सर्वांग शोफ : त्वचेखालील संयोजी ऊतकांत ( समान रचना व कार्य असणाऱ्या व जोडणाऱ्या कोशिकासमूहांत म्हणजे पेशीसमूहांत )  द्रव साठल्यामुळे सूज येण्याच्या स्थितीला सर्वांगशोफ असे म्हणतात. हा द्रव मुख्यत: आंतरकोशिकीय ( पेशींदरम्यानच्या ) मोकळ्या जागेत असून त्यात प्रथिने वगळता रक्तद्रवातील सर्व घटक त्याच प्रमाणात आढळतात. ऊतकदाहाच्या ( शोथाच्या ) प्रकियेतील द्रवामध्ये आढळणाऱ्या श्वेत कोशिका आणि प्रथिने यांचाही अभाव असतो. द्रव साठण्याची क्रिया प्रारंभी पावले, घोटे, चेहरा यांसारख्या सैल संयोजी ऊतकांच्या स्थानी सहज घडून येते परंतु कालांतराने इतरत्र आणि विशेषत: उदराची पोकळी, छातीमधील फुप्फुसांभोवतालची जागा यांसारख्या बाहेरून सहज लक्षात न येणाऱ्या ठिकाणीही द्रव साचू लागतो. कोणत्याही ठिकाणी सूज आढळली तरी ऊतकांच्या शोथाची लक्षणे – उदा., वेदना, स्पर्श असह्यता, रक्तवर्ण, तापमानातील वाढ-आढळत नाहीत. द्रव साचलेल्या ठिकाणी पृष्ठभागावर बोटाने दाब दिल्यास खळगा पडतो. दाब काढल्यावर काही मिनिटांत  सभोवतालचा द्रव त्या ठिकाणी येऊन त्वचा पूर्ववत होते.

शरीरातील पाण्याचे तीन कप्प्यांत वितरण : ( अ ) रक्तद्रव, ( आ ) आंतरकोशिकीय द्रव, ( इ ) कोशिकांतर्गत द्रव (१) लसीका तंत्र, (२)केश-वाहिनी पटल, (३) कोशिका पटल.सर्वांगशोफाची उत्पत्ती व कारणे समजण्यासाठी शरीरातील द्रवाचे नैसर्गिक वितरण जाणून घेतले पाहिजे. मानवी शरीराच्या प्रौढावस्थेतील वजनाच्या सु. ६० ते ६५ प्रतिशत इतके पाणी असते. सत्तर किगॅ. वजनाच्या व्यक्तीमधील ६०% म्हणजे ४२ लिटर पाण्याचे वितरण तीन कप्पे असलेल्या प्रारूपाच्या साहाय्याने करता येईल. ( पहा आकृती ).

आकृतीतील प्रारूपानुसार वर उल्लेख केलेल्या ६०% पाण्याचा सर्वांत मोठा भाग (४०%) कोशिकांच्या आतील भागात असून त्यांच्याबाहेरच्या आंतरकोशिकीय द्रवात १५% आणि रक्तद्रवात केवळ ५% (३ लिटर ) पाणी आढळते. एकूण ५ लिटर रक्तातील सु. ४०% घनफळ कोशिकांचे असल्याचे, उर्वरित ६०% (३ लिटर ) रक्तद्रवात हे पाणी असून त्यात रक्तप्रथिने आणि विविध विद्युत् विच्छेद्य ( इलेक्ट्रोलयी ) पदार्थ ( सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, बायकार्बोनेट इ.) असतात. शरीरातील द्रवाचे परिसरातील द्रवाशी आदान-प्रदान ( निवेश – उत्सर्जन ) फक्त रक्तद्रवाच्या कप्प्यातूनच होऊ शकते. संतुलित अवस्थेत या कप्प्यात प्रतिदिनी सु. २ लिटर पाणी पेयजल, अन्नपदार्थ, पेये यांच्या स्वरूपात प्रवेश करते. यकृतातील रासायनिक प्रकियांचा ( कार्बोहायड्रेट पदार्थांचे विघटन ) यात समावेश असतो. या कप्प्यातून शरीराबाहेर जाणारे पाणी मूत्र, घाम, मलातील आर्द्रता, त्वचेतून बाहेर पडणारी असंवेद्य स्वेदनरूप आर्द्रता, श्वसनमार्गातील आर्द्रता इ. रूपे धारण करते.

रक्तातील द्रव पदार्थांचा आंतरकोशिकीय कप्प्यात प्रवेश केश-वाहिन्यांच्या पटलांतून होतो. या पटलांतून कोशिका व प्रथिने आरपार जाऊ शकत नाहीत. त्यामुळे केशवाहिनीमधील रक्तदाब द्रवाला बाहेर ढकलतो आणि प्रथिनांचा तर्षण दाब बाहेरील द्रवास आत खेचत असतो. आंतरकोशिकीय द्रवातील घटकांचा तर्षण दाब द्रवाला वाहिन्यांच्या बाहेर ठेवण्यास मदत करतो. या सर्व दाबांच्या एकंदर बेरजेमुळे आंतरकोशिकीय कप्प्यात द्रव प्रथम प्रवेश करतो आणि कोशिकांच्या दुसऱ्या टोकांस ( नीलांच्या प्रारंभी ) त्याचा विरूद्ध दिशेने रक्ताकडे प्रवास सुरू होतो. यांखेरीज आंतरकोशिकीय द्रवाचा निचरा करण्यास लसीका वाहिन्यांचीही मदत होते. या वाहिन्यांमधून लसीका तंत्रात प्रवेश करणारे सु. २ ते ३ लिटर लसीका द्रव प्रतिदिनी लसीका महावाहिनीवाटे परत रक्तात येत असते [⟶लसीका तंत्र]. शरीरातील एकंदर आंतरकोशिकीय द्रवाचा ( सु. ११ लिटर ) बहुतेक भाग ऊतकात असलेल्या जेलीसारख्या पदार्थाच्या जालामुळे ( ऊतकजेल ) सुबद्ध स्थितीत असतो. त्याची ऊतकात दूरवर हालचाल घडू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेत बोटाने दाबल्यास त्वचेला खळगा पडत नाही.

कोशिकांच्या अंतर्भागातील द्रव आणि त्यांच्या बाहेरचा आंतरकोशिकीय द्रव यांचे विभाजन कोशिकांच्या पटलांमुळे झालेले असते. या पटलांतून पोषणद्रव्ये व ऑक्सिजन आत जाऊ शकतात आणि उत्सर्जन द्रव्ये व कार्बन डाय-ऑक्साइड, तसेच अतिरिक्त सोडियम बाहेर टाकले जातात. शरीरातील सु. ७५ × १०१२ कोशिकांमध्ये हे कोशिकाजल पसरलेले असते. एकूण घनफळ २८ लिटर. त्याचा तर्षण दाब जवळजवळ आंतरकोशिकीय द्रवाइतकाच असतो परंतु पटलाच्या विशिष्ट पदार्थांना प्रवेश देण्याच्या गुणधर्मामुळे आणि कोशिकाद्रव्यातील चयापचयामुळे ( सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे ) घटक पदार्थाचे प्रमाण फार भिन्न असते. उदा., पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, सल्फेट हे अधिक प्रमाणात असतात तर सोडियम, कॅल्शियम, क्लोराइड, बायकार्बोनेट यांचे प्रमाण कमी असते. विविध प्रकारच्या ऊतकांमधील द्रवात, इतकेच नव्हे तर विविध प्राण्यांच्या कोशिकांमधील द्रवात फारसा फरक आढळत नाही.

कारणे : वरील वर्णनावरून असे लक्षात येईल की, ऊतकांमध्ये आंतरकोशिकीय द्रव साचण्यामागे अतिरिक्त निर्मिती किंवा अपुरा निचरा अशी दोन प्रकारची कारणे असू शकतात. अतिरिक्त निर्मिती, म्हणजेच रक्तजलातून ऊतकांकडे मोठया प्रमाणात गळती होणे. कोशिकांमधील दाब वाढल्यामुळे अशी गळती होऊ शकते. उदा., नीलांमधील रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला किंवा त्यांच्या झडपा पूर्ण बंद होत नसतील, तर रक्त साठून कोशिकांमधील दाब वाढतो. अशाच प्रकारची अवस्था हृदयविकारामुळे ( दीर्घकालिक ) रक्ताभिसरणाची कार्यक्षमता कमी होऊन उजव्या कर्णिकेतील आणि महानीलांमधील रक्तदाब वाढल्यास निर्माण होते. केशिकावाहिन्यांमध्ये रक्त साठण्याची स्थिती त्यांच्याकडे रक्त आणणाऱ्या रोहिणींमधील प्रतिरोध कमी झाल्यामुळेही उद्भवू शकते. उदा., अनुकंपी तंत्रिकांची [⟶तंत्रिका तंत्र] क्रियाशीलता कमी होणे, वाहिनी विस्फारक औषधे अधिक मात्रेत घेणे, शरीराचे तापमान वाढल्याने वाहिनी विस्फारण होणे इत्यादी.

कोशिकावाहिन्यांमधील दाब वाढण्याचे एक अन्य कारण म्हणजे शरीरातील पाणी व सोडियम यांचे प्रमाण वाढणे. सोडियम उत्सर्जनाचे आपले कार्य पार पाडण्यातील वृक्कांची ( मूत्रपिंडांची ) असमर्थता या विकाराला प्रारंभ करून देते. अधिवृक्काच्या गंथींमधून निर्माण होणाऱ्या कॉर्टिसोनसदृश हॉर्मोनांचा परिणाम (अवांच्छित परिणाम ) अशीच स्थिती निर्माण करतो. या सर्व प्रकियांमध्ये प्रथम सोडियमाचा शरीरातील अतिरिक्त संचय व त्यामुळे सोडियमाच्या जलधारक कियेमुळे द्रवाचा संचय अशी कारणपरंपरा असते.


कोशिकांमधील दाबाच्या विरूद्ध दिशेने क्रिया करणारा कलिली तर्षण दाब कमी झाल्यामुळेही सर्वांगशोफ उद्‌भवू शकतो. यकृताच्या विकारामुळे प्रथिनांच्या निर्मितीत घट होणे, दीर्घकालिक अपकर्षी वृक्कशोथ ( एक प्रकारचा ऊतकृहास करणारा विकार ) झाल्यामुळे मोठया प्रमाणात प्रथिनांचे उत्सर्जन होणे, कुपोषण, मोठया जखमांमधून किंवा भाजल्याने त्वचा सोलली जाऊन रक्तद्रव पाझरत राहणे यांसारख्या कारणांनी रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यास अशा प्रकारचा शोफ दिसू लागतो. केशिकावाहिनींची नैसर्गिक अर्धपार्यता नष्ट होऊन प्रथिनांची गळती झाल्यामुळेही शोफ निर्माण होतो. उदा., विषारी पदार्थाचा परिणाम, जंतुसंक्रामणे, जीवनसत्त्व ‘ क ’चा अभाव, ⇨ ॲलर्जी मुळे हिस्टामीन मुक्त  होऊन तीव्र प्रतिक्रिया उद्भवणे, कीटकांचे किंवा अन्य प्राण्यांचे दंश.

लसीकावाटे होणारा द्रवाचा निचरा कमी झाल्यामुळे आंतरकोशिकीय अवकाशात काही प्रमाणात द्रव साठू शकतो. लसीका वाहिन्यांचे जंतुसंक्रामण, फिलेरिया कृमींचे आक्रमण, कर्करोगाच्या कोशिकांमुळे लसीका गंथी अवरूद्ध होणे, विस्तृत प्रमाणात केलेल्या शस्त्रकियांमध्ये लसीका वाहिनी व गंथी काढल्या जाणे यांसारख्या कारणांनी अशी परिस्थिती निर्माण होऊन सूज दिसू लागते. याशिवाय हॉजकिन किंवा अन्य प्रकारच्या लसीकार्बुदांमुळे छातीमधील महानीलांवर दाब पडून रक्ताचा प्रवाह रोखला जाऊन किंवा रक्तक्लथनामुळे ( रक्त गोठल्यामुळे ) शरीराच्या वरच्या किंवा खालच्या भागात सूज निर्माण होणेही शक्य असते.

लक्षणे, प्रगती व दुष्परिणाम : सर्वांगशोफामध्ये त्वचेखालील सूज हे प्रमुख लक्षण असले तरी त्याच्यामागील कारणानुसार इतर लक्षणे आधी किंवा नंतर दिसू लागतात. त्यांची वेळीच दखल घेतल्यास लवकर उपचार करणे सुलभ होते. संयोजी ऊतकात साचणारा द्रव गुरूत्वाकर्षणामुळे जमिनीच्या दिशेने पसरण्यास मुक्त असतो. तसेच त्याची प्रवृत्ती अधिक शिथिलरचना असलेल्या ऊतकांत साचून राहण्याकडे असते. परिणामत: बहुसंख्य रूग्णांमध्ये दीर्घकाळ उभे राहिल्यास किंवा चालल्यानंतर आणि दिवसाच्या अखेरीस पावलांच्या वरच्या बाजूस व घोटयांवर थोडीशी सूज दिसू लागते. रात्रीच्या विश्रांतीनंतर ती ओसरते. सकाळी उठल्यावर चेहरा आणि विशेषत: डोळ्यांच्या पापण्या सुजलेल्या लवकर लक्षात येतात. एका कुशीवर झोपल्यास त्या बाजूस अधिक सूज आढळते. हृदयाच्या अकार्यक्षमतेमुळे द्रवाचा संचय होत असल्यास रूग्णाला थोडया परिश्रमानंतर सूज वाढल्याचे जाणवते. हृदयाच्या डाव्या बाजूची कार्यक्षमता कमी झाल्यास फुप्फुसांत द्रव साठून दम लागणे, खोकला येणे यांसारखी लक्षणे निर्माण होतात.

शोफाच्या प्रगत अवस्थेत पाय, गुडघे, मुष्क ( अंडाची पिशवी ), उदरगुहा, छाती यांमध्ये द्रव साठून रूग्णाच्या दैनंदिन हालचाली आणि श्वसन, पचन इत्यादींवर मर्यादा पडलेल्या दिसतात. विश्रांती घेऊनही सूज ओसरत नाही. आंतरकोशिकीय द्रवाचे घनफळ ३० ते ५० प्रतिशत वाढून ( निरोगी अवस्थेतील १४ लिटर ऐवजी सूज आल्यामुळे २० ते २५ लिटर ) वजन वाढते. योग्य उपाययोजना न केल्यास शोफाचा विपरीत परिणाम कोशिकांच्या पोषणावरही होऊन त्यांचे कार्य मंदावते. शोफगस्त भागावर वण किंवा जंतुसंक्रामण होऊ शकते.

शोफाव्यतिरिक्त इतर लक्षणांमध्ये मूत्राचे प्रमाण कमी होणे, रक्तदाबातील वाढ, अशक्तपणा यांचा समावेश होतो. अपकर्षी वृक्कशोथामध्ये मूत्रातील प्रथिनांचे अस्तित्व त्याच्या फेसाळपणावरून आणि काही सोप्या मूत्र चाचण्यांनी सहज ओळखता येते. रक्ताच्या परीक्षणातून लसीकार्बुदे, लसीका तंत्राचे इतर विकार, प्रथिनांची कमतरता यांची माहिती मिळू शकते. रक्तद्रवाच्या तर्षण दाबाच्या निर्मितीमधील घटकांचे प्रमाणही कळू  शकते. जीवनसत्त्वाच्या अभावाची काही लक्षणे केशिकावाहिन्यांच्या पटलातील कमतरता सूचित करतात. उदा., क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हिरडयांमधून रक्तस्राव होतो. थायामिनाच्या ( बी १) अभावामुळे तंत्रिकांच्या    ( मज्जांच्या ) मायेलिन आवरणाचे विघटन ( ऱ्हास ) होत असल्याने सूज आलेल्या भागाला स्पर्श केल्यास वेदना होतात. यकृत विकारातील के जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रक्ताची क्लथनक्रिया ( रक्त गोठणे ) मंदावते. शोफाच्या अन्य कारणांचा अंदाज रूग्णाच्या इतिहासावरून करता येतो. उदा., गर्भिणी अवस्था, डोंगराळ भागातील प्रवास, आहारातील दोष, ॲलर्जी, औषधांचा- विशेषत: कॉर्टिसोनसारख्या औषधांचा- अतिरेकी वापर, हृदयविकारावरील औषध घेण्यातील अनियमितता इत्यादी. फायलेरियामुळे होणाऱ्या लसीका रोधाच्या प्रगत अवस्थेत त्वचा आणि तिच्या खालील ऊतकाचे परिवर्तन जाड कातड्यात होऊन त्याला भेगा पडतात. शस्त्रकियेने असे ऊतक ( हत्तीरोग ) काढून टाकावे लागतात.

उपचार : सर्वांगशोफामागील कारणांची विविधता लक्षात घेता त्यावरील उपचार करणे काहीसे अवघड असते. प्राथमिक तपासण्यांमधून द्रव साचण्यामागील कारणे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आहेत असे अनुमान निघाल्यास सोडियमाचे वृक्कावाटे होणारे उत्सर्जन वाढविणारी औषधे देता येतात. सोडियम, क्लोराइड आणि पाणी यांचा मूत्रावाटे निचरा करणाऱ्या या औषधांना मूत्रल पदार्थ असे म्हणतात. वृक्काच्या सूक्ष्मनलिकांच्या निरनिराळ्या भागांतील उत्सर्जनाचे आणि पुन:शोषणाचे कार्य प्रभावित झाल्यामुळे त्यांचा परिणाम घडून येतो. त्यातून शरीरातील इतर पदार्थांचे उत्सर्जन ( उदा., पोटॅशियम, बायकार्बोनेट, हायड्रोजन आयनांमुळे अम्लतेचे प्रमाण ) होण्याची क्रिया निरनिराळ्या प्रमाणांत   प्रभावित होत असते. त्याचा परिणाम हृदयाचे कार्य, रक्तवाहिन्यांमधील दाब, चयापचय, श्वसनाची कार्यक्षमता इत्यादींवर कसा होईल याचा विचार करून योग्य असे मूत्रल निवडले जाते. त्याशिवाय आवश्यकतेनुसार रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारी आणि हृदयाची कार्यक्षमता वाढविणारी डिजिटॅलिस वर्गातील औषधे उपयोगात आणली जातात.

वृक्कविकारामुळे उद्‌भवणाऱ्या शोफात वृक्कशोथ कमी करणारी कॉर्टि-कोस्टेरॉइड वर्गातील द्रव्ये आणि सौम्य स्वरूपाची मूत्रले उपयुक्त ठरतात. वृक्कशोथ संकामणजन्य विकारातून किंवा ॲलर्जीमधून निर्माण झाला असल्यास त्या मूळ विकारावर उपचार केले जातात. गर्भिणी विषाक्तता, लसीकार्बुदे, नीलांमधील क्लथन इत्यादींवर विशिष्ट उपचारांनी सर्वांगशोफ कमी करून इतर लक्षणांसाठी- उदा., उलटया होणे, रक्तदाब वाढणे, वाहिन्यांमधील गाठी पसरत जाणे- लक्षणानुरूप उपचार होतात. शिवाय सौम्य प्रभाव करणारी मूत्रलेही वापरता येतात.

उदरपोकळीत किंवा परिफुप्फुसीय अवकाशात साचलेला द्रव मोठय प्रमाणात आहे असे आढळल्यास आत सुई घालून त्याचा निचरा करता येतो. दीर्घकाळ साठलेल्या द्रवाचा निचरा करताना तो एकदम न करता थोडयाथोडया अवधीने करणे हितावह ठरते. वरील सर्व उपचारांबरोबरच रूग्णाच्या रक्ताचे परीक्षण करणे आणि विद्युत् विच्छेदय पदार्थांच्या पातळीनुसार आहारात बदल करणे ही उपचारांची अन्य अंगे असतात. उदा., मीठ कमी घेणे, फळांसारखा पोटॅशियमयुक्त आहार घेणे, प्रथिने व जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात घेणे इत्यादी. सूज कमी होण्यासाठी मधूनमधून विश्रांती घेणे, पायांची बाजू वर करून काही काळ पडून राहणे यांसारख्या दैनंदिन नित्यकमाबद्दलच्या सूचनाही रूग्णाला दिल्या जातात.

पहा : शोफ.

संदर्भ : 1. Berkow, R., Ed., Merck Manual of Medical Information, N. J., 1997.

           2. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.

           3. Hardman, J. G. Limbird, L. E., Eds., The Pharmacological Basis of Therapeutics, New York, 2001.

श्रोत्री, दि. शं.