारंवार करणे इ. पथ्यकर असून अभिष्यंदी, उष्ण, तीक्ष्ण, कटुरसात्मक पदार्थ, तसेच दही, अतिद्रव अतिस्निग्ध पदार्थ, दिवास्वाप, दातवण घासणे, सुपारी सतत चघळणे, विडी तंबाखू ओढणे व खाणे इ. सर्व अपथ्यकर होय.

कर्ण-रोग: गहू, साठे साळी, मूग, सातू, तूप, जांगल मांसरस, पडवळ, शेवगा, कारले, रसायने, फार मोठ्याने न बोलणे, संताप न करणे, ब्रह्मचर्य पाळणे इ. सर्व पथ्यकर असून कफकर आहारविहार, दही, हरभरा, कटुरसात्मक पदार्थ, तसेच डोक्यावरून शीत जलस्नान, पोहणे, समोरील वारा घेणे, मऊ नसलेल्या कुंचलीने (ब्रशाने) दातवण करणे, कान खाजवणे, गार हवेत वावरणे इ. सर्व अपथ्यकर होय.


 नासा-रोग: जुने तांदूळ, सातू, कुळीथ, मूग यांचे कढण, जांगल मांसरस, शेवगा, कारले, कोवळा मुळा, लसूण, शृतजल, मद्य, स्निग्धोष्णलघु पदार्थ इ. पथ्यकर असून शीत व द्रव प्रधान, अभिष्यंदी व गुरू पदार्थ तसेच शिरःस्नान, क्रोध, शोक, जागरण, मलमूत्रावरोध, समोरील वारा, अतितीक्ष्ण दुर्गंधी पदार्थांचा वास घेणे इ. अपथ्यकर होत.

शिरो-रोग: जुने धान्य, तूप, दूध, जांगल मांस, पटोल, शेवगा, मनुका, चाकवत, कारले, आवळकठी, डाळिंब, लिंबू, कापूर इ. पदार्थ पथ्यकर असून शीतजल, अभिष्यंदी पदार्थ, दिवास्वाप, वेगावरोध, पोहणे, दंतकाष्ठ, समोरचा वारा घेणे, अती रडणे, शोक करणे, सूक्ष्म वस्तू एकसारख्या व टक लावून पाहणे अपथ्यकर होत.

 नेत्ररोग: जुने तूप, रक्तशाली, मूग, सातू, सुरण, पडवळ, कारले, कोरफड, आवळकठी, सैंधव, त्रिफला, स्त्रीदुग्ध, चंदन, तुपाचा अभ्यंग, तळपायाला तूप चोळणे इ. पथ्यकर असून दही, लवण, विदाही, तीक्ष्णोष्ण, कटु-गुरू असे पदार्थ तसेच क्रोध, शोक करणे, रडणे, मैथुन, दुष्ट विषारी वायू, मलमूत्रावरोध, छर्दिनिग्रह, दंतकाष्ठ, उष्ण जलाने शिरःस्नान, रात्री उशीरा जेवणे, उन्हात हिंडणे, अनवाणी चालणे, प्रखर किंवा सूक्ष्म वस्तू टक लावून पाहणे ही सर्व अपथ्यकर होत.

 शस्त्रकर्म: जीर्णशाली, स्निग्ध, अल्प, द्रवोत्तर पदार्थ, जांगल मांस, तांदुळजा, कोवळा मुळा, चाकवत, पडवळ, कारले, डाळिंब, आवळा, तूप, सैंधव, मूग, सातू हे पदार्थ तसेच स्वच्छ व निवांत जागेत राहणे, त्वचा, नखे, केस इ. साफ ठेवणे स्वच्छ हलके वस्त्र परिधान करणे, शांति-बली मंगल होमादि आचरणे, अनुकूल-प्रिय गोष्टी श्रवण करणे, हलक्या पंख्याने वारा घेणे, छत्रा-लांगली, वेखंड-अतिविष-शतावरी-दुर्वा-मोहरी इ. वनस्पती धारण करणे हे पथ्यकर असून नवे धान्य, उडीद, मांस, गार पाणी, दही, ताक, पूर्वेकडील वारा, उन्ह, धूर, अतिभोजन, जागरण, दिवास्वाप, विषयचेष्टा, व्यायाम, विरुद्धाशन, लवण, मक्षिकादि बाह्य जंतूंचा स्पर्श तसेच अंगविक्षेप करणे, जोराने ओरडणे, स्त्रीदर्शन, स्त्रीचिंतन, मैथुन, व्रण, खाजविणे, संताप इ. गोष्टी उपथ्यकर होत.

विषरोग: साठे साळी, मूग, तीळ, तूप, वार्ताक, कुळीथ, आवळकठी, जीवंती, तांदुळजा, सैंधव, झोप न घेणे इ. पदार्थ पथ्यकर असून विरुद्धाशन, क्रोध, मैथुन, अतिश्रम, भीती, उन्ह, क्षुधानिग्रह व झोपणे हे अपथ्यकर आहे.

  

विस्फोट: जुने साळी, मूग, तुरी, मसूर, शूंठीसिद्ध मांसरस, कुर्डू, वेताचे कोंब, तांदुळजा, कारली, पडवळ, शतावरी, पित्तपाप़डा, वाटाणे, कडुलिंबाची व बेलाची फुले-पाने यांचे यूष हे पदार्थ पथ्यकर असून तीळ, कुळीथ, उडीद, लवण, तिखट व अम्ल तसेच विदाहकारक, उष्ण व रुक्ष पदार्थ अपथ्यकर होत.

  

विसर्प: जुने सातू, गहू, राळे, साठे साळी, मूग, मसूर, हरभरे, तुरी, जांगल मांसरस, लोणी, तूप द्राक्षे डाळिंब, कारली, वेताचे कोंब, पडवळ, आवळे, खैर, मनुका, शिरीष, कापूर, चंदन-तिललेप इ. पदार्थ पथ्यकर असून लसूण, हुलगे, उडीद, तीळ, आनुप-ग्राम्य मांस, शेकणे, विदाही पदार्थ, लवण, अम्ल, तिखट, तीक्ष्णोष्ण पदार्थ, मद्य, तसेच व्यायाम, दिवसा झोपणे, मैथुन, सोसाट्याचा वारा, क्रोध, शोक, छर्दिनिग्रह, उन्ह इ. गोष्टी अपथ्यकर होत.

  

बिनौषधी पथ्य: वरील विकारांची पथ्यापथ्ये औषधोपचारींना मदत करीत असतात पण काही अवस्थात औषधांचे वीर्य शरीराला दोषकारक होते म्हणून औषधे न देता पथ्याच्या योगाने ते स्वास्थ्यनिर्माण कार्य करावे लागते. (१) वमनविरेचनादि शोधनानंतर केवळ आहारानेच बृंहण करावे. (२) तसेच अशक्त मनुष्याचा दीर्घकाल चालू असलेला संतत किंवा विषमज्वर लघू भोजनाने उपचारावा, पहिल्या स्थितीत औषधच अपथ्य होते म्हणून त्याचा निषेध आहे. दुसऱ्या अवस्थेत आहारावर भर आहे. औषधाचा प्रत्यक्ष निषेध नाही.

  

रोजचे पथ्यापथ्य: दीर्घायुष्य आणि स्थिर आरोग्य मिळविणे व राखणे यांसाठी काही विशेष पथ्ये सांगितली आहेत. यांनाच आचार-रसायन किंवा नित्य-रसायन असे संबोधिले आहे. हे आचार-विचार प्रत्येक मनुष्याने रोज किंवा प्रतिक्षण पाळावयाचे म्हणून सांगता येतील [⟶ स्वस्थवृत्त]. 

उपसंहार: पथ्याच्या व अपथ्याच्या ज्ञानाची आरोग्य राखण्यासाठी तसेच रोगाचा परिहार करण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे. लोकांमध्येही नेहमी अज्ञानामुळे अगर परिस्थित्यनुरूप बदलत्या जीवनात हरघडी अपथ्यकारक आहारविहार घडतो. अशा वेळी पथ्यकारक काय आहे, हे पथ्यापथ्याच्या ज्ञानावरूनच समजते. थोडक्यात जीवन सुखाचे जगण्यासाठी व प्रदीर्घ टिकविण्यासाठी आहारविहार यांबाबत दक्ष राहिले पाहिजे आणि वर्ज्यावर्ज्य युक्तीने साधले पाहिजे.

जोशी, चं. ग.