अष्ठीला ग्रंथि : (प्रोस्टेट ग्लँड). पुरुषाच्या प्रजोत्पादन तंत्राशी (व्यूहाशी) संबंधित अशी ग्रंथी. ही मूत्राशयाच्या खाली मूत्रनलिका व शुक्रप्रषेचिनी-वाहिनीभोवती (रेत बाहेर टाकणाऱ्या वाहिनीभोवती) असते. तिचे स्थूलमानाने अग्रखंड, पश्चखंड, दोन पार्श्वखंड व मध्यखंड असे भाग पडतात. हे सर्व खंड शुभ्र तंतूंनी बनलेल्या आवरणात बांधल्यासारखे असतात. ग्रंथीची लांबी अदमासे ३ सेंमी., जास्तीत जास्त रुंदी ३·५ ते ४·० सेंमी. व वजन सु. २० ग्रॅ. असते. ग्रंथिकोशिका (ग्रंथिपेशी), शुभ्रतंतुकोशिका व अनैच्छिक स्नायू यांनी ह्या ग्रंथीची रचना होते.

भ्रूणावस्थेत (विकासाच्या पूर्व अवस्थेतील बालजीवाच्या अवस्थेत) तिसऱ्या महिन्यात आदिम-मूत्रनलिकेच्या (अविकसित मूत्रनलिकेच्या) निकट भागापासून या ग्रंथीची उत्पत्ती होते. लैंगिक कार्यक्षमता येण्याच्या वेळी ती विशेष वाढते. वयाच्या विसाव्या वर्षाच्या सुमारास तिची वाढ पूर्ण होते व पंचेचाळीस ते पन्नास वय होईपर्यंत तिचा आकार तेवढाच राहतो. त्यानंतर मात्र तिचा आकार लहान तरी होत जातो किंवा ती वाढते. थोडीशी वाढ पूर्णपणे निरुपद्रवी राहू शकते, परंतु कधीकधी ग्रंथी मुठीएवढी मोठी होते. या वाढीमुळे मूत्रनलिकेवर येणाऱ्या दाबाने मूत्रप्रवाहास अडथळा होऊन मूत्राशय व वृक्क (मूत्रपिंड) यांत विकार उत्पन्न होऊन क्वचित जीवितासही धोका संभवतो. वाढीचे कारण निश्चित सांगता येत नाही.

या ग्रंथीचा स्राव रेताचा एक घटक असतो. स्राव दर तासाला १० ते ३५ थेंब असा सतत होत असतो व तो मूत्रनलिकेतून बाहेर पडतो. लैंगिक उद्दीपनाच्या काळात स्राव वाढतो. तो अनेक सूक्ष्म नलिकांनी मूत्रामार्गात जातो व रेतस्खलनाच्या वेळी शुक्राणूंबरोबर आलेल्या द्रवात मिसळतो.

अष्ठीला ग्रंथीच्या स्रवात स्पर्मीन, सायट्रिक अम्ल, कोलेस्टेरॉल, फॉस्फोलिपिडे ही संयुगे आणि फायब्रिनोलायसीन, फायब्रिनोजिनेज, फॉस्फटेज ही एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) तसेच क्षारीय (अल्कलींचे गुणधर्म असणारी → क्षार) फॉस्फेटेज ही द्रव्ये असतात. स्राव पाण्याप्रमाणे प्रवाही पण दुधाळ व किंचित अम्लीय असतो.

ग्रंथीचे कार्य अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकांकडून (मज्जातंतूकडून, → तंत्रिका तंत्र) नियंत्रित केले जाते. स्रावाचे नियंत्रण परानुकंपी व ग्रंथीचे आकुंचन अनुकंपी तंत्रिकांकडून येणाऱ्या प्रेरणेमुळे होते. रतिप्रसंगी प्रारंभी परानुकंपी तंत्रिकांच्या प्रेरणेने स्राव वाढतो व अंतिम रतिक्षणी अनुकंपी तंत्रिकांच्या तीव्र प्रेरणांनी ग्रंथीतील अनैच्छिक स्नायूंच्या आकुंचनाने स्राव मूत्रमार्गात जोराने ढकलला जातो.

विकार : या ग्रंथीत (१) शोथ (दाहयुक्त सूज), (२) वाढ व (३) कर्करोग हे विकार प्रामुख्याने आढळतात.

(१)शोथ : प्रतिजैव औषधांचा [ → प्रतिजैव पदार्थ] शोध लागण्यापूर्वी या ग्रंथीचा शोथ-विकार पुष्कळच आढळत असे. हा विकार संसर्गी असून लैंगिक वा अन्य संसर्गामुळे प्रमेहगोलाणूंच्या (गोनोकॉकस या परम्याच्या सूक्ष्मजंतूंच्या) योगे होतो. उपचार केलेले नसल्यास प्रमेह-गोलाणू मूत्रनलिकेतून अष्ठीला ग्रंथीत पोहोचतात. मूत्र-विसर्जनाच्या वेळी मूत्रमार्गाची आग होणे, मूत्रमार्गाच्या मुखाशी पू येणे, वारंवार लघवीला लागल्यासारखे वाटणे, मूत्र गढूळ येणे, कंबरेत दुखणे अशी लक्षणे होतात. गुदद्वारातून गुदाशयात अंगुलीने प्रवेश करून परीक्षण केल्यास ग्रंथी सुजलेली व दुखरी असल्याचे आढळते. बहुतेक प्रकारच्या जंतूंमुळे उद्भवणार्‍या शोथावर प्रतिजैव औषधे उपयुक्त ठरली आहेत.

(२)वाढ : या ग्रंथीच्या सामान्य निरुपद्रवी वाढीला पांढरे केस व टक्कल या वृद्धपणाच्या चिन्हांइतकाच रोग म्हणून अर्थ असतो. पन्नाशीच्या खाली सहसा अशी वाढ होत नाही. पन्नाशीनंतर इतर

अष्ठीलाग्रंथी. (१) मूत्राशय, (२) रेतवाहिनी, (३) मूत्रवाहिका, (४) रेतपुटक, (५) अष्ठीला,, (६) मूत्रमार्ग.

कारणांनी मृत्यू आलेल्या वृद्धांपैकी शेकडा सत्तर व्यक्तींमध्ये ग्रंथीची वाढ झाल्याचे आढळले आहे. ग्रंथीच्या मध्यखंडातील वाढ मात्र उपद्रवकारक असते, इतर खंडांतील वाढ त्रासदायक होत नाही. वाढीचे कारण पुरुष व स्त्री मद-प्रवर्तकांतील (पुरुष व स्त्री यांच्या प्रजोत्पादक ग्रंथींतून स्रवणार्‍या हॉर्मोनांतील, → हॉर्मोने) असमतोल हे असावे, अशी कल्पना होती परंतु ही गोष्ट सिद्ध झालेली नाही. मध्य-खंडातील वाढीने मूत्रनलिकेची अष्ठीलेतील लांबी वाढते. मूत्रमार्गाच्या अंतर्मुखाशी अष्ठीलेच्या वाढीमुळे अडथळा निर्माण होतो व मूत्रविसर्जन अवघड व दुःखदायक होते. मूत्र मूत्राशयात साचते. मूत्राशय पूर्ण रिकामे होऊ शकत नाही. मूत्राशयाचा शोथ होतो. शस्त्रक्रियेने अष्ठीला काढून टाकली नाही. तर मूत्र तुंबल्यामुळे मूत्रवाहिका व मूत्रपिंड यांच्यात विकार उद्भवतो.

(३) कर्करोग : शस्त्रक्रियेने काढून टाकलेल्या ग्रंथीतील पंधरा टक्के ग्रंथींमध्ये कर्करोग आढळतो. विशेषेकरून हा पश्चखंडात आढळतो. याचे (अ) मूत्रमार्गात विकाराची लक्षणे असणारा, (आ) मूत्रमार्गात लक्षणे नसली, तरी रक्तातील अम्ल फॉस्फेटेजात वाढ व पक्षेप (कर्काच्या मूलस्थानापासून दूर असलेल्या शरीरातील इतर भागांत उद्भवणे) यांनी सिद्ध होणारा व (इ) पूर्णपणे चिन्हे नसणारा, असे प्रकार आढळतात. प्रक्षेप यकृत, फुप्फुस इ. अवयवांत होऊ शकतात. परंतु विशेषेकरून अस्थींमध्ये होतात. इतर इंद्रियांतील ⇨ कर्करोगापेक्षा याची वाढ फार सावकाश होते. रोग लौकर उघडकीस आला, तर शस्त्रक्रिया, क्ष-किरणे यांसारख्या चिकित्सेने त्याचे निर्मूलन करणे शक्य असते. गुदद्वारावाटे अंगुली-परीक्षणाने ग्रंथी दगडासारखी कठीण व अनियमित कडांची असल्याचे आढळते म्हणून पन्नास वर्षांवरील व्यक्तींनी अशा परीक्षा नियमितपणे करून घेत गेल्यास निदान लौकर होऊन चिकित्सा यशस्वी होते.

चिकित्सा : प्रगत रोगात शस्त्रक्रियेचा खास उपयोग होत नाही. कदाचित आधीच प्रक्षेप झालेले असतात. ५ ते १५० मिग्रॅ. मात्रेत स्टिलबीस्ट्रॉलचा (कृत्रिमरीत्या तयार केलेल्या स्त्रीमदजन या हॉर्मोनाचा) उपयोग होतो. परंतु अधिक मात्रेत याचा ⇨अधिवृक्क ग्रंथीवरही परिणाम होत असल्याने त्याची उपयुक्तता मर्यादित होते. वंध्यीकरणाचाही उपयोग होतो.

शिरोडकर, शा. ना.

आयुर्वेदीय चिकित्सा : अष्ठीला ग्रंथीच्या विकाराशी शुक्रधातुक्षय किंवा शुक्रधातुविकृती यांचा संबंध असतो. म्हणून शुक्रवृद्धिकर व शुक्रदोषनाशक अशी चिकित्सा करणे अत्यावश्यक असते. यांवर अश्वगंधा, भुईकोहळा, शतावरी, पुनर्नवा, एरंडमूळ, कवचबीज, तालिमखाना इ. शुक्रवर्धक द्रव्यांचे चूर्ण दूध वा तूप याबरोबर द्यावे किंवा या द्रव्यांनी सिद्ध केलेल्या दुधाबरोबर व तुपाबरोबर द्यावे. महायोगराज गुग्गळ हा शुक्रदोषाचे शोधन करणारा आहे. हा गुग्गुळ तसेच वरील सर्व औषधे जेवायला बसताना दिली असता अधिक कार्यकारी होतात. शिवाय नारायण तेल व चंदनबलालाक्षादी तेल ह्यांचा बस्ती द्यावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

संदर्भ : Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.