जनन तंत्र : प्रजोत्पादन हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे. मर्यादित आयुष्यामुळे, विशिष्ट जाती कायम टिकून राहण्याकरीता तसेच जातिप्रसारासाठीही प्रजोत्पादन महत्त्वाचे ठरते.

प्रजोत्पादनाचे ढोबळ मानाने दोन प्रकार आढळतात : (१) अलैंगिक, (२) लैंगिक [⟶ प्रजोत्पादन], लैंगिक प्रकार सामान्यतः प्रगत प्राण्यांत आढळतो. ह्यास नर व मादी अशा दोन जनकांची जरूरी असते. इतकेच नव्हे, तर प्रत्येकात आवश्यकतेनुसार शारीरीक व शरीरक्रियात्मक वैशिष्ट्ये असलेली जननेंद्रिये किंवा जनन तंत्राची वाढ झालेली असते. काही उभयलिंगी [⟶ उभयलिंगता] प्राण्यांत ही इंद्रिय तंत्रे एकाच प्राण्यांत असतात (उदा., पट्टकृमी, गांडूळ, ट्यूनिकेट वगैरे).

प्रोटोझोआ (प्रजीवसंघ) संघातील पॅरामिशियम ह्या प्राण्यात केंद्रकापासून (पेशीतील क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजापासून) स्त्री-व पुं-युग्मक (प्रजोत्पादन पेशी) तयार होऊन व दोन प्राणी काही काळ एकत्र येऊन संयुग्मनाने लैंगिक प्रजनन होते. तथापि ह्या प्राण्यांत लैंगिक प्रजननासाठी खास अशी इंद्रिये नसतात. लैंगिक प्रजननात केवळ जननेंद्रिये असल्याचे उदाहरण म्हणजे हायड्रा हा आंतरगुही (सीलेंटेरेट) प्राणी होय. हायड्र्यात जातीनुसार एकाच प्राण्यांत किंवा वेगवेगळ्या प्राण्यांत शरीराच्या विशिष्ट भागांवर वृषण (पुं-प्रजोत्पादक ग्रंथी) न अंडाशय (स्त्री-प्रजोत्पादक ग्रंथी) निर्माण होतात. ह्यांत अनुक्रमे शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी) आणि अंडाणू (स्त्री-प्रजोत्पादक पेशी) तयार होतात. त्यांच्या फलनाचे युग्मनज तयार होऊन त्यापासून सरतेशेवटी नवीन हायड्रा निर्माण होतो.

आ. १. अपृष्ठवंशी प्राण्यांचे जनन तंत्र : (अ) पर्णाभकृमी : (१) पुं-जननरंध्र, (२) शिस्न, (३) मैथुनांग कोश, (४) रेतवाहिनी, (५) रेताशय, (६) वृषण, (७) अष्ठीला ग्रंथी, (८) स्खलन वाहिनी, (९) स्त्री-जननरंध्र (१०) मेहलीस ग्रंथी, (११) अंडवाहिनी, (१२) अंडाशय, (१३) पीतक कोश, (१४) पीतक ग्रंथी, (१५) मध्यस्थित पीतकवाहिनी, (१६) लॉरर नाल, (१७) गर्भाशय; (आ) पट्टकृमी : (१) वृषण, (२) रेतवाहिनी, (३) शिस्न, (४) अंडाशय, (५) अंडवाहिनी, (६) पीतक ग्रंथी, (७) पीतकवाहिनी, (८) गर्भाशय, (९) शुक्राणुकोश, (१०) योनिमार्ग, (११) जनन अलिंद; (इ) जंत (पुं-जनन तंत्र) : (१) वृषण, (२) रेतवाहिनी, (३) अवस्कर, (४) कंटिका (५) आतडे; (ई) जंत (स्त्री-जनन तंत्र) : (१) जननरंध्र, (२) योनिमार्ग, (३) अंडाशय, (४) गर्भाशय, (५) मुख, (६) आतडे; (उ) गांडूळ : (१) वृषण, (२) वृषणकोश, (३) शुक्राणुग्राही नसराळी, (४) रेताशय, (५) रेतवाहिन्या (६) अष्ठीला ग्रंथी, (७) पूरक ग्रंथी, (८) अंडाशय, (९) अंडवाहक नसराळी, (१०) अंडवाहिनी, (११) शुक्रग्राहिका, (वर्तुळातील आकडे खंडांचे क्रमांक दाखविणारे आहेत); (ऊ) झुरळ (पुं-जनन तंत्र, अधर दृश्य) : (१) वृषण, (२) कंदुकाकृती ग्रंथी, (३) भूछत्राकृती ग्रंथी, (४) रेतवाहिनी, (५) स्खलन वाहिनी; (ए) झुरळ (स्त्री-जनन तंत्र, अधर दृश्य) : (१) सहावी उदर गुच्छिका, (२) श्लेष्म ग्रंथी, (३) अंडवाहिनी, (४) अंडनलिका; (ऐ) गोगलगाय (पुं-जनन तंत्र) : (१) वृषण, (२) रेतवाहिनी, (३) रेताशय, (४) मलाशय, (५) पुं-जनन-रंध्र, (६) गुद, (७) पचन ग्रंथी; (ओ) गोगलगाय (स्त्री-जनन तंत्र) : (१) अंडाशय, (२) अंडवाहिनी, (३) शुक्राणुकोश, (४) गर्भाशय, (५) योनिमार्ग, (६) स्त्री-जनन रंध्र, (७) पचन ग्रंथी.

तथापि बहुतेक प्राण्यांत जनन तंत्र असते. तसेच जनन तंत्राचा मूळ आराखडा लिंगभेदानुसार सर्व प्राण्यांत सारखाच असतो. त्यात पुढील गोष्टींचा समावेश असतो. (१) युग्मकनिर्मितीसाठी जनन ग्रंथी : नरात शुक्राणुनिर्मितीसाठी वृषण मादीत अंडाणुनिर्मितीसाठी अंडाशय असतात. ह्या दोहोंस आद्य जननेंद्रिये म्हणतात. (२) निर्माण झालेल्या युग्मकांच्या परिवहनासाठी युग्मक वाहिन्या : नरात रेतवाहिन्या आणि मादीत अंडवाहिन्या असतात. (३) युग्मक साठविण्याकरिता व त्यांच्या स्थानांतरणासाठी रेताशय, शुक्रवाहिका वगैरे विशेष इंद्रिये असतात. (४) अष्ठीलासारख्या रेत निर्माण करणाऱ्या साहाय्यक ग्रंथी असतात. (५) अंडी (अंडाणू) काही काळ साठविण्याकरता, भ्रूणाच्या वाढीसाठी अंड्यात पीतक वगैरे स्त्रवण्यासाठी (ह्याचा अन्न म्हणून उपयोग होतो), संरक्षणासाठी अंड्यावर कवच तयार करण्यासाठी, तसेच गर्भाच्या योग्य वाढीसाठी [⟶ गर्भाशय] अंडवाहिन्यांत योग्य ते रूपांतर झालेले असते. तसेच (६) आंतर निवेचनासाठी (आंतरफलनासाठी) रेत व शुक्राणू मैथुनाच्या वेळी नरातून मादीत जाण्यास शिश्न, रेत व शुक्राणू येण्यास योग्य असा योनिमार्ग अशी उपांगे मादीत आवश्यक असतात. त्याचप्रमाणे अंडी, अंडप्रावर (अंडी असलेला कोश) योग्य ठिकाणी घालण्यास अंडनिक्षेपासारख्या उपांगांचाही जनन तंत्रात समावेश होतो. ह्यांखेरीज सस्तन प्राण्यांतील दुग्ध ग्रंथी, दाढी, मिशा, आवाजाच्या पातळीतील बदल सिंहाची आयाळ, पक्ष्यातील गडद रंग वगैरे अनेक लैंगिक उपलक्षणांचाही जनन तंत्राशी संबंध पोहोचतो.

अशा संरचनेसाठी जनन तंत्रे पट्टकृमी, गांडूळ, जंत, कीटक, पायला (एक शंखाची गोगलगाय) गोगलगाई वगैरे अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांत व सामान्यतः सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत आढळतात. जनन तंत्र भ्रूणाच्या मध्यस्तरापासून निर्माण होते. बहुतेक पृष्ठवंशीत प्रामुख्याने नरात, उत्सर्जन (शरीराला निरुपयोगी असणारे पदार्थ बाहेर टाकण्याचे तंत्र) व जनन तंत्र यांची भ्रूणावस्थेतील निर्मिती, तसेच शारीरीय व काही प्रमाणात शरीरक्रियावैज्ञानिक निकटवर्तीपणा यांमुळे ह्या दोन्ही तंत्रांस मूत्रजनन तंत्र असे एकच पण सार्थ नाव दिले जाते. जनन तंत्रातील विविध भागांची रचना, कार्ये व भ्रूणवैज्ञानिक उपपत्तींचा सांगोपांग विचार पुढे मानवी जनन तंत्र ह्या शिर्षकाखाली केला आहे. प्रथम मानवेतर प्राण्यांतील जनन तंत्राचा आढावा दिला आहे.

प्लॅटिहेल्मिंथिस संघातील पर्णाभकृमी व पट्टकृमी ह्या उभयलिंगी प्राण्यांत जनन तंत्रे बरीच प्रगतावस्थेत असून त्यांची रचनाही गुंतागुंतीची असते. पर्णाभकृमीत (आ. १ अ) पुं-जनन तंत्रात एकामागे एक असलेले, बरेच खंड पडलेले दोन वृषण, दोन रेतवाहिन्या, एक रेताशय, एक स्खलनवाहिनी, अष्ठीला ग्रंथी व शिस्न यांचा समावेश होतो. स्त्री-जनन तंत्रात एक शाखायुक्त अंडाशय, अंडवाहिनी,  बराच संवलित (वेटोळ्यासारख्या गुंडाळलेला), गर्भाशय असंख्य पीतक ग्रंथी, निरनिराळया पीतकवाहिन्या, तसेच मेहलीस ग्रंथी (शुक्राणू क्रियाशील होण्यास मदत करणारी ग्रंथी), लॉरर नाल (अंडवाहिनी व पीतकवाहिनी यांच्या संयोग स्थानापासून दूर जाणारा नाल) वगैरेंचा समावेश होतो. दोन्ही तंत्रे प्राण्यांच्या अधर (खालच्या) बाजूस असलेल्या जागेत म्हणजे जनन अलिंदात उघडतात. पट्टकृमीत खंडासारख्या दिसणाऱ्या, शरीराच्या प्रोग्लॉटिड नावाच्या प्रत्येक भागात (आ. १ आ) पक्वावस्थेत पुं-व स्त्री-जनन तंत्रे असतात. पुं-जनन तंत्रात सर्वत्र विखुरलेले पुटकासारखे अनेक वृषण असून त्यांपासून निघणाऱ्या बारीक वाहिन्या एकत्र येऊन एक रेतवाहिनी तयार होऊन ती शिस्नात उघडते. स्त्री-जनन तंत्रात दोन खंडांचा अंडाशय, एक अंडवाहिनी, एक पीतकवाहिनी व एक कोशासारखा अपरिवलित गर्भाशय, शुक्राणुकोश, योनिमार्ग वगैरेंचा समावेश होतो. दोन्ही तंत्रे जनन अलिंदात उघडतात.

नेमॅटोडा संघात सामान्यतः नर व मादी असे एकलिंगी प्राणी आढळतात. उदा., जंतामध्ये नर मादीहून कमी लांब असून त्याच्या शेपटीचा भाग वाकडा असतो. तिथे मैथुन-कंटिकांची एक जोडी असते. (आ. १ इ). एक लांबट वृषण, रेतवाहिनी, काहीसा फुगीर रेताशय, एक स्खलनवाहिनी ह्यांनी बनलेले पुं-जनन तंत्र शेवटी मागील बाजूच्या एका जागेत म्हणजे अवस्करात उघडते. स्त्री-जनन तंत्रात दोन दोऱ्यासारखे बारीक व खूपच संवलित अंडाशय, दोन अंडवाहिन्या, दोन जोडसर गर्भाशय, एक योनिमार्ग इत्यादींचा समावेश होतो. (आ. १ ई).

आ. २. पृष्ठवंशी प्राण्यांचे जनन तंत्र (पुं-जनन तंत्र) : (अ) उपास्थिमीन : (१) वृषण, (२) रेतवाहिनी, (३) रेताशय, (४) शुक्राणुधानी, (५) आलिंगक, (६) अवस्कर, (७) वृक्क, (८) ग्रसिका, (९) मलाशय; (आ) बेडूक (मूत्रजनन तंत्र) : (१) वृषण, (२) मूत्रजनन-वाहिनी, (३) मेदपिंड, (४) वृक्क, (५) मूत्राशय, (६) मूत्रजनन-रंध्र (७) अवस्कर; (इ) सरडा : (१) वृषण, (२) अधिवृषण, (३) रेतवाहिनी, (४) शिश्न, (५) मूत्रवाहिनी, (६) मूत्रजनन मार्ग, (७) अवस्कर, (८) शेपटी; (ई) उंदीर (मूत्रजनन तंत्र) : (१) अधिवृक्क ग्रंथी, (२) रेताशय, (३) वंक्षण नाल, (४) रेतवाहिनी, (५) वृषण, (६) अधिवृषण, (७) कंदमूत्रमार्ग ग्रंथी, (८) मुश्क, (९) शिश्न, (१०) मूत्रजनन-रंध्र, (११) शिश्नमणी ग्रंथी, (१२) अष्ठीला ग्रंथी, (१३) मूत्राशय, (१४) मूत्रवाहिनी, (१५) वृक्क.
आ. ३. पृष्ठवंशी प्राण्यांचे जननतंत्र (स्त्री-जनन तंत्र) : (अ) अस्थिमीन : (१) अंडनलिका, (२) अंडाणू, (३) स्त्री-जनन-रंध्र; (आ) कबूतर (मूत्रजनन तंत्र) : (१) अंडाशय, (२) अंडवाहिनीचे नरसाळे, (३) अंडवाहिनी, (४) अवस्कर, (५) वृक्क, (६) मूत्रवाहिनी; (इ) उंदीर (मूत्रजनन तंत्र) : (१) अंडाशय, (२) मूत्रवाहिनी, (३) मूत्राशय, (४) योनिमार्ग, (५) गुदद्वार, (६) मूत्रमार्ग, (७) गर्भाशय, (८) अंडवाहिनी, (९) वृक्क, (१०) अधिवृक्क ग्रंथी.

ॲनेलिडा संघातील गांडूळ ह्या खंडीभूत व उभयलिंगी प्राण्यात जनन तंत्राचा विस्तार (आ. १ उ) सु. सहा ते वीस ह्या खंडांत आढळतो. पुं-जनन तंत्रात वृषणांच्या दोन जोड्या, वृषणकोश, शुक्राणुग्राही  नसराळी, रेताशय, रेतवाहिन्या, अष्ठीला ग्रंथी व पूरक ग्रंथी ह्यांचा समावेश होतो स्त्री-जनन तंत्रात अंडाशयांची एक जोडी, अंडवाहक नसराळी, अंडवाहिन्या व शुक्राग्राहीकांच्या चार जोड्यांचा समावेश होतो. गांडूळांचे चौदा ते सोळा खंड हा भाग पक्वावस्थेत जाड झालेला असून उठून दिसतो, ह्यास पर्याणिका म्हणतात. ह्याच्या स्त्रावांचा अंडप्रावर तयार करण्यास उपयोग होतो.

झुरळ (आ. १ ऊ), नाकतोडा वगैरे आर्थ्रोपोडा संघातील कीटक किंवा शेवंड्यासारख्या कवचधारी प्राण्यात, तसेच मृदुकाय (मॉलस्का) संघातील शंखाची ⇨ गोगलगाय  (आ. १ ऐ) ह्या एकलिंगी प्राण्यातही पुं-व स्त्री-जनन तंत्रे बरीच प्रगतावस्थेत असतात. त्यांची संरचना आकृत्यांवरून सहज स्पष्ट होऊ शकेल.

पृष्ठवंशीत काही प्रमाणात ⇨उभयलिंगता  आढळत असली, तरी सामान्यतः प्राणी एकलिंगीच असतात. तसेच पुं-जनन तंत्र [उदा., उपास्थिमीन (आ. २ अ), बेडूक (आ. २ आ), सरडा (आ. २ इ) व उंदीर (आ. २ ई)] व स्त्री-जनन तंत्र [उदा., अस्थिमीन (आ. ३ अ), कबूतर  (आ. ३ आ), व उंदीर (आ. ३ इ)] प्रगतावस्थेत असतात. त्यांची संरचना आकृत्यांवरून सहज स्पष्ट होऊ शकेल, पैकी उपास्थिमीन, सरीसृप, (सरपटणारे प्राणी) व सस्तन प्राण्यांमध्ये नरात एक शिश्न किंवा शिश्नांची जोडी असते. अशा प्राण्यांत स्वाभाविकच आंतरनिषेचन होते  तर अस्थिमीन, उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे) प्राणी व पक्षी यांत अशी उपांगे नसतात. ह्या प्राण्यांत सामान्यतः नर व मादीचे अवस्कर एकमेकांजवळ आणले जातात. काहींत (उदा., पक्षी) आंतरनिषेचन आढळते, तर काहींत (उदा., बेडूक वगैरे उभयचर) बाह्य निषेचन आढळते. प्रगत सस्तन प्राणी वगळता बहुतेक सर्व पृष्ठवंशी प्राणी अंडी घालतात व भ्रूणाची (गर्भाची) वाढ अंड्यात होते. प्रगत सस्तन प्राण्यांत भ्रूणाची वाढ विशिष्ट पद्धतीने व ठराविक कालमर्यादेपर्यंत गर्भाशयात [⟶ गर्भाशय  भ्रूणाविज्ञान] होते. नंतर मादी पिलास (अर्भकास) जन्म देते.

बहुतेक प्रगत प्राण्यांत, विशेषतः पृष्ठवंशीतील सस्तन प्राण्यांत जनन तंत्राची वाढ आणि कार्यपद्धती ह्यांवर हॉर्मोनांमार्फत (वाहिनीविहीन ग्रंथींतून एकदम रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावामार्फत) अंतस्त्रावी तंत्राचे नियंत्रण असते. [→ अंतस्त्रावी ग्रंथि  हॉर्मोने].

परांजपे, स. य.

मानवी जनन तंत्र

मानवी जनन तंत्रे प्रगत जनन तंत्रे असून त्यांचे स्त्री-जनन तंत्र व पुं-जनन तंत्र असे दोन मुख्य प्रकार पडतात.

स्त्री जनन तंत्र : स्त्री-जननेंद्रियांचे मुख्यतः अंतर्गत व बाह्य असे दोन गट पडतात. अंतर्गत इंद्रिये स्त्रीच्या श्रोणिगुहेत (धडाच्या तळाशी हाडांच्या संयोगामुळे तयार झालेल्या हाडांनी वेष्टित असलेल्या पोकळीत) असतात. यांत अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय व योनी यांचा समावेश होतो. जघनास्थी (जांघेच्या हाडांच्या) चापाच्या खाली व समोरच्या भागात बाह्य जननेंद्रिये असते. बृहत्‌भगोष्ट (फटीसारख्या बाह्य भागाच्या दोहो बाजूंस असलेल्या केसाळ त्वचेच्या ओठासारख्या घड्या), लघुभगोष्ठ, भगशिश्न, (पुरुषातील शिश्नाशी समजात असलेला भाग), भगप्रकोष्ठ (लघुभगोष्ठांमधील व भगशिश्नाखालील जागा) व तेथील ग्रंथी यांनी बाह्य जननेंद्रिय तयार होते.

अंडाशय : गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंस एक एक असे एकूण दोन अंडाशय श्रोणिगुहेत असतात. ते काळपट लालसर असून त्यांचा आकार बदामाच्या बी सारखा असतो. मानवी शरीराच्या आकारमानाशी तुलना करता अंडाशय अतिशय लहान असतो.

भ्रूणांच्या अंडाशयाच्या पृष्ठभागावर घनाकार कोशिकांचा (पेशींचा) एक स्तर असतो. या कोशिकांपासून अंडपुटकांची (ज्यांत अंड असतात अशा लहान पिशव्यांची) उत्पत्ती होते म्हणून या स्तराला जननद अधिस्तर म्हणतात. या कोशिकांची वाढ होताना त्या अंडाशयाच्या गाभ्याकडे सरकू लागतात. त्यांतील काही कोशिकांचे आकारमान मोठे होते व त्यांच्यापासून अंड तयार होते. अशा अंडाच्या सभोवती लहान कोशिकांचा एक स्तर असतो, त्यास कणिका कला म्हणतात. नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या अंडाशयात ३०,००० ते ३,००,००० अंड असतात.

आ. ४. स्त्रीची अंतर्गत जननेंद्रिये : (१) गर्भाशय, (२) अंडाशय, (३) अंडवाहिनी, (४) गुदांत्र, (५) योनिमार्ग, (६) मूत्राशय.

तारुण्यावस्थेपूर्वी कणीय कोशिकांच्या वाढीमुळे अनेक अंडपुटक मोठे होतात, परंतु त्या सर्वांचा अपकर्ष (ऱ्हास) होतो. तारुण्यावस्था प्राप्त होताना अंडाशयात हजारो अंडपुटके असतात. त्यांपैकी पुढील जननक्षम काळात (३० ते ३५ वर्षे) फक्त थोड्यांचेच पूर्ण वाढलेल्या अंडांत रूपांतर होते. बहुतेक सर्व ऋतुचक्रांत जरी सुरुवातीस अनेक अंडपुटकांची वाढ दिसू लागते, तरी शेवटी त्यांच्यापैकी एकाच अंडपुटकाची पूर्ण वाढ होते. इतर अंडपुटकांचा अपकर्ष होतो. असे पूर्ण वाढ झालेले अंडपुटक अंडाशयाच्या पृष्ठभागावर येते व मग ते फुटते व त्याच्यातील अंड व त्याच्या भोवतालच्या काही लहान कोशिका उदरगुहेत (उदराच्या पोकळीत) टाकल्या जातात. अंडपुटकांची वाढ व फुटणे हे पोष ग्रंथीच्या (मेंदूच्या तळाशी असलेल्या ग्रंथीच्या) जनन ग्रंथिपोषक स्त्रावांवर म्हणजे बीजग्रंथी पोशी (गोनॅडोट्रॉफिक) व पुटकोद्दीपक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग) या हॉर्मोनांवर अवलंबून असते. असे अंडमोचन (अंड बाहेर पडणे) सर्वसाधारणतः ऋतुचक्रांच्या मध्यावर (तेराव्या ते चौदाव्या दिवशी) होत असते. चिकित्सेने अडमोचनाचा काळ निश्चित करता येतो.

अंडमोचनानंतर अंडपुटकातील उरलेल्या कोशिकांत बदल होऊन त्यांचे पीत पिंडामध्ये (पिवळसर पुंजात) रूपांतर होते. पीत पिंड प्रगर्भरक्षी (प्रोजेस्टेरॉन) हे हॉर्मोन तयार होते.

प्रगर्भरक्षीखेरीज अंडाशयात स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) व रिलॅक्‌झीन ही हॉर्मोने तयार होतात. [⟶  स्त्रीमदजन प्रगर्भरक्षी हॉर्मोने].

अंडाशयाचे आवर्ती कार्य स्वरूप अधोथॅलॅमसकडून (मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भागाकडून) पोष ग्रंथीमार्फत नियंत्रित होते. [⟶ अंडकोश].

अंडवाहिनी :  अंडवाहिनी सु. ११ ते १२·५ सेंमी, लांब असते. अशा दोन अंडवाहिन्या असतात. अंडवाहिनीच्या भित्ती मांसल असून आत श्लेष्मकलेचे (बुळबुळीत थराचे) अस्तर असते. तिच्या दोन टोकांपैकी अभिमध्य (मध्याच्या जवळचे) टोक गर्भाशयाला जोडलेले असते. दुसरे पार्श्वीय (बाजूचे) टोक उदरगुहेत मोकळे असते. पार्श्वीय टोक नसराळ्यासारखे फुगीर असून त्याच्या काठावर झालर असते. येथील रंध्र मोठे असते. उदरगुहेत विमुक्त झालेले अंड झालरीच्या हालचालीमुळे या रंध्रातून अंडवाहिनीत प्रवेश करते. श्लेष्मकलेवरील पक्ष्माभिकांमुळे (केसासारख्या वाढींमुळे) व अंडवाहिनीच्या भित्तीच्या आकुंचनामुळे अंड हळूहळू गर्भाशयाकडे ढकलले जाते.

अंडवाहिनीत अंडाच्या परिपक्वतेचा शेवटचा टप्पा सुरू होऊन संपतो. त्याच सुमारास शुक्राणू व अंडाचे संयुग्मन होऊन गर्भधारणा होते. अंड परीपक्व होण्यास लागणाऱ्या कालावधीत अंडवाहिनी अंडाला अडवून ठेवते. यालाच अंडवाहिनीचा अटकाव म्हणतात. हा अटकाव झाला नाही, तर अपरिपक्व अंड गर्भाशयात येईल व गर्भधारणा होणार नाही. कुटुंब नियोजनाच्या दृष्टीकोनातून ही क्रिया महत्त्वाची आहे.

निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंडाचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.

अंडाची निषेचनक्षमता अंडमोचनानंतर काही तासांपर्यंत असते. (६ ते ८ तास), तर गर्भाशयात आलेल्या शुक्राणूंची क्षमता २४ ते ४८ तास असते. योनिमार्गात राहिलेल्या शुक्राणूंचे चलनवलन मात्र एक तासात बंद होते. [⟶ अंडवाहिनी].

गर्भाशय : गर्भाशय ही स्नायूंची त्रिकोणाकृती पिशवी आहे. तिच्या अरेखित स्नायूच्या भित्तीची जाडी २ सेंमी. असते. तारुण्यावस्थेत त्याची लांबी ७·५ सेंमी. असून वजन सु. ७० ग्रॅ. असते.

वरचा मुख्य भाग व गर्भाशय ग्रीवा (मानेसारखा भाग) असे गर्भाशयाचे दोन भाग पडतात. या दोन्ही भागांना जोडणाऱ्या संकुचित भागास सेतू म्हणतात. अंडवाहिन्या गर्भाशयाला जेथे जोडलेल्या असतात, त्या रेषेच्या वरील भागास बुघ्न म्हणतात. गर्भधारणा झाल्यानंतरच्या तिसऱ्या तिमाहीत हा भाग मुख्यतः वाढून गर्भाला सामावून घेतो.

त्रिकोणाकृती गर्भाशयाचे निमुळते टोक ग्रीवेला जोडलेले असते. तेथेच ग्रीवेचे आतले रंध्र गर्भपोकळीत उघडलेले असते.

गर्भाशयाच्या भित्तीचा अंर्तभाग संयोजी (जोडणारे) ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) आणि अधिस्तर यांचा असतो, यास गर्भाशय अंतस्तर म्हणतात. ऋतुचक्रात अंतस्तरात बदल होत असतो. निषेचन न झाल्यास वृद्धिंगत अंतस्तराचा अपकर्ष होऊन तो गर्भाशयापासून सुटतो आणि ऋतुस्त्रावाच्या रूपाने शरीराबाहेर टाकला जातो. [⟶ ऋतुस्त्राव व ऋतुविकार]. स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी या हॉर्मोनांच्या आवर्ती स्त्रवणामुळे हे बदल घडून येतात. गर्भधारण झाल्यास हा स्तर जाड होऊन गर्भाचे रोपण व पोषण करतो. प्रसूतीच्या वेळी गर्भाशय स्नायूंच्या आकुंचनामुळे गर्भ शरीराबाहेर ढकलला जातो. [⟶ गर्भाशय].

योनिमार्ग : बाह्य जननेंद्रियापासून गर्भाशय ग्रीवेपर्यंतच्या मांसल पोकळीस योनिमार्ग म्हणतात. तरुण स्त्रीत तो सु. १० सेंमी. लांबीचा असतो. त्याच्या बाह्य जननेंद्रियाकडील टोकावर एक श्लेष्मल पडदा असतो. त्यास योनिच्छद म्हणतात. गर्भाशयाकडील भाग बंद असून तो ग्रीवेला चोहोबाजूंनी चिकटलेला असतो. संभोगाच्या वेळी योनी शिश्नास सामावून घेते व त्यावेळी टाकलेले वीर्य योनिमार्गात साठून राहते.

तारुण्यावस्था प्राप्त होताच योनिचा अधिस्तर जास्त स्तरीय होतो. त्यातील कोशिकांमध्ये ग्लायकोजेनाचा साठा होऊ लागतो. तेथे असलेल्या डॉडरलेन दंडाणूमुळे (डॉडरलेन यांनी शोधून काढलेल्या दंडाकार सूक्ष्मजंतूमुळे) ग्लायकोजेनाचे लॅक्टिक अम्लात रूपांतर होते व योनिमार्गातील द्रव्याचा pH अम्लीय होतो. [⟶ पीएच मूल्य]. अम्लतेमुळे तेथे इतर जंतूंची वाढ होत नाही. त्यास अपवाद म्हणजे ट्रिकोमोनास व्हजिनॅलीस  या जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) प्रजीवांचे (एककोशिक जीवांचे ) व मोनिलीया  कवकोचे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीचे) संक्रामण (संसर्ग) होय. [⟶ योनिमार्ग].

बाह्य जननेंद्रिय : भगशिश्न, भगप्रकोष्ठ, बृहत्‌भगोष्ठ, लघुभगोष्ठ व भगग्रंथी हे बाह्य जननेंद्रियाचे भाग आहेत. भगशिश्न हा उत्थानक्षम अवयव असून पुरुषाच्या शिश्नाशी समजात असते. पण पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. मूत्रमार्ग स्वतंत्र रीतीने बाह्य जननेंद्रियात उघडतो.

आ. ५. स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय : (१) भगशिश्‍न, (२) भगप्रकोष्ठ, (३) लघुभगोष्ठ, (४) बृहत्‌भगोष्ठ, (५) योनिद्वार, (६) योनिच्छद, (७) मूत्रमार्ग द्वार.

बृहत्‌भगोष्ठ त्वचेच्या घड्यांचे बनलेले असतात. लघुभगोष्ठांवर श्लेष्मकलेचे आवरण असते. वरच्या भागात ते भगशिश्नाला वेढतात. बृहत्‌भगोष्ठ धर्म ग्रंथी, त्वक्-स्नेह ग्रंथी (वंगणासारखा पदार्थ निर्माण करणाऱ्या ग्रंथी) व विशिष्ट प्रकारच्या कोशिकांशस्त्रावी (स्राव निर्माण करणाऱ्या कोशिकांचा काही भाग स्रावात समाविष्ट होणाऱ्या) ग्रंथी आढळतात.

लघुभगोष्ठांवर केस असतात. त्यावर थोड्याफार त्वक्-स्नेह ग्रंथी व घर्म ग्रंथी आढळतात. त्याच्या त्वचेच्या खाली वसा (चरबी) नसते. त्यात अनेक केशवाहिन्यांचे (सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे) जाळे आढळते. हा भाग अतिशय संवेदनाक्षम असून त्यात उत्थानक्षम ऊतक असते.

भगशिश्न हा उत्थानक्षम ऊतकांचा बनलेला असतो. त्यावर तंत्रिका तंतूचे (मज्जातंतूचे) जाळे असते. संभोगाच्या वेळी हा भाग चेतवला जातो.

लघुभगोष्ठाच्या पार्श्व भागात बार्थोलित ग्रंथी नावाचे दोन लालसर पिवळे पिंड असतात. त्यांच्या नलिका योनिरंध्राभोवती उघडतात. संभोगाच्या वेळी त्या चेतवल्याने त्यांतून पातळ बुळबुळीत स्राव बाहेर पडतो. व तो योनिमार्गाचे स्नेहन करतो. (वंगणासारखी क्रिया) करतो.

स्त्री-जनन तंत्राला मुख्यतः अनुकंपी (हालचाल निर्माण करणारे संदेश स्नायूंना पोहोचविणाऱ्या) तंत्रिका तंत्रापासून तंत्रिका गेलेल्या असतात. बाह्य जननेंद्रियाला बाह्य जननेंद्रिय (पुडेंडल) तंत्रिका व श्रोणिफलक-वंक्षण तंत्रिका यांचा पुरवठा होतो.

पुरुष-जनन तंत्र : पुरुष-जनन तंत्रात खालील भाग मोडतात. वृषण, अधिवृषण (प्रत्येक वृषणाच्या वरच्या भागाला जोडलेले लांबट पिंड), रेतवाहिनी, स्खलनवाहिनी व व शिश्न यांचा समावेश होतो. अष्ठीला ग्रंथी, कंदमूत्रमार्ग ग्रंथी (शिश्नातील मूत्रमार्गाच्या भोवती असणाऱ्या स्पंजासारख्या ऊतकातील फुगीर भागाजवळील ग्रंथी, कौपर ग्रंथी) व रेताशय ही पूरक इंद्रिये होत.

वृषण : हे पुरुषाचे आद्य जननेंद्रिय आहे. यात असलेल्या रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन होते. वृषणातील अंतराली (मधल्या फटीमध्ये असणाऱ्या) कोशिकांपासून टेस्टोस्टेरोन या हॉर्मोनाची उत्पत्ती होते.

रेतोत्पादक नलिका वृषणजालाला जोडल्या जाऊन त्यापासून दहा-बारा नलिका निघतात. त्यांच्या वेटोळ्यांनी अधिवृषणाचे शीर्ष तयार होते. या सर्व नलिका शेवटी एका नलिकेस जोडलेल्या असून आणि त्यापासून अधिवृषणाचे शरीर व पृच्छ तयार होते आणि त्याचेच रेतवाहिनीत रुपांतर होते. रेतवाहिनी स्खलनवाहिनीला मिळते. त्यांच्यात अष्ठीला ग्रंथी व रेताशय नलिका उघडतात. प्रत्येक रेताशयापासून निघणारी नलिका व त्या बाजूची रेतवाहिनी मिळून एकेक स्खलनवाहिनी बनते. प्रत्येक स्खलनवाहिनी २ सेंमी. लांबीची असून अष्ठीला ग्रंथीतून जाणाऱ्या मूत्रमार्गामध्ये एका उंचवट्यावर त्या उघडतात.

शुक्राणू व या विविध ग्रंथीचा स्राव म्हणजेच वीर्य होय. वीर्याचे मूत्रमार्गावाटे शरीराबाहेर स्खलन होते.

वृषण श्रोणिगुहा सोडून मुष्कात (पिशवीसारख्या भागात) उतरल्यामुळे तेथील कमी तापमानात शुक्राणूंचे उत्पादन चांगले होते. मुष्कामुळे स्थानिक तापमान नियंत्रित ठेवता येते.

शुक्राणूंचे उत्पादन कार्यक्षमतेने होण्याकरीता टेस्टोस्टेरोन व इतर हॉर्मोनांची आवश्यकता असते [⟶  वृषण].

मैथुनेंद्रिये : स्त्रीच्या योनिमार्गात रेताचे स्खलन करण्याचे कार्य मैथुनेंद्रिये करतात. याकरिता पुरुषातील शिश्नाचा उपयोग होतो. शिश्न उत्थानक्षम कुहरी काय (शिश्नाच्या मागील बाजूकडील उत्थानक्षम व मधून मधून पोकळ्या असलेल्या ऊतकाचा स्तंभ) व छिद्रिष्ट काय (शिश्नातील मूत्रमार्गाच्याभोवती असणारे स्पंजासारखे ऊतक) यांनी तयार होते. त्याच्या पुढच्या फुगीर भागास शिश्नमणी म्हणतात. शिश्नाला त्वचेचे आवरण नसते. शिश्नमण्यावरील त्वचेचे आवरण मोकळे असते. त्यास शिश्नमणिच्छद म्हणतात.

आ. ६. पुरुषातील मूत्र-जनन तंत्र : (१) शिश्‍न द्वार, (२) शिश्‍नमणिच्छद, (३) शिश्‍नमणि, (४) शिश्‍न, (५) कुहरी काय, (६) अष्ठीला ग्रंथी, (७) रेतवाहिनी, (८) मूत्राशय, (९) स्खलनवाहिनी, (१०) रेताशय, (११) गुदांत्र, (१२) गुदद्वार, (१३) कंदमूत्रमार्ग ग्रंथी (कौपर ग्रंथी), (१४) अधिवृषण, (१५) वृषण, (१६) मुष्क.

शिश्नास रक्ताचा मुबलक पुरवठा असतो. परानुकंपी तंत्रिका तंतूच्या [⟶ तंत्रिका तंत्र] प्रेरणेने शिश्नाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रोहिणिका विस्फारतात. त्यामुळे स्पंजासारख्या असलेल्या कुहरी काय व छिद्रिष्ट काय ऊतकांत रक्त शिरून ते खूप फुगतात. शिवाय शिश्नपृष्ठावरील नीला दबल्या जाऊन शिश्नातून परत जाणाऱ्या रक्ताला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शिश्न फुगून मोठे व ताठ होते. ही क्रिया प्रतिक्षेपी (उत्तेजनाला प्रतिसाद म्हणून आपोआप होणारी वा अनैच्छिक) क्रियेने मेरुरज्जुमार्फत (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या दोरीसारख्या तंत्रिकेमार्फत) होत असली, तरी या प्रतिक्षेपी क्रियेची तीव्रता वाढण्यास किंवा तिचे दमन करण्यास मेंदू व इतर शरीर भागांतून येणाऱ्या संवेदना महत्त्वाच्या असतात. शिश्नमणी संवेदनाक्षम आहे. त्याच्या चेतनेने प्रतिक्षेपी क्रिया सुरू होऊ शकते.

वीर्यस्खलन होण्यास अनुकंपी तंत्रिकांची [⟶ तंत्रिका तंत्र] प्रेरणा कारणीभूत होते. यांच्या प्रेरणेने रेताशय, अष्ठीला ग्रंथी, अधिवृषण व शुक्रवाहक आकुंचन पावतात व वीर्याचे स्खलन होते. अशावेळी अनुकंपी प्रेरणेने मूत्राशयाचा परिसंकोची स्नायू आकुंचन पावल्याने वीर्य मूत्राशयात प्रवेश करत नाही. [⟶ शिश्न].

रेताशय : यांची जोडी असते. हे स्नायुमय सर्पिल नलिकांचे बनलेले असते. प्रत्येक रेताशयाची बाह्य, मध्य व अंतस्थ अशी तीन आवरणे असतात. बाह्य आवरण अवकाशी ऊतकांचे, मध्य स्नायूंचे व अंतस्थ सतंभाकार कोशिकायुक्त अधिस्तराचे असते. अंतस्थ आवरणापासून पिवळसर दाट क्षारीय (अल्कलाइन) स्राव तयार होतो. वीर्य बव्हंशी या स्रावाचे बनलेले असते.

अष्ठीला ग्रंथी :ही स्नायुमय ग्रंथी आहे. हिच्यात लहान लहान पर्णाकृती पोकळ्या असतात. तेथे तयार झालेला स्राव अनेक नलिकांवाटे स्खलनवाहिनीत येतो. हा स्राव पातळ व थोडा अम्लीय (pH ६.४) असतो. त्यात कॅल्शियम सायट्रेटे व अम्ल फॉस्फेटेज एंझाइम [⟶ एंझाइमे] जास्त प्रमाणात असतात. वीर्याला येणारा विशिष्ट वास या स्रावामुळे येतो. [⟶ अष्ठीला ग्रंथी].

कंदमूत्रमार्ग ग्रंथी : हिचा स्राव बुळबुळीत व  श्लेष्मल असतो. हा मूत्रमार्गात टाकला जातो.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, जनन तंत्राचे कार्य सुरळीत होण्यास हॉर्मोने, तसेच तंत्रिका तंत्राचे संतुलित नियंत्रण महत्त्वाचे असते. हॉर्मोनांपैकी स्त्रीमदजन, प्रगर्भरक्षी, व पोष ग्रंथीचे जनन ग्रंथी पोषक स्राव अतिशय महत्त्वाचे आहेत. तंत्रिका तंत्रापैकी अधोथॅलॅमस, तसेच अस्वायत्त तंत्रिका तंत्र व काही प्रमाणात स्वायत्त तंत्रिका तंत्र यांचे नियंत्रण महत्त्वाचे आहे [⟶ तंत्रिका तंत्र].

जनन तंत्राचे भ्रूणविज्ञान : जननेंद्रियाचे परिवर्धन व मूत्रोत्पादक इंद्रियांचे परिवर्धन यांचा निकटचा संबंध असतो. पृष्ठवंशी प्राण्यात जनन ग्रंथीच्या विभेदनाशी (पूर्णपणे विशिष्ट गुणधर्म प्राप्त होणाऱ्या प्रक्रियेशी) मध्यवृक्काचा (भ्रूणाच्या उत्सर्जन इंद्रियांचा) संबंध असतो.

जनन ग्रंथी :आद्यजनन कोशिका अंतस्तरापासून उत्पन्न होतात. त्यांची उत्पत्ती पीतककोशाकडून होते. समविभाजनाने [⟶ कोशिका] त्यांची संख्या वाढते. अमीबीय गतीने (अमीबा या एककोशिक जीवाप्रमाणे जीवद्रव्याचे तात्पुरते फुगवटे तयार करून निर्माण होणाऱ्या गतीने) त्या कोशिका सरकत मध्यवृक्क कंगोऱ्याच्या अभिमध्य भागात येतात. येथूनच जननेंद्रियांची वाढ होते.

मध्यवृक्काच्या अभिमध्य भागावर उदरगुहीय कोशिकांचे अनेक स्तर जमू लागतात. त्यांच्या अनुदैर्घ्य (आडव्या) वाढीमुळे तेथे मध्यवृक्क कंगोरा तयार होतो. त्या कंगोऱ्यावर पुढे अनुदैर्घ्य चर आल्याने त्याचे अभिमध्य व पार्श्व असे दोन भाग पडतात. अभिमध्य भागास जननांग दुमड किंवा वळी व पार्श्वभागास नलिकाकार दुमड किंवा वळी म्हणतात. नलिकाकार दुमडीत मध्यवृक्क व उपमध्यवृक्क नलिकांचा समावेश असतो.

भ्रूणाच्या सातव्या आठवड्यापर्यंत या भागात कोणताच बदल आढळत नाही. त्यानंतर अधिस्तरापासून कोशिकांचे स्तंभ तयार होतात. भ्रूण-वृषणात आद्यजनन कोशिका या स्तंभाबरोबर आतल्या भागात जातात. भ्रूण-अंडाशयात मात्र आद्यजनन कोशिकांपैकी बऱ्याच कोशिका पृष्ठभागावर अधिस्तराखालीच राहतात. मागाहून भ्रूणमध्यस्तर वृषणातील स्तंभ पृष्ठभागापासून अलग करतात. अंडाशयात अशी अवस्था नसते.

वृषण :वर वर्णिलेले वृषण-कोशिकास्तंभ वृषण नाभिकेकडे (वृषणातील खड्ड्यासारख्या भागाकडे ) एकत्र येऊन परस्परांना मिळतात. त्यापासून वृषण जाल तयार होते. वृषण जालापासून निघणाऱ्या १०–१२ नलिकांच्या वेटोळ्याने अधिवृषण तयार होतो. उरलेल्या कोशिकास्तंभापासून रेतोत्पादक नलिका तयार होतात. स्तंभकोशिकांच्या बरोबर आत आलेल्या मध्यस्तरातील काही कोशिकांपासून अंतराली कोशिका तयार होतात.

वृषण जाल भाग मध्यवृक्क नलिकेशी जोडला जातो. मध्यवृक्कापासून अधिवृषण नलिका व शुक्रवाहक तयार होतात.

अंडाशय :सुरुवातीस अंडाशय वृषणासारखाच दिसतो. अंडाशयातील पुढील बदल मंदगतीने होत असतात. आत उतरलेल्या जनन स्तंभाचे जनन कोशिकासमूहात रूपांतर होते. असे समूह तंतुमय पडद्याने विलग केले जातात. जनन कोशिकासमूहात विभेदन होऊन आद्यजनन कोशिकांपासून आलेल्या अंडाभोवती कणमय स्तरांचा कोश तयार करतात. अशा रीतीने आद्य अंडपुटक तयार होतात.

काहींच्या मते सर्वच आद्य अंडपुटकाचा अपकर्ष होतो. त्यानंतर उदरगुहेतून आलेल्या कोशिका अंडाची दुसरी पिढी तयार करतात. पण काहींच्या मते पुढे तयार होणारे अंड हे आद्यजनन कोशिकांपासूनच उत्पन्न होतात व उदरगुहेतून आलेल्या कोशिकांपासून चपट्या कणिका कोशिका मिळतात व अंडपुटक तयार होतात. प्रत्येक पुटक प्रौढ अंडाशयाचा क्रियाशील एकक असतो. आद्यजनन कोशिका पीतक कोशापासून आलेल्या असतात.

जनन तंत्राची उत्पत्ती :जनन कंगोऱ्याच्या पार्श्वभागातील नलिकाकार दुमडीपासून कोशिकांचा स्तंभ भ्रूणाच्या पश्च टोकाकडे वाढू लागतो. हा रज्जू वोल्फियन वाहिनीच्या (मध्यवृक्कातील ज्या वाहिनीचे पुरुषात रेतवाहिनीत रूपांतर होते व स्त्रीत जी जवळजवळ नाहीशी होते तिच्या) पार्श्वभागातून जातो. या रज्जूचे वाहिनीत रूपांतर होते, तिला म्यूलेरियन किंवा उपमध्यवृक्क वाहिनी म्हणतात. म्यूलेरियन वाहिनीपासून अंडवाहिनी, गर्भाशय व योनी तयार होतात.

जेव्हा मध्यवृक्कातील कोशिका गुच्छांचा व नलिकांचा अपकर्ष होतो तेव्हा म्यूलेरियन व वोल्फियन वाहिन्या उदराच्या षृष्ठीय भित्तीपासून पर्युदर-पदरांनी (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थरांनी ) टांगल्या जातात. हा पर्युदर श्रोणिगुहेत दुसऱ्या बाजूच्या पदराशी मध्यरेषेत जोडला जाऊन त्यापासून जनन-पट तयार होतो. तो पश्च आंत्र (आतडे) व मूत्रजनन कोटर (मध्यवृक्कापासून निघणाऱ्या वाहिन्या ज्यात येतात असा लांबट पिशवीसारखा भाग) यांच्यामध्ये असतो. पश्च आंत्रापासून मलाशय व मूत्रजनन कोटरापासून मूत्राशय व मूत्रवाहिनीचा विकास होतो.

या पटात म्यूलेरियन वाहिनी मध्यरेषेकडे वोल्फियन वाहिनी ओलांडून येते व मध्यरेषेत विरुद्ध म्यूलेरियन वाहिनीशी जोडली जाते. त्या पश्च दिशेने व नंतर समोर वळतात व मूत्रजनन कोटराच्या खालच्या व पश्च भित्तीला चिकटतात. त्यामुळे कोटरात एक उंचवटा दिसतो. त्यास म्यूलेरियन उंचवटा म्हणतात.

म्यूलेरियन वाहिन्या मध्यरेषेत जोडलेल्या असतात तेव्हा त्यांत रंध्र नसते. पुढे त्यांत रंध्र तयार होते व मग त्यास मूत्रजनन नाल म्हणतात. त्यातील आतल्या अधिस्तरापासून गर्भाशय व योनीचा अंतस्तर तयार होतो. त्याच्या भोवतालच्या मध्यस्तरापासून त्यांचे स्नायू तयार होतात. म्यूलेरियन उंचवटा योनिच्छदाची जागा दर्शवितो. मूत्रजनन कोटराच्या म्यूलेरियन उंचवट्याच्या वरच्या भागापासून मूत्रमार्ग तयार होतो, तर खालचा भाग पसरट व उथळ राहून त्यापासून भग (स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय) तयार होते. वोल्फियन वाहिन्यांचा स्त्रीगर्भात अपकर्ष होतो.

बाह्य जननेंद्रिये : मूत्रजनन कोटर पश्च आंत्राचा अंधवर्ध (बाहेरच्या टोकाशी बंद असलेली नळी किंवा पिशवी) असते. त्यापासून मूत्राशय, मूत्रमार्ग व भगप्रकोष्ठ तयार होते. हे वर आलेलेच आहे. पुढे हा अंधवर्ध पश्च आंत्रापासून मध्यस्तर पडद्याने अलग केला जातो. या पडद्यापासून एक उंचवटा मध्यरेषेत तयार होतो त्यास आद्यजननेंद्रिय गुलिका म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन दोन वळ्या दिसतात. त्यांतल्या आतल्या वळीस जननेंद्रिय वळी व बाहेरचीस जननेंद्रिय फुगवटा म्हणतात. पश्च भागात ते एकमेकांस मिळतात व गुदद्वार आणि भगप्रकोष्ठ यांना अलग करतात. आद्यजननेंद्रिय गुलिकेपासून भगशिश्न व आतील वळीपासून लघुभगोष्ठाची घडण होते. बाहेरच्या वळीपासून बृहत्‌भगोष्ठ तयार होतात.

पुरुष जननेंद्रिय :पुरुष गर्भात वोल्फियन वाहिनीपासून पुरुष-जनन क्षेत्र तयार होते. म्यूलेरियन वाहिनी अकार्यक्षम असते. वोल्फियन वाहिनीपासून अधिवृषण, रेतवाहक, रेताशय व स्खलनवाहिनी तयार होतात.

बाह्य जननेंद्रिये आद्यजननेंद्रिय गुलिकेपासून तयार होतात. विभेदनापूर्वी भ्रूणावस्थेत दोन्ही लिंगांत हा उंचवटा सारखाच असतो. शिश्न तयार होताना शिश्नाचा मूत्रमार्ग शिश्नातच बंद होतो आणि आकारमानाने वाढतो. अष्ठीला ग्रंथीची उत्पत्ती मूत्रवाहिनीपासून होते.

लिंग निर्धारण :लिंग निर्धारण मुख्यतः लिंगगुणसूत्रावर [⟶ गुणसूत्र] अवलंबून असते. परंतु दृश्यमान लिंगाच्या लक्षणांवर हार्मोनांचा बराच परिणाम दिसून येतो. [⟶ प्रजोत्पादन भ्रूणविज्ञान].

जनन तंत्र विकृती

स्त्री जनन तंत्र : स्त्री-जनन तंत्राच्या प्रमुख विकृतीचे वर्गीकरण पुढील प्रकारे करता येईल : (१) विकृत भ्रूणीय वाढ, (२) श्रोणिगुहेच्या इजा व इंद्रियांचे स्थानांतर, (३) जंतुसंक्रामण, (४) अर्बुद (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेत निरुपयोगी असणाऱ्या गाठी), (५) गर्भाशयातून होणारा विकृत रक्तस्त्राव, (६) गर्भधारणेबद्दलच्या विकृती.

विकृत भ्रूणीय वाढ : अंडाशयाची जन्मजात अनुपस्थिती असल्यास स्त्रीनुरूप स्तनग्रंथीची वाढ, नितंबाची वाढ व इतर स्त्रीलिंगी लक्षणे दिसणार नाहीत. त्या स्त्रीस ऋतुस्राव येणार नाही.

अंडाशयाची अनुपस्थिती यौवनापूर्वी रोगाने झाल्यास वरीलप्रमाणेच लक्षणे दिसतात. यौवनानंतर अंडाशय नाश पावल्यास ऋतुचक्र बंद पडते, वांझपणा येतो व ऋतुविकृती काळातील बदल घडून येतात.

गर्भाशयाची अपूर्ण वाढ, त्याचे द्विभाजन, द्विकोटर गर्भाशय, रंध्र नसलेला योनिमार्ग वगैरे अनेक विकृती आढळतात. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सुधारणा करता येते.

गुणसूत्रांच्या विकृतीमुळे होणाऱ्या विकृतीत क्लाइन फेल्टर सिंड्रोम (लक्षणसमूह) आणि टर्नर सिंड्रोम, हिजडेपणा इ. विकृतींचा समावेश होतो [⟶ आनुवंशिकी].

श्रोणिगुहेच्या इजा व जननेंद्रियांचे स्थानांतर : शरीरातील इतर भागांवरील इजेचे जसे परिणाम दिसतात, तसे येथेही दिसतात. काही विशिष्ट विकृती इजेमुळे येथे उत्पन्न होतात. त्यांत योनि-मूत्राशय नाडीव्रण (खोलवर गेलेला वळसेदार व्रण), मलाशय-योनी नाडीव्रण व गर्भाशयास इजा यांचा समावेश असतो. योनिमार्गात गर्भपाताकरिता अशिक्षित व्यक्तीने घातलेल्या काठ्या किंवा सळ्यांमुळे अनेक वेळा अशा गंभीर इजा होतात. योग्य शस्त्रक्रियेने त्यावर इलाज करावा लागतो. श्रोणितलातील स्नायूंच्या कमजोरीमुळे व आधार देणारे बंध नष्ट झाल्यामुळे गर्भाशयाचे स्थानांतर होते. हे मुख्यतः बहुप्रसवा स्त्रीमध्ये होते. शस्त्रक्रिया हाच यावरील हमखास उपाय आहे.

जंतुसंक्रामण :भगशोथ (बाह्य जननेंद्रियांची दाहयुक्त सूज), योनिशोथ, गर्भाशयशोथ, अंडवाहिनीशोथ जंतूच्या संक्रामणामुळे होऊ शकतात. अनेक जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. ट्रिपोनेमा पॅलिडम, गोनोकॉकस, ड्यूक्रे दंडाणू इत्यादींमुळे होणारे उपदंश, परमा, मृदुरतिव्रण इ. संभोग संसर्गजन्य रोग [⟶ गुप्तरोग], क्षय व गोलाणूंमुळे (गोलाकार सूक्ष्मजंतूमुळे ) होणारे रोग दिसतात.

यांव्यतिरिक्त कवकामुळे होणारे मोनिलियासिस व गजकर्ण हे रोगही आढळतात.

प्रसूती होताना किंवा गर्भपात झाल्यावर ग्रीवेवर होणाऱ्या संक्रामणाने तेथे चिरकारी (दीर्घकालीन) शोथ होतो. त्यातून पांढरट व पूयुक्त स्राव अंगावर जातो.

गर्भाशयाच्या अंतस्तराचा शोथ अनेक जंतूंच्या संसर्गामुळे होतो. त्यांत स्ट्रेप्टोकॉकस फीकॅलिस, एश्चेरिकिया कोलाय, स्ट्रेप्टोकॉकस पायोजिनीस, क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय, गोनोकॉकस  इत्यादींचा समावेश होतो. असाच शोथ अंडवाहिनीत पसरतो.

यावरील चिकित्सा करण्याचा अगोदर रोगनिदान करावे लागते. त्यानंतर ज्या प्रकारचे संसर्ग जंतू आढळतील त्या प्रकारची प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे व इतर साहाय्यक औषधे देतात.

अर्बुदे :गर्भाशयात तसेच अंडाशयात निरनिराळ्या प्रकारची अर्बुदे आढळतात. त्यांचे प्रकार ती जेथे उद्‌भवतील तेथील ऊतकप्रकारांवर अवलंबून असतात [⟶ अर्बुदविज्ञान]. त्यांतील काही कर्करोग अर्बुदे असतात. गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग पुष्कळ प्रमाणात आढळतो. लवकर व योग्य निदान झाल्यास व शस्त्रक्रियेने विकृती बरी होते. कर्करोगग्रस्त अर्बुदांची विकृती फार पुढे गेली असल्यास, किरणोत्सर्ग (भेदक किरण वा कण यांचा उपयोग करणाऱ्या) चिकित्सेने तसेच क्लोरॅमबोसिल, मिथोट्रिक्सेट इ. कोशिका-विषारी (विशिष्ट कोशिकांवर विषारी परिणाम करणाऱ्या) औषधांच्या साहाय्याने विकृती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

गर्भाशयातून होणारे विकृत रक्तस्त्राव :यांची अनेक स्थानिक व व्यापक कारणे आहेत.

(१) स्थानिक : श्रोणिगुहेतील स्थानिक विकृतीमुळे. उदा., तंत्वार्बुद, गर्भाशय अंतःस्तरातील मोड, अंडवाहिनीशोथ, परम्यामुळे होणारा तीव्र गर्भाशयांतर शोथ, जनन तंत्रमार्गाचा क्षय इत्यादींमध्ये विकृत रक्तस्त्राव होतो.

(२) व्यापक : अवटु-आधिक्य (मुख्य श्वासनलिकेच्या पुढे व दोन्ही बाजूंना असणाऱ्या अंतःस्रावी ग्रंथींची जादा क्रियाशीलता) तसेच अवटु-न्यूनता मासिक अतिस्रावाचा प्रथमावस्थेत कारणीभूत असतात. रक्तार्बुद बिंबाणुन्यूनताजन्य नीलारुणी रोग [⟶ नीलारुणी रोग] इ. रक्तदोषांत अतिस्त्राव आढळतो.

(३) जनन ग्रंथीच्या हॉर्मोनांचे संतुलन बिघडल्यास : अशा प्रकारचे रक्तस्राव अनेक आहेत. उदा. ऋतुचक्राच्या मध्यावर होणारा रक्तस्राव, अनार्तव (स्राव अजिबात वा दीर्घकाल न होणे), अतिस्राव इ. विकृती आढळतात.

यांच्या निदानासाठी योग्य शारीरीक तपासणी, गर्भाशय अंतःस्तराचे ऊतक परीक्षण इत्यादींचा उपयोग केला जातो. निदानाप्रमाणे चिकित्सा बदलते. अंतःस्तर खरवडून टाकणे, स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी या हॉर्मोनांचा उपयोग करून कृत्रिम रीतीने ऋतुचक्राचे नियंत्रण काही काळ करणे, त्याचबरोबर पांडुरोग (ॲनिमिया) व इतर संसर्गावर उपचार करणे हे उपाय करतात.

गर्भधारणेबद्दलच्या विकृती :वंध्यत्व हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न यात मोडतो. याव्यतिरिक्त गर्भाशय बाह्य गर्भरोपण उदा. अंडवाहिनीतील गर्भरोपण, उदरगुहेतील गर्भरोपण व गर्भाशयातील विकृत गर्भरोपण यांचा समावेश होतो. [⟶ गर्भारपणा वंध्यत्व].

पुरुष-जनन तंत्र : पुरुष-जनन तंत्राच्या प्रमुख विकृतींचे पुढील प्रकारे वर्गीकरण करता येईल : (१) वृषण विकृती, (२) वंध्यत्व, (३) अष्ठीला ग्रंथी विकृती, (४) मूत्रमार्ग विकृती, (५) शिश्न विकृती.

वृषण विकृती :(अ) गुप्तवृषणता : वृषण मुष्कात न उतरल्यामुळे शुक्राणुजननावर परिणाम होतो. (आ) यौवनापूर्वी वृषणोच्छेदन केल्यास किंवा वृषणातील हॉर्मोन उत्पादन करणाऱ्या कोशिकांचा नाश झाल्यास क्लीबाभता येते. या विकारात लैंगिक उपलक्षणे दिसत नाहीत. कामवासनेचा अभाव, शरीराची अवास्तव वाढ व स्त्रैणत्व येते. दाढी, मिशा व इतर ठिकाणच्या केसांची वाढ होत नाही [⟶ वृषण].

वंध्यत्व :पुरुषात वंध्यत्व येण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (अ) वीर्यमार्गात अडथळा, कमजोर शुक्राणूची वाढ किंवा विकृत व अपुरी वाढ. (आ) गालगुंडाच्या विषाणूंमुळे झालेला वृषणशोथ किंवा आघातजन्य शोथ. (इ) मारक अर्बुद : सेमिनोमा (जननद अधिस्तरातील कोशिकांचे स्त्री व पुरुष कोशिकांत विभेदन न होता त्यांच्यापासून तयार झालेले अर्बुद ), कर्करोग, वृषण जलसंचय (वृषण पटलांमध्ये पाणी साचणे) इ. कारणांनी झालेली मारक अर्बुदे. (ई) अधिवृषणशोथ प्रमेह (परमा) गोलाणु-संक्रामणामुळे उद्‌भवतो. क्षयरोग जंतूंमुळे नलिका बंद पडतात.

अष्ठीला ग्रंथी विकृती :अष्ठीला ग्रंथिशोथ, सौम्य वाढ, खडे बनणे, कर्करोग अशा अनेक प्रकारच्या विकृती आढळतात [⟶ अष्ठीला ग्रंथि].

मूत्रमार्ग विकृती :मूत्रमार्गशोथ मुख्यतः प्रमेह गोलाणूंमुळे होतो.

शिश्न विकृती : शिश्नाग्रशोथ, अरुंद मूत्रमार्ग, अस्वाभाविक मूत्रमार्ग, गरमीमुळे होणारा प्राथमिक व्रण, कर्करोग इत्यादी [⟶ शिश्न].

भालेराव, कमल य.; सलगर, द. चि.

संदर्भ : 1. Chapman, G. Barker, W. B. Zoology, London, 1964.

2. Clayton, S. G. Fraser, D. Lewis, T. L. T., Eds. Gynaecology, Aberdeen, 1974.

3. Davies, D. V. Davies, F., Ed. Gray’s Anatomy, London, 1962.

4. Dawn, C. S. Textbook of Gynaecology, Calcutta, 1972.

5. Kamat , D. N. Life of Animals, Poona, 1964.

6. Kotpal, R. L Agarwal, S. K. Khetarpal, R. P. Modern Textbook of Zoology  : Invertebrates, Meerut, 1974.

7. Masani, K. M. A Textbook of Gynaecology, Bombay, 1960.

8. Parkar, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, 2 Vols., London 1960.

9. Waheley, Sir C. Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.