आयुर्वेदाचा इतिहास : आयुर्वेदाचा किंवा वैद्यकाचा प्रारंभ वेदपूर्वकालात झाला. आयुर्वेद किंवा वैद्यक हे मुळापासूनचे भारतीय विज्ञान आहे. येथील पार्थिव द्रव्ये, हवापाणी, ऋतुचक्र, वनस्पती, प्राणी इ. सर्व भौगोलिक निसर्ग आणि येथील संस्कृती व जीवनदृष्टी यांच्या अध्ययनावरच भारतीय वैद्यक आधारलेले आहे. भारतीय वैद्यकाने चीन, मध्य पूर्वेतील संस्कृती, ग्रीक रोमन व अरबी संस्कृती यांच्यापासून काही गोष्टी घेतल्या असल्या तरी वैद्यकाचे विज्ञान, तत्त्वज्ञान, निदान व चिकित्सा ही सर्व स्वतंत्र रीतीने विकास पावली आहेत. सृष्टी व जीवन यांच्यासंबंधी एका सुसंगत व समग्र विचारसारणीत आयुर्वेद ग्रथित केला आहे.

सिंधु संस्कृती ही चार हजार वर्षांच्या पूर्वीची लुप्त संस्कृती. मोहेंजोदडो व हरप्पा येथील उत्खननात शिलाजतू, समुद्रफेन, मृगशृंग, सांबरशिंग, गेंड्याचे शिंग, प्रवाळ, निंब इ. आयुर्वेदिक औषधे सापडली आहेत. वैद्यक व्यवसाय करणार वर्ग ऋग्वेदकाळी होता. वैद्याला भिषक् व औषधाला भेषज म्हणत. वेदकाळी भूत, पिशाच, ग्रह इत्यादिकांच्या झपाटण्यामुळे शारीरिक व मानसिक रोग होतात असे मानून त्यांचे निवारण करणारे, रोग्याची परीक्षा करून औषधे देणारे व शस्त्रक्रिया करणारे त्यांना भिषक् ही संज्ञा होती. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांच्यामध्ये मंत्र-तंत्र आणि औषधयोजना अशा दोन्ही गोष्टी संमिलित रूपात किंवा पृथक् सांगितलेल्या आढळतात. रोगाला यक्ष्म म्हणत. ऋग्वेदात भिषक् हे विशेषण माणसाला जसे दिले आहे तसे काही देवांनाही दिले आहे. रुद्राला प्रथम दैव्य भिषक् किंवा भिषक्‌तम (शुक्‍ल यजुर्वेद १६-१२, ऋग्वेद २-३३-४ ७ १२) म्हटले आहे. अश्विदेव हे शस्त्रक्रिया विशारद वैद्य होते, असे त्यांचे वर्णन ऋग्वेदात येते व मोडलेल्या मांडीच्या ठिकाणी धातूची मांडी लावून त्यांनी बरी केली किंवा अंधाला डोळे दिले इ. प्रकारची वर्णने त्यात येतात (१-१७६-१५, १-११६-१६).

डोके, डोळे, नाक, कान, छाती, जीभ, मान, खांदा, बाहू, पाय, हाडांची पेरे, त्वचा, मांस, गर्भाशय, योनी, धमन्या, सर्व शरीर इ. रोगांची स्थाने ऋग्वेदात सांगितली आहेत. अंधत्व, बाधिर्य पंगुत्व, नपुंसकत्व, कुष्ठ इ. अनेक चर्मरोग, टक्कल, हृद्रोग, जम्भ, तक्म म्हणजे ज्वर, ज्वरांचे विविध प्रकार, राजयक्ष्मा, गंडमालांचे प्रकार, संधिवात, शीर्षरोग, कर्णशूल, अर्श, रक्तक्षय, जलोदर, आंत्रपीडा, मज्जारोग, विद्रधी, सुराम (दारू जास्त प्यायल्याने होणारा रोग), अलजी, केशपतन, गर्भस्राव, गर्भरोध, मूत्राघात, व्रण, कृमी इ. रोगांचा अथर्ववेदात निर्देश केला आहे. रामा, कृष्मा, असिक्‌नी, आंजन, ब्राह्मी, सुपर्ण, पृश्निपर्णी, हरिणशृंग, दूर्वा, वृषा, शुष्मा, सहदेवी, अपामार्ग, सिलाची, कुष्ठ, कुष्ठधूप, जंगिड, पिप्पली, चीपद्रु, गुग्गुल, अजशृंगी, एकशृंगा, अंशुमती, कंडिणी, दर्भ, वर्णा, मधुपरूष्णी, शीपाला, मधुक (जेष्ठमध) इ. औषधींचा त्या त्या रोगांवरील उपाय म्हणून अथर्ववेदात निर्देश केला आहे. त्यात विषाचाही औषध म्हणून उपयोग व सर्पदंशावरील उपाय सांगितले आहेत. लाक्षा, शिसे, समुद्रफेन, सुवर्ण, वारुळाची माती, जल, अग्‍नी, सूर्य, वायू यांचीही रोगहरणाची साधने म्हणून उपयुक्तता दर्शित केली आहे.

अथर्ववेदातील मंत्रांचा रोगहरणार्थ करावयाचा विनियोग अथर्ववेदाच्या कौशिकसूत्रात स्वतंत्र प्रकरणात सांगितला आहे.

शारीर, गर्भविद्या आणि निदानासह चिकित्सा ह्या तीन शास्त्रांचा वेदकाली प्रारंभ झाला होता. याची गमके वैदिक वाङ्‍मयात सापडतात. शतपथ ब्राह्मण (कांड १० व ११) आणि अथर्ववेद (१० – २) यात मानवी शरीराची हाडे व अवयव पद्धतशीर रीतीने मोजून सांगितले आहेत. शतपथ ब्राह्मणात माणसाच्या शरीरात ३६० अस्थी असतात असे सांगितले आहे. यजुर्वेदसंहितांमध्ये शरीराच्या अवयवांची तपशीलवार नावेही सांगितली आहेत.

वेदकालीन वैद्यक हे शास्त्र अस्तित्वात आल्यामुळे त्याला स्वाभाविकपणे आयुर्वेद अशी संज्ञा प्राप्त झाली. वेद म्हणजे विद्या. आयुर्वेद हा अथर्ववेदाचे उपांग म्हणून निर्दिष्ट केला आहे. आयुर्वेद त्रिष्कंध व अष्टांग होय असा परंपरेप्रमाणे निर्देश केला जातो. हेतू, लिंग व औषध या तीन स्कंध म्हणजे आयुर्वेदाच्या शाखा किंवा खांद्या होत असे चरकसंहितेत म्हटले आहे. आरोग्याची व रोगाची कारणे म्हणजे हेतू, आरोग्याची व रोगाची लक्षणे म्हणजे लिंग आणि आरोग्याचे व रोगनिवारणाचे उपाय म्हणजे औषध. वनस्पतींचा रोगनिवारणार्थ बाहुल्याने उपयोग आयुर्वेदात सांगितला असल्यामुळे औषधी या शब्दावरून बनलेला औषध हा शब्द रूढार्थाने रोग-निवारणास उपयुक्त अशा सर्व पदार्थांना नंतर लागू झाला. अष्टांग म्हणजे आठ अंगे असलेला. ती आठ अंगे अशी : (१) शल्य म्हणजे मुख्य शस्त्रक्रिया (२) शालाक्य म्हणजे सळ्या वगैरेंनी करायची गौण शस्त्रक्रिया (३) कायचिकित्सा म्हणजे शरीरातील रोगांवर उपचार (४) भूतचिकित्सा म्हणजे भूतबाधा, सूक्ष्मजंतुबाधा, मानसिक रोग यांच्यावरील उपचार (५) कौमारभृत्य म्हणजे बालकांच्या व स्त्रियांच्या रोगांवरील उपचार (६) अगदतंत्र म्हणजे विष-वा दंष्ट्रचिकित्सा (७) रसायन म्हणजे सर्व शरीर निरोगी व तरुण राखण्याचा उपाय आणि (८) वाजीकरण म्हणजे शुक्रधातू वाढविण्याचा वा शरीर बलवान करण्याचा उपाय.

अध्यात्मविद्या, राजनीती, पुराणे इत्यादिकांचा इतिहास ब्रह्मदेवापासून सांगण्याची प्रथा प्राचीन भारतीयांमध्ये होती. त्याचप्रमाणे वैद्यक हे ब्रह्मदेवाने प्रथम सांगितले नंतर ते प्रजापति, अश्विदेव आणि इंद्र यांना प्राप्त झाले आणि या देवांकडून ते शास्त्र भरद्वाजादी ऋषींना प्राप्त झाले असे चरककाश्यप संहितांमध्ये म्हटले आहे. भरद्वाज, आत्रेय, हारीत, काश्यप, अग्निवेश, भेड इ. ऋषी यांत प्रमुख होत. आत्रेय किंवा कृष्ण आत्रेय हा वैद्यक शास्त्राचा पहिला निर्माता म्हणून सांगितलेला असतो. प्राचीन वैद्यक ग्रंथांत आत्रेय, हारीत व काश्यप यांचा मूल प्रणेते म्हणून वारंवार उल्लेख येतो. आत्रेयसंहिता म्हणजेच चरकसंहिता होय. हारीतसंहिता, काश्यपसंहिता आणि भेंडसंहिता ह्याही अलीकडे उपलब्ध झाल्या आहेत. काश्यपसंहितेस वृद्धजीवकीय तंत्र म्हणूनही म्हणतात. बुद्धपूर्वकालीन जीवक हा वृद्धजीवक असावा. या आयुर्वेदज्ञाचा उल्लेख बौद्ध पाली साहित्यातही अनेक वेळा झालेला आहे. तक्षशिला येथील विद्यापीठात आत्रेय आचार्यापासून त्याने वैद्यकाचे शिक्षण घेतले असे त्यात म्हटले आहे. शास्त्रचिकित्सा व अन्य चिकित्सा यांचा उल्लेख पाली वाङ्‍मयात मिळतो. बाष्पस्नान, रक्तसुति, शस्त्रक्रियेची साधने इत्यादीकांचा त्यात समावेश आहे. शस्त्रक्रिया विशारदाचे ‘मझ्झिमनिकाय ’(१०१ व १०५) या पाली ग्रंथात जे वर्णन आलेले आहे त्यावरून भारतीय शस्त्रक्रिया बुद्धाच्या काळात पुष्कळ प्रगत झालेली होती असे अनुमान निघते. अशोकाच्या एका शिलालेखात मनुष्यचिकित्सा व पशुचिकित्सा आपल्या देशात सुरू केल्याचा उल्लेख आहे. प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन हा वैद्यक शास्त्राचा प्रणेता होता असेही अनेक ठिकाणी निर्देश आहेत. यानेच सुश्रुतसंहितेस उत्तर तंत्राची जोड दिली असे म्हणतात.


चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रहअष्टांगहृदय हे ग्रंथ आयुर्वेदाचे मुख्य अधारस्तंभ होत. या ग्रंथांचा मूळ गाभा सूत्रकाली म्हणजे इ. स. पू. ७ व्या शतकाच्या सुमारास बुद्धाच्या पूर्वी रचला गेला असावा असे चौथ्या शतकाच्या सुमारास झालेल्या बौद्ध साहित्यावरून अनुमान निघते. चरकसंहितेचा गाभा असलेले तंत्र पुनर्वसु आत्रेय याने रचले व त्याचा शिष्य अग्निवेश आचार्य याने त्याची नवी आवृत्ती तयार केली असावी. अग्निवेश हा आचार्य भेड याचा सहाध्यायी होय. हल्ली जी भेडसंहिता मिळते ती व चरकसंहिता यांच्यात बरेच साम्य आहे. चरकाने अग्निवेशकृत तंत्रावर पुन्हा संस्कार म्हणजे प्रतिसंस्कार केला. चिनी भाषेत भाषांतरित केलेल्या (इ. स. ४७७) त्रिपिटकात म्हटले आहे की चरक हा कनिष्काचा वैद्य होता त्याने कनिष्काच्या राणीला अडलेल्या गर्भाचा पात करून मुक्त केले. कनिष्काचा काळ इसवी सनाचे पहिले शतक होय. चरकसंहितेवर इ. स. पाचव्या शतकाच्या सुमारास झालेल्या कपिलबलपुत्र दृढबलाने पुस्ती जोडली. परंतु चरकसंहितेचे चरकाने केलेले संस्करण कोणते व दृढबलाने दिलेली पुस्ती निश्चित कोणती हे सांगता येणे कठीण आहे. परंतु तसा प्रयत्न नेपालसंस्कृतग्रंथमालेत प्रकाशित झालेल्या काश्यपसंहितेच्या प्रस्तावनेत पं. हेमराज शर्मा यांनी केला आहे. चरक हे सामान्यनाम आहे व्यक्तिनाम नव्हे. कृष्ण यजुर्वेदाची चरक शाखा आहे. त्या शाखेच्या लोकांना चरक हे उपनाम लागते.

चरकसंहितेत आठ स्थाने म्हणजे प्रकरणे आहेत. (१) सूत्रस्थान यात रोगोपचाराचे सामान्य स्वरूप, आहार, वैद्याची कर्तव्ये इ. वैद्यकसंबंधी सामान्य विचार म्हणजे सूत्रे आहेत. (२) निदानस्थान मुख्य अशा आठ रोगांवरील निदानांचा यात विचार आहे. (३) विमानस्थान रस, पथ्यापथ्य, सामान्य निदान व इतर वैद्यकीय आधारभूत सिद्धांत यात आहेत. (४) शारीरस्थान यात शरीररचना आणि गर्भविद्या आहे. (५) इंद्रियस्थान यात निदान आणि परिणाम यांचा विचार आहे. (६) चिकित्सास्थान यात चिकित्सेचे तपशीलवार वर्णन आहे. (७) कल्पस्थान व (८) सिद्धांतस्थान यांतही सामान्यपणे चिकित्साच सांगितली आहे.

चरक हा केवळ वैद्य नव्हता, नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांतही तो पारंगत होता. शरीर व मन यांना बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे हे मानवी कर्तव्य त्याने विस्ताराने सांगितले आहे. शारीरस्थानात त्याने सांख्य, न्याय व वैशेषिक या तत्त्वदर्शनांसंबंधी स्वत:चे मौलिक सिद्धांत सांगितले आहेत व योगशास्त्राचीही तत्त्वे मांडली आहेत. ही सर्व मांडणी आयुर्वेदाच्या मुख्य विषयाशी सुसंगत व आयुर्वेदास आवश्यक अशा स्वरूपात सांगितली आहे. आहार, निद्रा व संयम या तीन गोष्टी शरीरस्वास्थ्यास कशा कारण आहेत हे त्याने विशेष सयुक्तिक रीतीने सांगितले आहे.

चरकसंहितेवरील इ. स. ११ व्या शतकातील चक्रपाणिदत्ताची आयुर्वेददीपिका किंवा चरकतात्पर्यटीका आज उपलब्ध आहे. चरकसंहितेची भाषांतरे पर्शियन व अरबी भाषांमध्ये ९ व्या शतकात झालेली आहेत. त्यावेळच्या इतर राष्ट्रांना माहीत नसलेले शस्त्रक्रियेचे प्राचीन काळचे प्रगल्भ तंत्र सांगणारा वैद्यक ग्रंथ म्हणून सुश्रुतसंहितेची मोठी ख्याती आहे. या ग्रंथांची लॅटिन, जर्मन व इंग्लिश भाषांत भाषांतरे किंवा तात्पर्यश: अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. महाभारतात (१३-४·५५) सुश्रुताचा पिता विश्वामित्र होय असा उल्लेख येतो. यूरोप, अरबस्तान, कंबोडिया व इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकांत सुश्रुताचे नाव माहीत झाले होते. सुश्रुतसंहितेमध्ये वैद्यकाचा पौराणिक इतिहास सांगितला आहे. त्यात म्हटले आहे की, सुश्रुत हा धन्वंतरीचा अवतर व वाराणसीचा राजा दिवोदास याचा गुरू होता. सुश्रुतसंहितेत चरकसंहितेप्रमाणेच सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान आणि अखेरची पुरवणी उत्तरस्थान ही प्रकरणे आहेत. चरकसंहितेत शस्त्रक्रिया नाही ती यात आहे. सुश्रुतसंहितेवर जैय्यट (जज्जट किंवा जैज्जट) आणि गयदास यांच्या सर्वांत प्राचीन अशा टीका होत्या, त्या आज उपलब्ध नाहीत. चक्रदत्त आणि डल्हण यांच्या अनुक्रमे ११ व्या व १२ व्या शतकातील भानुमतीनिबंधसंग्रह या टीका उपलब्ध आहेत. नागार्जुनाने सुश्रुतसंहितेमध्ये भर घातली आहे, तेच उत्तरतंत्र.

वाग्भटाने लिहिलेले अष्टांगसंग्रहअष्टांगहृदय असे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अष्टांगसंग्रहाच्या अखेरीस वाग्भटाने म्हटले आहे की सिंहगुप्तपुत्र अवलोकित याचा शिष्य व माझा पितामह वाग्भट नामक होता त्याचेच नाव वाग्भट हे मला दिले आहे. सिंहगुप्त हा सिंधू नदीच्या परिसरात जन्मला होता. वाग्भटाचा समय सातवे किंवा आठवे शतक मानतात. अष्टांगसंग्रह हा वाग्भटाच्या आजोबाचा ग्रंथ असावा. त्याचा ‘वृद्ध वाग्भट’ म्हणून उल्लेख येतो. दोन्हीही वाग्भट बौद्ध होते. अष्टांगहृदय याचे तिबेटीत भाषांतर झाले आहे. चरक, सुश्रुत आणि सुश्रुताचे उत्तरतंत्र यांचे आधार नामनिर्देशपूर्वक वाग्भट घेतो.

माधवनिदान हा ग्रंथ वाग्भटाचा समकालीन माधवकर या पंडिताने लिहिलेला प्रसिद्ध आहे. या ग्रंथावर पुष्कळ टीका झाल्या आहेत. वृंद नामक पंडिताचा सिद्धयोग नामक ग्रंथ लगेच यानंतर झाला. काहींचे मत असे की वृंद हे नाव माधवकराचे दुसरे नाव आहे. बंगालच्या चक्रपाणिदत्ताने चरक व सुश्रुत यांवर टीका जशा लिहिल्या तसे वैद्यकावर स्वतंत्र ग्रंथही लिहिले. त्याचे १०६० मध्ये लिहिलेले चिकित्सासारसंग्रहद्रव्यगुण हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ११ व्या शतकात गदाधरपुत्र वृंदसेनाने चिकित्सासारसंग्रह नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. त्यात नवे असे काही नाही. शार्ङ्‌गधराने इ. स. १३ व्या शतकात शार्ङ्‌गधरसंहिता लिहिली. त्यावरची बोपदेवकृत टीका प्रसिद्ध आहे. शार्ङ्‌गधरसंहिता अत्यंत लोकमान्य झाली. त्यात वृंदाच्या ग्रंथाचा भरपूर उपयोग करून निदान व चिकित्सा उत्कृष्ट रीतीने लिहिली आहे. त्याचप्रमाणे अफू व पारा यांचा औषध म्हणून कसा उपयोग करावा याचे नीट विवरण केले आहे. तत्पूर्वीच्या मूळ ग्रंथामध्ये अफूचा औषध म्हणून उपयोग सांगितलेला नाही. अरबी व इराणी वैद्यकापासून अफूचा उपयोग करण्याचे तंत्र आयुर्वेदाने स्वीकारले. बोपदेवाची आयुर्वेदीय औषधीनिर्मितीवरची शतश्लोकी प्रसिद्ध आहे. यादव राजाचा मंत्री हेमाद्रि याने बोपदेवाचा पिता केशव यास राजवैद्य म्हणून आसरा दिला होता. सोळाव्या शतकातील भावमिश्राने भावप्रकाश लिहिला आहे. त्यात प्रथमच सिफिलिस म्हणजे फिरंगोपदंश याचा उल्लेख येतो. हा रोग पोर्तुगीजांतर्फे भारतात आला. १७ व्या शतकातील लोलिंबराजाने वैद्यजीवन हा ग्रंथ पंचमहाकाव्यांच्या शैलीत व वृत्तांमध्ये लिहिला आहे.

आयुर्वेदाची रसतंत्र नावाची स्वतंत्र शाखा इसवी सनाच्या सुमारे आठव्या शतकापासून अस्तित्वात आली असे म्हणतात. सिद्ध योग्यांच्या संप्रदायात व बौद्ध संप्रदायात रसतंत्र किंवा रसविद्या अस्तित्वात आली असे दिसते. रस म्हणजे पारा. पाऱ्यास संस्कृतमध्ये पारद अशी दुसरीही संज्ञा आहे. सोने, रुपे, तांबे, लोखंड, शिसे, जस्त इ. धातूंचा उपयोग रोग निवारणाकरता व आरोग्याकरता करण्याची प्रथा वेदकाळापासून भारतात प्रचलित असली तरी त्याला चरक, सुश्रुत, वाग्भट इ. आयुर्वेदज्ञांनी विशेष महत्त्व दिले नसले तरी त्यांचा उपयोग मात्र त्यांनी काही थोड्या ठिकाणी सांगितला आहे. सिद्ध-संप्रदायात हे शरीर अमर कसे करावे याबद्दलचे रसायन प्रयोग शतकानुशतके चालले होते. अल्केमी म्हणजे किमया करून खनिज, प्राणिज व वनस्पतिज पदार्थांचा रोगहारक व बलकारक गुण, विशिष्ट संस्कार वारंवार करून वाढविण्याचे प्रयोग वैद्यक संप्रदायांमध्ये चालू असताना त्यात १८ संस्कार केलेल्या पाऱ्याचा विलक्षण उपयोग होतो असे आढळून आले. १८ प्रकारचे संस्कार करून काढलेला पारा व धातूंची भस्मे किंवा अन्य औषधे यांच्या मिश्रणाने आश्चर्यकारक परिणाम घडतात असे रसतंत्रामध्ये सांगितले आहे. पाऱ्याचा उपयोग करून तांब्याचे, लोखंडाचे वा इतर धातूंचे सोने बनविता येते अशीही कल्पना व प्रयोग रसतंत्रात सांगितले आहेत. सातव्या किंवा आठव्या शतकातील रसेंद्रमंगल वा रसरत्नाकर हा सिद्ध नागार्जुनाचा ग्रंथ प्रफुल्लचंद्र रे (१८६१-१९४४) यांनी प्रसिद्ध केला आहे. शंकराचार्यांचे गुरू गोविंद भगवत्‌पाद यांचे रसहृदयतंत्र मिळते. संस्कारयुक्त पाऱ्याच्या औषधांनी अजरामर होता येते आणि तांब्याचे सोने बनविता येते असे त्यात म्हटले आहे. शैव संप्रदायाचे शरीर अमर करण्याचे तत्त्वज्ञान चौदाव्या शतकातील माधवाचार्यांच्या सर्वदर्शन संग्रहात रसेश्वरदर्शन म्हणून मांडले आहे. रसार्णव, रस-प्रकाश सुधाकर, रसेंद्रचूडामणि, रसराजलक्ष्मी, रसरत्नसमुच्चय इ. १२ व्या ते १७ व्या शतकापर्यंतचे रसतंत्रावरील अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत.


निघंटु या नावाचे औषधी नामांचे कोश प्राचीन काळापासून तयार झालेले दिसतात. वेदातील शब्दांच्या कोशाला निघंटु म्हणतात. यास्काच्या निरूक्तात निघंटु हा शब्द शब्दकोश या अर्थी येतो. आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ तयार होण्यापूर्वीपासून निघंटुरचनेची परंपरा चालू असली पाहिजे. औषधींच्या याद्या या वैद्यकाच्या मूळ ग्रंथात सुद्धा सापडतात. सर्वांत जुना वैद्यकीय निघंटु म्हणजे धन्वंतरी निघंटु हा होय. त्याच्यात चरकादिसंहितांप्रमाणे मागाहूनही भर पडली असावी. १०७५ मध्ये बंगालचा राजा भीमपाल याचा वैद्य नरहरी याचा राजनिघंटु किंवा अभिमानचुडामणि, १४ व्या शतकातील मदनपालाचा मदनविनोद निघंटु हा सर्वसंग्राहक कोश आणि त्रिमल्ल याचा पथ्यापथ्य निघंटु हे उपलब्ध आहेत. बौद्ध व जैन यांनीही असेच कोश लिहिले आहेत भेषजमंजूषा  हा पालीतील ग्रंथ श्रीलंकेमध्ये प्रसिद्ध आहे.

चिनी तुर्कस्तानातील काशगर येथील बौद्ध स्तूपामध्ये बॉवर या इंग्लिश गृहस्थाला संस्कृत व प्राकृत यांचे मिश्रण असलेला एक वैद्यकग्रंथ सापडला. हा ग्रंथ चौथ्या शतकातील असावा असे मानतात. त्याच्यात नवनीतक हे सगळ्यात मोठे प्रकरण आहे. या प्रकरणात अग्निवेश, भेड, हारीत, जातूकर्ण, क्षीरपाणी आणि पराशर यांचा व सुश्रुताचाही आयुर्वेदज्ञ म्हणून उल्लेख आहे. त्याच परिसरात योगशतक हा आयुर्वेदाचा ग्रंथ सापडला आहे. ह्या ग्रंथाचा कर्ता नागार्जुन म्हणून म्हटला आहे. या पोथीचा काल ७ वे शतक असावे असे अनुमानित होते.

पशुवैद्यक व वनस्पतिवैद्यकही प्राचीन भारतीयांनी निर्माण केले होते. अशोकाच्या दुसऱ्या व तेराव्या शिलालेखात मनुष्यचिकित्सेची व पशुचिकित्सेची व्यवस्था केल्याचा उल्लेख आहे. चरकसंहितेत (सिद्धिस्थान, अ. ११-१९-२५) पशूंना द्यावयाचा बस्तिविधी सांगितला आहे. महाभारतात (विराट पर्व अ. ३-१०-१२) नकुल हा सांगतो की अश्वविद्या, अश्वशिक्षा, अश्वचिकित्सा, गोविद्या व गो-चिकित्सा यांत मी पारंगत आहे.

शालिहोत्राचा अश्ववैद्य म्हणून निर्देश पंचतंत्रांत सापडतो. हय-घोषाचा पुत्र शालिहोत्र याच्या अश्वायुर्वेद किंवा अष्टांग अश्ववैद्यक या ग्रंथाची हस्तलिखित प्रत अपूर्ण स्वरूपात मिळते. शालिहोत्रीय अश्वशास्त्राची एक प्रत मद्रास येथील सरकारी ग्रंथालयात आहे. वर्धमानाची या विषयावरील योगमंजरी, दीपंकराचे अश्ववैद्यक, भोजाचा शालिहोत्र, कल्हणाचा शालिहोत्रसमुच्चय, जयदत्त सूरीचे अश्ववैद्यक व नलकृत अश्वचिकित्सा हे ग्रंथ लिखित वा प्रकाशित स्वरूपात उपलब्ध आहेत.

हत्तीच्या संबंधी मोठा वैद्यक ग्रंथ म्हणजे पालकाप्य मुनीचा हस्त्यायुर्वेद पुणे येथील आनंदाश्रम ग्रंथमालेत प्रसिद्ध झाला आहे. इ. स. पू. चौथ्या शतकात भारतात आलेला ग्रीक राजदूत मेगॅस्थिनीज याने भारतातील हस्तिवैद्यकाची माहिती दिली आहे. कौटिल्याच्या अर्थ-शास्त्रात हस्तिचिकित्सेचा निर्देश केला आहे. नारायण पंडिताचा मातंगलीला नामक ग्रंथ हस्तिचिकित्सेची माहिती देणारा त्रिवेंद्र संस्कृत सीरीजमध्ये प्रसिद्ध झाला आहे. १४ व्या शतकातील शार्ङ्‌गधरपद्धतीत बकरी, गाय इ. पशूंची चिकित्सा संक्षेपाने सांगितली आहे. त्यातील ‘उपवनविनोद’ ह्या २३६ श्लोकांच्या वनस्पतिविषयक प्रकारणात वृक्षवैद्यकही आहे. राघवभट्टाच्या वृक्षायुर्वेद नामक ग्रंथाचा उल्लेख आयुर्वेद का इतिहास या श्री. दुर्गादत्तशास्त्रीलिखित पुस्तकात केला आहे.

संदर्भ :  1.Winternitz, Z. M. A History of Indian Literature, Vol. III, Part II, Scientific

            Literature, Delhi, 1967.

            २. काश्यपसंहिता (वृद्धजीवकीय तन्त्रम्), निर्णयसागर मुद्रणालय, मुंबई, १९३८.

            ३. विद्यालंकार अत्रिदेव, आयुर्वेद का बृहत् इतिहास, प्रकाशनशाखा, सूचना विभाग, उत्तरप्रदेश, १९६०.

जोशी, लक्ष्मणशास्त्री