रेचके : मलोत्सर्जनास [⟶ मलोत्सर्ग] पुष्टी देणाऱ्या औषधांना रेचके अथवा विरेचके म्हणतात. ⇨मलावरोधावरीलच नव्हे, तर कित्येक रोगांवर एक हमखास गुणकारी उपचार म्हणून रेचक औषधांचा उपयोग मानव अनादिकालापासून करीत आला आहे. दैनंदिन जीवनात प्रकृतिस्वास्थाकरिता दररोज मलोत्सर्जन आवश्यक आहे हा गैरसमज रेचकांना अवास्तव महत्व देण्यास कारणीभूत ठरला. परिणामी मध्ययुगीन (इ.स.सु. ५०० ते १५००) औषधोपचार पद्धतीत रेचनांना महत्व प्राप्त झाले . गैरसमजुतीपायी फ्रान्सचे राजे तेरावे लुई (१६०१–४३) यांनी एका वर्षात २१२ वेळा ⇨बस्तीचा व २१५ वेळा रेचकांचा उपयोग केल्याची नोंद आहे. व्हिक्टोरिया राणी यांच्या काळात (१८१९–१९०१) हे वेड इंग्लंड व अमेरिकेतही पसरले. मलोत्सर्जनासंबंधीच्या गैरसमजुती आजही काही प्रमाणात टिकून आहेत. ठराविक दिवशी न चुकता रेचक घेण्याची पद्धत चुकीची असूनसुध्दा आजही पाळली जाते.
काही निरोगी व्यक्तींना दिवसातून तीन वेळा, तर काहींना आठवड्यातून एकदाच मलोत्सर्जन होणे प्राकृतिक (सर्वसामान्य) असू शकते. रेचकांचा वापर बहुधा मलावरोधावर केला जातो. वस्तुतः रेचक वापरण्यापूर्वी मलावरोधाचे कारण समजणे आवश्यक असते. रेचके वैद्यकीय आदेशपत्राविना औषधी दुकानातून सहज मिळत असल्यामुळे त्यांचा गौरवापर अधिक प्रमाणात होतो.
वर्गीकरण : रेचकांचे वर्गीकरण सौम्य, मध्यम व तीव्र असे काही वेळा करण्यात येते. सौम्य रेचकाने व सारकाने मऊ कुंथावे न लागता फारसा पाण्याचा अपव्यय न होता मलोत्सर्जन होते. रेचकांचा उद्देश मलोत्सर्जनाची गती वाढविणे व ती क्रिया त्रासाशिवाय होण्यास मदत करणे हा असतो. तो साधण्याकरिता वापरावी लागणारी औषधे निरनिराळ्या प्रकारांनी क्रियाशील बनतात आणि त्यानुसार त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते आणि ते सामान्यपणे अधिक प्रचारात आहे.
विस्तारक औषधे : अन्न पचनानंतर आतड्यात शिल्लकउरणाऱ्या त्याज्य पदार्थांचे (म्हणजेच मलाचे) आकारमान ही औषधे वाढवतात. ⇨इसबगोल, ⇨आगर, तृणधान्याचा कोंडा, मिथिल सेल्युलोज, सोडियम कॉर्बाक्सिमिथिल सेल्युलोज यांचा विस्तारक रेचकांत समावेश होतो. आगर हे सागरी शैवलांपासून बनवितात व त्यात अपचनीय हेमिसेल्युलोजाचा मोठा भाग असून तो पाण्याच्या संपर्कात जेलीसारखा मऊ बनतो. गव्हाच्या पिठातील कोंड्यामुळे २०% सेल्युलोज असते. संस्कारित कोंडा चपातीच्या पीठात मिसळल्यास चव बिघडत नाही. उरलेली दोन्ही रेचके सेल्युलोजापासून बनविलेली अर्धसंश्लेषित (नैसर्गिक पदार्थ आरंभी घेऊन कृत्रिम रीतीने बनविलेली) व जलशोषणाचा गुणधर्म असलेली औषधे आहेत. या औषधांच्या आतड्यात पाणी रोखून धरण्याच्या गुणधर्मामुळे आतड्याचा क्रमसंकोच [⟶ पचन तंत्र] वाढून मलोत्सर्जनास मदत होते.
मल मऊ करणारी औषधे : यांमध्ये खनिज तेलापासून मिळविण्यात येणाऱ्या द्रव पॅराफीन या तेलकट पदार्थाचा सर्वाधिक वापर होतो. हायड्रोकार्बनांचे मिश्रण असलेल्या या द्रव पदार्थाच्या वंगणक्रियेमुळे मलोत्सर्जनास मदत होते. डाय-ऑक्टील सोडियम सल्फोसक्सिनेट हे औषध त्याच्या ⇨पृष्ठाताण कमी करण्याच्या गुणधर्मामुळे मल मऊ करण्यास मदत करते.
तर्षणक्रियाकारक औषधे : अत्यल्प अभिशोषणक्षम असलेल्या काही औषधांचे विद्राव आतड्यातील एकूण पातळ पदार्थांचे प्रमाण त्यांच्या
⇨तर्षणक्रियेमुळे वाढवितात. त्यामुळे लध्वांत्रातील (लहान आतड्यातील) मल बृहदांत्रात (मोठ्या आतड्यात) लवकर उतरतो आणि बृहदांत्राचा क्रमसंकोच वाढून औषध घेतल्यापासून तासाभरातही मलोत्सर्जन होते. मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम सल्फेट, तसेच मॅग्नेशियम, सोडियम व पोटॅशियम यांची इतर काही लवणे या प्रकारात मोडतात.
काही नेहमी वापरात असलेली रेचके
क्षोभक अथवा उद्दीपक औषधे : ही औषधे आतड्याच्या श्लेष्मकलेवर (बुळबुळीत पातळ अस्तरावर) क्षोभक परिणाम करून क्रमसंकोच वाढवतात. एरंडेल, सोनामुखी, कॅस्करा-सॅग्रेडा इत्यादींचा त्यात समावेश होतो.
⇨कॅलोमेल (मर्क्युरस क्लोराइड) हे औषध एकेकाळी लोकप्रिय व अतिशय वापरात होते परंतु त्याचे संभाव्य विषारी परिणाम फार भयंकर असल्याने ते आता पूर्णपणे वापरातून गेलेले आहे. फिनॉलप्थॅलीन हे औषध चॉकोलेट किंवा कँडीच्या स्वरूपात फार लोकप्रिय होते परंतु त्याचे दुष्परिणाम एवढे भयंकर आहेत की, त्यामुळे अतिसार, पोटशूळ, अधिकह्रषताजन्य (ॲलर्जीजन्य) त्वचेवरील पुरळ, गलितगात्रावस्था व मृत्यूही झाल्याचे आढळून आले आहे.
काही नेहमी वापरात असणारी रेचके कोष्टकात दिली आहेत.
उपयुक्तता : पुढील परिस्थितीत रेचकांचा उपयोग आवश्यक असतो : (१) ⇨मलावरोध या विकृतीत मलोत्सर्जनास मदतीकरिता. (२) काही औषधे आतड्यातील कृमींचा नाश करण्याऐवजी त्यांना शिथिल बनवितात. असे कृमी बाहेर पडण्याकरिता. (३) काही विषबाधांमध्ये विषारी परिणाम कमी करण्याकरिता. (४) ह्रदयविकाराच्या रूग्णांना मलोत्सर्जनासाठी कुंथण्याचे श्रम पडू नयेत म्हणून. (५) जठरांत्र मार्गाच्या (जठर, लध्वांत्र व बृहदांत्र यांनी मिळून बनणाऱ्या अन्न मार्गाच्या) क्ष-किरण तपासणीपूर्वी. (६) आतड्यावरील शस्त्रक्रियेपूर्वी. (७) ⇨मूळव्याध व ⇨भगंदर या विकारांत मल मऊ पडून मलोत्सर्जन सुलभ व विनासायास होण्याकरिता. (८) गर्भापणात शेवटच्या तिमाहीत मलोत्सर्जनासाठी जादा कुंथावे लागू नये म्हणून.
पुढील परिस्थितीत रेचक केव्हाही देऊ नये : (१) गंभीर ह्रदय विकार, (२) आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), (३) कारण अनिश्चित असलेला पोटशूळ व (४) ⇨आंत्ररोध.
रेचकांच्या अतिवापरामुळे पुढील दुष्परिणाम संभवतात: (१) सवय जडण्याचा संभव. (२) अपचन, मळमळ, क्षुधानाश इ. जठरांत्रासंबंधीचे उपद्रव. (३) जीवनसत्वे, खनिजे यांच्या अभिशोषणात बाधा. (४) ऊर्जानिर्मितीत व्यत्यय. (५) बृहदांत्राच्या पृष्ठीय रचनेत फरक पडून अंगग्रह (स्नायूंचे अनैच्छिक आणि अपसामान्य आकुंचन) निर्माण होणे. (६) रसायनांपासून बनविलेल्या काही रेचकांचे विषारी परिणाम संभवतात. मलावरोध व रेचकांचा जवळचा संबंध आहे, तसेच आहाराचाही आहे. या संदर्भातील आहारासंबंधीची माहिती ‘मलावरोध’ या नोंदीत दिली आहे.
मलोत्सर्गी अंतःस्थापित घन पदार्थ : मुले व बेशुध्दावस्थेतील रूग्ण यांच्या मलोत्सर्जनास मदत होण्याकरिता गुदद्वारातून गुदाशयात ठेवण्यासारखी औषधे विशिष्ट आकाराच्या गोळ्यांतून मिळतात. त्यांनाच मलोत्सर्गी अंतःस्थापित घन पदार्थ म्हणतात. भारतात बहुधा ग्लिसरीनयुक्त गोळ्या मिळतात. एका नव्या प्रकारात निर्जल सोडियम अम्ल फॉस्फेट व सोडियम बायकार्बोनेट यांचे मिश्रण असलेली गुदाशयात विरघळणारी गोळी तयार करण्यात आली आहे.या गोळीमुळे गुदाशयाच्या ओल्या श्लेष्मकलेच्या संपर्कात ३०० मिली. कार्बन डाय-ऑक्साइड मुक्त होतो व क्रमसंकोच वाढून मलोत्सर्जन होते. गुदाशयाच्या काही रोगांत विशेष औषधांनी युक्त असे अंतःस्थापित घन पदार्थ वापरतात.
संदर्भ :
- Laurence D. R.; Bennett, P. N., Clinical Pharmacology, Edinburgh, 1980.
- Rang, H. P.; Dale, M. M., Pharmacology Edinburgh, 1987.
- Satoskar, R. S., Bhandarkar, S. D., Pharmacology and Pharmacotherapeutics, Bombay, 1983.
- Wilson, A. and others Applied Pharmacology, Edinburgh, 1975.
लेखक : नाडकर्णी, सुरेश; भालेराव, य. त्र्यं.