अंगस्थिती : शरीराच्या नैसर्गिक योग्य आणि सुखावह स्थितीला ‘अंगस्थिती’ असे म्हणतात. स्वस्थ बसणे, बसून काम करणे, उभे राहणे किंवा चालणे या सर्व वेळी स्नायूंना ताण न पडता काम योग्य प्रकारे होण्यासाठी सुयोग्य अंगस्थितीची फार जरूरी असते.
डौलदार किंवा ऐटीत चालणे-बसणे आणि भोंगळपणे, फेंगडे अथवा पोक काढून चालणे-बसणे यांमधील फरक सहज लक्षात येतो. सुयोग अशी अंगस्थिती कोणती, याबद्दल निश्चित व साचेबंद कल्पना सांगता येणार नाही परंतु बसले असताना पाठ ताठ राहील पण अवघडणार नाही, उभे राहिले असताना सर्व शरीर एका रेषेत व सुखावह राहील, अशी अंगस्थिती प्राकृत (स्वाभाविक) किंवा सुयोग्य समजली जाते. साधारणपणे वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत अंगस्थिती कायम होते.
अंगस्थिती सुयोग्य नसणे हे शरीराच्या विकृतीचे लक्षण असते. शारीरिक आणि मानसिक प्रकृती उत्तम असलेली व्यक्ती साधारणपणे डौलदार अंगस्थितीतच असते. विकृत अंगस्थितीला कारणीभूत असणाऱ्या घटना बहुधा बाल्यावस्थेतच सुरू होतात. तिला शारीरिक अथवा मानसिक कारणे असू शकतात. उदा., तळपायाचा अंगठा आणि टाच यांमधील उभी कमान तयार न होणे यासारख्या शारिरीक किंवा वारंवार उपेक्षा वा अवमान होत राहणे अशा मानसिक विकृतीमुळे अंगस्थिती बिघडू शकते. प्रौढावस्थेत पाठीत दुखणे, दोन मणक्यांमधील उपास्थिचक्र (मऊ चकती) स्थानभ्रष्ट होणे, श्रोणिसंधितंत्रिकाशोथ (मांडीच्या सांध्याच्या मागील तंत्रिकेला येणारी सूज), संधिशोथ (सांध्यांची सूज) इ. विकारांमुळे, तसेच अयोग्य पादत्राणे वापरण्यामुळेही अंगस्थिती विकृत होऊ शकते. साधारपणे वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत अंगस्थिती कायम होते.
![](/images/stories/khand1/1-21.gif)
भिंतीला टेकून उभे राहिले असताना दोन्ही अंसफलक (खांद्याचे मागील हाड) आणि श्रोणी (ढुंगण) भिंतीला टेकलेली असणे ही प्राकृत अंगस्थिती समजावी. प्राकृत अंगस्थितीमध्ये सर्व क्रियांसाठी करावी लागणारी स्नायूंची हालचाल सुलभ होते व शरीरात कोठेही अवास्तव ताण पडत नाही. अतिशय स्थूल व्यक्ती पोट व खांदे पुढे काढून चालतात त्यामुळे त्यांच्या कण्याचा खालचा भाग, गुडघे व पाय यांवर अकारण ताण पडतो. बसलेल्या स्थितीतही पृष्ठवंशाच्या (पाठीच्या कण्याच्या) टोकावर भार येईल असे बसल्यास पाठीच्या स्नायूंवर ताण पडतो, अंतस्त्ये (पोटातील इंद्रिये) दबली जातात आणि पायांतील रक्ताच्या परिवहनास अडथळा होतो.
बसून काम करीत असताना डोके, खांदे आणि श्रोणी एका सरळ रेषेत असावी, छाती थोडी वर उचलल्यासारखी असावी. चालताना पाय सरळ बरोबर पडतील अशी काळजी घ्यावी. फार वेळ उभे राहून करण्याचे काम असल्यास छाती वर उचलेली असावी. एका पावलाखाली थोडा उंच आधार घेतल्यास सर्व हालचाल सुखावह होते. अतिताठ अथवा अतिशिथिल या दोन्ही प्रकारांची अंगस्थिती टाळावी.
लहान मुलांच्या अंगस्थितीबद्दल काही तरुण आईबाप निष्कारण काळजी करतात. सु. नऊ वर्षे वयापर्यंत श्रोणीची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे मुले पोट काहीसे पुढे काढून चालतात.मुडदूस, सपाट पाऊल आणि पृष्ठवंशाला आलेली वक्रता ही विकृत अंगस्थितीची प्रमुख कारणे आहेत. नेत्रदोष आणि बहिरेपणा असलेल्या किंवा बुजरेपणा आणि भित्रेपणा या मानसिक दोषांमुळेही अंगस्थिती विकृत होऊ शकते. पावले वाकडी टाकून चालणे वगैरे लहानपणीच्या खोडी प्रौढपणी आपोआप नाहीशा होतात. विकृत अगंस्थिती असल्यास मुलावर रागावून त्याला बळेच सरळ बसण्यास वा चालण्यास सांगू नये त्यामुळे उपायापेक्षा अपायच संभवतो. अशा विकृत अंगस्थितीचे कारण शोधून काढणे व ते नाहीसे करणे हे फार महत्त्वाचे असते.
आपटे, ना. रा.