औषधि चिकित्सा : रुग्णाला बरे वाटावे ह्यासाठी केलेला कोणताही उपचार चिकित्साविज्ञानात समाविष्ट होतो. अर्थातच असे करताना दर वेळेस औषध वापरण्यात येईलच असे नाही. भौतिकी चिकित्सा किंवा मानसोपचार करताना औषधे वापरली नाहीत तरी त्यांचा अंतर्भाव चिकित्साविज्ञानात होतो. औषधिवैज्ञानिक चिकित्साविज्ञानाच्या केवळ एका शाखेशीच जास्त संबंधित असतो, ती म्हणजे औषधिचिकित्सा होय. ह्यामध्ये जीवाच्या विकृतीवर रासायनिक व इतर द्रव्यांच्या परिणामाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे वैद्यांचा ह्या शाखेशी दृढ संबंध असतो, ह्यात शंकाच नाही. औषधे वापरून रुग्णावर उपचार केले जातात तेव्हा औषधिचिकित्सा योजण्यात आली असे म्हणतात. 

औषध म्हणजे काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर वाटते तेवढे सोपे नाही. बरे वाटत नसताना उपचारासाठी देण्यात आलेले रासायनिक द्रव्य म्हणजे औषध अशी सर्वसामान्य समजूत असते. पण औषध ह्या संज्ञेत पुढील गोष्टीही समाविष्ट केल्या जातात : (१) अधिकृत निघंटूत (विविध औषधिद्रव्यांसंबंधी माहिती देणाऱ्या अधिकृत ग्रंथात) दिलेली द्रव्ये (२) रोगाचे निदान, उपचार,प्रतिबंध किंवा रोग्याला होणारा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेली रासायनिक द्रव्ये व (३) शरीरातील ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रचना आणि कार्य ह्यांवर परिणाम घडवून आणणाऱ्या अन्नाव्यतिरिक्त गोष्टी.

रोग्याला औषध देताना मात्रा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. चिकित्सेमध्ये आवश्यक परिणाम घडवून आणण्यासाठी एकावेळी लागणारे औषधाचे परिमाण म्हणजे मात्रा असे म्हणता येईल. औषधांची परिणामतीव्रता ही त्यांची मात्रा व रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, अभिशोषणगती(रक्तात समाविष्ट होण्याची गती), उत्सर्गगती (शरीराबाहेर पडण्याची गती), रुग्णाची ग्राहिता(रुग्णाची औषध ग्रहण करण्याची क्षमता) आणि त्यावेळीच असलेल्या साहाय्यक किंवा विरोधक औषधांची उपस्थिती ह्या सर्वांवर अवलंबून असते.

औषधांचे प्रकार व देण्याच्या पद्धती विविध असतात पण चिकित्सादृष्ट्या त्यांचे तोषके (औषधीगुणधर्म नसलेले पण रोग्याच्या समाधानासाठी देण्यात आलेले पदार्थ) व कारके (कार्य करणारी द्रव्ये) असे मुख्य विभाग पडतात.

तोषक: ह्या संज्ञेवरूनच मानसिक पैलूलाच इतर कोणत्याही तर्क विचाराहून या औषधातअधिक महत्त्व असल्याचे प्रतीत होते. हा तोषक परिणाम एखाद्या औषधाच्या स्वरूपाशी किंवा देण्याच्या पद्धतीशी संबंधित असून त्याच्या औषधिविज्ञान विषयक किंवा दुसऱ्या कोणत्या विशिष्टगुणधर्माशी त्याचा अगदी संबंध नसतो. म्हणजेच तोषके औषधिवैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय असतात.

तोषक दिले असताना आपल्यासाठी काही तरी केले जात आहे व बरे होण्याचेच औषध दिले जात आहे ह्या कल्पनेनेच सुखावून रुग्णाचा त्रास कमी होतो. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा त्रास नाहीसा होऊ शकेल ह्याला काहीच मर्यादा नाहीत. त्याची परिणामकारकता किती वेळपर्यंत राहील हे मात्र रोग, रुग्ण व तोषकाचे स्वरूप ह्यांच्यावर अवलंबून असते. काही वैद्यांच्या मते अशा प्रकारे तोषकांचा वापर करणे हे समर्थनीय आहे, तर काहींच्या मते ही एक प्रकारची रुग्णाची फसवणूक असल्यामुळे हे निषिद्ध मानले पाहिजे. त्रासाचे मूळ कारण शारीरिक किंवा मानसिक कोणतेही असो, त्याची सुरुवात कशीही झालेली असो व गांभीर्य कितीही असो तोषकांचा परिणाम होऊ शकतो.

काही वेळा शर्करेसारख्या रोगविरुद्ध व पूर्णपणे निष्क्रिय अशा तोषकामुळेही काही रुग्णांना उलट्या, रेच, छातीत धडधडणे, छातीत दुखणे असा त्रास होतो तर बरेच वेळा मूळ होत असलेल्या त्रासाचेच वाढते प्रमाण दिसून येते. अशा वेळी खरोखरी उपयुक्त सक्रिय औषधांची परिणामकारकता कमी होते व त्यांची मात्रा वाढविल्याशिवाय पाहिजे असलेला परिणाम साधता येत नाही.

आपल्याला काय औषध देण्यात येत आहे हे जर रुग्णाला कळले तर त्याचा बरा वाईट परिणाम त्याच्या त्रास सोसण्यावर होतो. ह्यामुळे वैद्याने रुग्णाला औषधाबाबत पूर्णपणे अज्ञानात तरी ठेवले पाहिजे किंवा पूर्ण माहिती दिली पाहिजे. याबाबत जीवनसत्त्वाचे उदाहरण देता येईल. एखाद्या वैद्याने रुग्णाला व्यवस्थित तपासून निदान केल्यानंतर जीवनसत्त्वाच्या गोळ्या लिहून दिल्या तर साहजिकच आपल्याला काही विशेष झालेले नाही असे त्याला उमगेल व त्याला होणारा त्रासही अपेक्षेपेक्षा कमी होईल. तसेच एखाद्या औषधाची क्रिया चांगलीच जाणवणारी असेल तर त्याचाही तोषक परिणाम होऊ शकतो. जुलाबाचे औषध दिल्यावर भराभर रेच झाल्यास औषधाच्या परिणामकारकतेबद्दल रुग्णाला विश्वास वाटून बरे वाटू लागते. ह्यावेळी रेचकाची आवश्यकता असतेच असे मात्र नाही. तसेच  त्रासाची तीव्रता जेवढी जास्त तेवढी तोषकाची परिणामकारकता जास्त. एखाद्या रुग्णास अतिशय वेदना होत असताना काहीही तोषक दिला, तर त्याला थोडेसे समाधान वाटून बरे वाटू लागतेच हे  सिद्ध झालेले आहे.

शेकणे, अंग रगडणे ह्या गोष्टीही अतिशय परिणामकारक तोषक ठरतात. क्ष-किरण छायाचित्र  घेणे हे सुद्धा काही वेळा तोषक म्हणून परिणाम साध्य करते. वैद्य व रुग्ण यांचा संबंध व परस्पर विश्वास महत्त्वाचा असल्याने वैद्याचे व्यक्तिमत्त्व व रुग्णाशी संभाषण ह्या गोष्टींचाही तोषक परिणाम  कळत नकळत घडत असतोच. अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिलेली औषधे एवढेच काय, छोटीशी  शस्त्रक्रिया ह्यांचाही तोषक म्हणून चांगला परिणाम होऊ शकतो. एखाद्या वैद्याचा ‘हातगुण’ म्हणतात तो याच गोष्टीचा द्योतक म्हणावे लागेल.

कारक : शरीरातील निरनिराळ्या ऊतकांवर किंवा तंत्रांवर (संस्थांवर) कार्य करणारी द्रव्ये हीकारक औषधे होत. प्राण्यामध्ये व मानवामध्ये औषधांची परिणामकारकता बरीचशी सारखी असते.ह्यामुळे नवीन औषध वापरात यावयाच्या अगोदर इतर प्राण्यांवरील त्याच्या परिणामाचा पूर्ण अभ्यास केला जातो व नंतरच ते मानव रुग्णावर वापरतात. अर्थातच काही जीवरासायनिक फरकांमुळे एखाद्या औषधाचे वितरण व शरीरातील रूपांतर निरनिराळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे होऊ शकते.

अफूमुळे सामान्यपणे माणसाच्या केंद्रीय तंत्रिका तंत्राचे (मज्‍जासंस्थेचे) कार्य मंदावते, पण घोडा  व मांजर ह्या प्राण्यांत अफूमुळे उत्तेजनच होते. म्हणजेच एकाच औषधाच्या दोन अगदी भिन्न प्रक्रिया  दोन वेगवेगळ्या प्राण्यांत दिसून येतात. क्लोमिफेन ह्या औषधाने उंदीर व तत्सम प्राण्यांत अंडमोचनास (अंडाशयात अंडे तयार होऊन त्यातून बाहेर पडण्यास) प्रतिबंध होत असल्याचे  आढळून आले आहे. अर्थातच असे औषध स्त्रियांमध्ये वापरले, तर संततिप्रतिबंधक म्हणून त्याचा फार चांगला उपयोग होईल असे वाटले. पण स्त्रियांना हे औषध दिले असताना अंडमोचनास प्रतिबंध न  होता उलट ज्या स्त्रियांत ते होत नव्हते अशा स्त्रियांत देखील ते चालू झालेले आढळले.

रासायनी चिकित्सा हा एक चिकित्सेचाच भाग आहे. सांसर्गिक रोगांवर उपचार करण्याकरिता  म्हणजेच ज्या जंतूंमुळे किंवा परजीवींमुळे (दुसऱ्याच्या शरीरावर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे) रोग  उद्भवला त्यांचा नाश करण्यासाठी जेव्हा रासायनिक द्रव्ये वापरतात तेव्हा त्याला रासायनी चिकित्सा  असे म्हणतात [→ रासायनी चिकित्सा].

करंदीकर, श. म.