सार्स : (SARS सिव्हीअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ). एक विषाणुजन्य विकार. श्वसन प्रणालीच्या या विकारामधील लक्षणांची विविधता आणि गांभीर्य लक्षात आल्यावर प्रारंभीपासूनच त्याची ओळख सार्स (तीव्र किंवा गंभीर अल्पकालिक श्वसन संलक्षण) या नावाने होऊ लागली. करोना व्हायरस या वर्गातील या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याची शंका फेब्रुवारी २००३ मध्ये प्रथम चीनमध्ये प्रकट झाली.तिची खात्री पटून उपाययोजना होईपर्यंत सार्सचे संक्रामण विमान प्रवाशांमार्फत झपाट्याने पसरू लागले. जुलै २००३ पर्यंत जगातील सु. २५ देशांमधील अंदाजे साडेआठ हजार व्यक्तींना या रोगाची लागण होऊन ८०० व्यक्तींचा मृत्यू ओढवला. जागतिक आरोग्य संघटनेचा पुढाकार आणि सर्व राष्ट्रांचे सहकार्य यांचा परिणाम होऊन ही साथ काही महिन्यांतच आटोक्यात आली.

सार्सच्या संक्रामणामुळे ८–१० दिवसांत लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खूप ताप येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे व धाप लागणे यांसारखी लक्षणे श्वसन प्रणालीत दिसू लागतात. त्याचप्रमाणे खोकला आणि शिंका यांच्यामुळे श्वसनमार्गातून जो स्राव सूक्ष्म थेंबांच्या रूपात बाहेर फेकला जातो, त्यातून विषाणूंचा प्रसार होऊ लागतो. हे थेंब सु. एक मी.पर्यंत दूर पोहोचत असल्यामुळे आसपासच्या व्यक्ती, वस्तू आणि अशा वस्तूंना स्पर्श करणाऱ्या व्यक्ती यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो. तीव्र श्वसन संक्रामणामुळे रक्तातील ऑक्सिजनाची न्यूनता, हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येणे, मेंदूत ऑक्सिजनाची न्यूनता इ. परिणामांमुळे मृत्यू ओढवू शकतो. लक्षणांनुसार उपचार, योग्य ती शुश्रूषा आणि प्रतिजैविकांचा (अँटिबायॉटिक पदार्थांचा) उपयोग यांच्या मदतीने रुग्ण काही दिवसांत पूर्ण बरा होऊ शकतो. सुमारे दहा दिवसांपूर्वी सार्सच्या रुग्णांशी संपर्क आला असल्यास किंवा सार्सग्रस्त प्रदेशातून आगमन झाले असल्यास, हे उपाय या विकाराची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अवलंबणे शक्य असते.

सार्सच्या प्रतिबंधासाठी रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती, शुश्रूषा करणारे कर्मचारी आणि इतर संभाव्य रुग्ण यांनी चेहऱ्यावर विशिष्ट जाडीच्या कापडाचे किंवा अन्य प्रकारच्या वस्त्रांचे मुखाच्छादन वापरणे इष्ट असते. तसेच रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंवर विषाणूंचे अस्तित्व असण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा वस्तूंना स्पर्श केल्यास वारंवार हात स्वच्छ धुणे आणि आपल्या हातांनी चेहऱ्यास स्पर्श करावयाचे टाळणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. रुग्णास इतरांपासून अलग ठेवून त्यालाही खोकताना किंवा शिंकताना चेहरा झाकून घेण्याची सूचना द्यावी. रुग्णाचा संपर्क कमीतकमी व्यक्तींशी येऊ द्यावा. त्याने वापरलेली भांडी, चमचे व वस्तू इतरांनी वापरू नयेत. सार्सग्रस्त प्रदेशातील प्रवास टाळावा आणि अशा प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची सूचना आरोग्याधिकाऱ्यांना त्वरित दिली जावी.

श्रोत्री, दि. शं.