चार्ल्स ब्रेंटन हगिन्झ

हगिन्झ, चार्ल्स ब्रेंटन : (२२ सप्टेंबर १९०१—१२ जानेवारी १९९७). कॅनडात जन्म झालेले अमेरिकन शल्यविशारद व मूत्रमार्ग रोगाचे तज्ञ. त्यांनी विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाशी हॉर्मोनांचे असलेले संबंध शोधून काढले. या संशोधनकार्यासाठी त्यांना १९६६ मध्ये मानवी वैद्यक अथवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨ फ्रान्सिस पेटन राउस (रॉस) यांच्यासमवेत विभागून मिळाले.

हगिन्झ यांचा जन्म हॅलिफॅक्स [नोव्हास्कोशा (एन. एस.), कॅनडा ] येथे झाला. त्यांचे शिक्षण वॉल्फव्हिले (एन. एस.) येथील ॲकॅडिया विद्यापीठात झाले. त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातू न एम्.डी. पदवी प्राप्त केली (१९२४). मिशिगन विद्यापीठातून त्यांनी शल्यतंत्राचे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर (१९२४—२७) ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी कर्करोगाच्या संशोधनासाठी असलेल्या बेन मे लॅबोरेटरीचे संचालक म्हणून काम पाहिले (१९५१—६९).

हगिन्झ हे पुरुषांतील मूत्रमार्ग व जननमार्ग या विषयांचे तज्ञ होते. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या लक्षात आले की, रुग्णांच्या पौरुषजनावर (अँड्रोजेन हॉर्मोनांवर) स्त्रीमदजनाचा (इस्ट्रोजेन हॉर्मोनांचा) वापर करून अष्ठीला ग्रंथीच्या कर्करोगाचा प्रतिरोध करता येणे शक्य आहे. या संशोधनावरून असे दिसून आले की, सामान्य देहकोशिकांप्रमाणेच काही कर्ककोशिका जिवंत राहण्यासाठी व वाढीसाठी हॉर्मोनांच्या संदेशांवर अवलंबून असतात. तसेच कर्ककोशिकांना हॉर्मोनांच्या योग्य संदेशांपासून दूर ठेवता आले, तर कर्कार्बुदाची वाढ काही अंशी तात्पुरतीतरी हळू करता येऊ शकते. १९५१ मध्ये त्यांनी असे दाखवून दिले की, स्तनांचा कर्करोग देखील विशिष्ट हॉर्मोनांवर अवलंबून आहे. इस्ट्रोजेन हॉर्मोनांचा स्रोत असलेले अंडकोश आणि अधिवृक्क ग्रंथी काढून टाकल्यामुळे काही रुग्णांच्या कर्करोग वाढीत लक्षणीय फरक पडलेला त्यांना दिसून आला. त्यांच्या कार्यावर आधारित अशा इस्ट्रोजेनांच्या उत्पादनास प्रतिबंध करणाऱ्या औषधांचा वापर करून स्तनाच्या कर्करोगावर महत्त्वाचे उपचार करता येतात.

हगिन्झ यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांतील काही पुढीलप्रमाणे आहेत : अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशन (१९३६ व १९४०), अमेरिकन कॅन्सर सोसायटी (१९५३) व रूडॉल्फ विर्शॉ सोसायटी (१९६४) या संस्थांची सुवर्णपदके; मिड्लसेक्स हॉस्पिटल, लंडन यांचे कम्फर्ट क्रूकशॅन्क पारितोषिक (१९५७); एडिंबरो युनिव्हर्सिटीचे कॅमेरॉन पारितोषिक (१९५८); न्यूयॉर्क ॲकॅडमी ऑफ मेडिसीनचे व्हॅलेन्टाइन पारितोषिक (१९६२); अमेरिकन थेराप्युटिक सोसायटीचाहंटर पुरस्कार (१९६२); युनिव्हर्सिटी ऑफ बोलोन्या याचा लॉरिया पुरस्कार (१९६४) इत्यादी.

हगिन्झ यांचे शिकागो (इलिनॉय) येथे निधन झाले.

भारस्कर, शिल्पा चं.