अग्निकर्म : (आयुर्वेद). डाग देणे. शस्त्रकर्मात शस्त्रानुशस्त्रांपेक्षा क्षार श्रेष्ठ व क्षारापेक्षा अग्नी श्रेष्ठ. आग्नीने जाळलेले रोग पुन्हा उत्पन्न होत नाहीत.

उपकरणे : त्वग्गत रोग जाळण्यास पिंपळी, बकरीची लेंडी, दात,बाण, सळई मांसगतांकरिता दगडाचे किंवा तांबे, रुपे इत्यादींचे बनवलेले जांभूळ इ. वस्तू, शिरास्नायू, संधी, अस्थी यांतील रोगांकरिता कढत वा उकळते मध, गूळ वा तेल ही उपयुक्त होतात.

काल : शरद व ग्रीष्म या ऋतूंखेरीज अन्य ऋतूंत डाग द्यावा. या ऋतूंत आवश्यक असेल तर भोवताली थंड वातावरणात निर्माण करून द्यावा.

विशेष : सर्व रोगांवर सर्व ऋतूंत स्निग्ध, शीत व पिच्छिल बुळबुळीत) अन्न खाण्यास देऊन नंतर डाग द्यावा. अपवाद—अडलेला गर्भ, मूतखडा, भगंदर, मूळव्याध व मुख रोग इत्यादींत जेवण न देता अग्निकर्म करावे.

विकार : त्वचादी स्थिर रोगांत अतिशय वेदना असतात, व्रणांत कठीण, बधिर व उंचावलेले मांस असताना, ग्रंथी, अर्श, अर्बुद, भगंदर, अपची, श्लीपद, चामखीळ, आंत्रवृद्धी, संधी, शिरा यांचा छेद केल्यावर, नाडीव्रण, रक्तस्त्राव फार होत असेल तर अग्निकर्म करावे.

प्रकार :  १. वलय, २. बिंदू, ३. जरूरीप्रमाणे उभ्या-आडव्या-तिरक्या फुल्या, सरळ नागमोडी रेषा (विलेखा) इत्यादि, ४. घर्षण (प्रतिसारण).

वर्ज्य : पित्तप्रकृत्ती, अंतर्गत रक्तस्त्राव, कोठा फुटला असता, शल्य निघाले नसेल, वा रोगी दुर्बल, बाल, वृद्ध, भित्रा, अनेक व्रणपीडित घाम काढण्यास अयोग्य असला तर अशांना अग्निकर्म करू नये.

दग्धप्रकार : १. प्लुष्ट (झळ लागणे).२. दुर्दग्ध (फोड, लाली, दाह, वेदना अधिक होणे). ३. सम्यद्गग्ध (योग्य डाग). ४. अतिदग्ध (मांस लोंबकळणे, शिरादींचा अधिक नाश, ज्वर-दाह-तहान इ. उपद्रव होणे).

योग्य डाग : त्वचा : चर्ऽ असा आवाज होणे, दुर्गंधी येणे व त्वचा संकुचित होणे. मांस : पारव्याच्या रंगासारखा व्रण, अल्प सूज, वेदना व शुष्क संकुचित व्रण असणे. शिरास्नायू : काळा व वर उचलून आलेला व्रण आणि स्त्राव थांबणे. संधी व अस्थी : रुक्ष, अरूण, कर्कश व स्थिर व्रण होणे.

उपचार : प्लुष्ट : या प्रकारात चुकूनही थंड उपचार न करता उष्ण उपचारच करावेत. जाळलेली जागा शेकावी, अन्नपानही उष्ण वीर्याचे व उष्ण द्यावे म्हणजे होरपळलेल्या जागेतील वायू व उष्मा शरीरात पसरेल. त्या जागेत न राहिल्याने सूज लाली व वेदना होणार नाहीत. पण थंड उपचारांनी वायू व उष्मा तेथेच स्थगित होतील व सूज इ. वाढतील.

दुर्दग्ध : अवस्थानुरूप उष्ण किंवा थंड उपचार करावे. सम्यक् दग्धवंशलोचन इ. तुपात लावावे किंवा बारिक वाटलेल्या मांसाचा लेप करावा.

अतिदुग्ध : लोंबवलेले मांस कात्रीने कापून काढावे व थंड उपचार करावेत. शाली तांदळाचे पीठ किंवा टेंभुर्णीचे चूर्ण तुपातून लावावे, गुळवेल किंवा कमळ इत्यादींच्या पानांनी व्रण झाकावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री