पाव्हलॉव्ह ,  इव्हान  प्यिट्रॉव्ह्यिच  : (१४ सप्टेंबर १८४९ – २७ फेब्रुवारी १९३६). रशियन शरीरक्रियावैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ. रशियन शरीरक्रियावैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ. कुत्रा आणि इतर प्राण्यांमधील ⇨  प्रतिक्षेपी क्रियेविषयीच्या  सुसंबद्ध प्रयोगात्मक संशोधनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध असून प्रयोगशाळेत प्राण्यांवरील शस्त्रक्रिया –विभाग सुरू करणारे पहिले शास्त्रज्ञ होत. पचनक्रियेतील स्त्रावक क्रियासंबंधीच्या संशोधनाबद्दल त्यांना १९०४ सालचे शरीरक्रियाविज्ञानातील नोबेल पारितोषिक देण्यात आले [⇨ पचन तंत्र].

इव्हाव प्यिट्रॉव्ह्यिच पाव्हलॉव्ह

त्यांचा जन्म मॉस्को प्रांतातील ऱ्यझान या गावी झाला. त्यांचे वडील धर्मोपदेशक असल्यामुळे सुरुवातीस काही काळ त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले व ते चालू असतानाच १८७० मध्ये त्यांनी सेंट पीटर्झबर्ग (हल्लीचे लेनिनग्राड) विद्यापीठात रसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान या विषयांच्या अभ्यासास सुरुवात केली. तेथे त्यांनी तंत्रिकांच्या (मज्जांच्या) रुधिराभिसरणावरील प्रभावासंबंधी संशोधन केले. अग्निपिंडावर (उदराच्या वरच्या भागात असलेल्या आणि पचनक्रियेत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या ग्रंथीवर) नियंत्रण ठेवणाऱ्या तंत्रिकांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १८७५ मध्ये सुवर्णपदक मिळाले. त्याच वर्षी पहिली पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शरीरक्रियाविज्ञानसंबंधी अधिक ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी मिलिटरी मेडिकल ॲकॅडेमीमध्ये प्रवेश घेतला. ॲकॅडेमीच्या पशुवैद्यकीय विभागातील शरीरक्रियाविज्ञान प्रयोगशाळेत रुधिराभिसरणाच्या शरीरक्रियाविज्ञानासंबंधी पाव्हलॉव्ह यांनी संशोधन केले व त्याच वेळी त्यांचा एस्.पी. बोटकीन या तंत्रिकाविज्ञांशी संबंध आला. १८७८ – ९० या काळात पाव्हलॉव्ह यांनी बोटकीन यांच्या रुग्णालयातील शरीरक्रियावैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून काम केले आणि तेथेच रुधिराभिसरण व पचनक्रिया यांसंबंधीच्या शरीरक्रियाविज्ञानाविषयी संशोधन केले. तेथेच त्यांना प्रतिक्षेपी क्रियांतील बिघाड व शारीरिक अस्वास्थ्य यांच्यातील संबंधाची कल्पना सुचली. १८७९ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. १८८३ मध्ये हृदयाच्या अपवाही तंत्रिकांसंबंधीच्या त्यांच्या प्रबंधाला मान्यता मिळून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. १८८४ – ८६ या काळात त्यांना जर्मनीत लाइपसिक येथे कार्ल लूटव्हिस्व यांच्या व ब्रेस्लौ येथे रूडोल्फ हायडेनहाइन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी ‘वायली शिष्यवृत्ती’ मिळाली. १८८३ साली मिलिटरी मेडिकल ॲकॅडेमीमध्ये त्यांची शरीरक्रियाविज्ञानाचे व्याख्याते म्हणून व १८९० मध्ये औषधिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १८९१ साली इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्पेरिमेंटल मेडिसिन या संस्थेतील शरीरक्रियाविज्ञान विभागाचे ते संचालक झाले. येथे त्यांनी पचनक्रियेच्या शरीरक्रियाविज्ञानाविषयी संशोधन केले व ते १८९७ मध्ये प्रसिद्ध झाले. १८९५ साली ॲकॅडेमीच्या शरीरक्रियाविज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली आणि  १९२५ पर्यंत त्यांनी याच पदावर काम केले. उर्वरित आयुष्यात त्यांनी सोव्हिएट ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिऑलॉजी या संस्थेत (या संस्थेला नंतर पाव्हलॉव्ह यांचे नाव देण्यात आले) तसेच इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्पेरिमेंटल मेडिसिन व लेनिनग्राडजवळील कोल्टूशी (आता पाव्हलॉव्हो) येथील जीववैज्ञानिक केंद्र या संस्थांमध्ये कार्य केले. १८८८ पासून त्यांनी स्वतंत्र संशोधनास सुरुवात केली व १८९० पर्यंत हृद्-शरीरक्रियाविज्ञान व रक्तदाब या विषयांवर संशोधन केले. हे संशोधन करताना ते प्राण्यांवरील शस्त्रक्रियांचे एक निष्णात शस्त्रक्रियाविशारद बनले. त्यामुळे कुत्र्याच्या मांडीतील मोठ्या रोहिणीत शलाका सहज बसवून कोणत्याही शुद्धिहारकांच्या प्रभावाखाली नसलेल्या त्या प्राण्याच्या निरनिराळ्या उद्दीपकांमुळे होणारे रक्तदाबातील फरक अभ्यासणे शक्य झाले.

कुत्र्याच्या हृदयाला पुरवठा करणाऱ्या सर्व अतिसूक्ष्म तंत्रिकांचे ते अतिशय उत्तम विच्छेदन करीत.

त्यांचे लक्ष १८९८ ते १९३० या काळात ‘अभिसंहित प्रतिक्षेप’ (कंडिशन्ड रिफ्लेक्स) या विषयाकडे गेले होते. सतत व वारंवार मिळालेल्या शिक्षणामुळे तयार होणाऱ्या प्रतिक्षेपाला अभिसंहित प्रतिक्षेप म्हणतात. उदा., कुत्र्यांचे पिलू सुरुवातीस दूध चाटू लागताच त्याच्या लाला ग्रंथी लाळ स्रवू लागतात. ही एक प्रतिक्षेपी क्रियाच असून ती नैसर्गिक किंवा अनाभिसंहित असते परंतु तेच पिलू जसे मोठे होते व वारंवार दूध पिऊ लागते तसे दुधाचा वास व रंग यांची सांगड ते दुधाच्या चवीशी जोडते. यामुळे केवळ दूध नजरेस पडताच किंवा वासानेही लाळ स्रवू लागते. ही दुसऱ्या प्रकारची क्रियाही प्रतिक्षेपीय असते. मात्र ती पूर्व-शिक्षणाने तयार झाल्यामुळे तिला ‘अभिसंहित प्रतिक्षेप’ म्हणतात.

नैसर्गिक उद्दीपकामुळे होणारी प्रतिक्षेपी क्रिया, सहचारी उद्दीपकाशी तसेच उत्तरोत्तर इतर उद्दीपकांशी देखील अभिसंहित करता येते. अभिसंधानाचे काही काळपर्यंत विलोपन व नंरत पुनरुज्जीवन होऊ शकते हे दर्शविणारे त्यांचे प्रयोग इतर शास्त्रज्ञांनाही मार्गदर्शक ठरले. ‘प्रतिक्षेपी क्रियांचे अभिसंधान’ या संकल्पनेचा आधार घेऊन जे.बी. वॉटसन व त्यांच्या अनुयायांनी मानवी वर्तनात घडून येणाऱ्या परिवर्तनाची अर्थात ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेची साक्षात निरीक्षणनिष्ठ भूमिकेवरून उपपत्ती देण्याचा प्रयत्न केला [→ ज्ञानसंपादन].

प्रतिक्षेपी क्रियांवर संशोधन करीत असतानाच १९१८ च्या सुमारास त्यांच्या पाहण्यास काही मानवी चित्तभ्रमाचे रोगी झाले. शरीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टिकोनातून मनोविकृतींचा अभ्यास उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले. त्या दृष्टीने प्रयोग करीत असताना त्यांनी ‘प्रयोगजनित मज्जाविकृती’ [⇨ मज्जाविकृति] हा प्राण्यांविषयी महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यानंतर त्यांनी प्राण्यातील व मानवातील काही इंद्रिय बिघाडविरहित विकृतींमधील साम्य दाखवून दिले. मानवातील छिन्नमानस ही विकृती एक प्रकारची चिरकारी संमोहनावस्थाच असून प्रमस्तिष्कातील कोशिकांच्या दुर्बलतेपासून उद‌्भवते, असा सिद्धांत त्यांनी मांडला [⇨ मनोविकृतिविज्ञान].

पाव्हलॉव्ह यांचे प्रमुख ग्रंथ (इंग्रजीत भाषांतरित) पुढीलप्रमाणे आहेत. लेक्चर्स ऑन द वर्क ऑफ द प्रिन्सिपल डायजेस्टिव्ह ग्लँड्स (१८९७, इं.भा. १९५५), लेक्चर्स ऑन कंडिशन्ड रिफ्लेक्सेस (१९०३, इ.भा. १९२८), लेक्चर्स ऑन कंडिशन्ड रिफ्लेक्सेस : ट्वेंटीफाइव्ह इसर्स ऑफ ऑवजेक्टिव्ह स्टडी ऑफ हायर नर्व्ह ॲक्टिव्हिटी (बिहेवियर) ऑफ ॲनिमल्स-२ खंड (१९२३ इं.भा. १९२८–४१), कंडिशन्ड रिफ्लेक्सेस : ॲन इनव्हेस्टिगेशन ऑफ द फिजिऑलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेरेब्रल कॉटेंक्स (१९२७, इं.भा. १९६०).

प्रयोगशाळेतील कामाच्या वक्तशीरपणाबद्दल ते प्रसिद्ध होते. त्यांचे संशोधन कार्य आमरण चालू होते. त्यांच्या प्रयोगशाळेच्या वाढीकरिता वयाच्या ८५ व्या वर्षी सोव्हिएट सरकारने मोठी रक्कम दिली आणि त्यांना वैयक्तिक निवृत्तिवेतन म्हणून २०,००० रूबल दिले. ते रशियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (१९०६), लंडनची रॉयल सोसायटी (१९०७)  व तेथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स (१९२८) या संस्थांचे सदस्य होते. १९१५ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली सुवर्णपदक मिळाले. ते लेनिनग्राड येथे न्यूमोनियाने मरण पावले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लेनिनग्राड येथे स्मारक उभारलेले आहे.

संदर्भ : 1.  Asratyan, E.A. Ivan Petrovich Pavlov : His Life and Work, Moscow, 1974. 2.  Wells H.K. Ivan, P. Pavlov : Toward a Scientific Psychology and Psychiatry, New York, 1956.

भालेराव, य.त्र्यं.