उपशय: (आयुर्वेद). रोगनिश्चिती करण्याचे एक साधन. रोगी जो आहारविहार वा औषध घेतो त्यांपैकी ज्याने रोग कमी होतो असा अनुभव येतो ते उपशय होय. याला सात्म्य म्हणतात. प्रसंगी वैद्यालाही मुद्दाम रोगनिश्चय करण्याकरिता विशिष्ट औषधे व आहार रोग्याला देऊन पहावे लागतात. याचे सहा प्रकार आहेत (१) रोगकारण विपरीत, (२) रोग विपरीत, (३) दोहोंशी विपरीत, (४) कारणाशी सम असून रोगनाश करणारे, (५) रोगाशी सम असून रोगनाशक व (६) रोगकारण व रोग या दोहोंशी सम असून रोगनाश करणारी औषधे व आहार. रोग वाढविणार्‍या औषधांना व आहारांना अनुपशय म्हणतात. याला असात्म्य असेही म्हणतात. त्याचेही वरीलप्रमाणेच सहा प्रकार होतात. उपशय व अनुपशय या दोहोंचाही रोगनिश्चयाकरिता उपयोग होतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री