शरीर व मन : (आयुर्वेद). शरीरामध्ये भौतिक व आध्यात्मिक असे दोन प्रकारचे घटक असतात. भौतिक घटकांत कफ, वात, पित्त हे त्रिधातू व रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सात धातू स्नायू इ. उपधातू मलमूत्र इ. मल हे पांच भौतिक विकार असतात.    

आयुर्वेदामध्ये मनासहित सर्व इंद्रिये भौतिक मानलेली आहेत. यांपैकी मन हे संचारी आहे. मानाचा आणि शरीरघटकांचा अतिशय निकट संबंध आहे. मनाच्या गुणदोषांचे परिणाम शरीरावर होतात व शरीराच्या गुणदोषांचे परिणाम मनावर होत असतात.

मनाचे शरीरावर होणारे परिणाम : मनाचा सत्त्व गुण अधिक असेल, तर त्याचे इष्ट परिणाम होत असतात. भक्ती, शील, शौर्य, भय, उत्साह इ. मनापासून उत्पन्न होतात. त्यांत मन भक्तीने शांत, स्थिर, दृढ, एकाग्र निर्व्यथ (व्यथा नसलेले) असे होते. त्याचे परिणाम शरीरघटकांवर इष्ट होऊन पित्त व वात दोष कमी होतात, श्रेष्ठ दर्जाचे कफस्वभावी धातुघटक वाढतात, ते स्निग्ध होतात.    

दातृत्वाने (शीलाने) शरीर घटक स्निग्धसार होतात, गरजूंची गरज व त्यांचे होणारे हाल किंवा अडचणी ह्यांमुळे मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम, दया उत्पन्न होते व आपल्याकडून होईल ती मदत निरपेक्षपणे केली जाते. असे दयाशील ज्याचे मन असते व जो दाता असतो, त्याच्या मनात दया उत्पन्न होण्यापूर्वी जे दुसऱ्याचे क्लेश पाहून मनाला क्लेश होतात, त्यांनी प्रथम पित्त उत्पन्न होते. पित्त व वात शरीरघटक आहेत. व्यक्ती जेव्हा दान करते, तेव्हा दुःखी-कष्टी व्यक्तीचा आनंद पाहून तिला आनंद होतो. वाढलेले वात, पित्त कमी होतात. ह्या दानाची स्मृती व सुख ही त्या-त्या वेळी शरीराचे कफधर्मीय, स्निग्ध, मधुर इ. घटक वाढवितात व शरीर पुष्ट करतात. दातृत्वामुळे दात्याचे मन पुष्ट होते.

चिंता, शोक, भय ह्यांनी शरीरामध्ये वायू प्रकुपित (विकृत) होऊन शरीरातील शिरःस्थान व अन्य जो अवयव अबल असेल, त्याचे वातभूयिष्ठ (अतिवातजन्य) विकार उत्पन्न होतात, क्रोधाने पित्त उत्पन्न होते व वरीलप्रमाणेच त्या पित्ताचे शारीरिक विकार उत्पन्न होत असतात. मानसिक विकार उत्पन्न झाल्यास त्यांचे शरीरावर अनिष्ट परिणाम होतात.    

मन जर उत्तम सार (न खचणारे, विषण्ण न होणारे व व्यवस्थित) असेल, तर परिणामी स्मृती, भक्ती, भावना, बुद्धी, उत्साह, धैर्य, पराक्रम आदी चांगले गुणभाव निर्माण होतात. सत्त्वसार (बलवान, स्थिर व विशुद्धतर मनाचा) मनुष्य अत्यंत सावध बुद्धीचा, सावध शरीरक्रिया करणारा असतो. असार मनाचा मनुष्य कोत्या विचारांचा, शरीराने दुर्बल असा असतो.    

शरीराचे मनावर होणारे परिणाम : कोणतेही शरीर व मानसविकार, आहारविहारजन्य विकार हे ⇨ प्रज्ञापराधामुळेच (बुद्धीने केलेल्या प्रमाद अपराधामुळेच) होत असतात. त्या वेळी मन हे रजतयुक्त होऊन धी, धुती, स्मृती ह्या भ्रष्ट झालेल्या असतात. ⇨ अतत्त्वाभिनिवेश ह्या मानसिक रोगात हीच स्थिती असते. ह्या रोगांचे उपचार केवळ धी, धैर्यादि यांनी करून भागत नाही, त्यासाठी वमन. विरेचन हे उपचार महत्त्वाचे ठरतात. त्यावाचून तो बरा होत नाही आणि देश, काल, स्वतः रोगी ह्यांच्या गुणांच्या विपरीत गुणांची औषधे आणि गायीचे तूप, दूध असे मनाचे परिपोषक अन्न, मनः प्रसादकर मधुर व अम्ल रसाचे सेवन करावे एरंडेल तेलासारखी मनोदोषांचे धोधन करणारी द्रव्ये, शंखपुष्षी, प्रवाळ, मोती, सुवर्ण, हिरा इ. मनोबुद्धी ह्यांचे गुणवर्धन करणारी औषधे उपयुक्त ठरतात. चंदन, अगरू, कस्तूरी, कापूर, लवंग, वेलदोडा, जायफळ, सुगंधी फुले, तेले, अत्तर यांचा सुगंध, स्वच्छ व प्रसन्न जागा यामुळे मनाला प्रसन्नता येते.

मानव हा आहारविहाराचे नियम बहुधा न पाळणारा आहे. ह्यामुळे त्याची संतती ही निर्दोष, निर्मल अशी बहुधा होत नाही. बालकाच्या शरीरात एक किंवा दोन दोषांचे आधिक्य असतेच. त्याचा त्याच्या मनावर, बुद्धीवर, विचारांवर परिणाम होत असतो.

दोषप्रकृतीचे मानस परिणाम : जन्मतः शरीरात दोष अधिक असल्यास दोष प्रकृती निर्माण होते. त्या दोषांचे मनावर, स्वभावावर, विचारांवर, बुद्धीवर अनिष्ट परिणाम होतात.

वातप्रकृतीचे मनावर होणारे परिणाम : वातप्रकृती मनुष्याचे मन अस्थिर असते. तो ताबडतोब क्षुब्ध होतो. तो मत्सरी असतो. त्याला स्निग्ध, उष्ण, गोड, आंबट, खारट अन्नपानाची इच्छा असते. ते घेतल्याने त्यापासून सुख होते, ते सतत दीर्घकाल घेत राहिले, तर जन्मतः उत्पन्न झालेला वातदोष नाहीसा होतो. मनुष्य समप्रकृतीचा (जिच्यात वात, पित्त व कफ हे त्रिदोष सम असतात त्या प्रकृतीचा) होतो व मानस अनिष्ट परिणाम नाहीसे होतात. तिखट, कडू व तुरट ह्या पदार्थांचा द्वेष होतो. त्याला गाणे आवडते. चोरी करण्याचा त्याचा स्वभाव असतो. त्याला थंड आवडत नाही.    

पित्तप्रकृतीचे मनावर होणारे परिणाम : पित्तप्रकृतीचा मनुष्य अभिमानी, साहसप्रिय, दयावान पण क्रोधी असतो. त्याला सुगंधी, मधुर, कडू, तुरट अशी द्रव्ये आवडतात. ही द्रव्ये योग्य प्रमाणात दीर्घकाळ नियमितपणे घेत राहिले, तर पित्तप्रकृती नाहीशी होऊन मनुष्य समप्रकृतीचा होतो. 

कफप्रकृतीचे मनावर होणारे परिणाम : कफप्रकृतीचा मनुष्य शांत, स्थिर, विचार करणारा व स्थिर रीतीने काम करणारा असतो. तो कोमल स्वभावाचा, सत्यवादी, तीव्र स्मरणशक्तीचा असतो. हा लोलूप नसतो, त्याला राग फार कमी येतो. त्याला दूरदृष्टी असते. तो स्थिर व सरळ स्वभावाचा, लाजरा, दृढ मैत्री करणारा, उघड द्वेष न करता दीर्घकाळ वैर करणारा असतो. समप्रकृतीचे मन सात्त्विक असते. समप्रकृतीचा मनुष्य निर्दोष व गुणवान असतो. सतत प्रसन्न मनाचा असतो. त्याची इंद्रिये, आत्मा व मन ही प्रसन्न असतात. 

रसधातू : हा जितका श्रेष्ठ प्रतीचा असेल, तितका तो मनुष्य बुद्धिमान व विद्वान, समाधानी असतो. हाच धातू अल्पसार (यथोचित प्रमाण नसलेला) असेल तर ती व्यक्ती नेहमी दुःखी, मंदबुद्धी व निर्बुद्ध असते.    

 

रक्तधातू : हा धातू  जितका श्रेष्ठ प्रतीचा असेल तितका तो मनुष्य स्पष्टवक्ता, तीव्र बुद्धिमान, आपल्या मनाप्रमाणे वागणारा असतो. त्याला उष्ण वातावरण व क्लेश सहन होत नाहीत. तो प्रसन्न व सुंदर दिसतो. सुगंधी अत्तरे, फुले, सौंदर्य, गायन, अतितलमवस्त्रे यांची त्याला आवड असते. तो सुकुमार असतो. ह्याच्या उलट लक्षणे ती व्यक्ती रक्तधातूने असार (विशुद्धतरधातुविहीन) असताना दिसून येतात.

मांसधातू : या धातूने उत्तम सार असणारा पुरूष अलोलूप, धैर्यशील, क्षमावान, सरळ स्वभावाचा, सुखी व दीर्घायुषी असतो. ह्याच्या उलट दोष तो धातू असार किंवा अल्पसार असताना त्याच्या ठिकाणी दिसून येतात.

  मदोधातू : हा ज्यांच्या शरीरात उत्कृष्ट असतो, त्यांचे वागणे व बोलणे स्नेहपूर्ण असते. तो दानशील व अगदी सरळ स्वभावाचा असतो.    

अस्थिधातू : हा ज्याच्या शरीरात उत्तम सार असतो, त्याचे मन स्थिर असते. तो अतिशय उत्साही, सतत कामामध्ये व्यग्र व न थकणारा, न्यायनिष्ठूर, शिस्तीचा, नियमित वागणारा, मोठ्या मनाचा, आतून जिव्हाळा असलेला असा असतो. दोषांचा अस्थिअसार असलेला मनुष्य ह्याच्या उलट असतो.    

शुक्रधातू : हा सुख व आनंद ह्यांचा जनक आहे. हा ज्याच्या शरीरात उत्तम सार असतो, तो मनुष्य सतत आनंदी, हसरा, निरोगी, सुखी असतो. त्याची दृष्टी सौम्य असते. त्याचा स्वर स्निग्ध असतो. तो विषयोपभोगांमध्ये अती बलवान असतो पण उच्छृंखल (मुक्त) नसतो स्त्री व मूल ह्यांच्यावर त्याचे अतिशय प्रेम असते व सर्व जगाकडेही तो प्रेमळ दृष्टीने पाहतो. भूतदया हा त्याचा स्थिर गुण असतो. तो महाधैर्यवान असतो. ह्याच्या उलट दोष तो धातू असार व अल्पसार असलेल्या पुरुषामध्ये दिसून येतात.    

मनासह वरील सर्व धातू ज्याचे उत्तम सार असतात, असा मानव विरळच, असा महापुरुष पुरुषोत्तम होय.

पहा : आतुर चिकित्सा स्वस्थवृत.                        

पटवर्धन, शुभदा अ.