आतुरचिकित्सा: (आयुर्वेद). आतुर चिकित्सा म्हणजे रुग्णावर करावयाचे उपचार होत. ⇨ आतुर निदान  या प्रकरणामध्ये संपूर्ण आरोग्ययुक्त व्यक्तीचे आरोग्य कसे ढळू लागते व मरणापर्यंत त्या व्यक्तीला कोणकोणत्या अवस्थांतून जावे लागते, हे दाखविले आहे. निदान व चिकित्सा करताना संपूर्ण रुग्णव्यक्ती ध्यानात घ्यावी लागते. रोग निश्‍चित ठरल्यानंतर त्याच्या अवस्था पाहाव्या लागतात आणि त्या अवस्थांना अनुसरून त्या रोगावर उपचार करावे लागतात.

चिकित्सा-प्रकार : पुरुषाशी दु:खाचा होणारा संयोग म्हणजेच व्याधी, अशी व्याधीची तात्त्विक व्याख्या केलेली आहे. अर्थात ह्या संयोगाचा नाश करणे म्हणजे चिकित्सा दु:ख-संयोग म्हणजेच जन्म. दु:ख-संयोग-नाश म्हणजे मोक्ष. मोक्षाची चिकित्सा ग्रंथकारांनी दिलेली आहे. तिला ‘नैष्ठिकी’ असे नाव आहे. निष्ठा म्हणजे अत्यंत दु:खमोक्ष. तिच्याकरिता करावयाची चिकित्सा म्हणजे नैष्ठिकी चिकित्सा होय. अत्यंत दु:खनाश हा योगावस्थेत होतो. योग हा मोक्षप्रवर्तक आहे. मोक्ष मृत्यूनंतर मिळतो आणि योग जिवंतपणी साध्य होऊ शकतो. योगसाधना ही आयुर्वेदीय चिकित्सेचा एक महत्त्वाचा आणि शेवटचा भाग आहे.

वैद्य व्यवहारात जी चिकित्सा करतो ती रोगनाशनी चिकित्सा होय. ही एक चिकित्सा झाली. ह्या चिकित्सेमध्ये कोणत्याही रोग्याला, मरण्याच्या अवस्थेला पोहोचलेल्या व्यक्तीलाही, रोगमुक्त करणे व तो रोग होण्यापूर्वी तो जितका स्वस्थ होता तितका स्वस्थ करणे एवढ्याच कार्याचा समावेश होतो व रोग झाला नसतानाही जन्मत: जी दोषप्रकृती असते ती नाहीशी करून त्याला प्राकृतिक म्हणजे स्वाभाविक शरीराचा बनविणे, अशी चिकित्सा करावी लागते ही दुसऱ्या प्रकारची चिकित्सा होय. प्रत्येक व्यक्तीची ही चिकित्सा प्रकृति-परीक्षण करून केली म्हणजे रोगोद्भवाची आपत्ती सहसा येणार नाही. ह्या चिकित्सेला ‘प्रकृतिस्थापनी चिकित्सा’ असे म्हणतात.

प्रकृतिस्थापनी चिकित्सेनंतर दोष सम झाले, ते प्राकृत झाले तरी, सर्व धातू सारवान व विशुद्धतर होणे अत्यावश्यक असते. यासाठी जी चिकित्सा करावयाची असते तिला ‘रासायनी’ वा ‘वय:स्थापनी चिकित्सा’ असे म्हणतात. स्वास्थ्यसंपन्न व्यक्तीचे रसादी धातू विशुद्धतर बनविणाऱ्या चिकित्सेला ‘रासायनी चिकित्सा’ म्हणतात. ही तिसऱ्या प्रकारची चिकित्सा होय. ही चिकित्सा, पहिली रोगनाशाची चिकित्सा झाल्यानंतर करावयाची असते.

चौथी आणि शेवटची चिकित्सा म्हणजे प्रथम सांगितलेली नैष्ठिकी चिकित्सा होय. तिच्यामध्ये शरीराचे धातुघटक विशुद्धतम–अति-उच्च प्रतीचे–होतात.

निदान परिवर्जन : निदान म्हणजे रोगाची कारणे ती टाळणे हा प्राथमिक आणि फार महत्त्वाचा उपचार आहे. रोगकारणे घडत राहिली तर उपचारांचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून आहारविहार नीट तपासून रोगास कारण असलेले आहारविहार म्हणजे अपथ्ये बंद करणे अत्यावश्यक आहे. अपथ्ये ही रोग वाढविणारीच असतात. रोगनाशनी चिकित्सेत हे सहज तपासता येते. पण प्रकृतिस्थापनी चिकित्सेच्या वेळी चिकित्स्य व्यक्तीचे आईबाप संपर्कात आले तरच त्यांच्याकडून पुष्कळशी कारणे कळतात नाहीतर ज्या दोषाची प्रकृती असेल त्या दोषाची वाढ करणारे आहारातील सर्व पदार्थ बंद करावे लागतात तसाच विहारही बंद करावा लागतो. रसायन-चिकित्सेत ठराविक आहारच बहुधा घ्यावयाचा असतो व अत्यावश्यक विहारच करण्याला अनुज्ञा द्यावी लागते. नैष्ठिकी चिकित्सेत इच्छाद्वेषात्मिका कोणतीही तृष्णा वर्ज्य करावयाची असते. अपवाद आहे तो भूक, तहान, मूत्रपरीषोत्सर्गाचा वेग, भयनिवारण यांचा. उदा., भूक लागली की, जे पुढे येईल ते मित प्रमाणात शरीरात घेणे हा होय.

रोगनाशनी चिकित्सा : कोणत्याही रोगामध्ये जी चिन्हे होतात, त्या चिन्हांनी रोगाची अवस्था निश्‍चित करून, त्या अवस्थेला अनुसरून चिकित्सा करावी लागते. उदा., वांती हा रोग निर्माण झाला आहे. वांतीमध्ये प्रत्येक वेळी खूप चिकट असा कफ पडत असेल, शरीर, डोके, छाती जड आहेत असे वाटत असेल, तर कफदोष तेथे प्रमाणाने पुष्कळ आहे म्हणून त्या अवस्थेत ओकारीचे औषध देऊन कफ काढून टाकणे आवश्यक असते ओकारीमध्ये कफाबरोबर पित्त असेल, तर ओकारीचे औषध देऊन ओकारी करविल्यानंतर, रेचक देऊन पित्तही काढून टाकले पाहिजे. ह्या दोन्ही प्रकारांत कफ आणि पित्त आमाशयात पुष्कळ प्रमाणात आहे आणि आमाशयाचा क्षोभ होऊन ते वरच्या बाजूने फेकून देण्याचा पुरुषाचा प्रयत्‍न आहे म्हणून त्या प्रयत्‍नाला मदत म्हणून ओकारीचे औषध व प्रसंगी रेचकही देऊन कफ-पित्त काढून टाकणे हे चिकित्सकाचे कर्तव्य होय. वांत्या जर कोरड्या येत असतील, त्यांतून काही बाहेर पडत नसेल, तर आमाशयाला क्षोमक असे बाहेर काढून टाकण्यासारखे द्रव्य आमाशयात नाही, तर तेथे वाताचाच प्रकोप आहे. म्हणून वाताचे शमन करण्याकरिता केवळ सैंधव तुपाशी चाटविले तरी ति ओकारी बंद होऊ शकते.

ही अगदी साधी व सोपी रोगचिकित्सा सांगितली आहे. मोठ्या रोगांतही चिन्हांचा अर्थ करून, अवस्था ठरवून चिकित्सा करावयाची असते. रोगाची कारणे घडल्यानंतर रोग होईपर्यंत ज्या संचयादी अवस्थांतून रोगी जातो, त्या अवस्थांमध्ये त्या कारणांपासून उत्पन्न झालेल्या दोषांमुळे काही गुणांची व द्रव्याची इच्छा व द्वेष निर्माण होतात. त्यांना अनुसरून ही चिकित्सा करावयाची असते.

प्रकृतिस्थपानी चिकित्सा : समदोष म्हणजे प्राकृतिक पुरुष विरळाच. बहुतेक लोक कोणत्या-ना-कोणत्या दोषप्रकृतीचे असतात. प्रत्येक शरीराची प्रकृती ओळखून त्या दोषाचा नाश करणारा आहार-विहार व औषधे त्याला आखून द्यावी लागतात. जन्मत:च कोणाला उष्ण हवे असते, थंड नको असते आंबट हवे असते, तिखट नको असते तिखट हवे असते, गोड नको असते ह्याच्या उलटही असते. जन्मत:च असणाऱ्या इच्छा व द्वेष लक्षात घेऊन व त्यांना अनुसरून त्याचा आहार आखावयाचा असतो. ज्या गुणाची जास्त वाढ झाली असेल तो कमी करणारा व जो गुण क्षीण असेल त्याची योग्य वाढ करणारा आहार व औषधे आखून दिली पाहिजेत. याचप्रमाणे त्याचा विहारही आखून द्यावा लागतो. या आहारविहाराच्या व औषधाच्या सतत अभ्यासाने त्याला खरे स्वास्थ्य प्राप्त होते नाहीतर तो एका अर्थाने रोगीच होय. ते प्राकृत शरीर नव्हे. दोषांची प्राकृतिक लक्षणे ही थोडी जटिल असतात. त्यांचा अर्थ लक्षात घेऊनच नित्याचा आहारविहार व औषधे आखून देऊन त्यांची सवय केली पाहिजे म्हणजे जन्मदोष नाहीसे होऊन खरी प्रकृती (आरोग्य) बनेल.

वय:स्थापनी चिकित्सा : आरोग्यसंपन्न शरीरात शुद्ध-विशुद्ध-विशुद्धतर व विशुद्धतम असे धातू योग्य आहारविहाराने व औषधाने निर्माण करता येतात. विशुद्धतर धातू रासायनी चिकित्सेने उत्पन्न करता येतात. कोणते धातू असार, मध्यम वा अल्पसार आहेत हे पाहून त्या सर्वांना उत्तमसार बनवायचे असते. या दृष्टीने सामान्यत: गाईचे दूध, चांगला भात, साखर, तूप व मध अशा आहारोत्तम द्रव्यांचा आहारात उपयोग करून रसायन औषधे द्यावयाची असतात.


नैष्ठिकी चिकित्सा : शरीरात दोषादी रूपांनी शल्य विद्यमान असते. रोगनाशनी चिकित्सेने आपण ती शल्ये नाहीशी करतो आणि दु:खनाश करतो प्रकृतिस्थापनी चिकित्सा करून जन्मत: असणाऱ्या दोषांचे जे दु:ख शरीरात असते ते नाहीसे करतो. विपरीत गुणांची सतत इच्छा होत असते आणि तिच्या पूर्तीने सुख उत्पन्न होत असते. हे सुख सापेक्ष असते म्हणजे बाह्य द्रव्यांवर अवलंबून असते. प्रकृतिस्थापनी चिकित्सेने जन्मत: असलेले विषम दोष सम झाले म्हणजे ह्या इच्छा आणि द्वेष उत्पन्न होत नाहीत आणि दोषज दु:खही उत्पन्न होत नाही. फक्त दैनंदिन शारीर कर्माने झिजलेले घटक भरून येण्याकरिता अनेक तऱ्हेच्या अन्नाची इच्छा उत्पन्न होते. तिची पूर्ती आहाराने केली म्हणजे झाले. रासायनी चिकित्सेने मनासह सर्व धातू अती बलवान झाल्याच्या योगाने अंत:स्थ सुखसंवेदना प्रमाणाने वाढतात. त्या वाढलेल्या सुखामध्ये तो नित्य रमतो. बाह्य सृष्टीतल्या कोणत्याही खाद्य–वस्त्रप्रावरण इत्यादींकडे मन आकृष्ट होत नाही, त्याची बुद्धी–स्मृती–धृती ह्या बलवान होतात, मन अधिक सत्त्वगुणी होते आणि असे ते निरपेक्ष सुखी मन एकाग्र होते. त्याचे सर्व शरीरघटक विशुद्धतर होतात. 

सज्जनांची सेवा, एकांतात वास, मनोनिग्रह इ. नैष्ठिकी चिकित्सेच्या उपायांनी सात्त्विक शारीरघटक विशुद्धतम होतात व मन पूर्ण सात्त्विक होऊन योग्यांचे अष्टविध बल त्याला प्राप्त होते. अशा अवस्थेत आसक्तीने काही न करता जर मन समाधि-अवस्थेत स्थिर ठेवले तर हा योग मोक्षसाधक होतो.

शारीरघटक विशुद्ध करणारी आहारद्रव्ये : शारीरघटक विशुद्धतर-विशुद्धतम लाभणे ही महाभाग्याची गोष्ट आहे. ती आपल्या स्वाधीनची नाही. जन्मानंतर तसे बनविणे अशक्य नाही त्याकरिता मनोनिग्रहाने, आहारविहारावर नियंत्रण ठेवून, तसे घटक मिळविणारा आहारच घ्यावयाचा, इतर वर्ज्य करावयाचा असा दृढनिश्चय केला पाहिजे. शरीरातले धातुघटक विशुद्धतम झाल्यानंतर योगावस्थेत शरीराचा अग्नी इतका गुणसंपन्न होतो की, तेव्हा कोणतेही कदान्न वा शाका वगैरे आहार्यद्रव्ये जरी आहारात घेतली तरी त्यातील सारतमत्वाला न्यूनत्व निर्माण होईल असे होत नाही त्यामुळे त्या अवस्थेत फक्त काहीही चालू शकते.

इतर वेळी आहारात नित्य एकदल धान्यातील उत्तम गहू, रक्तशाली वा कृष्णशाली जातीचे तांदूळ व जव ह्यांचा प्राधान्याने उपयोग करावा हा मुख्य आहार असावा ह्याखेरीज इतर पदार्थ ह्यांना मदत करणारे म्हणून असावेत. मूग, तूर, मसूर ह्या डाळी काळे तीळ तसेच कोंबडा, हंस, लावा, मोर, तित्तिर हे पक्षी आणि पांढरा, तांबडा वा काळा हरीण, बकरी, रोहितमासा व कासव यांचे मांस डाळिंब, आवळा, द्राक्ष, बोर, पिकलेला आंबा, खजूर, नारळ, फालसा, अक्रोड, जर्दाळू, चारोळी व महाळुंग ही फळे चाकवत,चंदनबटवा, चुका, हरणदोडी, ब्राह्मी, कुरडू, गोजिव्हा, पडवळ व वांगी या भाज्या आले, सैंघव, पिंपळी, ऊस व साखर गाईचे दूध, तूप व मध यांपैकी मानवतील त्या आहार्य पदार्थांचा व अशाच इतरही पदार्थांचा उपयोग तज्ज्ञा‍च्या सल्ल्याने आहारामध्ये नित्य करावा.

मुले अन्न खायला लागल्यापासून वरील पदार्थांचीच चव जिभेवर दृढमूल होईल, अशा दृष्टीने सवय करावी. सवयीचे रुचकर पदार्थ शरीराला विकारकर असे असले तरी ते सोडण्याचे अतिशय जिवावर येते आणि रोग बरा करण्याच्या वैद्याच्या चिकित्सेत फार मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणून आरंभापासून धातुघटक उच्चप्रतीचे निर्माण करणाऱ्या आहाराची सवय लावावी. वरील पदार्थांखेरीज अन्य पदार्थ तज्ज्ञ‍ वैद्यांच्या सल्ल्याने सेवनात आणावे.

चिकित्साधिष्ठान पुरुष : चिकित्सा ज्याच्यावर करावयाची तो पुरुष (शरीर व मन) शास्त्रकारांनी दोन मानले आहेत. एक षाड्धातुक पुरुष व दुसरा चतुर्विंशतिक पुरुष. पंचमहाभूते व चेतना मिळून षाड्‍धातुक पुरुष होय. अव्यक्त (प्रकृती व पुरुष यांची जोडी) आणि महदादी प्रकृती व विकृती सात व सोळा विकृती मिळून चोवीस तत्त्वांचा सांख्यांनी सांगितलेला चतुर्विंशतिक पुरुष होय. रोगनाशनी, प्रकृतिस्थापनी आणि रासायनी ह्या तीन चिकित्सा षाड्धातुक पुरुष डोळ्यापुढे ठेवून करावयाच्या असतात. म्हणजे आध्यात्मिक द्रव्ये न विसरता पंतमहाभूतविकार जे दोष–धातु–मल ह्यांची प्राधान्याने चिकित्सा करावी लागते. रासायनी चिकित्सेत चतुर्विंशतिक पुरुषही लक्षात घ्यावयाचा असतो. ती केवळ दोषादी शारीरघटकांचीच चिकित्सा होत नाही आध्यात्मिक घटकांचीही चिकित्सा होते. त्या चिकित्सेपैकी वातातपिक चिकित्सा षाड्धातुक पुरुष दृष्टीपुढे ठेवून केली जाते. तर कुटीप्रावेशिक (कायाकल्प) ही चतुर्विंशतिक पुरुषाची म्हणजे भौतिक आणि विशेषत: आध्यात्मिक घटकांची चिकित्सा केली जाते. नैष्ठिक चिकित्सा ही पूर्णाशाने चतुर्विंशतिक पुरुषाची केली जाते. या चिकित्सेत भौतिक घटकांपेक्षा आध्यात्मिक घटकांची चिकित्सा प्राधान्याने होते.

खालील कोष्टकामध्ये या चार चिकित्सांचे अधिकरण पुरुष, त्यात झालेल्या विकाराचे लक्षण, चिकित्सा आणि चिकित्साफल थोडक्यात दिली आहेत.

 

चिकित्साप्रकार

विकारलक्षण 

चिकित्साधिकरण

        पुरुष 

फल 

१.

रोगनाशनी

प्रकुपित दोष-दूष्य-दुषिजन्य दु:ख

षाड्धातुक पुरुष

रोगशमन

२.

प्रकृतिस्थापनी

जन्मत: दोषवैषम्यजन्य दु:ख

षाड्धातुक पुरुष

दोषसाम्य (आरोग्यप्राप्ती)

३.

रासायनी

     
 

अ)    वातातपिक

भौतिक रसादिधातु-असारत्वजन्य दु:ख

षाड्धातुक व चतुविंशतिक पुरुष

विशुद्धतर धातुनिर्मिती

 

आ)  कुटीप्रावेशिक

आध्यात्मिक धातु-असारत्वजन्य दु:ख

चतुर्विंशतिक पुरुष

विशुद्धतम धातुनिर्मिती

४.

नैष्ठिकी (आत्यंतिक दु:खनाशिनी)

संसारदु:ख

चतुर्विंशतिक पुरुष

योगप्राप्तीनंतर मोक्षप्राप्ती

जोशी, वेणीमाधवशास्त्री

आतुर म्हणजे रोगी त्याची कायचिकित्सा येथे प्रतिपादावयाची आहे. कायचिकित्सा म्हणजे शरीराला होणाऱ्या रोगांचा परिहार करण्यासाठी करावयाचे उपचार. ‘कायचिकित्सा’ या शब्दात ‘काय’ व ‘चिकित्सा’ असे दोन शब्द आहेत. त्यांतील ‘काय’ या शब्दाचा ‘अन्नादिकांनी वाढतो तो’, असा अर्थ केलेला आहे. सर्व शरीरघटकांना निर्माण करणारी जी अग्नी नावाची शक्ती आहे, तीच या सर्व शरीरप्रक्रियांच्या मुळाशी आहे व या अग्नीचे दुसरे नाव  ‘काय’ असे असल्याने हा अग्नी योग्य करणे व त्यायोगे रोगपरिहार करणे म्हणजेच कायचिकित्सा होय.

कायचिकित्सा या शब्दांतील दुसरा शब्द ‘चिकित्सा’ हा आहे. त्याचा अर्थ ‘रोग घालविणे’ असा आहे. अमरकोशात चिकित्सेचा हा अर्थ रुक्‌प्रतिक्रिया व वैद्यक शब्द-सिंधुकोशात रोगनिदानप्रतिकार असा दिला आहे. रुक्‌प्रतिक्रिया म्हणजे रोगप्रतिकार. रोगनिदानप्रतिकार या शब्दात मात्र रोग निर्माण करणाऱ्या कारणांना दूर करणे म्हणजे चिकित्सा असा अर्थ दिसतो. सुश्रुतामध्ये या अर्थाने चिकित्सा शब्द आला आहे. चिकित्सा म्हणजे केवळ निदान परिवर्जन करणे नव्हे, तर शरीरातील दोषसाम्य हे उद्दिष्ट असलेली चतुष्पाद-चिकित्सा होय.

चिकित्सेचे चतुष्पाद व षोडशगुण : योग्य तऱ्हेने व संपूर्ण चिकित्सा करण्याच्या दृष्टीने चिकित्सेला जरूर असलेल्या अशा चार महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पाद. ते म्हणजे (१) वैद्य, (२) द्रव्य, (३) परिचारक, (४) रोगी. या प्रत्येकाचे चार चार गुण वर्णिले असून एकूण सोळा गुणांनी युक्त अशी चिकित्सा ही परिपूर्ण होते.

चिकित्सेच्या या चतुष्पादांमध्ये सर्व शास्त्रकारांनी वैद्याला प्राधान्य दिले असून त्याच्याशिवाय इतर तिघांना महत्त्व नाही. नावाड्याशिवाय जसे नावेला महत्त्व नाही, तसे वैद्याशिवाय चिकित्सेला महत्त्व नाही. वैद्य हा औषधोपचारादी जाणणारा, परिचारक, रोगी इत्यादींना मार्गदर्शक, युक्तीने शस्त्रकर्मादी उपचार करणारा म्हणून सर्वांत मुख्य होय. यांशिवाय वैद्याच्या ठिकाणी असणारे गुण म्हणजे वैद्यकशास्त्र योग्य गुरूकडून योग्य तऱ्हेने शिकलेला, उपचारात अनुभवी असणारा, स्वत:च्या बुद्धीने चिकित्साकर्म करणारा, शस्त्रकर्मामध्ये हलक्या हाताचा, पवित्र, धाडशी, सर्व तऱ्हेची औषधे व उपकरणादी यंत्रे जवळ असलेला, प्रत्युत्पन्नमती असलेला, तरबेज, सत्यधर्मपरायण असा असला पाहिजे. रोगाचे हेतू, लक्षणे, रोगोपशम करणे व अपुनर्भवत्व (रोग पुन: उद्भवणार नाही अशी स्थिती) प्राप्त करून देणे अशा चतुर्विध विषयांचे वैद्याचे ज्ञान असले पाहिजे.


दुसरा पाद द्रव्य : हे द्रव्य म्हणजे चिकित्सेसाठी वापरले जाणारे औषधी द्रव्य. या द्रव्याचे गुण असे की, हे द्रव्य प्रशस्त देशात निर्माण झालेले, योग्य काळी काढलेले, योग्य अशा रसगंधादी गुणांनी परिपूर्ण, निर्दोष, ज्याचे कल्प अनेक प्रकारांनी बनविता येतात असे अनेक गुणांचे व योग्य काळी दिले जाणारे असावे.

परिचारक म्हणजे रोग्याची शुश्रूषा करणारा. हा प्रेमळ, अंतर्बाह्य स्वच्छता पाळणारा, दक्ष, बुद्धिमान म्हणजे कोणत्या वेळी काय करावे लागते ते समजणारा व उपचारादी कर्मांमध्ये कुशल असलेला, रुग्णाची निंदा न करणारा, कष्टाळू, बलवान, वैद्याचे आदेश योग्य रीतीने अमलात आणणारा, असा पाहिजे.

स्वत: रोगी हा ज्ञापक म्हणजे स्वत:ला होणारी दु:खे योग्य तऱ्हेने सांगणारा, वैद्याच्या ताब्यात असणारा, आस्तिक, आयुष्यमान, सत्यवान व धनवान असावा. अशा तऱ्हेने योग्य गुणाचे हे चारही पाद चिकित्सेसाठी सज्‍ज असले म्हणजे चिकित्सा यशस्वी होते.

चिकित्सा ज्याच्या साहाय्याने केली जाते त्या ‘भेषज’ शब्दाचे पर्यायी शब्द पाहिले तर चिकित्सेची वेगवेगळी अंगे वा विस्तृतपणा समजून येतो. ते शब्द असे आहेत-

(१) चिकित्सित, हा शब्द वर स्पष्ट केलेल्या चिकित्सा शब्दापासून झाला आहे. (२) व्याधिहर, म्हणजे जे व्याधीला नाहीसे करते ते. (३) पथ्य, म्हणजे जे आरोग्याच्या मार्गाला सोडून नाही ते. (४) साधन, म्हणजे ज्याच्या साहाय्याने रोग साध्य केले जातात किंवा घालविले जातात ते. (५) औषध, म्हणजे औषधींनी निर्माण झालेले. (६) प्रायश्‍चित्त, म्हणजे पापापासून चित्ताचे शोधन करते ते. (७) प्रशमन, म्हणजे प्रकर्षाने रोगाचे शमन करते ते. (८) प्रकृतिस्थापन, म्हणजे प्रकृतिप्रत (दोषसाम्याप्रत) आणून ठेवते ते. (९) हित, म्हणजे आरोग्याला हितकर असलेले जे ते. (१०) भेषज, म्हणजे रोगभय नाहीसे करते ते.

चिकित्सेची आवश्यकता : चिकित्सेबद्दल अशी शंका प्रदर्शित केली जाते की, काही रोगी योग्य साहाय्य न मिळूनही निरोगी होतात, तर काही रोगी असे साहाय्य मिळूनही मृत्यू पावतात. खरे म्हणजे षोडशगुणयुक्त चिकित्सा लाभल्यावर कोणाचाही मृत्यू होता कामा नये आणि असे तर आढळत नाही त्यावरून चिकित्सेमुळेच आरोग्य मिळते असे नाही. आरोग्य अगर मृत्यू हा दैवयोगानेच होतो. अर्थात पर्यायाने चिकित्सेची जरूरी नाही असे म्हणावे लागेल. परंतु अशा प्रकारचा चिकित्सेबद्दलचा आक्षेप चुकीचा आहे. जो रोग भेषजसाध्य आहे त्या रोगामध्ये चिकित्सा ही निष्फल ठरत नाही. अर्थात भेषजसाध्य व्याधीमध्ये व्याधिनिवारणार्थ चिकित्सा हीच कारण होते. एखादा रोगी चिकित्सेशिवाय बरा झाला असे दिसते अशा उदाहरणात चिकित्सा करण्याचे काहीच कारण नाही असे समजणेही योग्य नाही. चिकित्सेच्या थोड्याही साहाय्याने असा रोगी अधिक लवकर रोगमुक्त होतो. रोगी संपूर्ण चिकित्सा करूनही मृत्यू पावतो अशा असाध्य रोगांमध्ये उत्तम ज्ञानवान वैद्यदेखील रुग्णास वाचवू शकत नाही. जो रोग उपायसाध्य आहे त्याच्या बाबतीत उपाय किंवा चिकित्सा केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही प्रत्यक्षातही आपण पाहतोच की, औषध देऊन रोगोपशम होतो. साध्यासाध्यत्वाची मर्यादा ध्यानात घेणे हे चिकित्सेमध्ये आवश्यक आहे.

चिकित्सेची मर्यादा : शरीर, आत्मा, मन व इंद्रिये यांचा संयोग म्हणजे आयुष्य होय. या चार पदार्थांपैकी शरीर, मन व इंद्रिये ही अचेतन वा जड व आत्मा हा चेतन आहे. हा जड–चेतनांचा संयोग टिकविणे हे चिकित्सेचे कार्य आहे.

हा संयोग टिकविताना चैतन्य या पदार्थाबाबतचा विचार अध्यात्मविद्येत येतो. अचेतन भाग हा पंचमहाभूतांचा झालेला आहे व ही पंचमहाभूते चिकित्साशास्त्राच्या कक्षेत येतात. चेतन आत्म्याचे अधिष्ठान असे हे शरीर विकृत झाले, तर या शरीरामधील चैतन्याचा आधारच जातो. तेव्हा हा शरीररूपी चैतन्याचा आधार नीट राखण्याने आयुष्य चालू राहते एवढी चिकित्सेची मर्यादा राहते. म्हणजे चिकित्सेत चेतना वगैरे पंचमहाभूतांच्या पलीकडचा आत्म्याचा विचार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. आत्मा हा निर्विकार असून त्याला विकार होत नाहीत असे चरकाचार्यानी सांगितले आहे. चिकित्सा करताना जे पदार्थ शरीरात उत्पन्न करावयाचे किंवा घालावयाचे किंवा काढावयाचे त्या सर्व क्रिया सचेतन अशा शरीरावरच करावयाच्या असतात. चिकित्सा पूर्णांशाने सफल होणे अशक्य असले, तरी काही मर्यादेपर्यंत सफल होते व त्याचाच विचार या चिकित्साविभागात करावयाचा आहे व या दृष्टीने व्याधी यावच्छक्य समजावून घेऊन रोग्याचे दु:ख घालविणे एवढेच वैद्याचे खास कार्य आहे.

चिकित्साकर्म : म्हणजे शरीरातील धातुसाम्य राखणे वा धातुसाम्य निर्माण करणे, हेच आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. शारीरिक दोषधातुमलादींचे व मानसिक दोषांचे साम्य राखणे हे कार्य चिकित्सेचे आहे. वात–पित्त–कफ हे शरीराचे व रज–तम हे मनाचे दोष आहेत. नेहमी चिकित्सा करताना पुढील चार गोष्टी प्रमुखपणे ध्यानात घ्याव्या लागतात : (१) ज्याच्यावर चिकित्सा करावयाची तो चिकित्सा-पुरुष, (२) व्याधी व तिचे स्परूप,     (३) क्रियाकाल व (४) औषधी.

आयुर्वेदात शरीराचे किंवा चिकित्स्य पुरुषाचे अनेक दृष्टींनी वर्णन केले आहे. महाभूतांच्या दृष्टीने, दोषधातुमलांच्या दृष्टीने, स्रोतसांच्या दृष्टीने केलेले वर्णन चिकित्सेला अत्यंत उपयोगी आहे. चरकाचार्यांनी मनुष्य-शरीराचे केलेले वर्णन हे कायचिकित्सेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. मनुष्यशरीर हे पंचमहाभूते आणि आत्मा या सहा द्रव्यांचे बनले आहे. तद्वतच बाह्यसृष्टीसुद्धा पंचमहाभूते आणि चैतन्य यांच्या मिश्रणाची आहे. शरीर व सृष्टीतील कोणताही अंश पाहिला, तरी तो चैतन्ययुक्त पाच महाभूतांचा आहे असे दिसते. शरीरातील कोणताही पदार्थ कमी झालेला असेल तो वाढविण्याकरिता किंवा वाढलेला असेल तो कमी करण्याकरिता बाह्य सृष्टीतील पदार्थांचा उपयोग करावा लागतो. बाह्य सृष्टीतील जे पदार्थ शरीरातील पदार्थाशी समान असतात त्यांनी शरीरातील त्या पदार्थांची वाढ होते व जे पदार्थ विरुद्ध असतील त्यांनी त्यांचा नाश होतो आणि हाच सिद्धांत आयुर्वेदीय चिकित्साशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे.

शरीरात द्रव्य, गुण व कर्म या नावाचे तीन पदार्थ आहेत. शरीरातील रक्त-किंवा मांस-धातू कमी या झाला तर दुसरे रक्त किंवा मांस खाल्ल्याने तो वाढतो. अर्थात तो शरीरातील रक्त व मांस यांच्या गुणांशी जुळता असला पाहिजे नाही तर विकृती होईल. चिकित्सेसाठी द्रव्यसामान्य व गुणसामान्य हे दोन प्रकार लक्षात घेऊन तिसरा कर्मसामान्य हा जो प्रकार आहे तोही पाहावा लागतो. जसे शरीराची हालचाल, धावणे, बसणे, बोलणे, झोपणे इ. क्रियांनीही शरीरद्रव्यांची वाढ अगर घट होत असते व ही कर्मामुळे होत असते. जसे अती धावणे, श्रम, जागरण इ. कर्मांमुळे धातुक्षय व वातवृद्धी होते, तर दिवसा जेवणानंतर झोपणे या कर्मामुळे शरीरात कफवृद्धी होते.

अशा प्रकारे द्रव्य, गुण व कर्म यांचा विचार करून चिकित्सा करण्याच्या या तत्त्वानुसार व्यवहार करावयाचा तर सृष्टी व शरीर यांचे विशेष ज्ञान झाले पाहिजे. ही दोनही पंचमहाभूतांपासून बनली असून शरीराचे ज्ञान हे याच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले दोष, धातू व मल हे शरीराचे मूल घटक पाहून होते. सृष्टीचे विशेष ज्ञान हे रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव पाहून होते. दोष–धातु–मल हे पंचमहाभूतांचेच विकार आहेत. सृष्टीतील प्रत्येक द्रव्याचा शरीरावर म्हणजे दोषादींवर होणारा परिणाम समजला म्हणजे चिकित्सा नेमकी करता येते.


रस व त्याचा चिकित्सेस उपयोग : सृष्टीचे तपशिलाने वर्णन करताना शास्त्रकारांनी प्रथम रसाच्या रूपाने सर्व सृष्टीचे ज्ञान करून दिले आहे व रसांचे शरीराशी म्हणजे शरीराचे मूलभूत जे दोष त्यांच्याशी सारखेपणा व वेगळेपणा दाखविला आहे. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट या एकूण षड्रसांपैकी गोड, आंबट, व खारट या रसांच्या सेवनाने शरीरात कफ तयार होतो. कडू, तिखट व तुरट यांमुळे वायू व आंबट, खारट आणि तिखट यांमुळे शरीरातील पित्त वाढते. अशा रीतीने सृष्टीतील द्रव्यांचे दोषांशी साम्य दाखविले आहे. याउलट गोड, आंबट व खारट वायूला कमी करणारे कडू, तिखट व तुरट कफाला कमी करणारे आणि गोड, कडू व तुरट हे रस पित्ताला कमी करणारे आहेत.

कोणतेही द्रव्य एकरसात्मक नाही. तसेच रोगामध्येही दोषांचे मिश्रण असते. द्रव्यांमधील रसांचे मिश्रण व रोगांमधील दोषांचे मिश्रण यांतील बारकावे लक्षात घेऊनच चिकित्सा करावी लागते. कधीकधी मिश्र रसांच्या द्रव्याचे गुण हे त्या द्रव्यातील मिश्र रसांनुसार असतात, तर कधी द्रव्यातील मिश्रित रसांच्या गुणांहून वेगळेच गुण उत्पन्न होतात. अशा रीतीने सृष्टीतील प्रत्येक रस तपासून त्याचा रोगपरिहार व आरोग्यरक्षणाकरिता उपयोग करणाऱ्या वैद्यांचा एक वर्ग चरककाली होता व त्यांना ‘रसचिंतक’ असे नाव चरकांनी दिले आहे. या रसचिंतकांनी सोने, वायू, ऊन, चांदणे इ. मूर्तामूर्त पदार्थांचेही वर्णन केले आहे व त्यानुसार चिकित्सेतली उपयुक्तता दिली आहे.

विपाक व त्याचा चिकित्सेला उपयोग : सुरुवातीला द्रव्याचा जिभेला जो रस समजतो तो रस पुढे पोटातील अग्नीच्या संयोगामुळे बदलतो. यालाच ‘विपाक’ असे म्हणतात. रसापेक्षा विपाक बलवान असतो. या विपाकाचेही चिकित्सेच्या दृष्टीने काही नियम आढळले आहेत व त्यानुसार विपाकाचा विचार करून चिकित्सा केली जाते. द्रव्यगुणवर्णनात द्रव्याचा जो विपाक होतो तो सांगितला जातो व विपाकरूप जो रस नियमाप्रमाणे निर्माण होतो त्या रसाच्या कार्यानुसार त्या द्रव्याचे कार्य होते. पुष्कळ वेळा मूळ रसाचे विपाकात रूपांतर झाल्यावरही तोच रस, असा नियम आहे परंतु काही वेळा अपवादात्मक वेगळाच विपाक होतो. उदा., सुंठ तिखट रसाची आहे तरी तिचा विपाक मधुर होतो. परंतु तो तिखट रस वातघ्न ठरतो. अशी अपवादात्मक द्रव्ये पुष्कळ वेळा चिकित्सेला चांगली उपयोगी पडतात.

वीर्य-गुण व त्याचा चिकित्सेला उपयोग : अनेक ठिकाणी रसाच्या विपाकाचे कार्य न घडता भिन्न गुणांचे दुसरेच कार्य घडलेले दिसते. रसाचे कार्य त्यांचा विपाक होईपर्यंत तोंडापासून पक्काशयापर्यंतच्या बिघडलेल्या दोषांवर होते, तर या गुणाचे कार्य सर्व शरीरभर होते. जसे मध जिभेवर गोड लागला तरी पुढे पोटात गेल्यावर रूक्ष गुण व तिखट गुण यांमुळे व विपाकामुळे कफघ्न कार्य करतो. पाचकाग्नीने न बदलणाऱ्या व प्रकर्षाने अथवा अधिक परिणामकारक कार्य करणाऱ्या या गुणासच वीर्य असे प्राय: समजले जाते. शरीरातील दोषांवर गुणांचा विरोध नसेल तेव्हाच रसांचा परिणाम होतो म्हणून रसांचा व गुणांचा विरोध असेल तेव्हा गुण बलवान व महत्त्वाचे ठरतात, असा वैद्यकशास्त्राचा सिद्धांत आहे व त्यानुसार गुणांचे कार्य लक्षात घेऊन चिकित्सा केली पाहिजे.

प्रभाव व त्याचा चिकित्सेस उपयोग : काही काही द्रव्यांचे रसवीर्यविपाकाच्या कार्यानुसार न घडणारे असे परिणाम शरीरावर आढळतात. हे परिणाम घडविणारी जी अचिंत्य अशी द्रव्यशक्ती आहे तिला ‘प्रभाव’ म्हणतात. अशा द्रव्यामध्ये असणारी प्रभावी शक्ती ही शास्त्रकारांनी अनुभवाने नमूद करून ठेवली आहे. चिकित्सकानेही नवीन नवीन द्रव्यांचा प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे व असे द्रव्यांचे प्रभाव समजावून घेऊन त्याप्रमाणे चिकित्सा करणे आवश्यक आहे. रसवीर्यविपाकाच्या परिणामाचे काही नियम आहेत, परंतु प्रभावाला काही नियमच नाही. उदा., मनुका व जेष्ठमध ही दोनही रसवीर्यविपाकाने सारखीच असून सारकपणा फक्त मनुकांत आहे, जेष्ठमधात नाही. या दोन द्रव्यांत जो भेद आहे तो द्रव्यांतील विशिष्ट शक्तीचा आहे. त्यालाच ‘प्रभाव’ म्हणतात. त्याचा चिकित्सेत विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चिकित्सा करताना जी द्रव्ये वापरावयाची त्यांचा शरीराच्या दृष्टीने दोषादींवर वा शरीराच्या कार्यावर कसा परिणाम होतो याचा विचार करणे आवश्यक आहे व तो आतापर्यंत वर्णन केलेल्या रसवीर्यविपाकप्रभावावरून समजतो हे ध्यानी येईल.

चिकित्सेच्या दृष्टीने दोषादींचा विचार : शरीर बिघडण्यास कारण दोष हेच प्रमुख असल्यामुळे शरीराची सुधारणाही दोष सुधारल्याने होते, म्हणून औषधही विशेषेकरून दोषांवर द्यावे लागते. दोष प्रथम आहाररसांनी बिघडतात व ते बिघडले म्हणजे रसादी सप्त धातूंना बिघडवितात. हे दोष व धातू बिघडले की मलांना बिघडवितात व नंतर ती ती स्थानेही बिघडतात, असा क्रम आहे. तसेच स्वस्थानी वाढून कुपित झालेला दोष कारणविशेषाने शरीरात पसरून स्थानविशेषाने अनेक विकार उत्पन्न करतो. अशी विकार होण्याची पद्धत असल्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार प्रामुख्याने चिकित्सा करताना करावयाचा असतो.

विकार जेव्हा एका दोषानेच उत्पन्न झालेला असेल तेव्हा त्या त्या एका दोषावर चिकित्सा करावी लागते. कोणतेही दोन दोष बिघडून जेव्हा विकार होतो त्या वेळी त्या दोषांची चिकित्सा तद्दोषांवरील द्रव्ये एकत्र करून करावी लागते. परंतु अशी चिकित्सा नेहमी उपयोगी पडतेच असे नाही. उदा., पित्ताबरोबर वायू असेल तर पित्ताची चिकित्सा करून वायू व पित्त हे दोनही दोष बरे होतात. तसेच कफाबरोबर वायू असेल तर कफदोषाच्या चिकित्सेने बरे वाटते. याला कारण वायूचा योगवाही गुण होय. वायू ज्या दोषाबरोबर असेल त्या दोषाचे विकार वाढवतो व त्या सहकारी दोषांवरील चिकित्सेने कमी होतो. उदा., शीत ऋतूत सकाळी थंडीत फिरल्याने पाय दुखतात व जड होतात. येथे वात व कफाची दुश्टी असते. यावर कफघ्न अशी मिरी वाटून लावल्याने दु:ख व जडपणा कमी होतो. तसेच पित्तासह वाताने आलेल्या मूर्च्छेवर मोरावळा चाटवणे, थंड पाणी शिंपडणे या पित्तघ्न उपचारांनीच बरे वाटते. कफ व पित्त या दोषांच्या मिश्रणाने होणाऱ्या विकारावर मात्र दोन्ही दोषांवरील चिकित्सा करावी लागते व ती परस्परविरुद्ध गुणांची असल्याने कठीण असते.

कधीकधी दोन दोषांच्या विकारात त्या दोन दोषांच्या लक्षणांशिवाय इतर तिसऱ्याच दोषाचे लक्षण असते या मिश्रणास ‘विकृतिविषमसमवाय’ म्हणतात. उदा., वातकफज्वरात संताप व स्वेद ही लक्षणे व वातपित्तज्वरात अरुची हे लक्षण असते. ती लक्षणे समजून घेऊन त्या दोषांनुसारही चिकित्सा करावी लागते.

द्विदोषज विकारात चिकित्सा करताना उरलेला तिसरा दोष वाढेल अगर बिघडेल का, इकडे लक्ष द्यावयास हवे. उदा., वातकफावर उष्णोपचार करताना पित्तदुष्टी होत नाही असे पाहावयास पाहिजे. नाही तर वातकफांच्या जोडीस आणखी पित्त येऊन तिन्ही दोषांचा म्हणजे सन्निपाताचा विकार होईल.

सन्निपातज विकारात चिकित्सा करताना, काहींच्या मताप्रमाणे, बिघडलेले तिन्ही दोष सारख्या बलाचे असले म्हणजे प्रथम वायूची चिकिसा करावी, कारण तो आशुकारी आहे मग पित्त किंवा कफास जिंकावे. काहींच्या मते, प्रथम पित्ताला जिंकावे कारण तो तीक्ष्ण–उष्ण गुणांमुळे शरीराला फार त्रासदायक होईल. तर काहींचे म्हणणे, कफाला जिंकावे कारण कफामुळे लवकर श्वास, उचकी यांसारखे मारक विकार होतील. तरी ही सर्व मते लक्षात घेऊन कोणता दोष अधिक वाढण्याची प्रवृत्ती आहे, रोग्याची मूळची प्रकृती, भोवतालचे वातावरण, दिलेल्या औषधांचा परिणाम या गोष्टी लक्षात आणून त्या त्या दोषावर प्रथम उपचार करावेत. त्रिदोषघ्न औषधे द्यावीत.


दोष-त्यांच्या शरीरातील स्थानानुसार चिकित्सा : जेव्हा एखादा दोष बिघडून तो दुसऱ्या ज्या दोषाच्या स्थानात जातो त्या वेळी त्या दोषाची लक्षणे होतात. आपल्या स्थानात तो अधिक होऊन आपली लक्षणे उत्पन्न करतो. अशा वेळी हे दोन्ही दोष बिघडून हे विकार होतात अशी शंका येते. उदा., अम्‍लपित्तात पित्त हे कफाच्या स्थानात म्हणजे आमाशयात आल्यामुळे तेथील कफामुळे मळमळणे, अग्निमांद्य, गौरव अशी लक्षणे होतात. अशा वेळी बाहेरून आलेला दोष म्हणजे येथे पित्त जर बलवान नसेल,तर तो ज्या स्थानात आला असेल त्या स्थानिक दोषाची म्हणजेच कफाचीच चिकित्सा करावी. येथे पित्तघ्न म्हणून केवळ मधुर रसाची व शीत स्‍निग्ध गुणाची द्रव्ये अगर मृदू विरेचनद्रव्ये देऊन चिकित्सा संपूर्ण सफल होणार नाही. कारण आमाशयात कफाची वृद्धी अधिकच होईल. जेव्हा हा आक्रमक पित्तदोष बलवान असेल त्या वेळी त्या पित्तदोषावरील उपचार प्रथम करावे व नंतर स्थानिक दोष नीट करावा.

दोषांवर उपचार करताना ते दोष कोष्ठात असतील तर वरीलप्रमाणे उपचार करावे. परंतु ते कोष्ठात नसतील व त्याबाहेर म्हणजे शाखेत (रक्तादी धातूंत) किंवा हातपाय,सांधे, मर्मे इ. ठिकाणी असतील तर ते कोष्ठात आणून बाहेर काढावे लागतात. दोषांनी स्थानसंश्रय कोठे केला आहे,  हे लक्षणांवरून ओळखून कोष्ठात आणून आमाशयातले दोष जवळील मार्गाने म्हणजे मुखाने वमनाने व गुदाखालचे दोष विरेचनाने बाहेर काढावे. डोक्यातील दोष नाकाच्या मार्गाने काढावेत. दोष पुष्कळ वाढले किंवा त्यांना स्‍नेह–स्वेद–दीपन–पाचनादी उपचारांनी पातळ केले किंवा वायूच्या निग्रहाने पसरविण्याचे रोखले म्हणजे ते कोष्ठात येतात व तेथून वरीलप्रमाणे शोधन औषधांनी बाहेर काढावेत.

कोष्ठातून बाहेर गेलेले दोष बाहेरील सूक्ष्म स्त्रोतसांत लीन होऊन राहतात. ते सहजासहजी शरीराबाहेर निघत नाहीत व रोग्याला फार वेळ त्रास देतात. म्हणून ते लीन झालेले दोष दीपन–पाचन–स्‍नेहन–स्वेदनादी उपचारांनीच पातळ करून त्या ठिकाणच्या स्त्रोतसांना न बिघडविता त्या स्त्रोतसांतून दोष बाहेर काढून कोष्ठात आणावे व शोधनाने ते बाहेर काढावे, म्हणजे विकार बरा होतो.

कधीकधी अतिशय वाढलेले दोष कोष्ठातून आपोआप मलरूपाने बाहेर जाऊ लागतात, जसे आमातिसारात व हे वृद्ध दोष,जर रोगी बलवान असेल तर, तसे आपोआप जाऊ लागले तर जाऊ द्यावेत. नाहीतर हेच दोष स्तंभनाने पुन: शरीरात अडकून सर्व शरीरभर पसरून निरनिराळे अनेक विकार करतील. म्हणून योग्य अशा पथ्याने रोग्याचा अग्‍नी प्रदीप्त राहील अशी चिकित्सा करून दोष संपूर्ण निघून जाईपर्यंत ते बाहेर जाण्याचे बंद करू नयेत. रोगी फार अशक्त, बाल वा वृद्ध असा असेल तरच दोषपचनाची औषधे देऊन दोष बाहेर जाण्याचे बंद करण्याची चिकित्सा करावी.

दोष शरीराबाहेर काढताना तो आमयुक्त म्हणजे साम आहे किंवा निराम आहे ते पाहावे लागते. कच्च्या फळातून जसा रस काढता येत नाही त्याचप्रमाणे साम दोषही शरीरातून बाहेर काढता येत नाहीत. ते तसेच बाहेर काढू लागले, तर ते ज्या धातूत असतात त्या धातूचा व परंपरेने शरीराचाही नाश करतात. म्हणून चिकित्सा करताना साम दोषांना दीपन–पाचन औषधांनी निराम करून नंतर कोठ्यात आणून बाहेर काढावेत.उदा., तापाच्या सुरुवातीला दुष्ट दोष धातूंत असल्यामुळे सर्व शरीरभर पसरलेले दोष कोष्ठात येण्यास किंवा त्यांचा पाक होण्यासाठी दीपन–पाचन उपचार करावे लागतात. सामान्यपणे स्रोतसांचा अवरोध म्हणजे उदा., मलमूत्रादी, शिंक, अपानवायू योग्य तऱ्हेने प्रवृत्त न होणे, अंग कसकसणे, शक्ती कमी वाटणे, अंग जड वाटणे, आळस, अन्नपचन न होणे, थुंकी जास्त सुटणे किंवा जाड बुळबुळीत होणे, ही सर्व लक्षणे दोष साम झाले म्हणजे होतात.

वात, पित्त व कफ हे दोष साम किंवा निराम असताना त्यांची वेगवेगळी लक्षणे होतात. ती समजून घेऊन त्या लक्षणांनुसार त्यांतील दोषाचे गुण व तीव्रता ओळखून चिकित्सा करावी. जसे सामवाताची उष्णगुणात्मक चिकित्सा, सामपित्ताची शीत व रूक्ष अशी चिकित्सा व सामकफाची उष्ण व रूक्ष अशी पाचन करणाऱ्या द्रव्यांची चिकित्सा हवी.

दोषांची चिकित्सा करीत असता रोगांचे जे तीन मार्ग दिले आहेत त्यांचा विचार साध्यासाध्यत्वाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. उदा., विद्रधिविकारातील दोष बाह्य मार्गात, अंतमार्गात किंवा मध्यमार्गात साठले असता पहिल्यापेक्षा दुसऱ्यात किंवा दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या मार्गात विद्रधी अधिकाधिक कष्ठसाध्य होत जातो. कारण अशा प्रकारे विकारातील दोष अधिकाधिक लीन, शोधनमार्गापासून दूर व मर्मासारख्या महत्त्वाच्या भागांना दुष्ट करणारे असतात. हे सर्व शोधनमार्गापासून दूर असलेले दोष पुन: शोधनमार्गात (महास्रोतसात)आणून शरीराबाहेर काढावेत.

क्रियाकाल अगर चिकित्साकाल : सुश्रुताचार्यांनी दोषांच्या संचयप्रकोपादी-गतींनुसार विचार करून चिकित्सा करावी, असे सांगितले आहे. दोषांच्या चयावस्थेतच विकार होणार असे ध्यानात आल्यास त्या साठलेल्या दोषांची चिकित्सा करावी .त्यामुळे त्या दोषांना पुढील प्रकोप प्रसरादी गती मिळून पुढील विकार होणार नाहीत . याप्रमाणेच ज्या अवस्थेत (म्हणजे दोषांचे प्रकोप, प्रसर, स्थान, संश्रय इ. अवस्थेत) रुग्ण असेल त्या त्या अवस्थेची लक्षणे व स्थाने लक्षात घेऊन चिकित्सा करावी व दोषांना पुढील गती मिळू देऊ नये. सुश्रुताचार्यांनी या अवस्थांची लक्षणे वर्णन केली आहेत व या चिकित्सा करण्याच्या कालास ‘क्रियाकालְ’ अशी संज्ञा दिली आहे.

दोषांच्या प्रमाणानुसार तीव्र-मध्यम-अल्प चिकित्सा : दोषांच्या कमीअधिक प्रमाणानुसार चिकित्सेचे स्वरूप बदलावे लागते. दोष अल्प प्रमाणात असताना तीव्र प्रकारची किंवा शोधन-स्वरूप चिकित्सा करण्याने शरीरस्थ उपयुक्त घटकांचाही नाश होतो. दोष पुष्कळ प्रमाणात असताना सौम्य प्रकारची शमन किंवा अल्पशोधन-चिकित्सा केल्यास शरीरातील दुष्ट दोष केवळ चाळविले जातात व ते शरीराबाहेर जाऊन रोग नाहीसा करू शकत नाहीत. दोष-बलाप्रमाणेच व्याधीचेही असेच बलाबल लक्षात घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे.

रोग्याचे बल व स्थौल्य हे चांगल्या प्रमाणात असतील तर जरूर ते शोधन उपचारच करावेत. दोष साम असतील, ज्वर, सर्दी, अतिसार, हृद्रोग, गौरव, हल्लास इ. विकार व दोष मध्यम प्रमाणात असतील व बलही मध्यम प्रमाणात असेल, तर प्रथम दीपन-पाचनाचे उपचार करून नंतर जरूर तेवढे शोधनाचे उपचार करावेत. अशाच प्रकारचा विचार करून ज्या वेळी दोष हीन-बल असतील व रोग्याचे बल व स्थौल्य मध्यम असतील तर क्षुधा व तृष्णा यांचा निग्रह वा आयास इ. शमनोपचार करावेत. दोषबलही हीन व रोग्याचे बलही हीन असेल तर याहूनही सौम्य उपचार करावेत. म्हणजे अल्प प्रमाणात शमनोपचार केलेले पुरतात.

दोषभेद व दोषांची गुणानुसार चिकित्सा : चिकित्सा करणे म्हणजे संप्राप्तीचा भंग करणे. ज्या तऱ्हेने ज्या दोषाचा बिघाड झाला असेल त्यानुसार ही दोष-दृष्टी नाहीशी करणे हे चिकित्सेचे मुख्य कर्तव्य होय. चिकित्साविषय असलेला दोष कोणता व तो कोणत्या गुणांनी बिघडला आहे, याचा विचार करावा लागतो. पाय दुखणे या विकारात वायू हा दोष आहे हे स्पष्ट आहे परंतु तो वायू रुक्ष, लघु, शीत, चल, खर अशा वायूच्या कोणत्या गुणांनी बिघडला आहे हे नेमके समजले तर योग्य औषध देता येते. उदा., थंडीच्या दिवसांत थंड हवेत पाय उघड्यावर पुष्कळ वेळ राहिल्याने पायात शीत गुण अधिक होऊन वायू बिघडला व त्यामुळे पाय दुखू लागला तर किंवा वृद्धत्वामुळे शरीरातील स्‍निग्ध धातू कमी होऊन रुक्ष व लघू हे गुण वाढून पाय दुखू लागला तर या दोन्ही उदाहरणांत वायू हाच शूल करतो परंतु त्याचे प्रकार वेगळे आहेत. शीत गुणाने बिघडलेल्या पहिल्या उदाहरणात वायूवर सुंठीसारख्या उष्ण गुणाच्या औषधांचा लेप करून शेकावे लागते, तर दुसऱ्या उदाहरणात रूक्ष व लघू गुणांनी वायूचा बिघाड होऊन पाय दुखतो म्हणून तेल चोळणे व स्‍निग्ध पदार्ध खाणे ही चिकित्सा आवश्यक ठरते. शेकणे या वायूवरील उपचाराचा येथे फारसा उपयोग होत नाही.


अशा तऱ्हेने चिकित्सेच्या वेळी प्रत्येक विकारात दोषांच्या दृष्टीने तीन प्रकार व पुन्हा त्या प्रत्येक दोषांच्या गुणांच्या दुष्टीने वीस किंवा त्यापेक्षाही आधिक प्रकार समजावे लागतात.

दोषभेदांनुसार चिकित्सा कशी वेगवेगळी होते हे या उदाहरणांवरून स्पष्ट होईल. उदा., घसा येणे या एकच विकारात हा विकार कफाचा असेल तर टंकण व मध यांचे मिश्रण वापरावे लागेल. पित्तामुळे असेल तर आवळकाठी, जेष्ठमध, तूप अशी द्रव्ये वापरावी लागतील. वातामुळे असेल तर तेलाचा गंडूष (चूळ) वापरावा लागेल.

आश्रयी दोषांची चिकित्सा : रक्ताचा पित्त,अस्थीचा वात व इतर धातूंचा कफ आश्रयी दोष असतो. त्या दोषांची वृद्धी किंवा क्षय झाला तर क्रमाने आश्रयधातूंचा क्षय किंवा वृद्धी करणारी औषधे व अन्न द्यावे. एकाची वृद्धी किंवा क्षय करणारे क्रमाने तदाश्रयी कफाची वृद्धी किंवा क्षय करतात. अपवाद : हा नियम अस्थी व तदाश्रयी वायू यांना लागू होत नाही. अस्थीची वृद्धी करणारे औषध तदाश्रयी वाताचा क्षय व क्षय करणारे औषध वाताची वृद्धी करते. तेव्हा अस्थ्याश्रयी वायूची वृद्धी झाली तर अस्थिक्षयकर व त्याचा क्षय झाला तर अस्थिवृद्धी करणारी औषधे द्यावीत.

अनुबंध्यानुबंधी दोष-चिकित्सा : रोगकर दोषांना दुसरा दोष अनुबंधी म्हणजे सहकारी असतो. खोकल्यात पुष्कळ वेळा असा दोष आढळतो. तेव्हा अनुबंधी दोषाची चिकित्सा प्रथम करावी लागते. कफ व कास यांमध्ये पित्ताचा अनुबंध म्हणजे सहकार असला तर पित्तकासक्रिया म्हणजे पित्तदोषाची चिकित्सा व वातकासात कफाचा अनुबंध असला तर कफहर-उपचार करावे लागतात.

दूष्यांनुसार चिकित्सा : चिकित्सा करताना रसादी दूष्यांचा विचार करावा लागतो. रसादी दूष्यांमध्ये विकार होणे म्हणजे दोषदुष्टीमुळेच ते विकार होणे असे असले तरी त्या त्या दूष्यांच्या स्थानरचनेनुसार काही खास चिकित्सा करावी लागते. रसधातुदुष्टी असेल त्या वेळी लंघन, तापलेले पाणी, लघू-रूक्ष पदार्थांचे सेवन, दीपन-पाचन द्रव्याचे सेवन, कोरड्या प्रदेशात राहणे, अग्‍नी सुधारणे इ. उपचार करावे लागतात. रक्तधातुदुष्टी असेल त्या वेळी विरेचन, लंघन व जरूरीप्रमाणे बलदोष जाणून रक्तस्त्रुती हे उपचार करावे. दोषानुबंधानुसार, रक्तपित्तविकारात सांगितल्याप्रमाणे, शमनोपचार करावेत. मांसदुष्टी असेल त्या वेळी शस्त्रकर्म व अग्निक्षारकर्म हे उपचार मांस वाढलेल्या अर्श, अर्बुद, ग्रंथी, गंडमाळ इ. विकारांवर करणे जरूर आहे. उदा., अर्शविकारात म्हणजे मूळव्याधीत स्रावी अर्शावर क्षारकर्म, शुष्कार्शावर अग्निकर्म अगर क्षारकर्म व मोठे अर्श आणि बलवान रोगी असेल तर शस्रकर्म करून मांसार्श काढून टाकावेत. मांसधातू क्षीण असेल त्या वेळी मांसवर्धक तत्सम गुणांचा आहार अगर साक्षात सात्म्य असलेल्या मांसाहाराचा उपयोग करावा. मेदोदुष्टी असेल त्या वेळी स्थौल्यविकारांची चिकित्सा करावी. थोडक्यात, कफमेदोघ्न असा आहारविहार व औषधांची चिकित्सा करावी. रूक्षोष्णलघु अशी द्रव्ये व विहार यांचा प्राय: उपयोग करावा. याच्या उलट, अतिकृश म्हणजे मेदक्षीणता असेल त्या वेळी पुष्टिकारक बृंहण-चिकित्सा करावी लागते. अस्थिधातूची दुष्टी असेल त्या वेळी तित्करसांचे वा क्षीरघृतांचे बस्ती द्यावेत. मज्‍जशुकोद्रव धातूंच्या दुष्टीवर मधुर, तित्क व शुक्रल रसांची आहारद्रव्ये देऊन या धातूंची क्षीणता घालवावी. या धातूंची वृद्धी असेल तर व्यवायश्रम, चिंता रूक्षोष्ण, तिक्त, कडू अशा द्रव्यांचे सेवन करावे. धातूमध्ये ज्या वेळी दोष मिसळून विकार होईल त्या वेळी त्या त्या धातूचीच चिकित्सा करावी.

मलानुसार चिकित्सा : पुरीष मलाची वृद्धी असेल तर अतिसार, प्रवाहिक या विकारांनुसार चिकित्सा करावी. पुरीष क्षीण असताना पुरीषवर्धक अशा मेष, बोकड इ. प्राण्यांच्या कोठ्यातले मांस, उडीद, सातू इ. द्रव्याचा आहार द्यावा. वातशूलामध्ये पुरीषाशयात मलसंचय असेल, तर पुरीष-शोधन झाल्याशिवाय वात-शमन करणाऱ्या औषधांचा उपयोग होत नाही. मूत्रवृद्धी असेल तर त्या वेळी प्रमेह विकाराची तसेच मूत्रक्षय असेल तर त्या वेळी त्या त्या लक्षणांनुसार मूत्रकृच्छ्र विकाराची चिकित्सा करावी. मूत्राची उत्पत्ती कमी झाली असता शोथ निर्माण होतो. अशा वेळी दोषांवरच्या सामान्य चिकित्सेपेक्षा मूत्रोत्पत्ती न होण्याची कारणे शोधून त्याप्रमाणे चिकित्सा करावी लागते. स्वेदाची दुष्टी असेल तर व्यायाम, अभ्यंग, शेकणे, मद्यपान इत्यादींचा उपयोग करावा. चिकित्सेच्या विचाराच्या वेळी दुष्यांमध्ये बिघडलेल्या दोषांनी कोणते विकार झाले, हे समजणे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट ध्यानात येताच चिकित्सेत फरक होतो म्हणून दोषांबरोबर दुष्यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

स्रोतसांनुसार चिकित्सा : स्रोतसांच्या दुष्टीच्या अनुसार चिकित्सा करावी लागते ती याप्रमाणे : प्राणवहस्रोतोदुष्टीवर श्वासविकाराची चिकित्सा उदकवहस्रोतोदुष्टीवर तृष्णोपशमन अन्नवहस्रोतोदुष्टीवर आमप्रददोषघ्नी रसादिस्रोतोदुष्टीवर त्या त्या धातूची, तसेच मूत्रवह, पुरीषवह व स्वेदवह स्रोतसांवर क्रमाने मूत्रकृच्छ्र, अतिसार व ज्वरविकार यांची चिकित्सा करावी.

बलानुसार चिकित्सा : बल हे रोग्याच्या व दोषाच्या असे दोन्ही तऱ्हांनी लक्षात द्यावे. रोग्याचे बल त्याचा व्यवसाय व हालचाली यांवरून व दोषाचे बल दोषांच्या लक्षणांवरून समजते. रोग्यास तीव्र औषध द्यावयाचे तर ते सहन करण्यास रोगी समर्थ आहे अगर नाही हे समजून घेऊन चिकित्सा करावी. अन्यथा क्षीण रोग्याला अल्पदोषदुष्टीच्या विकारात तीव्र औषध दिल्याने रोगी दगावेल. याउलट, बलवान रोग्याला भरपूर दोषदुष्टीच्या विकारावर अल्पसे औषध दिल्याने दोष केवळ चाळविले जाऊन इतर विकार निर्माण होतील.

कालानुसार चिकित्सा : ऋतूंप्रमाणे शीत, उष्ण व वर्षा असे काल चिकित्सा करताना लक्षात घ्यावे लागतात. त्या त्या देशानुसार या कालामध्ये थोडा फरक पडतो. परंतु सभोवती सृष्टीच्या वातावरणातील गुणांचा विचार करून त्या त्या काली चिकित्सा करावी लागते. उन्हाळ्यात विरेचनद्रव्याची कमी मात्रा पुरते. तीक्ष्णोष्ण द्रव्ये शीत ऋतूत चालतात. शोधनोपचार अतिशीत किंवा उष्ण ऋतूत न करता साधारण काळीच करावे वा उग्र ऋतुकाली साधारण कालाचे वातावरण निर्माण करून चिकित्सा करावी. याशिवाय सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे दिवसाचे व तसेच रात्रीचे विभाग पाडून त्या त्या दोषोत्कटतेनुसार चिकित्सा करावी.

याप्रमाणेच व्याध्यवस्थेचा काल (साम,पच्यमान,निराम,नवीन वा जीर्ण विकार इ.) लक्षात घेऊनही चिकित्सा वेगवेगळी करावी लागते.

अग्न्यनुसार चिकित्सा : सर्वच विकार अग्नीमांद्यामुळे होतात. प्रत्येक विकाराची चिकित्सा करणे म्हणजे अग्नी प्राकृत करण्याची चिकित्सा होय. यावरूनच कायचिकित्सा हा विभाग निर्माण झाला. अग्नि हा प्राय: प्रकृतिस्थ दोषांनी अगर दुष्ट अशा वातादी दोषांनी क्रमाने विषम, तीक्ष्ण व मंद होतो. परंतु कधकधी अग्नीचे वैषम्य स्वतंत्र असते. म्हणून विषम, तीक्ष्ण व मंद अग्निवर क्रमाने वात–पित्त–कफ या दोषांची चिकित्सा करूनही खास अग्निची चिकित्सा करावी लागते. दीपनद्रव्येही प्राय: अग्नि वाढणारी असून अग्निमांद्यावर द्यावयाची असतात. अशा द्रव्यांच्या योगाने आहार-रसाचे तसेच धातूचेही योग्य ते पचन होऊन शरीराच्या पोषणास मदत होऊन शरीर निरोगी होते.


प्रकृत्यनुसार चिकित्सा : शुक्रशोणितसंयोगाच्या वेळी असणाऱ्या दोषोत्कटतेनुसार मनुष्याची मूळ प्रकृती बनते. शास्त्रकारांनी प्रकृती सात प्रकारच्या वर्णन केल्या आहेत. त्यांची लक्षणे लक्षात घेऊन रोग्याची मूळ प्रकृती कोणती हे समजून घेऊन त्यानुसार चिकित्सा करावी लागते. औषधाची मात्रा तसेच योग्य औषधाची निवड प्रकृत्यनुरूप ठरवावी लागते. उष्णतीक्ष्णरुक्ष गुणांचे औषध कफप्रकृत्तीच्या मनुष्यास योग्य ठरेल तर पित्तप्रकृतीच्या मनुष्यास त्रासदायक होईल. लंघन, शोधन, पंचकर्मोपचार, व्यायाम हे उपचार कफप्रकृतीच्या माणसास उपकारक तर वातप्रकृतीच्या माणसास विकारकारी ठरतील.

रोग्याच्या प्रकृतीशिवाय रोगाच्या प्रकृतीचाही विचार करावा लागतो. रोग्याची व रोगाची प्रकृती एकच असेल म्हणजे वातप्रकृतीचे मनुष्यास वातव्याधी होणे हे अधिक त्रासाचे असून उत्कट वाताघ्न अशी चिकित्सा करणे जरूर आहे. याउलट वातप्रकृतीच्या मनुष्यास कफज व्याधी होणे हे त्या मनुष्याला पहिल्याएवढे त्रासाचे होणार नाही. त्याला चिकित्साही अल्प कफघ्न व वाताला अविरोधी अशी करणे जरूर आहे. विकारांमध्ये त्या त्या विकारांची आत्मप्रकृती लक्षात घेऊनच सर्व चिकित्सा करावी लागते. ज्वर विकारांत पित्तप्राधान्य व मेह विकारांत कफप्राधान्य अशा रोगप्रकृतींना ध्यानात घेऊनच प्राय: सर्व चिकित्सा करावी लागते.

मानसप्रकृत्यनुसार चिकित्सा : मनाच्या सात्विक ७, राजस ६ व तामस ३ प्रकृती आहेत, त्यांची चिकित्सा करून मानसगुण सम करून मानस समप्रकृती करणे आवश्यक असते. शारीर प्रकृतिदोषाच्या गुणकर्माच्या विपरीत गुणकर्माची चिकित्सा करावी लागते पण मानसिक प्रकृतिदोषाच्या गुणकर्माच्या समानगुणकर्माची चिकित्सा करावी लागते. ब्रह्यकाय व्यक्तीला गुरूपूजन अभ्यास आवडतो, वारूणकाय व्यक्तीला शीतसेवा आवडते, तर तेच त्यांना करायला लावावे म्हणजे त्यांना जे आवडते ते, जे अनुरूप ते करवावे.

वयानुसार चिकित्सा : जन्मापासून १६ वर्षांपर्यंत बाल, पुढे साठ मध्य व पुढे वृद्ध अशा वयाच्या मर्य़ादा आहेत. कालमानावरून म्हणजे वर्षांवरून वय ठरवितात तसेच त्या त्या वयात होणाऱ्या लक्षणांवरूनही वयाची अवस्था ठरवावी व त्याप्रमाणे चिकित्सेत त्याचा विचार करावा. बालवयात तीक्ष्णोष्ण औषध सोसत नाहीत औषधमात्रा अल्प असते बालवयात कफप्रधान शरीर असते. स्वभाव हट्टी असतो. मध्यमवयात औषधे सोसण्यासारखे शरीरबल असते पित्तप्रधान शरीर असते. वृद्धावस्थेत शरीराचे धातू क्षीणबल असतात, वातप्रधान शरीर असते. अशा तऱ्हेचा विचार करून चिकित्सा करावी लागते. विशेषत: शोधनोपचार, औषधमात्रा, तीक्ष्णोष्ण औषधे, रसायनचिकित्सा यांच्या बाबतीत वयाचा विचार करावा लागतो.

सवयीनुसार चिकित्सा : रोग्याच्या सवयी, त्याचे खाणे, पिणे, व्यवसाय, व्यसने, आवडनिवड इत्यादींचा विचार चिकित्सेत करावा लागतो. निरनिराळ्या देशांत, निरनिराळ्या जातींत, निरनिराळ्या वयांत, निरनिराळे पदार्थ खाण्याची सवय अगर इतर सवयी लोकांना असतात. कोणाला तीक्ष्ण औषधांचा स्पर्शही नकोसा वाटतो, तर कोणाला विशिष्ट औषधाचा विशिष्ठ गंध किंवा दर्शनही सहन होत नाही. कोणाला एरंडेलासारख्या औषधी द्रव्याच्या आठवणीनेही ओकाऱ्या होतात. कोणाला जागरणाची सवय असते, तर कोणाला थोडेसेही जागरण सोसत नाही. अशा अनेक सवयी लक्षात घेऊन चिकित्सा करावी लागते.

 चिकित्सा-प्रकार : शुद्ध-अशुद्ध-चिकित्सा : वाग्भटाचार्योनी चिकित्साप्रयोग हे दोन प्रकारचे वर्णिले आहेत : एक शुद्ध प्रयोग  की ज्याच्या योगाने रोग्याचा रोग नाहीसा होतो व अशा चिकित्सा प्रयोगाने दुसरा रोग उत्पन्न होत नाही याच्या विपरीत दुसरा अशुद्ध प्रयोग, की ज्याच्या योगाने पहिला रोग गेला तरी त्या चिकित्साप्रयोगाने पुन्हा दुसरा विकार उत्पन्न होतो. जसे शोधनप्रयोगाची मर्यादा लक्षात घेतली नाही तर दोषनिर्हरण होऊन मूळ विकार गेला तरी शोधनातियोगाने पुढे वातविकार अगर धातुक्षयादीसारखे विकार होतात किंवा कफघ्न म्हणून मिरेपिंपळीचे चाटण दिले तर विशिष्ट मर्यादेपलीकडे तीच मिरेपिंपळी दाहादी विकार निर्माण करील.

शोधनशमनचिकित्सा : बाह्य सृष्टीतील भावांचा शरीरावर जितक्या प्रकारांनी परिणाम होत असेल तितके प्रकार साधारणत: चिकित्सेचे होतात व ते तितके अनेक प्रकारांनी वर्णन करता येतील. शास्त्रकारांनी शरीरावर होणारे परिणाम तीन प्रकारांनी वर्णिले आहेत. काही द्रव्ये शरीरातील दोषधातुमलांची दुष्टी करतात, काही द्रव्ये दोषदींना शांत करतात व काही शरीराचे स्वास्थ्य राखतात. या द्रव्यांना अनुक्रमे ‘कोपनकर’, ‘शमनकर’, व स्वस्थहितकर, असे म्हणतात. यांपैकी स्वस्थहितकर द्रव्ये ही विकारांच्या चिकित्सेला विशेषत: रसायन म्हणून उपयुक्त होतात. कोपनांनी दोष वाढतात व शामक द्रव्यांनी दोष शमन पावतात.

शरीरात जास्त झालेले दोष, धातू व मल यांना शरीराबाहेर काढून टाकणे यास ‘शोधन’ म्हणतात. ज्या वेळी विकार होतो त्या वेळी बिघडलेले दोषादी हे शरीरातून, काही अपवाद सोडले तर, आपणहून निघून जात नाहीत. किंबहुना योग्य प्रमाणात ते शरीराबाहेर न गेल्यानेही विकार होतात. हे बिघडलेले दोषादी शरीराबाहेर जाण्याची प्रमुख कारणे म्हणजे (१) मलांना शरीराबाहेर फेकणारा वायू दुष्ट दोषांनी विकृत होतो (२) मल जाण्याचे मार्ग बिघडणे किंवा मलायनामध्ये काही हरकत येणे (३) दुष्ट झालेले दोष, धातू, मल हे न बिघडलेल्या दोषादिकांपासून एकदम वेगळे होऊ शकत नाहीत किंवा त्या त्या जागी लीन होऊन बसतात व त्यामुळे त्यांना शरीराबाहेर फेकण्यास वायूही असमर्थ बनतो. अशा वेळी दुष्ट दोषादीना शरीराबाहेर काढण्यासाठी शोधनोपचाराची मदत द्यावी लागते.

शोधनचिकित्सेने दुष्ट झालेले दोष शरीरातून बाहेर निघून जात असतात. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रकुपित होण्यास व विकार करण्यास वावच मिळत नाही . म्हणून शोधनचिकित्सा ही उत्तम चिकित्सा मानली आहे.

या शोधनाचे प्रकार म्हणजे शरीरातून दोषादी बाहेर काढण्याचे प्रकार अनेक म्हणजे जितकी शरीरछिद्रे तितके मानता येतील, परंतु प्रमुखपणे तीन किंवा चार मानता येतील . ती म्हणजे तोंड, नाक व गुदव्दार आणि रक्त वाहणारी स्त्रोतसे. या मार्गानुसार वमन, नस्य, विरेचन, बस्ती व रक्तस्त्रुती असे शोधनाचे पाच प्रकार मुख्यत: होतात. काहींच्या मताने गुदद्वाराने वात सरणे व विरेचन अशा दोन क्रिया होतात म्हणून या शोधनात पुन: अनुवासन व निरूह असे दोन प्रकार मानले आहेत. या सर्व शोधनोपक्रमांना, म्हणजे रक्तस्त्रुती हे शोधन वगळून, वमन, विरेचन, नस्य व बस्तीचे निरूह व अनुवासन, या प्रकारांना ‘पंचकर्म’, नाव दिले आहे.

मूत्रमार्गाने दोष निघून जाणे व घामाच्या मार्गाने दोष निघून जाणे हेही प्रकार वास्तविक शोधनात असावयास पाहिजे होते. कारण याही उपचारांनी दोष शरीराबाहेर जाऊन विकारोपशमन होत असल्याची चिकित्सेत उदाहरणे आहेत. यांशिवाय गंडुष, धुम्रपान, अंजन, लेयन इ. सौम्य स्वरूपाची शोधनकर्मे आहेत.

आयुर्वेदीय चिकित्सेत ऊरुस्तंभासारख्या विकाराचा अपवाद सोडल्यास प्रत्येक विकारावर, तो शोधनसाध्य असताना, वरील पंचकर्मांपैकी कोणता ना कोणता एक वा अधिक उपक्रम त्या त्या विकारातील दोषांच्या स्थानांचा व त्या दोषांचा विचार करून करण्यासंबंधी सांगितले आहे. इतके शोधनाला चिकित्सेत महत्त्व आहे.


शमनचिकित्सा : शमनचिकित्सा हा दुसरा एक चिकित्साप्रकार आहे. या चिकित्साप्रकारात शोधनोपक्रमांप्रमाणे शरीरातून प्रभूत प्रमाणात दोष बाहेर निघुन जात नाहीत. शरीरात जी दोषांची अव्यवस्था असते ती नाहीशी होऊन ते दोष आपापल्या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणात राहतात. तसेच साम्यावस्थेत असलेले दोषही प्रकुपित न होता आपल्या योग्याशा साम्यावस्थेत राहतात.

शमनचिकित्सेचे एकूण सात प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे (१) पाचन, (२) दीपन, (३) उपवास,          (४) पाणी न पिणे, (५) व्यायाम,(६) उन्हाचे सेवन, (७) वायूचे सेवन हे होत

या शमनप्रकारांचा बारकाईने विचार केल्यास दीपन व पाचन हे दोन प्रकार सोडल्यास उरलेले उपवासादी पाच प्रकार हे अद्रव्यभूत आहेत.येथे ‘द्रव्य’, याचा अर्थ सुंठ, गुळवेल इ. चिकित्सेत वापरतो ती औषधी द्रव्ये . म्हणजे द्रव्यरूप चिकित्सा ही दीपन व पाचन या दोनच प्रकारची आहे. शास्त्रकारांनी रोगचिकित्सा प्रकरणात शमनौषधे लिहीताना नेहमीच ते दीपन आहे की पाचन आहे हे लिहिलेले नाही परंतु योग्य चिकित्सा होण्यासाठी हा विचार करणे आवश्यक आहे.

बारकाईने पाहाता ‘पाचन’, या शमनौषधप्रकाराचा रोगघ्नतेसाठी जितका उपयोग होतो तितका ‘दीपन’, प्रकाराचा होत नाही. प्रभूत दोषांसाठी शोधन व मध्यम दोषांसाठी लंघन व पाचन यांचा उपयोग होतो. चरकाचार्योनी दीपन या प्रकाराचा उल्लेख केलेला नाही सहाच प्रकार दिलेले आहेत. शोधन-पाचनादी चिकित्सा करून रोग नाहीसा झाल्यावर शरीर-वर्धक चिकित्सा सांगितली जाते त्या वेळी दीपन औषधांचाही उपयोग करावा. म्हणजे या वेळी मुख्य पाचकाग्‍नी व त्यावर अवलंबून असणारे घात्वग्‍नीही प्रदीप्त होतात. म्हणून रोग गेल्यावर वरीलप्रमाणे अग्निदीप्ती व शरीरपुष्टी ही कार्य केली पाहिजेत. काही वेळा अग्‍नी प्रदीप्त न होता रोगनिवृत्तीनंतर शक्तिवर्धक अशा काही तात्पुरत्या औषधांनी पुष्टी येते व त्यामुळे दुसरेही रोग होतात. म्हणून शास्त्रकारांनी दीपन-पाचानात्मक चिकित्सा पौष्टिक औषधांबरोबर सांगितली आहे. ज्वरात दोषपाचनासाठी उपास व गुळवेलीसारखी दोषचनात्मक द्रव्ये देऊन ज्वर गेला म्हणजे नंतर वर्धमान पिपंळी, सुवर्णमालिनीवसंत, लोहभस्म वगैरे दीपन व पौष्टीक योग द्यावयाचे असतात. ग्रहणीविकारात चित्रकमूळ हे पाचन-दीपनात्मक अशा उपयोगाचे असेल तरी दोन्ही कार्यासाठी एकाच पद्धतीने वापरता येणार नाही. याच विकारात पर्पटीचे योग दिले आहेत. ते आमदोषाच्या पचनानंतर प्राय: द्यावयाचे आहेत. कारण हे दीपनात्मक औषध आहे. त्याच्याबरोबर दुधाचे पथ्य हे पौष्टिकतेसाठी सांगितले आहे.

उपवास (शमन प्रकार) : उपवास हा शमनचिकित्सेचा एक प्रकार. काही मर्यादेपर्यंत उपवास करून शमन करता येते. अर्थात उपवास करणे याचा अर्थ संपूर्ण अन्नपाणी वर्ज्य करणे असा नसून, दोषदुष्टी परत्वे अगर रोगपरत्वे अनेक प्रकार उपवासाचे होऊ शकतात उदा., सबंध दिवसात एकदाच अन्न घेणे, घट्ट व जड अन्न वर्ज्य करूणे, अन्नच वर्ज्य करून राहणे वा अन्न न घेता केवळ गरम पाणी पिणे इत्यादी.

प्राय : दोष आमयुक्त असताना, अल्पदुष्टी असताना, उपास हा उपाय आहे. दोष पक्व झाले की उपवास थांबवावे लागतात. नाहीतर पुढे लंघनाने शरीरस्थ धातुनाश होऊन बलनाश होतो. विशेषत: दुर्बलाने उपास करू नये. उपासाचे थोडेसे तरी सात्म्य असावे. दोषांची सामनिराम लक्षणे ओळखून त्याच्या मर्यादेपर्यंतच उपास करावा. प्रत्येक विकारात विकाराच्या कोणत्या अवस्थेपर्यंतच उपास करावा वा उपास मुळीच करू नये हे सांगितलेले असते. सामान्यपणे ‘बलं यत्‍नेन पालयेत्’, म्हणजे बलरक्षण करणे हे सूत्र ध्यानात ठेवून उपवासोपक्रम करावा.

अन्नाच्या उपासाप्रमाणेच पाण्याचा उपवास हाही एक शमनोपचारच आहे. अन्नाचे दुरुपयोगाने जसे विकार होतात तसेच पाण्याच्या दुरुपयोगानेही होतात म्हणून पाण्याचा उपयोग कोणी करावा, अगर न करावा, याबद्दल चिकित्सेत विचार असतो. जलोदरासारख्या विकारात पाणी मुळीच प्यावयाचे नसते, हे प्रसिद्ध आहे. अग्निमांद्य, गुल्मरोग, पांडूरोग, उदर, अतिसार, अर्श, ग्रहणी, शोथ इ. विकार असलेल्या लोकांनी पाणी पिऊ नये. ज्यांना तृष्णानिग्रह करता येत नाही त्यांनी अगदी थोडे पाणी प्यावे. तसेच निरोगी लोकांनीही शरद ऋतू व ग्रीष्म ऋतू सोडून इतर ऋतूंत थोडे पाणी प्यावे. काही विकारांत तृष्णानिग्रह ही चिकित्सा करणे अवश्य आहे. शूल विकारात किंवा अम्‍लपित्तासारख्या जलांश अधिक असलेल्या विकारात पाणी पिणे किंवा अल्पसे व भोजनानंतर काही कालाने पाणी पिणे फायदेशीर ठरते. कारण पाणी पिण्याने अग्‍नी अधिकच मंद होतो व त्यामुळे शूलादी विकार वाढतो. कफविशिष्ट कुष्ठ व मेह विकारातही जलपान निषिद्ध आहे. उलट रुक्षान्नसेवन हितकारक ठरते. जलोदरात पाण्याचा उपयोग अंघोळीसाठी व पिण्यासाठी कटाक्षाने टाळावा असे सांगितले आहे. श्वास, कास, प्रतिश्याय (पडसे) इ. कफप्रधान विकारातही पाणी न पिता मूग, कुळीथ इ. कढणे घेण्यास सांगितली आहेत.

व्यायाम चिकित्सा = शमनप्रकार : आयुर्वेदात व्यायामाने रोगहरण कसे होते ते सांगितले आहे. शरीरश्रमरूप कर्मास ‘व्यायाम’, म्हणतात. निरनिराळ्या प्रकारचे, शरीराला आयास निर्माण करणारे व्यायाम आहेत. त्यामुळे त्या भागातील स्‍नायू लवचिक होतात. कफमेदात्मक धातू कमी होतात. रसरक्तादी धातुप्रवाहही जलद होऊ लागतो. त्यामुळे दोषसंचयही दुर होऊन स्त्रोतोरोध जातो व परिणामी विकारोपशय होण्यास मदत होते.

याप्रमाणे काही मर्यादेपर्यत शमनसाध्य विकारांत रोगी बलवान व रोग अल्पबल असताना निरनिराळया व्यायाम चिकित्सेचा उपयोग होतो. योगासनांचे व्यायाम असेच म्हणता येतील. अग्निमांद्य, अजीर्ण, मूळव्याध, मेह, श्वास, संग्रहणी, मेदोरोग, ऊरुस्तंभ, प्रतिश्याय इ. आहारजन्य व्याधीवर योग्य अशा व्यायाम चिकित्सेचा फायदा होतो. व्यायामाने शरीर दृढ होते व आरोग्यही लाभते. तेव्हा व्यायाम चिकित्सेचा विचार करताना आरोग्याचा कोणता व रोगपरिहारासाठी कोणता, हा मर्यादेचा विवेक करणे जरूर आहे. अती व्यायाम झाल्यास कास, ज्वर, ओकारी, क्षतक्षय, रक्तपित्तादी विकार होतात, हे ध्यानात द्यावे लागते.

आतपसेवन : शमनचिकित्सेचा सहावा प्रकार म्हणजे आतपसेवन म्हणजेच सूर्यप्रकाशकिरण सेवन करणे हा होय. हृद्रोग, कुष्ठ, क्षय, काही विषे इ. विकारांत आतपसेवन करावयास सांगितले आहे. हल्ली गाठ, अर्बुद, फक्क, शोथ इ. विकारांत विशिष्ट विजेचे किरण पाडून उपचार करतात ते सदरातच येतील. रोगी बलवान व रोग अल्पबल असताना हे उपचार करावेत.

वायुसेवन : शमनचिकित्सेच्या सातव्या व शेवटच्या प्रकारचे दोन भाग पडतात. एक शरीरातील वायूचा निग्रह करून त्या वायूच्या हालचालीनी शरीरातील दोषोपशम करणे व दुसरा बाह्य सृष्टीतील वायूचा शरीरावर परिणाम करून शरीरस्थ दोषांचे शमन करणे.

पहिल्या प्रकारच्या चिकित्सेसाठी वायूचा परिणामकारक उपयोग घेण्यास रोग्याला विशेष अभ्यास करण्याची जरूरी आहे. अशा प्रकारे वायूच्या निग्रहाने बाह्य मार्गातील दोष कोठ्यात आणता येतात व मग बस्ती वगैरे उपायांनी म्हणजेच उपचारांनी शरीराबाहेर घालविणे शक्य होते. श्वासचिकित्सेत प्राणायाम इ. वायुनिग्रहाच्या क्रिया उपयुक्त होतो.

बाह्यसृष्टीतील वायूसेवनाचाही रोगशमनासाठी उपयोग होतो. सृष्टीतील वायू हा सभोवती असणाऱ्या वनस्पती, जलाशय, पर्वत इत्यादिकांचे गुण घेऊन राहतो. त्यानुसार त्या त्या देशातील वायूचे गुणधर्म बदलतात व त्या त्या गुणकर्मानुसार निरनिराळ्या विकारांत त्याचा फायदा होतो. हवा बदल करण्यास सांगणे ही एक त्या प्रकारची चिकित्सा आहे. क्षयाच्या रोग्यांना किवां श्वासाच्या रोग्यांना एकाच ठिकाणची हवा फायदेशीर होत नाही. त्याचे विकार-स्वरूप व हवेचे स्वरूप लक्षात घेउन चिकीस्ता करावी लागते.


 द्विविधोपक्रम व षड‍‍विधोक्रम : वाग्भटाचार्यांनी कोणतीही चिकीत्सा ही दोनच प्रकारात मोडते असे वर्णिले आहे. चिकित्सा कार्यावरून व करण्याच्या जरी अनेक प्रकारानी तिचे वर्णन करता आले तरी प्रत्येक चिकित्सा ही संतर्पणात्मक (बृंहण किंवा पोषण) किंवा अपतर्पणात्मक (कर्षण) अशा तऱ्हेची असते. चिकित्सेची मूलद्रव्ये जी महाभूते आहेत तीच मुळी दोनच प्रकारची असल्याने चिकित्साही दोनच प्रकारची होते. आप व पृथ्वी ही महाभूते संतर्पणात्मक व आकाश वायू व अग्नी ही अपतर्पणात्मक महाभूते आहेत. या महाभूतांच्या कार्यांनुसार ते ते द्रव्य संतर्पणात्मक वा अपतर्पणात्मक कार्य करते. चरकाचार्यांनी षड़विधोपक्रम वर्णिला आहे व तो म्हणजे लंघन–बृंहन–रुक्षण–स्नेहन–स्वेदन–स्तंभन असा आहे. अर्थात हे सहा उपक्रम वरील दोन उपक्रमांत समाविष्ट होऊ शकतात, परंतु प्रामुख्याने या स्वरूपाची कार्ये चिकित्सेत नेहमी करावी लागतात म्हणून असे उपक्रम वर्णिले आहेत.

द्रव्यकार्यानुसार चिकित्सा : यांशिवाय चरकाचार्यांनी सु. पन्नास प्रकारांनी द्रव्यांच्या कार्यानुसार चिकित्सा करण्यास सांगितले आहे. ते म्हणजे जीवनीय–बृंहणीय–लेखनीय–भेदनीय–संधानीय–दीपनीय–बल्य– वर्ण्य–कंठ्य–हृद्य–तृप्तिघ्न–अर्शोघ्न–कंडूघ्न–कृमिघ्न–विषघ्न इ. होत. या प्रत्येक प्रकारचे कार्य करणारी १०–१० उहरणात्मक द्रव्ये दिली आहेत. ही सर्व वर्णने करूनही ही ५०० उदाहरणे ‘नातिसंक्षेपविस्तरम्’ स्वरूपाची व दिशा म्हणून सांगितली आहेत असे म्हटले आहे. यावरून चिकित्सकाने आपल्या क‌ल्पनेनुसार अधिक विचार करून भेदांनुसार चिकित्सा करावी, असे सुचविले आहे.

शार्ङ्गधर संहितेत दीपन–पाचन–शमन–अनुलोमन–स्रंसन–भेदन–रेचन–वमन–संशोधन–ग्राही– स्तंभन

–छेदन–लेखन–वाजीकर–शुक्रल–रसायन–व्यवायी–विकाशी–मदकारी–योगवाही–प्रमाथि–अभिष्यंदी अशा सु. बावीस प्रकारचे सार्थ व सोदाहरण वर्णन केले आहे. यांमध्ये चिकित्सेतील सूक्ष्म फरक स्पष्ट केले असून त्यामुळे चिकित्सा अधिक नेमकी व यशस्वी होते. उदा., स्रंसन–भेदन–रेचन–अनुलोमन यांचा अवस्थानुरूप कसा उपयोग करावा हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ग्राही व स्तंभन यांचेही भेद नेमकेपणाने स्पष्ट केले आहेत. म्हणून चिकित्सा करताना या कार्यांचा विचार करणे चिकित्सेत महत्त्वाचे आहे.

दैवव्यपाश्रय, युक्तिव्यपाश्रय व सत्वावजय या तीन प्रकारांनी ही पुन: चिकित्सा वर्णिली आहे (चरक सू. ११). दैवव्यपाश्रयी चिकित्सा म्हणजे दैवाने होणाऱ्या व्याधीना प्रतिकूल होणारे किंवा ते व्यापी नाहीसे करणारे उपचार. ते म्हणजे मंत्र-औषधी धारण करणे (जसे वेखंड, लसूण,कवड्या इ.), मणी (पोवळे, मोती, सोने इ.), मंगल, बली, उपहार, होम, नियमव्रतपालन, प्रायश्चित्त, उपवास, स्वस्तिवाचन, प्रणिपात, तीर्थगमन इ.उपचार होत. युक्तिव्यपाश्रय चिकित्सा म्हणजे शरीराला होणाऱ्या व्याधींवर आहार-औषधादी द्रव्यांचा युक्तीने म्हणजे शरीरस्थ दोषधातुमूलांचा व इतर बल, काल, अग्नी, प्रकृती, वय, सात्म्य हेतू, सत्त्वाहार इ. गोष्टींचा विचार करून वापर करणे व व्याध्युपशम करणे. सत्त्वावजय चिकित्सा म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण ठेवून अहितकारक अशा काल, अर्थ व कर्म यांचा शरीराशी संयोग घडू न देणे. यायोगे शरीरात विकारनिर्मिती होऊ शकत नाही. पूर्वापराधज व दृष्टापचारज असे एकत्र होणारे संकरज व्याधी झाले म्हणजे त्यांवर दैव व युक्तिव्यपाश्रय अशी मिश्र चिकित्सा करावी.

अंत:परिमार्जनादी तीन चिकित्सा : अंत:परिमार्जनात्मक चिकित्सा म्हणजे ज्या उपचारांत चिकित्साद्रव्य शरीराच्या आत कोष्ठमार्गाने शिरून व्याधीला मारक ठरून व्याध्युपशम करते ते उपचार. बहि:परिमार्जनात्मक चिकित्सा म्हणजे ज्या उपचारांत चिकित्साद्रव्य शरीराचे त्वगादी बाह्यभागावर कार्य करून विकारोपशम करते ते बहि:परिमार्जनात्मक उपचार. हे उपचार म्हणजे अभ्यंग, स्वेद, प्रदेह, परिषेक, उन्मर्दन इ. होत. शस्त्रप्रणिधानात्मक उपचार म्हणजे शरीरातील व्याधी निर्माण करणाऱ्या दोषांना शस्त्रांच्या मदतीने छेदन, भेदन, व्यधन, आहरण, लेकन, उत्पाटन इ. क्रियांनी शरीराबाहेर काढून विकारोपशम करणारे उपचार होत. यांमध्ये जलौका (जळू), अलावू , श्रृंग (तुंबडी) इ. उपचारही येतात.

हेतु–व्याधि–उभयविपरित तदर्थकारी चिकित्सा : चिकित्सेचा विचार आणखी काही दृष्टिकोनांतून केला जातो. हेतुविपरीत–व्याधिविपरीत उभयविपरीत व तदर्थकारी अशा प्रकारे चिकित्सा केली जाते.

हेतुविपरित म्हणजे रोगकारण असेल त्याच्या विपरीत म्हणजे उलट गुणांचे उपचार करणे. रोगहेतुदोष जो असेल व तो बिघडण्याचे जे कारण असेल त्याच्या गुणांच्या उलट गुणांचे औषध, अन्न अगर विहार यांच्या उपचाराने विकारोपशयम होतो. उदा., शीतकफज्वरावर त्याच्या उलट गुणांची म्हणजे उष्ण गुणांची औषधे देणे, श्रमामुळे येणाऱ्या रुक्ष-वातिकज्वरावर स्निग्ध रसाचे भोजन किंवा दिवसा झोपण्याने होणाऱ्या कफाधिक्यावर त्याउलट रात्री जागणे, ही हेतुविपरीत उपचाराची उदाहरणे आहेत. व्याधिविपरीत चिकित्सा करताना दोषाचा विचार करावा लागत नाही. कोणत्याही दोषाच्या कारणामुळे विकार असला तरी व्याधिविपरीत औषधोपचारांनी तो विकार बरा होतो. ज्वरावर नागरमोथा, तहानवेर माठातील पाणी, पांडुरोगावर पिंपळी इ. उदाहरणे व्याधिहर औषधांची आहेत. जे व्याधिहर असते ते औषध त्या व्याधिचा दोष घालविणारे असतेच. परंतु जे दोषहर असते ते अवश्यमेव तो व्याधी घालवीलच असे नाही. वास्तविक दोष हेच रोगनिर्माते समजल्यावर दोषघ्न औषध हे नेहमीच व्याधिहर असलेच पाहिजे. परंतु कधीकधी असे आढळत नाही. उदा., कफोदराला व कफगुल्माला दोषप्रत्यानिक म्हणजे दोषविरोधी असे कफघ्न वमन चालत नाही. म्हणून कधीकधी दोषांशिवाय व्याधीचाही चिकित्सेत विचार करावा लागतो. दोषांचा व व्याधीचाही विचार करून जे उपचार केले जातात त्यांस उभयविपरीत चिकित्सा असे म्हणतात. उदा., दशमूलकाढा हा वातघ्न व शोथघ्न (सूजनाशक) आहे. ताक हे वातकफघ्न व ग्रहणी विकार घालविणारे आहे. यांशिवाय चौथा प्रकार चिकित्सेचा तदर्थकारी असा आहे. या प्रकारात विकाराचे जे लक्षण असते तेच वाढवून दोषनिर्हरण व विकारोपशम करावयाचे. उदा., पित्तज व्रणशोथामध्ये पित्तवर्धक उष्णोपनाह (गरम पदार्थ बांधणे) किंवा पच्यमानावस्थेतील व्रणशोथावर विदाही अन्न देणे हे उपक्रम तदर्थकारी या सदरातील आहेत. यालाच ‘विपरीतार्थकारी’ असेही दुसरे नाव आहे. असेच हेतू,व्याधी व उभयविपरीतार्थकारी प्रकारही आहेत. छर्दिरोग (ओकारी) झाल्यास पुन: छर्दी निर्माण करणारे मदनफल औषध देणे ही व्याधिविपरीतार्थकारी चिकित्सा होय. अग्नीने भाजलेल्या व्रणावर पुन: उष्ण लेप देणे हा उपचार व्याधिविपरीतार्थकारी होय.

आशुकारी व चिरकारी विकारांची चिकित्सा : आशुकारी विकार (शूल, अतिसार इ.) वातप्रधान व्याधी असल्याने वातदोषाची चिकित्सा प्रामुख्याने करावी लागते. तसेच या विकारात शरीरस्थ दोषधातुमल शीघ्रतेने नाश पावण्याची शक्यता असल्याने त्या दोषधातुमलांचे संरक्षण करणारी चिकित्सा करावी लागते. चिरकारी विकारामध्ये (उदा., प्रमेह, कुष्ठ इ.) स्थिर स्वरूपाची दोषदुष्टी  असल्याने क्रमाने यथायोग्य शोधन, शमन व रसायन चिकित्सा करावी लागते.

आतापर्यंत वर्णन केलेल्या गोष्टींशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार चिकित्सेसाठी करावा लागतो. उदा., (१) आवृतत्व (दोषादींचे एकमेकांवरील आवरण), (२) आशयापकर्षत्व, (३) उपद्रव व (४) सारासारत्व इत्यादी.

आवरण विचार : शरीरात सर्वत्र दोषादी प्रत्यही खेळविले जातात. शरीरात यांचे परिभ्रमण चालू असता विशिष्ट संप्राप्त्यनुसार या दोषादींना एकमेकांपासून अडथळा निर्माण होतो व त्यामुळे त्या ठिकाणी ते ते विकार दोषादींप्रमाणे संभवतात. अशा प्रकारे दोष हे धातूंना किंवा मलांना आवरणरूप राहून किंवा धातुमल हे दोषांना आवरणरूप राहून विकार करतात. सामान्यपणे जो आवरक असतो त्याची लक्षणे अशा वेळी मुख्यत्वे असतात तर जो आवृत त्याच्या कर्माची हानी होते. वायू हा सूक्ष्म गुणाचा असल्याने कधीकधी कफपित्तांनी आवृत होऊनही त्यांच्यामधून आपला मार्ग काढून त्या त्या ठिकाणी वायूचे लक्षणे उत्पन्न करतो रसादींचेही


शोषणादी कार्य करू शकतो. तसेच पाच प्रकारचे वायू एकमेकांवर आवरण करू शकतात. व वरील नियमाप्रमाने प्राणादी वायूंच्या कर्माची वृध्दी अगर स्वकर्महानी निर्माण करतात. तेव्हा याप्रमाने लक्षणांचा विचार करून आवृततत्त्वानुसार चिकित्सा करणे जरूर आहे.

वायू पित्ताने आवृत असेल तर क्रमाने शीत व उष्ण अशी वातपित्तांची व्यत्यासचिकित्सा करावी. कफाने आवृत असेल तर कफघ्न चिकित्सा वायूला अविरोधी होईल अशा तऱ्हेने करावी. कफ पित्ताने आवृत असेल तर प्रथम पित्ताला जिंकून मग वातयुक्त कफाला जिंकावे रक्ताने आवृत असेल तर वातरक्ताची चिकित्सा करावी . या प्रमाणेच पुढील ज्या धातूंनी आवृत असेल त्या धातूंची चिकित्सा करावी. अर्थात ती वाताला अविरोधी असावी. अन्नाने आवृत असता पाचन–दीपन–वमन व लघुगुणाच्या द्रव्यांची चिकित्सा असावी. मूत्रावृत असता मलशोधनाची (विरेचन, बस्ती, स्नेह, स्वेद) चिकित्सा असावी. याप्रमाणेच अपानादी वायू आवृत असताना त्या त्या वायूचे कर्म-स्थान इ. अनुसार चिकित्सा करावी. उदा. अपान आवृत झाला असता अग्निदीपक, ग्राही वातानुलोमन तसेच बास्तिशोधन करणारी अशी चिकित्सा असावी. उदानवायूला नेहमी त्याची गती मिळेल (ऊर्ध्वगामी होईल) व अनुलोमक होईल अशी चिकित्सा करावी. समान वायूचा प्रकोप जरूरीप्रमाणे शमन (दीपन–पाचन) उपचारांनी घालवावा. अपानवायूला त्याची अडलेली गती सुधारण्याची अशी चिकित्सा करावी. या सर्वांपासून प्राणाचे रक्षण करून तो आवृत होणार नाही अशी दक्षता घ्यावी. आपल्या स्थानी प्राणवायू राहुन सम्यक कार्य करीत आहे. असे नेहमी लक्ष ठेवून इतर आवृत्त करणाऱ्या दोषादींची त्या त्या आवरकानुसार चिकित्सा करावी, कारण प्राणवायू हे देहाच्या स्थितीला मुख्य कारण आहे.

आशयापकर्षत्व-आमाशयोत्थ-पक्वाशयोत्थ व्याधिचिकित्सा : आमाशयोत्थ व्याधी प्राय: कफपित्तात्मक असतात म्हणून लंघनात्मक उपचार करावे. पक्काशयोत्थ व्याधी प्राय: वातप्रधान असल्याने बृंहणात्मक उपचार करावे.

ज्या वेळी दोष स्वस्थानस्थित असूनही वायूच्या गतीमुळे आपले स्थान सोडून दुसऱ्या स्थानात जातात त्या वेळी ते प्रमाणाने वाढलेले नसूनही दुसऱ्या स्थानात गेल्यामुळे विकार करतात. जसे, स्वस्थानस्थित असणारे पित्त पित्ताच्या स्थानापासून काढून घेऊन सर्व शरीरभर वायू फिरवतो व हे पित्त  ज्या ज्या स्थानात जाईल त्या त्या ठिकाणी दाहभेदादी लक्षणे उत्पन्न करतो, अशा वेळी पित्ताची लक्षणे होऊनही पित्ताची विरेचन, शीतोपचार इ. चिकित्सा करणे अयुक्त होईल. कारण वायू विगुण होऊन तो पित्ताला स्थानांतरित करीत आहे म्हणून या ठिकाणी वाताचे अनुलोमन करणारी चिकित्सा करणे आवश्यक आहे.

गतिवैविध्यनुसार चिकित्सा : याप्रमाणे दोषांची गती लक्षात घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे. उदा., रक्तपित्तविकांरात दुष्ट रक्तपित्त ऊर्ध्वमार्गाने जात असेल तर ही गती रोखण्यासाठी उलट गती निर्माण करणारी विरेचन चिकित्सा तसेच अधोग मार्ग जाणाऱ्या रक्तपित्तासाठी त्याच्या उलट गतीचा वमनोपक्रम करणे आवश्यक आहे. दोषादी ज्या वेळी क्षीण, सम व वृध्दावस्थेत असतील त्या वेळी क्रमाने ते वाढवावेत, राखावेत व कमी करावेत म्हणजे जेणेकरून दोषादीचे साम्य राहील अशी चिकित्सा नेहमी करावी असे वर्णिले आहे.

उपद्रवानुसार चिकित्सा : उपद्रव म्हणजे ज्या दोषाच्या दुष्टीमुळे मूळ विकार होतो तोच दोष दुष्ट होऊन व अन्य स्थानी जाऊन त्याने निर्मिलेले अन्य लक्षण होय. अन्य स्थानांत दोष गेल्यामुळे मूळ दोषदुष्टीच असली तरी स्थानांतरामुळे चिकित्सा मूळ विकारापेक्षा थोडी वेगळी करावी लागते. अर्थात ज्या वेळी उपद्रव बलवान असेल त्या वेळी खास उपद्रवाचीच चिकित्सा करणे आवश्यक ठरते. अन्यथा  मूळ विकाराचीची चिकित्सा  उपद्रवाला अविरोधी अशा रीतीने केली म्हणजे भागते आणि मूळ विकार व उपद्रव या दोहोंचाही उपशम होतो. उपद्रवाची आणखीही व्याख्या कोणी ‘उपक्रमविरोधी किंवा उपक्राविरोधी असा रोगोत्तरकालात होणारा विकारְ’ अशी करतात. उदर विकारात अतिसार होणे हा उपक्रमविरोधी उपद्रव असून त्या वेळी चिकित्सा करणे कठीण होते, कारण या ठिकाणी उदर व अतिसार या विकारांसाठी विरुद्धोपक्रमाची आपत्ती येते. तथापि फार तीव्र उपद्रव नसेल तर अशा विकारात व्यत्यास चिकित्सा करावी लागते. उपक्रमाविरोधी चिकित्सेत मात्र अशी अडचण येत नाही, कारण मूळ विकाराची चिकित्सा तीच उपद्रवाला हिताची व विरोधी नसणारी अशी असते. अर्शविकारात उदावर्त (अवष्टंभ इ.) या उपद्रवासाठी करावयाची अनुलोमनाची चिकित्सा दोघांनाही उपकारक असते.

मूळ विकार व त्याच्या लक्षणानुसार चिकित्सा : लक्षणरूपविकार हे मूळ विकारापेक्षा काहीसे भिन्न असतात. दुष्ट दोषांचेच शरीरातील विशिष्ट स्वरूप म्हणजे विकार होय किंवा दोषांचीच स्वरूपे ही लक्षण, उपद्रव या रूपांनी प्रकट झालेली असतात. यांपैकी जे मुख्य लक्षण असते तो विकार म्हणून ओळखतात व त्याबरोबर असणारी इतर लक्षणे ही त्या विकारात होणारी अमुख्य किंवा परतंत्र लक्षणे समजतात. उदा., ज्वरामध्ये रसानुग झालेले दुष्ट दोष अग्नीला त्याच्या स्थानातून बाहेर काढतात आणि तिर्यग्गत होऊन सर्व शरीरभर पसरतात व या रसानुग दोषांबरोबर अग्नीही सर्व फिरतो म्हणून सर्व शरीरात ऊष्मा निर्माण होतो व त्यामुळे इतरही नेत्रदाह, शिरोदाह, तृष्णा इ. लक्षणे होतात. म्हणून अशा ठिकाणी मुख्य जे ऊष्मा हे लक्षण आहे त्याच्यावर कारणानुरूप चिकित्सा केली असता इतर नेत्रदाहादी ऊष्याची लक्षणे नाहीशी होतात. थोडक्यात, मूळ विकाराची–लक्षणाची चिकित्सा केली असता त्यामुळे होणारी इतर लक्षणे आपोआप नाहीशी होतात. याप्रमाणे एकाच व्याधीत अनेक तऱ्हेची लक्षणे दिसली, तरी मुख्य लक्षण ओळखून त्याची चिकित्सा करणे ही खरी चिकित्सा होय.

संप्रात्यनुसार चिकित्सा : मुख्य लक्षण व इतर अमुख्य लक्षणे यांचा चिकित्सेत विचार करताना आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावयाची म्हणजे लक्षणाची संप्राप्ती होय. दुष्ट दोष शरीरात कसे कसे फिरले व ते फिरताना कोणकोणत्या ठिकाणी कोणती व किती तीव्रपणे लक्षणे निर्माण केली आणि पुढे ते दोष कोणत्या ठिकाणी स्थानसंमिश्र झाले या सर्वाचा म्हणजे दोषांच्या प्रवासाचाही विचार चिकित्साकर्मात करावा लागतो. अशा रीतीने विचार केल्यास पुष्कळ वेळा नवीन नवीन रोग आढळतात. दोषांच्या नवीन नवीन स्थानांत गेल्याने आढळणाऱ्या विकारांची, ग्रंथांत वर्णन न केलेल्या विकारांची किंवा रोगांचे स्वरूप बदलले असले तरी त्यांची चिकित्सा करताना अडचण भासणार नाही.

स्वास्थ्यचिकित्सा: आयुर्वेदीय चिकित्सेचे मूळ दोन उद्देश पूर्वी जे सांगितले त्यांपैकी रोग्याचा रोग नाहीसा करून स्वास्थ निर्माण करण्याबाबतचे सिद्धांत आतापर्यंत सांगितले . आता दुसरा उद्देश म्हणजे स्वस्थ पुरुषाचे स्वास्थ्यरक्षण करणे हा आहे. मनुष्य स्वस्थ राहाण्यासाठी जे उपचार करावयाचे त्याला ‘स्वास्थ्यचिकित्सा’ असे म्हणतात. स्वास्थचिकित्सेत चालू असलेले स्वास्थ तसेच टिकविण्याचे उपचार वा पुढे होणारे विकार होऊ नयेत म्हणून करावयाचे रोगप्रतिबंधक आहारविहार व औषधोपचार , असा दोन प्रकारचा विचार मुख्यत: येतो.


स्वस्थपुरुष म्हणजे चांगल्या अवस्थेत किंवा शारीर-मानसिक अशा दोन्ही तऱ्हांनी संपूर्ण निरोगी असलेला पुरुष होय. ज्या पुरुषाचे दोष-अग्नि–धातू, त्यांची निर्माणपरंपरा व कर्मे, मलमूत्रादी मलांच्या क्रिया समप्रमाणात असून ज्याचे मन इंद्रिये प्रसन्न आहेत, त्याला ‘स्वस्थְ’ असे म्हणावे. अशा तऱ्हेचे स्वास्थ्य, नेहमी शरीर व मन यांच्याकडून घडणाऱ्या अहितकर सेवनामुळे बिघडते व हितकर सेवनामुळे टिकून राहते. पहाटे उठण्यापासून सर्व दिवसभर म्हणजे चोवीस तास आचरण्याचे नियम सविस्तरपणे स्वस्थवृत्त विषयात येतात. 

ऋतूंप्रमाणे शीत–उष्ण–वर्षा–कालांत भोवतालच्या वातावरणाचे शरीरावर जे परिणाम होतात व त्यामुळे शरीरात विकार संभवतात. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जो आहारविहार ठेवावा लागतो त्याला ‘ऋतुचर्याְ’ असे म्हणतात. स्वास्थ्य टिकविण्यासाठी ऋतुचर्येचे पालन आवश्यक आहे. निसर्गकोप, अधर्म इ. कारणांमुळे उदक–देश–काल–वायू हे सामान्य भाव दुष्ट होऊन देश उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी वागण्याचे नियम स्वास्थ्य राखण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे निरनिराळ्या सांसर्गिक विकारांतही भोवतालचे वातावरण स्वच्छ राखणे, आहारविहारांत पथ्य राखणे आणि तत्तत्प्रतिबंधक औषधोपचार करणे, ही सर्व स्वास्थ्यरक्षणाच्या बाबतीत आवश्यक आहेत.  

रसायन वाजीकरण चिकित्सा : रसायन चिकित्सा ही शरीरातील रसरक्तादी सप्तधातू चांगले करून व वाढवून शरीराचे बल व आयुष्य वाढविते तसेच वृद्धत्व घालवून तारुण्य आणते. एखाद्या तीव्र आजारपणानंतर शरीराच्या रसरक्तादी धातूंची जी हानी होते ती भरून आणते व नेहमीचे आयुष्य मिळवून देते. प्राय: ही रसायन चिकित्सा निरोगी स्थितीत, आजारपणात व नंतर आलेले धातूंचे अबलत्व घालविण्यासाठी करतात. सुश्रुताचार्यांनी असाध्य वाटणारे व्याधीही रसायन चिकित्सेने बरे होतात असे लिहिले आहे.

रसायन प्रयोग दोन प्रकारचे आहेत. एक कुटीप्रावेशिक व दुसरा वातातपिक प्रयोग. विशिष्ट कुटी तयार करून शोधनोपचारानंतर तिच्यात राहुन रसायन सेवन नियमानुसार करावयाचे असते. वातातपिक रसायन विधीमध्ये कुटीप्रवेशाची जरूरी नसते व नियंत्रणही कुटीप्रावेशिक विधीएवढे नाही. रसायन प्रयोग अनेक प्रकारचे असून प्रकृतीनुसार, रोगानुसार, देशकालानुसार भिन्नभिन्न आहेत. अशा प्रकारे च्यवनप्राश, कूष्मांड-रसायन, आमलकरसायन, नागबलारसायन,  पिप्पली, भल्लातक, लसूण, त्रिफळा, मधुयष्टिरसायन, अभ्रक, सुवर्ण, मकरध्वज, सुवर्णमालिनीवसंत, कुसुमाकर, पारद इ.रसायने सर्व योग्य पद्धतीने उपयुक्त ठरतात. रसायनविधी चुकल्याने विकार झाल्यास रसायन बंद करून त्यासाठी उपचार करावेत. याशिवाय आचार–रसायने सांगितली आहेत. ही नित्य आचरणात सर्वांनी आणावयाची असून त्यामुळे स्वास्थ्य रक्षण होते. ही आचार–रसायने म्हणजे नेहमी सत्य बोलणे, संताप न करणे, मद्यमैथुनादीपासून निवृत्त असणे, आस्तिक वृत्ती ठेवणे, देवगोब्राह्मणादींची सेवा इ. होत. 

वाजीकरण चिकित्सेमध्ये मैथुनशक्ती अधिक निर्माण होते व शुक्रधातूची वृद्धी होणे ते मुख्य कार्य होय. या वाजीकरण चिकित्सेवरच पुत्रप्राप्ती आणि धर्म, अर्थ, प्रीती व यश अवलंबून आहे. म्हणून वाजीकरण चिकित्सा श्रेष्ठ असल्याचे शास्त्रकार सांगतात. वाजीकरण चिकित्सा ही वयात आलेल्या व शरीरशुध्दी असलेल्या पुरुषासाठी असून अनात्मवान, आळशी, दरिद्री, प्रमादी, व्यसनी, पापी व औषधोपचारावर विश्वास नसणारे यांना मात्र वाजीकरण चिकित्सा करू नये.

वाजीकरणयोग देण्यासाठी शरीर स्नेहस्वेदपूर्वक पंचकर्मांनी शुद्ध करून नंतर हे योग तूप, तेल, मध, दूध, साखर, मांसरस इत्यादीबरोबर द्यावेत. नेहमी दूध, मांसरस, स्निग्ध पदार्थ हे आहारात असावेत.

चिकित्सेचे औषध देण्याचे काल : आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये औषध देण्याला काही विशिष्ट काल आहेत. ठराविक अवस्थेत विकारातील दोषादिदुष्टी, प्रकृती इ. विचार करून त्यानुसार ठराविक कालातच औषध द्यावयाचे असते. कधीकधी औषध देण्यात उपेक्षा करून केवळ काल घालवावा लागतो : जसे ज्वराच्या आमास्थेत अगर आपोआप बाहेर टाकणाऱ्या आमातिसारात काल घालविणे एवढेच करावे लागते. शोधन औषध ते ते दोष शरीरात अधिक झाले व शरीरातून बाहेर काढण्यास योग्य झाले म्हणजे द्यावे. हिवतापासारख्या विकारात तापाच्या पाळीपूर्वी औषधे द्यावीत .सशक्त माणसाने किंवा कफोद्रेकाचा विकार असेल तर काहीही खाण्यापूर्वी सकाळी औषधे घेणे योग्य. औषध घेतल्यावर ते जिरेपर्यंत काही न खाणे चांगले किंवा न राहवल्यास सु. तासाभराने हलके पदार्थ अगर पेय द्यावे. अपान-वैगुण्य असल्यास भोजनापूर्वी, समान वायूची दुष्टी असल्यास भोजनाच्या मध्येच, व्यान-दुष्टी असेल तर प्रातराशानंतर, उदान-दुष्टीवर सायंकाळच्या खाण्यानंतर, प्राण-दुष्टीवर दर घासामध्ये व श्वास, कास, उचकी, ओकारी, तहान, विषबाधा अशा विकारांवर वारंवार औषध द्यावे . अरुची व अग्निमांद्य यांवर निरनिराळ्या चवींच्या अन्नपदार्थांबरोबर औषध द्यावे. कंप, आक्षेपक, उचकी इ. वातविकारांवर हलके व स्निग्ध असे अन्न देऊन जेवणापूर्वी व नंतरही औषध द्यावे. ऊ‌र्ध्वजत्रुविकारांवर म्हणजे खांद्याच्या वरच्या भागाच्या विकारांवर रात्री झोपताना औषध द्यावे म्हणजे ते अधोभागी फार न पसरता जत्रूर्ध्व इंद्रियांवरच कार्य करते. सामान्यत: दिवसातून २–३ वेळा औषध द्यावे. तथापि एकापेक्षा जास्त रोग असतील, तर अगर वरीलप्रमाणे काही विकारांत, अनेक वेळा जरूरीप्रमाणे औषध द्यावे. कोणतेही औषध जास्तीजास्त सात दिवस दिल्यानंतर थोडाही गुण न दिसेल तर ते औषध उगीचच अधिक दिवस चालू करू नये. त्याच गुणांचे अगर वेगळ्या दुष्टिकोनांतून विचार करून दुसरे औषध अगर जरूर तर औषधाची मात्रा वा वेळ बदलून औषध द्यावे. औषधाचा अपेक्षेपेक्षा ताबडतोब गुण न आल्यास ते औषध लगेच बदलावे.

चिकित्सा व अनुपान : काढा,स्वरस वगैरे पातळ औषधे खेरीजकरून बाकीची औषधे म्हणजे चूर्ण, गोळ्या, भस्मे वगैरे कोणत्या तरी दुसऱ्या पातळ पदार्थाबरोबर द्यावी लागतात. हे पदार्थ औषधाबरोबर (सहपान) अगर औषधामागून (अनुपान) दिले जावे. व्यवहारात या दोन्ही प्रकारांत ‘अनुपान’ असेच म्हटले जाते.

अनुपानामुळे औषधाची शक्ती वाढते, तृप्ती वाटते, औषध शरीरभर लौकर पसरते, औषध पातळ केले जाते व त्यामुळे शोषणाला मदत होते, औषध लौकर पचविले जाते, औषध तीव्र असेल तर सौम्य केले जाते, औषधाचे वाईट वास ,चव, रंग, स्वरूप इ. घालविता येतात व ते सहजपणे पोटात घेता येते. शास्त्रकारांनी याप्रमाणे अनेक औषधे वा आहारद्रव्यांना अनुरूप अशी बरीच अनुपाने सांगितली आहेत. प्राय: तेल, तूप, मध, मोरावळा, डाळिंबादी लेह, गरम पाणी, लिंबूपाणी, ताक, दूध, आल्याचा रस इ. अनुपाने चिकित्सेत वापरली जातात.

जोशी, ना. ह.