जागतिक आरोग्य संघटना : (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO) ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस येथील ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालया’चा (Office Internationale d’hygiene Publique) वारसा पुढे चालवीत आहे. ‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे. असे प्रयत्न करणाऱ्या संस्था पूर्वीही होत्या.

इतिहास : भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे (इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे) महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते. चौदाव्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती.

विलग्नवासामुळे रोगांचा प्रसार नेहमी थांबेच असे नाही, कारण त्या काळी रोगप्रसाराच्या कारणांचे ज्ञानच अपुरे होते. निरनिराळ्या देशांतील बंदरांत विलग्नवास व्यवस्था निरनिराळी असे, तसेच त्याकरिता केलेले कायदेही एकाच प्रकारचे नसत त्यामुळे व्यापारउदीमाला बराच अडथळा येई. १८५२ पासून या कायद्यांच्या एकसूत्रीकरणाचे प्रयत्न झाले, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सूक्ष्मजंतुशास्त्राची भक्कम पायावर स्थापना होऊन रोगप्रतिबंधाच्या मूलतत्त्वांबद्दल बरेचसे एकमत होईपर्यंत या कामी विशेष प्रगती झाली नाही. विलग्नवासविषयक नियमांमुळे साधारण एकसूत्रीपणा आल्यानंतर या कार्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा असावी, असा विचार प्रबळ झाला. अशा यंत्रणेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असावीत हा विचारही पटू लागला.

(१) स्‍वास्थ्यसंरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय संकेतांचा अर्थ लावून त्यांत वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे त्या संकेतांचा भंग होत असल्याच्या तक्रारीबद्दल अधिकृत मत प्रदर्शित करणे. (२) रोगविज्ञानात होत असलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी परिषदा भरवून त्यानुसार आंतरराष्ट्रीय संकेत व कायदे यांत बदल सुचविणे आणि (३) साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.

अशा माहितीच्या आधारावरच विलग्नवासविषयक नियम करण्यात येतात. १९०२ मध्ये या उद्दिष्टपूर्तीसाठी अखिल अमेरिकन आरोग्य संस्था स्थापण्यात आली. १९०९ मध्ये पॅरिस येथे ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय’ स्थापण्यात आले. ही संस्थाच पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून ती १९४७ ते १९५० च्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.

यापूर्वी कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार्याने सोडवण्यासारख्या अनेक प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले होते. उदा., औषधिद्रव्ये व रक्तरसापासून (रक्तातील घन पदार्थविरहित रक्तद्रवापासून) बनविलेल्या लसींचे प्रमाणीकरण, रोगांचे सर्वमान्य असे नामाभिधान ठरविणे, जन्ममृत्यूंची माहिती एकत्र करून पुरविणे व मादक पदार्थांविषयी (अफू, कोकेन वगैरेंविषयी) वैद्यकीय माहिती पुरविणे वगैरे. रोगासारख्या संकटाविरुद्ध आंतरराष्ट्रीय आघाडी उभारावयाची असेल, तर त्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील जनतेची आरोग्यपातळी वाढविणे हाच एक कायमचा आणि खरा टिकाऊ उपाय आहे, याचीही जाणीव होऊ लागली. रोगसंसर्ग कमी होण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांनी आपापसांत बांध उभे करणे हे प्रभावी साधन होऊ शकत नाही, हेही पटू लागले होते. पॅरिस येथील संस्थेच्या घटनेत अशा तऱ्हेच्या जागतिक प्रयत्नांना वाव नसल्यामुळे १९२१ मध्ये राष्ट्रसंघाने अशी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी केली, ही एक सुदैवाचीच गोष्ट मानली पाहिजे.

राष्ट्रसंघाच्या या आरोग्य यंत्रणेसाठी आर्थिक तरतूद मात्र अगदी अपुरी होती, पण तिला समर्पित भावनेने काम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्यकर्ते लाभल्यामुळे या यंत्रणेने कित्येक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. पोषण, हिवताप (मलेरिया), औषधिद्रव्यांचे प्रमाणीकरण आणि खेड्यांतील जनतेचे आरोग्यरक्षण या क्षेत्रांत या यंत्रणेने भरीव कामगिरी केली आहे. थोडक्यात म्हणजे रोगप्रतिबंधाचे कार्य आंतरराष्ट्रीय सहकार्याने किती यशस्वी होऊ शकते, ते या यंत्रणेने प्रत्यक्ष दाखवून दिले.

जागतिक शासनसंस्था स्थापन करण्याचे राष्ट्रसंघाने मूळ उद्दिष्ट असफल झाल्यामुळे या जागतिक आरोग्य यंत्रणेचे वजन पुष्कळ कमी झाले, हे जरी खरे असले तरी २० वर्षे केलेल्या भरीव कामगिरीमुळेच पुढच्या जागतिक आरोग्य यंत्रणेचा पाया रचला गेला, असे म्हटले पाहिजे.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळी आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात चार निरनिराळ्या संघटना कार्य करीत होत्या. (१) संयुक्त राष्ट्रांची साहाय्य व पुनर्वसन संघटना (युनायटेड नेशन्स रीलीफ अँड रिहॅबिलिटेशन ॲडमिनिस्ट्रेशन, UNRRA) : ही संघटना तात्पुरत्या स्वरूपाची असून आरोग्य संरक्षण एवढे एकच उद्दिष्ट तिच्यापुढे नसून ती इतर अनेक प्रकारची कार्ये करीत असे. (२) राष्ट्रसंघाची आरोग्य संघटना : ही जिनीव्हा येथे अगदीच अलग पडल्यासारखी होती व तिचे कर्मचारी अगदीच जुजबी असून तिची प्रतिष्ठाही कमी झालेली होती. (३) वर उल्लेखिलेली पॅरिस येथील संस्था. (४) अखिल अमेरिकेतील आरोग्यविषयक माहिती पुरविणारी संस्था : या संस्थेचे क्षेत्र अमेरिकेपुरतेच मर्यादित होते. सर्व राष्ट्रांमध्ये कार्य करणारी अशी जागतिक एकसूत्री यंत्रणा उभी राहण्यास हा काळ अत्यंत योग्य होता. १९४६ मध्ये ‘जागतिक आरोग्य यंत्रणे’ची तात्पुरती संघटना स्थापन करण्यात येऊन संयुक्त राष्ट्रांतील २६ राष्ट्रांची संमती मिळताच तिला कायम स्वरूप देण्यात आले. १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय मंजुरीने ही यंत्रणा कायम झाली. संयुक्त राष्ट्रांनी विविध कार्यांकरिता उभारलेल्या संघटनांपैकी ही एक संघटना असून तिला तिच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांवरून डब्ल्यू. एच.ओ. (WHO) असे संबोधितात.

उद्दिष्टे, घटना व अर्थव्यवस्था : जगाच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अशा ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही फार महत्त्वाची घटना होय. या संघटनेच्या घटनेमध्ये जे विस्तृत व उदार ध्येय ठरविण्यात आले आहे, त्यात आधुनिक आरोग्यविषयक व सामाजिक असे सर्व महत्त्वाचे प्रश्न अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची जागतिक संघटना प्रथमच स्थापन झाली असून तिच्या घटनेच्या प्रास्ताविकात तिच्या कार्याचे दिग्दर्शन असे केलेले आहे : (१) आरोग्य म्हणजे केवळ ‘रोगाचा अभाव’ असे नसून त्यात जनतेच्या मानसिक व सामाजिक आरोग्याचा अंतर्भाव होतो. (२) आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये सर्व राष्ट्रे परस्परावलंबी आहेत. (३) बालकांचे पालन, पोषण व विकास या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. (४) आरोग्यविषयक कार्यात जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी लोकशिक्षणाची फार जरूर आहे. (५) आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्‍क असून सर्व शासनसंस्थांनी या हक्काचे शक्य त्या प्रयत्नांनी जतन केले पाहिजे.

जगातील कोणत्याही राष्ट्राला या संघटनेचे सभासद होता येते. अजून जी राष्ट्रे स्वतंत्र नाहीत त्यांना ‘संबद्ध’ सभासद म्हणून घेण्यात येते. १६ मे १९५० रोजी दक्षिण ऱ्होडेशियास ‘संबद्ध’ सभासद करण्यात आले होते परंतु हे सभासदत्व तात्पुरते स्थगित ठेवण्यात आलेले आहे. १९७२ च्या मे महिन्यात चिनी प्रजासत्ताकानेच प्रतिनिधित्व करण्याचे मान्य करण्यात आले व तैवानचे सभासदत्व रद्द झाले. जानेवारी १९७३ मध्ये सभासदांची संख्या १३५ व संबद्ध सभासदांची संख्या २ होती. मे १९७३ मध्ये उ. कोरियाला सभासदत्व देण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत. (१) जागतिक आरोग्यसभा (संसदेच्या स्वरूपाची) : ही सभा वर्षातून एकदा भरते. सभेला प्रत्येक सभासद राष्ट्राने तीन प्रतिनिधी पाठवावयाचे असतात. या सभेत संघटनेचे सर्वसाधारण धोरण व अर्थसंकल्प ठरविणे, ही कामे होतात.

(२) कार्यकारी मंडळ (मंत्रिमंडळाच्या स्वरूपाचे) : हे मंडळ ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करते व अर्थसंकल्प तयार करते. या मंडळात २४ देशांचे प्रतिनिधी असून त्यांतील ८ आळीपाळीने दरसाल निवृत्त होतात, परंतु ते फेरनिवडणुकीस पात्र असतात.


(३) सचिवालय (प्रत्यक्ष कार्य करणारे कर्मचारी) : हे सचिवालय एका प्रमुख संचालकाच्या हाताखाली असून त्याच्या मदतीकरिता इतर कर्मचारी नेमलेले असतात. हे कर्मचारी व प्रमुख कोणत्याही देशातून घेतले जातात. निवड झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त होतो.  जानेवारी १९७३ मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या (प्रादेशिक कार्यालयांतील व प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मिळून) सु. ३,५०० होती.

संघटनेचे कार्य इंग्रजी व फ्रेंच या भाषांतून चालते त्यांशिवाय रशियन, चिनी व स्पॅनिश या तीन भाषांना मान्यता देण्यात आली आहे. सर्वसाधारण धोरण व कार्यव्यवस्था जरी जिनीव्हा येथील मुख्य कार्यालयाकडे असली, तरी सर्व महत्त्वाचे कार्य प्रादेशिक केंद्रांमार्फत चालते. अशी सहा केंद्रे असून त्यांची कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत.

प्रदेश 

मुख्य कार्यालय 

आफ्रिका

ब्रॅझाव्हिल, काँगो

अमेरिका

वॉशिंग्टन, अमेरिका

आग्नेय आशिया

नवी दिल्ली, भारत

यूरोप

कोपनहेगन, डेन्मार्क

भूमध्य समुद्र-

पूर्वभाग

ॲलेक्झांड्रिया, ईजिप्त

पश्चिम पॅसिफिक

सागरीय

मॅनिला, फिलिपीन्स

संघटनेच्या अर्थसंकल्पाकरिता प्रत्येक राष्ट्राचा वाटा त्या राष्ट्राची लोकसंख्या व दरडोई उत्पन्नावरून ठरविण्यात येतो. १९७० करिता काही प्रमुख राष्ट्रांचा वाटा पुढीलप्रमाणे अंदाजिला होता : अमेरिकेची संयुक्त संस्थाने ३०·८% रशिया (युक्रेनसह) १४·८६% ब्रिटन  ५·९५% आणि भारत १·५६%. १९७१ करिता केलेल्या अंदाजपत्रकात एकूण ७,५२,१५,००० अमेरिकन डॉलर्स खर्च धरण्यात आला होता. याशिवाय संयुक्त राष्ट्रांकडून तांत्रिक साहाय्य निधीतून काही रक्कम देण्यात येते तसेच संयुक्त राष्ट्र बालक निधीतूनही (युनिसेफमधूनही) औषधे, उपकरणे व संयुक्त कार्य या स्वरूपात मदत करण्यात येते. व्यक्ती, संस्था व सरकारे यांच्याकडून आर्थिक साहाय्य वेळोवेळी मिळते. १९६० पासून एक स्वेच्छ निधी उभारण्यात आला असून या निधीमार्फत देवी, कुष्ठरोग व यॉज यांचे निर्मूलन पाणीपुरवठा वैद्यकीय संशोधन वगैरे कामे चालतात.

कार्य : संघटनेच्या घटनेतील पहिले कलम ‘जगातील सर्व लोकांना शक्य तेवढे अधिकाधिक आरोग्य मिळवून देणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे’ असे असून या उद्दिष्टानुसार संघटनेचे कार्य चालते.

संघटनेमार्फत होणारे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अनेक राष्ट्रांना अनेकविध प्रकारे साहाय्य करणे. हे साहाय्य पुढील स्वरूपाचे असते : (१) राष्ट्रीय आरोग्य सेवेला मजबुती आणण्यासाठी मदत. (२) आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी शिक्षण साहाय्य. (३) राष्ट्रातील प्रमुख रोगांच्या निवारणार्थ मदत. (४) माता व बालके यांच्या आरोग्यरक्षणाकरिता साहाय्य. (५) पाणीपुरवठा आणि इतर स्वच्छताविषयक कार्यांसाठी साहाय्य. (६) मानसिक आरोग्य प्रवर्तक साहाय्य.

एखाद्या राष्ट्राकडून साहाय्याकरिता मागणी येताच संघटनेमार्फत त्या विशिष्ट प्रश्नाचा अभ्यास केला जातो. तेथील शासनाच्या एकट्या प्रयत्नाने तो सुटणार नाही, अशी खात्री करून घेतल्यानंतर त्या राष्ट्रातील आरोग्याधिकाऱ्याबरोबर विचारविनिमय करून एक आराखडा तयार करण्यात येतो. हा आराखडा संबंधित प्रादेशिक केंद्रामार्फत मध्यवर्ती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. सभेने मान्यता दिल्यानंतर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकरिता तपशीलवार योजना तयार करण्यात येते नंतर जरुरीनुसार मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रादेशिक कार्यालयाला तज्ञ पुरविण्यात येतात व मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यास सुरुवात होते. या कार्यात संघटना कर्मचारी आणि स्थानिक आरोग्याधिकारी सहभागी असतात. हाती घेतलेले कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी त्या राष्ट्राच्या शासनावर असते.

भारताला आतापर्यंत हिवताप, क्षय, देवीनिर्मूलन, माता व बालके यांचे आरोग्य या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता तसेच कुष्ठरोग, गुप्तरोग, खुपरी, पटकी इत्यादींवरील मोहिमांकरिता पुष्कळ साहाय्य मिळाले आहे. नागपूर येथील केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संशोधन संस्थेला उपकरणे व इतर साहित्य घेण्याकरिता सव्वापाच लक्ष डॉलर्स मिळाले असून संघटनेने योग्य तो सल्लाही या कामी दिला.

आणखी काही महत्त्वाच्या कार्यांत पुढील गोष्टींचा समावेश होतो : सांसर्गिक रोगांसंबंधी माहिती गोळा करून ती सर्व राष्ट्रांना पुरविणे विलग्नवासविषयक माहिती गोळा करणे औषधिद्रव्यांचे प्रमाणीकरण, औषधातील प्रभावी द्रव्यांचे परिमाण व पद्धती यांबद्दल निश्चित नियम घालून देणे आंतरराष्ट्रीय निघंटू  (इंटरनॅशनल फार्माकोपिया) प्रसिद्ध करणे जन्म-मृत्यूसंबंधी आकडेवारी प्रसिद्ध करणे.

विद्यावेतने देऊन विशेष शिक्षणासाठी संघटनेमार्फत मदत दिली जाते. डिसेंबर १९७० ते नोव्हेंबर १९७१ या काळात निरनिराळ्या वैद्यकीय विषयांकरिता अशी ३,३१७ विद्यावेतने चालू होती. याशिवाय १९७१ मध्ये संशोधन कार्याकरिता १०० देणग्या देण्यात आल्या.

आरोग्यासंबंधी वाङ्‌मय प्रसिद्ध करण्याचे कार्यही संघटना करते. त्याकरिता सर्व जगात ९० माहिती केंद्रे उभारलेली आहेत. उदा., इंग्लंडमधील इन्फ्ल्युएंझा केंद्र, अमेरिकेतील लस संशोधन केंद्र, अर्जेंटिनामधील अस्थि-अर्बुदांच्या (अस्थीतील पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठींसंबंधीच्या) संशोधनाचे केंद्र. या केंद्रातील तज्ञ जरूर ती माहिती गोळा करून तिच्या आधाराने निष्कर्ष काढतात.

जगातील सर्व उत्तमोत्तम शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने संघटनेने सु. २,००० शास्त्रज्ञांच्या व शिक्षकांच्या विषयवार ४४ याद्या तयार केल्या आहेत. भारतीय तज्ञांना योग्य प्रतिनिधित्व या याद्यांत मिळाले आहे. या याद्यांमधून जरुरीप्रमाणे ८ तज्ञांची निवड प्रमुख कार्यवाह करतात. हे तज्ञ सर्व काम विनामूल्य करतात जरुरीप्रमाणे त्यांच्या सभा भरून आधुनिक मतप्रवाहांची चर्चा केली जाते व या चर्चांवर आधारित प्रकाशने प्रसिद्ध केली जातात.


प्रकाशने : संघटनेमार्फत खालील प्रकाशने प्रसिद्ध होतात : (१) बुलेटिन ऑफ द ‘हू’  : संशोधनापासून उपलब्ध झालेल्या नवीन ज्ञानक्षेत्रांचे वर्णन, विविध प्रयोगशाळांतून चालू असलेल्या व प्रत्यक्ष झालेल्या संशोधनकार्याची माहिती यात देण्यात येते. दर सहा महिन्यांनी एक ग्रंथ आणि प्रत्येक ग्रंथात ६ अंक प्रसिद्ध होतात. हे समाचारपत्र इंग्रजी व फ्रेंच भाषेत असते व एका भाषेत समग्र लेख असला, तर दुसरीत त्याचा सारांश देतात. (२) ‘हू’ क्रॉनिकल : दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या या प्रकाशनात संघटनेमार्फत चालू असलेल्या कार्याची माहिती, वैद्य व आरोग्य कर्मचारी यांना उपयुक्त अशी आधुनिक प्रगतीसंबंधीची माहिती देण्यात येते. हे प्रकाशन पाचही अधिकृत भाषांत प्रसिद्ध होते. (३) इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ लेजिस्लेशन : दर तिमाहीस प्रसिद्ध होणाऱ्या या प्रकाशनात विविध देशांतील आरोग्यविषयक महत्त्वाच्या कायद्यांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतून समीक्षण असते. (४) सांसर्गिक रोग व जन्म-मृत्युविषयक माहिती देणारा हा वृत्तांत दरमहा इंग्रजी व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध होतो. (५) सांसर्गिक रोग व जन्म-मृत्यूंची वार्षिक आकडेवारी : ही दरसाल इंग्रजी व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध होते. (६) सांसर्गिक रोगांचा साप्ताहिक वृत्तांत : इंग्रजी व फ्रेंच भाषांतून. (७) वर्ल्ड हेल्थ : साधारण जनतेकरिता हे सचित्र मासिक इंग्रजी, फ्रेंच, रशियन व स्पॅनिश भाषांत प्रसिद्ध होते. (८) पदव्युत्तर कार्यकर्त्यांना मार्गदर्शक पाठ्यपुस्तके वरील चार भाषांत प्रसिद्ध होतात. (९) सार्वजनिक आरोग्यासंबंधी निबंध : विशेष अभ्यास करून लिहिलेले निरनिराळ्या विषयांवरील निबंध संघटना प्रसिद्ध करते. ते इंग्रजी व फ्रेंच भाषांत असतात. (१०) शास्त्रीय वृत्तांत व टिपणे : तज्ञांच्या समित्यांकडून आलेले वृत्तांत चार भाषांतून. (११) अधिकृत वृत्तांत : संघटनेच्या मुख्य सभेचे व इतर सभांचे वृत्तांत, कार्यवाहांचा वार्षिक वृत्तांत व दर चार वर्षांनी जागतिक आरोग्यासंबंधी अधिकृत निवेदन.

यांशिवाय जगातील वैद्यकीय शिक्षणसंस्था, दंतरोग शिक्षणसंस्था यांच्या याद्या व माहिती, आंतरराष्ट्रीय निघंटू (२ विभाग आणि १ पुरवणी), विलग्नवासाचे आंतरराष्ट्रीय संकेत यांबद्दलची प्रकाशनेही वेळोवेळी प्रसिद्ध होतात.

संघटनेचे एक स्वतंत्र ग्रंथालय असून निरनिराळ्या प्रादेशिक कार्यालयांना पुस्तके उसनवार देण्याची व्यवस्था आहे. १९७१ साली या ग्रंथालयात ३,१५७ नियतकालिके आली व ३,२०७ पुस्तके व पत्रिका जमा झाल्या.

इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध : (१) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी : या निधीमार्फत होणाऱ्या कार्याला संघटनेची तांत्रिक संमती मिळविण्यात येते. हे कार्य गर्भिणींचे व बालकांचे आरोग्य, क्षयप्रतिबंधक लस, हिवताप प्रतिबंधक, यॉज व खुपरी विरोधी मोहीम आणि पोषण यांवर केंद्रित केलेले असते. (२) आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेशी सहकार्य : कारखान्यांतील कामगारांचे आरोग्य, खलाशांचे आरोग्य व जहाजांतील आरोग्य व्यवस्था, आरोग्य विमा योजना व इतर सामाजिक विमा योजना यांविषयी कार्य केले जाते. (३) जागतिक अन्न व शेती संघटनेच्या सहकार्याने इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या सांसर्गिक रोगांबद्दल, तसेच पोषण व खेड्यांतील जनतेचे आरोग्यरक्षण ही कार्येही संघटना करते. (४) यांशिवाय अनेक बिनसरकारी आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संघटना सहकार्य करते व त्यांना अधिकृत मान्यता देते. यांपैकी काहींची नावे अशी : आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संस्था, आंतरराष्ट्रीय कर्करोगविरोधी संघ, जागतिक वैद्यकीय संघटना, जागतिक पशुवैद्यक संघटना वगैरे.

जागतिक आरोग्यास धोका उत्पन्न करणारा कोणताही प्रश्न ही संघटना ताबडतोब हाताळावयास सुरुवात करते. उदा., रुधिराभिसरण तंत्राच्या, विशेषेकरून हृदय व वाहिन्यांच्या रोगांमुळे होणारी मृत्युसंख्या वाढल्याचे निदर्शनास येताच संघटनेने त्यावर ताबडतोब संशोधनास सुरुवात केली. शरीरात अगदी अल्प प्रमाणात असलेली मूलद्रव्ये आणि हृद्‌रोग यांमधील संबंध शोधण्याच्या उद्देशाने फिनलंडमधील पाण्याची त्या दृष्टीने तपासणी चालू आहे. वरीलप्रमाणेच वातावरणीय आरोग्य हाही महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. वातावरणीय प्रदूषण हा आता मर्यादित स्वरूपाचा प्रश्न राहिला नसून मानवाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीमधील मोठा अडथळा एवढेच नव्हे, तर मानवाच्या अस्तित्वास आव्हान देणारा प्रश्न बनला आहे. संघटना या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवीत आहे. ५ जून १९७२ रोजी स्टॉकहोम येथे जागतिक प्रदूषण परिषद संयुक्त राष्ट्रांतर्फे भरविण्यात आली होती.

अद्रानवाला, जे. के. (इं.) ढमढेरे, वा. रा. (म.) भालेराव, य. त्र्यं.