काळपुळी, संसर्गजन्य : (अँथ्रॅक्स). बॅसिलस अँथ्रॅसिस  या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगाला संसर्गजन्य काळपुळी असे म्हणतात. मेंढी, शेळी, डुक्कर, गाय वगैरे पाळीव जनावरांचा हा रोग आहे परंतु रोगी जनावरांशी संपर्क येणाऱ्या मनुष्यांसही हा रोग होऊ शकतो. रोगाने मेलेल्या जनावरांचे केस, लोकर, त्वचा व अस्थी यांमध्ये ह्या रोगाचे जंतू असतात. त्वचेवर झालेल्या क्षतामधून वा जखमेमधून या जंतूंचा मानवी शरीरात प्रवेश होत असल्यामुळे लोकरीची कामे करणाऱ्या लोकांत या रोगाचे प्रमाण अधिक दिसते म्हणून या रोगाला ऊर्णायत रोग असेही म्हणतात.

इतिहास : हा रोग प्राचीन काळापासून माहीत आहे. बायबलात त्याचा उल्लेख आढळतो. तसेच होमर, हिपॉक्राटीझ, प्लिनी वगैरे प्राचीन वैद्यांच्या लेखनातही त्याचे वर्णन आहे. या रोगाच्या साथी मध्ययुगात आलेल्या होत्या आणि त्यांचे वर्णनही त्या काळातील लेखनामध्ये आढळते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत यूरोपाच्या दक्षिण भागात या रोगाच्या भयंकर साथी येऊन मानव आणि पशूंची अतोनात हानी झाली. जगातील सर्व देशांत हा रोग दिसून येतो.

रोगजंतू : या रोगाच्या जंतूचे प्रथम वर्णन १८४९ मध्ये रॉयर आणि डीव्हेन यांनी केले. पुढे १८७७ मध्ये रॉबर्ट कॉख यांनी त्याचे सविस्तर वर्णन केले. १८८१ साली लूई पाश्चर यांनी या जंतूविरुद्ध लस तयार केली. जंतुशास्त्राचा पायाच त्यामुळे घातला गेला. हा रोगजंतू पाच ते दहा मायक्रॉन (एक मायक्रॉन =१०-३ मिमी.) लांब आणि एक ते १⋅६ मायक्रॉन जाड असतो. शरीरातून बाहेर पडल्यावर त्याचे बीजाणू स्वरूप (सूक्ष्मजंतूंची विरामी किंवा प्रतिरोधी अवस्था) तयार होते हे बीजाणू पुष्कळ काळ व विपरीत परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतात. त्या अवस्थेमध्ये ते पुष्कळ वर्षेपर्यंतही जमिनीत सुप्तावस्थेत असू शकतात. सूर्यप्रकाशामध्ये हे नाश पावत असले, तरी सामान्य जंतुनाशक औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. १२० से. तापमानाच्या वाफेत अथवा १६० ते १८० से. तापमानात मात्र त्यांचा नाश होतो.

रोगप्रसार : रोगी जनावरांचे केस, लोकर, हाडे, मांस अथवा दूषित माती यांचा संपर्क होऊन क्षतांमधून हे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे निर्जंतुक न केलेले ब्रश व चामड्याचे पदार्थ यांमुळे रोगप्रसार होऊ शकतो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जपानमधून आयात केलेल्या दाढी करण्याच्या ब्रशांमुळे पाश्चात्त्य राष्ट्रांच्या कित्येक सैनिकांमध्ये व नागरी प्रजेमध्ये सांसर्गिक काळपुळीच्या साथीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता.

लक्षणे : मनुष्यांत तीन प्रकारांची लक्षणे दिसतात : (१) त्वचेसंबंधी, (२) फुप्फुसासंबंधी आणि (३) आंत्रांसंबंधी (आतड्यांसंबंधी).

(१)      त्वचेसंबंधी लक्षणे सर्वांत जास्त प्रमाणात दिसतात. हात, दंड, खांदा, मान व पाठ यांपैकी कोठेतरी लहानशी पुळी येऊन ती आजूबाजूला वाढत जाते. ज्वर फार नसतो ग्रस्त भागातील ⇨ लसीका ग्रंथी  सुजतात. ही पुळी वाढत असताना तीमध्ये इतर जंतूंचा संसर्ग झाला नसल्यास तीमध्ये पू बहुधा होत नाही. पुळीभोवती शोफ (द्रवयुक्त सूज) येऊन सर्व त्वचा जाड व घट्ट होते. पुळीमधील विशिष्ट जंतूंचा रक्तामध्ये प्रवेश झाल्यास जंतुरक्तता (रक्तप्रवाहात मोठ्या प्रमाणावार जंतूंचे अतिक्रमण) होते व त्यामुळे शरीरात रक्तस्त्राव आणि शोफ होतो. काळपुळीच्या जंतूपासून बहिर्विषे (जंतू आपल्या शरीराबाहेर टाकत असलेली विषे) तयार होतात, परंतु त्यांच्यापासून काय विशिष्ट परिणाम होतो याबद्दल विशेष माहिती नाही.

(२)      फुप्फुसासंबंधीची लक्षणे बहुधा लोकर व केस यांच्यापासून वस्तू तयार करण्याच्या कारखान्यातील कामगारांमध्ये दिसतात. कारखान्यातील धुळीमधून तरंगणारे जंतू श्वासोच्छवासाबरोबर फुप्फुसात गेल्यास फुप्फुसशोथ (फुफ्फुसाची दाहयुक्त सूज) व परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील आवरणाची दाहयुक्त सूज) यांची सर्व लक्षणे दिसतात. हा प्रकार फार मारक असतो.

(३)      आंत्रांसंबंधीची लक्षणे फार कमी प्रमाणात दिसतात. चांगले शिजविले न गेलेले मांस खाण्यात आल्यास त्या मांसामधील जंतूंचा बहुधा जठररसातील अम्लामुळे नाश होतो, पण जर त्यांची संख्या फार असेल तर काही जंतू आंत्रात जाऊ शकतात व त्यांच्यामुळे उलट्या, पोटदुखी आणि अतिसार ही लक्षणे दिसतात. संसर्गित प्राण्यांच्या दुधातूनही हे जंतू मानवी आतड्यात प्रवेश करू शकतात.

निदान : झपाट्याने वाढत जाणाऱ्या पुळीबद्दल नेहमीच संशय असतो. त्यातही केस व लोकर या धंद्यांत काम करीत असल्याचे पूर्ववृत्त मिळाल्यास संशय बळावतो. पुळीतून सुईने रक्तरस (रक्तातील पिवळसर, न गोठणारा व पेशीरहित द्रव) शोषून घेऊन तो सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासल्यास कारक जंतू सापडतो. साथींच्या दिवसांत रक्तरसाच्या विशिष्ट परीक्षेमुळेही निदानास मदत होते.

चिकित्सा : त्वरित आणि अचूक निदान करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा वेळीच उपयोग केल्यास रोगी दगावण्याचा संभव फार कमी होतो. ही औषधे उपलब्ध होण्यापूर्वी या रोगाने दगावलेल्यांचे प्रमाण शेकडा २० ते ३० असे. आता प्रतिजैव औषधांचा त्वरित उपयोग होत असल्याने ते प्रमाण शेकडा एकपर्यंत उतरले आहे.

प्रतिबंध : लोकर, केस, कातडी यांच्यापासून संसर्ग होण्याचा संभव असल्यामुळे हे पदार्थ वापरण्यापूर्वी जंतुनाशक औषधे घातलेल्या पाण्याने धुऊन निर्जंतुक करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारखान्यातील धुळीपासून संरक्षण होण्यासाठी नाकातोंडावर जाळीदार कापड अथवा वायुमुखवटे (विषारी वायू शोषून घेणारे मुखवटे, रेस्पिरेटर) वापरावे.

मेंढ्या वगैरे जनावरांना प्रतिरक्षा (संसर्गापासून रक्षण) व्हावी म्हणून लूई पाश्चर यांनी एक लस तयार केली. तिचा उपयोग केल्यास त्या जनावरांना हा रोग होत नाही.

बापट, श्री. ह.

पशूंतील संसर्गजन्य काळपुळी : पशूंतील या रोगाला फाशी असेही म्हणतात. मेंढ्या, शेळ्या, गाई, बैल, म्हशी, घोडे ह्यांना हा रोग विशेषकरून होतो. मेंढ्यांमध्ये मारक स्वरूपात उद्‌भवतो. उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या आरंभी रोग उद्‌भवतो. रोगजंतूंनी दूषित झालेले चारापाणी सेवन केल्यामुळे अगर जखमेतून जंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यामुळे रोग उद्‌भवतो. तेथे त्यांची झपाट्याने वाढ होऊन जनावराला ताप येतो, ते अतिशय आजारते व थोड्याच दिवसांत मरते. रोगाने मेलेले जनावर जेथे पुरले असेल तेथे रोगाचे जंतू बीजाणू स्वरूपात राहतात. हे बीजाणू ऊन, वारा यांना दाद न देता अनेक वर्षे जिवंत राहू शकतात. त्यामुळे या रोगामुळे मेलेली जनावरे पुरलेली जागा पुष्कळ दिवस रोगदूषित असते. हे बीजाणू जमिनीतील किड्यांच्या माध्यमातून वर येऊन तेथे उगवलेले गवत दूषित करतात. शिवाय अशा जमिनीतून वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर जाऊन तेथील जमीन व गवत दूषित होते. हे गवत खाल्ल्याने जनावरांना रोग होतो. ओढ्या-नाल्यांच्या काठची काही चराऊ कुरणे रोगदूषित असल्याचे आढळून आले आहे कारण तेथे चरणारी गुरे, खेचरे, घोडी तेथील गवत खाऊन व पाणी पिऊन रोगास बळी पडलेली आहेत. पक्षी व कुत्री मेलेल्या दूषित जनावरांचे मांस व हाडे दूर नेऊन टाकतात, तसेच उंदीर, घुशी यांच्यामुळेही रोगजंतू पसरतात. रोगग्रस्त जनावर मेल्यानंतर त्याची चीरफाड करण्यास बंदी आहे. पण गैरसावधपणाने चीरफाड करीत असताना, हातांना इजा झाल्यास त्या जखमेतून रोगजंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. रोगाचे जंतू कातडीत बरेच दिवस जिवंत राहत असल्यामुळे कातडी कमावणाऱ्या लोकांनाही हा रोग होण्याचा संभव असतो. हे सर्व अपघात टाळण्यासाठी मेलेल्या जनावरांची कातडी, केस, लोकर वगैरे परदेशात पाठविण्यापूर्वी त्यांची काळजीपूर्वक तपासणी करून, ती रोगजंतुविरहित असल्याबद्दलचा अभिप्राय तज्ञ अधिकाऱ्यांना द्यावा लागतो.

लक्षणे : गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या वगैरे चारा खाऊन रवंथ करणारी जनावरे, रोगाने एकदम आजारतात. त्यांना ४१ ते ४२ से. ताप चढतो. जनावर थरथर कापते, चारा खाणे, रवंथ करणे, दूध देणे वगैरे बंद होते, श्वासोच्छवास जलद चालतो व रोगी बेहोष होतो. त्याला आचके येतात. गाभण जनावर गाभडते. डोळे लाल होतात, नाकाकानातून रक्त येते, रक्ताचे जुलाब होतात, मलूल होऊन पडून राहते व थोड्याच दिवसांत मरते. कधीकधी काहीही लक्षणे न आढळता जनावर सकाळी गोठ्यात एकदम मेलेलेच आढळते. काही वेळा जनावराच्या मानेवर, पाठीवर किंवा जांघेत सूज येते. मेंढ्यांना रोग झाला म्हणजे त्या थोड्याच वेळात गरगर फिरू लागतात व एकदम मरतात. घोड्यामध्ये पोटात कळा येऊन, ऊठबस करणे, जमिनीवर पडून पाय झाडणे, घाम येणे, मान, मांड्या वगैरे मांसल भागांवर सूज येणे ही लक्षणे दिसतात. ही सूज प्रथम गरम व दुखरी असते पण थोड्याच अवधीत ती थंड पडते व रोगी जनावर दोनतीन दिवसांत अशक्त होऊन मृत्यू पावते. रोगाने मेलेल्या जनावराचे मांस खाऊन डुकरांनाही रोग होतो. त्यांना ताप येऊन, गळ्यावर सूज येणे, तोंडातून फेस येणे, नरडे बंद होऊन गुदमरणे अशी लक्षणे झाल्यानंतर एक ते दीड दिवसात ती मरतात. कुत्री, मांजरे व पक्षी यांनाही मेलेल्या जनावराचे मांस खाऊन रोग होतो.

मरणोत्तर तपासणी : या रोगाने मेलेल्या जनावराची चीरफाड विशेष कारणासाठी करावी लागलीच तर ती अतिशय काळजीपूर्वक करतात व भोवतालची जागा साफ करून शरीराचे सर्व अवशेष जाळून किंवा पुरून टाकतात. तपासणीमध्ये नाकातून, गुदद्वारातून व कधीकधी कान, डोळे या अवयवांतून रक्त वहाताना आढळते. ते काळे आणि पातळ असते व गोठत नाही. सर्व अंग नासलेले व पोट अतिशय फुगलेले असते. मृत्यूनंतर शरीराला येणारा ताठरपणा येत नाही. कातडीखालील भाग रक्ताळलेला दिसतो. विशेष लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे प्लीहा (पानथरी) फार सुजलेली, लि‌बलिबीत व काळसर रक्ताने माखलेली आढळते. तसेच फुप्फुस, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) व इतर ग्रंथी रक्ताळलेल्या व सुजलेल्या असतात. रोगाचे स्वरूप ‌तीव्र असते तेव्हा तशी लक्षणे आढळतात, पण रोग सौम्य असून जनावर बरेच दिवसांनंतर मेले असले, तर वरील भागांवर तांबडे डाग विखुरलेले दिसतात प्लीहा मात्र पुष्कळ सुजलेली व रक्ताळलेली असते.


व्यवच्छेदक निदान : चांगले जनावर गोठ्यात किंवा कुरणात एकाएकी मेलेले आढळते. पुष्कळवेळा रोगाचे स्वरूप तीव्र असते व जनावराला फऱ्या रोग किंवा गळसुजीसारखा रोग झाल्यासारखे वाटते किंवा काही विषबाधा झाल्याचा संशय येतो. मरणापूर्वी कानाच्या नीलेतून काचेवर घेतलेले रक्त सूक्ष्मदर्शकाखाली तपासले तर रोगजंतू सापडतात. मरणानंतर मात्र ते शरीरातील हृदय, यकृत व प्लीहा या अवयवांत सापडतात. रोगाबद्दलचा संशय दूर करण्यासाठी मेलेल्या जनावराचे रक्त उंदीर किंवा गिनीपिग यांना टोचल्यास ती चोवीस तासाच्या आत मेली तर रोगाची निश्चिती होते.

रोग फलानुमान : हा रोग फार घातुक असल्यामुळे मृत्युप्रमाण मूल्यमापन जास्त आहे. ज्या भागातील जनावरांना रोगप्रतिकारशक्ती आलेली असते, तेथे मृत्युप्रमाण कमी असते पण जेथे रोग एकदम उद्‌भवतो तेथे रोगाने आजारलेली बहुतेक जनावरे म्हणजे शेकडा ९० ते १०० मृत्यू पावतात. सौम्य किंवा तीव्र स्वरूपानुसार मृत्युप्रमाण कमी-अधिक असते.

‌चिकित्सा : पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, टेरामायसीन, ऑरिओमायसीन ही प्रतिजैव औषधे रोग झाल्याबरोबर दिल्यास तीनचार दिवसांत रोगाला उतार पडतो. औषधाची मात्रा वयोमानाप्रमाणे टोचतात. तसेच रोगाविरुद्धचा रक्तरस नीलेत टोचतात म्हणजे चांगला उपयोग होतो. आजारी जनावरास आरामशीर जागेत निराळे ठेवून त्याची शुश्रूषा करतात. शेजारी असलेल्या जनावरांना वरील औषधे व रक्तरस थोड्या मात्रेत टोचतात म्हणजे त्यांना रोगाची बाधा होत नाही. बाकी सर्व गुरांना रोगावरील लस टोचतात म्हणजे त्यांना रोगप्रतिकारशक्ती येते.

प्रतिबंधक उपाय : रोगी जनावराच्या आजूबाजूची सर्व जनावरे दूर हलवतात व देखरेख ठेवून संशय येताच वर लिहिल्याप्रमाणे व्यवस्था करतात. मेलेल्या जनावराची विल्हेवाट फार कसोशीने करतात, कारण त्याच्या अंगातील रक्त जेथे पडेल तेथे रोगाचे बीजाणू पुष्कळ दिवस राहू शकतील. रक्ताने दूषित झालेली जागा जंतुनाशक औषधाने साफ करतात. मेलेल्या जनावराखाली आंथरलेला चारा, शेण वगैरे जिन्नस जनावराच्या मुडद्याबरोबर जाळतात किंवा जमिनीत खोल पुरून वरच्या थरावर चुनखडी टाकतात. मेलेले जनावर ज्या गाडीतून नेले असेल ती गाडीही जंतुनाशक औषधाने धुऊन साफ करतात.

खळदकर, त्रिं. रं.