झोप : झोप ही दैंनदिन जीवनात पुनःपुन्हा दिसून येणारी प्राकृत शरीराची एक अवस्था आहे. या अवस्थेत शरीराचे सर्व व्यापार मंदपणे चालतात, मनाची चेतनावस्था मंद होते, स्नायूंना शैथिल्य येते आणि शरीरातील चयापचयाचे (सतत चालू असलेल्या भौतिक व रासायनिक बदलांचे) प्रमाणही कमी पडते. ही निद्रावस्था शरीरधारणेला अत्यंत आवश्यक असून तिच्यामुळे शरीराला विश्रांती मिळते, तीनंतर येणाऱ्या जागृतावस्थेत काम करण्याला तरतरी येते, झोपेपूर्वी होऊन गेलेल्या शरीर व्यापारामुळे झालेली झीज भरून निघून शरीर जास्त कार्यक्षम बनते.

मद्यपानानंतरची बेशुद्धी आणि शुद्धीहरणानंतर (ॲनास्थेशियानंतर) येणारी मोहनिद्रा, कित्येक प्राण्यांना हिवाळ्यात येणारी दीर्घ शीतनिद्रा (सुप्तावस्था) या अवस्थांमध्येही झोपेसारखीच लक्षणे दिसतात तसेच अपस्माराचा (वारंवार बेशुद्धी आणणाऱ्या मज्जायंत्रणेच्या विकाराचा) झटका येऊन गेल्यानंतर आणि संमोहनाच्या प्रयोगानंतर संज्ञाविहीन हालचाली दिसून येतात, परंतु या प्रकारांपेक्षा झोप ही अवस्था निराळी असते. ⇨निद्रारोग  ही एक स्वतंत्र व्याधी आहे. झोपेतून जागृतावस्थेत येण्याला विशेष प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही आणि एकदा जागृतावस्था आली म्हणजे त्या व्यक्तीचे कार्य नेहमीप्रमाणे चालते, असा प्रकार वर दिलेल्या अवस्थांमध्ये नसतो.

प्राण्यांतील निद्रावस्था : बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये जागृतावस्था आणि निद्रावस्था या एकीमागून एक अशा अनुक्रमाने येतात आणि त्यांच्यामध्ये एक तऱ्हेची लयबद्धता असते. बहुतेक सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्या झोपेचे स्वरूप मनुष्याच्या झोपेसारखेच असते. झोपेच्या वेळी त्यांच्या शारीरिक क्रियेत घडून येणारे फरकही मनुष्याच्या झोपेतील शारीरिक क्रियेतील फरकांप्रमाणे असतात, शरीरावर परिणाम करणाऱ्या संवेदनांचे प्रमाण कमी केले असता मेंदूचे उद्दीपन कमी होऊन त्या प्राण्यांना झोप आणता येते, परंतु प्राण्यांमध्ये निद्रावस्था आणि जागृतावस्था यांमध्ये लयबद्धता नेहमी दैनिक असतेच असे नाही. पुष्कळ प्राण्यांत ही लयबद्धता एका दिवसात अनेक वेळा दिसून येते. घुशी दिवसातून १० वेळा, उंदीर ९ वेळा आणि ससे १६ ते २१ वेळा झोप घेतात. इतर काही प्राण्यांत ही लयबद्धता २४ तासांची असते. अस्वलासारखे काही प्राणी हिवाळ्यात दीर्घ अशी शीतनिद्रा घेत नाहीत परंतु सर्व हिवाळ्यात मधून मधून एकाच वेळी २४ तास अथवा त्यापेक्षाही जास्त वेळ झोप घेतात.

पाळीव प्राण्यांनाही झोपेची आवश्यकता असते आणि तिच्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. सर्वसाधारणपणे मांसाहारी पशूंना शाकाहारी पशूंपेक्षा जास्त प्रमाणात झोपेची आवश्यकता असते, असे दिसून येते, कुत्रा व मांजर हे प्राणी बराच काळ झोपेमध्ये घालवतात, तर शाकाहारी जनावरे एका वेळी थोडी थोडी झोप घेताना दिसतात. दोन्ही गटांतील प्राणी माणसाप्रमाणे गाढ निद्रा घेत नाहीत. कुत्रा व मांजर यांना भोवती गोंगाट चालू असताना झोप घेता येत नाही. घोड्याची झोप फारच सावध असते. पावलांच्या जराशा आवाजानेही तो जागा होतो. तो डोळे उघडे ठेवून किंवा अर्धवट उघडे ठेवून झोप घेतो. बहुधा तो जमिनीवर आडवा पडून झोप घेतो, तथापि तो उभ्यानेही झोप घेऊ शकतो. त्याला फार थोडी झोप पुरते, पण ती शांत असावी लागते.

उभ्याने झोप घेणारा घोडा आपले चार पाय थोडेफार पोटाखाली आणतो व पापण्या अर्धवट मिटतो. झोपेमध्ये घोड्याची शुद्ध हरपलेली असते व त्याच्या स्नायूंवर मेंदूचे नियंत्रण नसते. तरीही ते कार्यक्षम राहतात म्हणूनच तो उभ्याने झोप घेऊ शकतो. याचे कारण स्नायूंच्या प्रतिक्षेपी क्रिया (शरीराच्या एका भागात उत्पन्न झालेल्या आवेगामुळे इतरत्र झालेली प्रतिक्रिया) घोड्यामध्ये जास्त सुसंघटित असून त्यांवर मेरुरज्जूचे (मेंदूच्या पाठीमागच्या शेपटीसारख्या भागापासून निघणाऱ्या, पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या मध्यवर्ती मज्जायंत्रणेच्या दोरीसारख्या भागाचे) नियंत्रण असते. तसेच अशंतः निमस्तिष्काच्या (मेंदूतील मागच्या जाडसर भागाच्या) अंमलामुळेही हे घडते.

रवंथ करणारी जनावरे आडवे पडून डोके मागे वळवून जांघेजवळ नाक खुपसून किंवा पुढे डोके नेऊन जमिनीवर हनुवटी टेकून झोपी जातात.

कनिष्ठ प्रतीच्या प्राण्यांमध्ये–अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) आणि निम्न श्रेणीच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्येही–निष्क्रियतेचे काही कालावधी दिसून येतात. त्या काळात त्यांची संवेदनशीलता कमी झालेली असते परंतु खऱ्या झोपेशी असलेला त्या अवस्थेचा संबंध लवकर उमगून येत नाही. पुष्कळ जातींचे मासे, बहुतेक उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी आणि सरीसृप (सरपटणारे) प्राणी यांच्यामध्ये असे निष्क्रियतेचे कालावधी दिसून येतात. जमावाने एकत्र राहणारे हायमेनॉप्टेरा (मुंग्या, मधमाश्या वगैरे) आणि फुलपाखरे यांमध्ये असे कालावधी उघडच दिसतात. इतर काही कीटक रात्री निष्क्रिय आणि असंवेदनक्षम असतात. सेफॅलोपोडांमध्ये (शीर्षपाद प्राण्यांमध्ये) देखील निष्क्रियतेचे असेच कालावधी असतात. इतर कित्येक प्राण्यांतही असाच प्रकार दिसतो. रात्रीच्या वेळी तापमान कमी होते, प्रकाशाचा अभाव असतो व दोन्हींचा प्रभाव नसल्यामुळे संवेदनक्षमता कमी होत असण्याचीही शक्यता आहे. असे असेल, तर ही असंवेदनक्षमताही खऱ्या झोपेपेक्षा काही निराळीच अवस्था असणे शक्य आहे. खरी झोप दिवसातून केव्हाही येऊ शकते.

बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर निद्रावस्थेत जमिनीवर आडवे होते. वटवाघळासारख्या काही प्राण्यांचे अपवाद सोडल्यास ही स्थिती सर्व प्राण्यांत दिसून येते. या आडव्या होण्याच्या शरीरावस्थेमुळे सर्व स्नायू शिथिल होतात. शरीर संतुलनाचे जरूरी नसल्यामुळे स्नांयूकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना बंद पडून मेंदूचे उत्तेजन कमी होते. सर्व स्नायूंप्रमाणे जबड्याचे आणि तालूचे स्नायूही शिथिल झाल्यामुळे काही व्यक्तींमध्ये दर श्वासोच्छ्‌वासाबरोबर तालू कंप पावते व त्यामुळे आवाज उत्पन्न होतो, त्यालाच घोरणे असे म्हणतात. काही माणसे झोपेत तोंड उघडे ठेवतात, हेही त्यांच्या नासागिलायू (घशात मध्यभागी असलेली ग्रंथी) व गिलायू (टॉन्सिल) यांच्या निरोगीपणाच्या अभावामुळे घडते. झोपेत दात खाणे, ओरडणे, बडबडणे हे मानसिक अवस्थेवर, तसेच दुःस्वप्नांवर अवलंबून असते.

शरीराला थकवा आला असता बसल्याबसल्याही झोप लागू शकते. क्वचित प्रसंगी उभ्याउभ्याही झोप लागल्याची उदाहरणे दृष्टीस पडतात परंतु या दोन्ही प्रकारांत झोप तितकीशी गाढ नसते.

तेच ते काम सारखे करीत राहिले, तर त्या कामाचा कंटाळा येऊन निरसता उत्पन्न झाली म्हणजेही झोप येते. कोणत्याही क्रियेचा तोच तोपणा कंटाळा उत्पन्न करून झोप आणू शकतो. तसेच अंधार, शांत वातावरण वगैरे गोष्टींमुळे मेंदूकडे जाणाऱ्या बाह्य संवेदना कमी होतात व त्याची झोप येण्यास मदत होते.

निद्राकाल : मनुष्याला दिवसातून किती वेळ झोप घेणे आवश्यक आहे, हे त्याच्या सवयी आणि शारीरिक व मानसिक श्रमांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, जसजसे वय वाढत जाते, तसतशी झोपेची जरूरी कमीकमी होत जाते. नवजात बालकाला २० ते २२ तास झोपेची आवश्यकता असते, ही समजूत चूकीची आहे. ते सरासरी १४–१५ तास झोपते आणि सहा महिन्याचे झाल्यावर त्याची झोप कमी होऊन १३–१४ तासच पुरेशी होते. लहान मुलाला १२ ते १४ तास, प्रौढास ७ ते ९ तास व वृद्धास ५ ते ७ तास झोप पुरते.

नेहमीपेक्षा अगदी कमी वेळ झोप मिळाली, तरी दीर्घकालपर्यंत मनुष्य जमवून घेऊ शकतो. काही व्यक्ती त्यांना पडत असलेल्या शारीरिक व मानसिक श्रमांच्या मानाने आवश्यक त्याहून अधिक काळ निद्रासुख अनुभवितात असे आढळते. जागृत जीवनातील क्षोभकारक प्रसंगातून मनाची सुटका अथवा सोडवणूक होण्यासाठीही फाजील झोप घेतली जाते असे आढळते.


निद्रावस्थेतील विविध प्रक्रिया व सवयी : बाह्य परिस्थितीमुळे उत्पन्न होणाऱ्या संवेदना कमी झाल्या म्हणजे झोप येण्यास मदत होते. डोळे मिटल्यामुळे प्रकाश-संवेदना, शांत वातावरणामुळे ध्वनिसंवेदना, मऊ बिछान्यावर आडवे पडल्यामुळे त्वचेमध्ये उत्पन्न होणाऱ्या स्पर्शसंवेदना वगैरे बाह्य संवेदना कमी झाल्यास झोप येते परंतु शरीरात उत्पन्न होणाऱ्या अंतःसंवेदना स्नायू जसजसे शिथिल होत जातील तसतशाच कमी होत जातात. म्हणून अंथरूणात पडण्याच्या अवस्थेमुळे त्याही संवेदना कमी होऊन काही काळाने झोप लागते.

स्नायू शिथिल झाले, तरी झोपी गेलेल्या व्यक्तीच्या शरीराची हालचाल, अजिबात थांबतेच असे नाही. झोपेमध्येही शरीराची हालचाल होऊन अंगस्थिती (शरीराची दृश्य अवस्था) जागृती न येता बदलते. लहान मुले आणि कित्येक मोठी माणसेही झोपेत लोळतात, हे आपण पाहतो. ही अंगस्थिती बदलण्याची क्रिया ती व्यक्ती पूर्ण जागृत न होताच होत असते. झोप जितकी जास्त वेळ टिकते तितके या हालचालीचे प्रमाणही वाढत जाते. स्वप्न पडत असेल, तर त्याच्या शेवटी मनुष्य एखादी मोठी हालचाल झोपेत करतो पण कुशीला वळणे इत्यादीसारखी थोडीशी हालचाल दर दहाबारा मिनिटांनी चालू असते. कदाचित त्वचेच्या ज्या भागावर दाब पडलेला असतो तेथून संवेदना उत्पन्न होऊन तो दाब कमी करण्याच्या दृष्टीने या हालचाली आपोआप प्रतिक्षेपी क्रियेत होत असाव्यात.

काही माणसे झोपेत चालतात, दारांच्या कड्या काढून जिनेदेखील उतरतात. हे बव्हंशी जागृतावस्थेत त्यांनी अनुभविलेल्या प्रसंगाच्या अथवा कल्पनांच्या तीव्रतेवर अवलंबून असते तसेच पलायनवादी प्रवृत्ती, बहुव्यक्तिमत्त्व (मनोव्यापारात सुसूत्रता नसल्यामुळे विचारात अगर कृतीत तुटकपणा असणे), स्मृतिलोप इ. वियोजनीय प्रतिक्रिया तंत्रिका (मज्जेच्या) विकाराशीही त्याचा संबंध लावतात. झोपेत चालणारांची ‘दृष्टी’जागी असते, पण ‘जाणीव’ निद्रिस्तच असते. निद्रितावस्थेत अंथरुणांतच मूत्रोत्सर्ग होणे, हाही काहीसा तसाच प्रकार असतो. स्वभावतःच मूत्रोत्सर्ग क्रियेवर ताबा मिळण्यास मलोत्सर्ग क्रियेहून अधिक काळ लागतो आणि काही निरोगी मुलेही वयाच्या पाच–सात वर्षांपर्यंतसुद्धा गाढ झोपेत अंथरूण भिजवितात. याहून मोठेपणी अंथरुणावर मूत्रोत्सर्ग होणे, हा मनोविकृतीचा विषय ठरतो (अपस्मारासारख्या झटक्यांमध्ये मूत्रोत्सर्गावरील ताबा तात्पुरता नष्ट होऊन मूत्रोत्सर्ग होतो, तो प्रकार यात मोडत नाही) , तरीही विद्युत् मस्तिष्कालेखाच्या (मेंदूमध्ये निर्माण होणारे विद्युत् प्रवाह नोंदवून मिळणाऱ्या आलेखाच्या) द्वारा असा मूत्रोत्सर्ग जागृतावस्थेतच होत असतो, असे सिद्ध होते. सामान्य लक्षणांमुळे व्यक्ती झोपेत असल्यासारखी वाटते एवढेच.

झोप घेण्याची नित्य वेळ, तसेच रोज वापरण्यात असणाऱ्या उशी, गादी, पांघरुणे वगैरे सवयीच्या गोष्टींवरही झोप अवलंबून असते. ठराविक वेळ झाली म्हणजे झोप येऊ लागते. मेंदूतील सर्वोच्च केंद्राला त्याच त्याच विशिष्ट परिस्थितीची सवय झाल्यानंतर ती परिस्थिती केव्हाही उत्पन्न झाली असता त्या केंद्राची प्रतिक्रिया तशीच होते. अशा प्रतिक्षेपी क्रियेला अवलंबी प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. झोपेची आणि जागृतीची ठराविक वेळ, झोपण्याच्या वेळी नित्य वापरण्यात येणाऱ्या उशी, गादी, पांघरूण वगैरे वस्तू यांची सवय झालेली असली म्हणजे पुढे सवयीच्या त्याच त्या वस्तू असल्या, तर त्या झोप येण्यास साहाय्यक होतात. जागृतावस्था आणि निद्रावस्था यांमध्ये एक तऱ्हेची लयबद्धता उत्पन्न होऊन तिच्यामुळे ठराविक वेळी झोप व जागृती येते. परिणामी झोपेमुळे विश्रांती आणि काम यांचे योग्य ते प्रमाण राहू शकते.

झोप झाली पण विश्रांती झाली का? झाली असल्यास कितपत? या प्रश्नांची उत्तरे झोपतेवेळच्या वातावरणातील उष्णता वा थंडपणा, झोप घेण्याच्या जागेचा परिचितपणा, झोप घेते वेळी वापरलेले कपडे, झोपी जाण्यापूर्वीची मानसिक उल्हसित किंवा ताणाची परिस्थिती व झोपून उठल्याबरोबर कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची आवड वा नावड यांवर अवलंबून असते. दिवाळीच्या पहाटे उठणारे मूल व कुठल्या तरी मधल्या स्थानकावर दुसऱ्या गाडीत जागा मिळविण्यासाठी चिक्कार गर्दीत झगडावे लागणार आहे या धास्तीत दुसऱ्या वर्गाच्या डब्यात परिवारासह प्रवास करीत असणारा, कसा तरी झोपलेला मध्यमवयीन मनुष्य यांच्या झोपेची वेळ तितकीच मोजली गेली, तरी तिने आणलेली तरतरी भिन्न असते. तसेच गाढ निद्रा अल्पकालात जी तरतरी आणू शकते, ती सारख्या चाळवत असलेल्या रात्रभरच्या निद्रेनेही मिळू शकत नाही.

पूर्णपणे निरोगी असलेल्या व कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन न केलेल्या व्यक्तीला पेंग आली, तिचे काळवेळ व भोवतालची परिस्थिती यांबद्दलचे भान गेले की, ती व्यक्ती आपल्याला झोप लागली होती, असे समजते. व्यक्तीचे डोळे मिटले गेले, श्वासोच्छ्‌वास गंभीर व मंदगती झाला, हालचाल थांबली, बारीक सारीक आवाजांचा परिणाम होईनासा झाला आणि तरीही थोड्याशा तीव्रतर आवाजाने किंवा इतर प्रकारे पूर्ण जागृतावस्था आणण्याची शक्यता असली की, आपण ती व्यक्ती झोपी गेली, असे समजतो.

झोपेमध्ये शरीराचे सर्व व्यापार मंदगतीने चालतात. रक्तदाब कमी-कमी होत सु. ३-४ तासांनी नेहमीपेक्षा १० ते ३० मिमी. पर्यंत उतरतो व गाढ झोप असेपर्यंत तसाच राहतो. जागृतावस्था येण्याच्या सुमारास तो हळूहळू वाढत जाऊन जागृतीच्या वेळी नेहमीसारखा होतो. नाडीचे ठोके दर मिनिटाला १० ते २५ पर्यंत कमी पडतात. शरीराच्या चयापचयाचे प्रमाणही १० ते १५ टक्के कमी होते. त्यामुळे शरीराचे तापमान एक अंशाने कमी होते. श्वासोच्छ्‌वासाचे दर मिनिटाचे प्रमाणही कमी होऊन तो अनियमितपणे चालतो, मूत्राचे प्रमाणही कमी झाल्यामुळे त्याचे विशिष्ट गुरुत्व वाढलेले असते. अश्रुग्रंथींचा व लालाग्रंथींचा (लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींचा) स्त्रावही कमी पडतो. सर्व स्नायू शिथिल पडल्यामुळे सर्व प्रतिक्षेपी क्रिया बंद पडतात, परंतु डोळ्यांची प्रकाश–प्रतिक्षेपी क्रिया मात्र अबाधित असते. डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचित होतात व बुबुळे वरच्या बाजूस फिरलेली असतात. त्वचेतील आणि जठराच्या रक्तवाहिन्यांतील स्नायू शिथिल झाल्यामुळे घाम आणि जठररसाचा स्त्राव मात्र वाढलेला असतो.

शास्त्रीय व पूर्ण वस्तुनिष्ठ दृष्ट्या मेंदूत निर्माण होणाऱ्या विद्युत् तरंगांच्या ऊर्जेतील फरकामुळे कागदाच्या धावत्या पट्टीवर निदर्शकाने काढलेल्या आलेखाद्वारे निद्रास्थिती ठरविणे योग्य असते. गाढ झोपेत या विद्युत् मस्तिष्कालेखातील तरंग मदंगती व दीर्घ होतात. जागृतावस्थेत त्या छोट्या व शीघ्रगती असून (दर सेंकदाला सु. दहा अशी) त्यांची एक लय असते. झोप येत असताना हा आलेख बदलतो. तसेच झोप उडत असतानाही तरंगांची गती वाढते, लांबी कमी होते. व्यक्ती झोपेत आहे की, जागी आहे, हे या तरंगांच्या स्वरूपावरून ठरविले म्हणजे लौकिक दृष्ट्या झोपेत झालेल्या क्रियाही वास्तविक जागृतावस्थेतीलच कशा असतात, याची उदाहरणे वर दिलीच आहेत.   

प्राणिमात्राला झोप ही अत्यंत आवश्यक असते, तरीही अपुरी झोप मिळाल्याचा कालावधी थोडा असेल, तर निरोगी मनुष्यात या जागरणाचे दुष्परिणाम पुरेशी झोप मिळाल्याबरोबर नाहीसे होतात. मनुष्याने मुद्दाम झोप कमी घेतली, तर त्याच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होत नाही असे आढळते परंतु एखाद्या व्यक्तीला किती झोपेची आवश्यकता आहे, हे तिची झोपेची भूक व झोप न मिळाल्यास उद्‌भवणाऱ्या क्रिया यावरून ठरते.

दिवसा उजेडी काम करणे व रात्रीच्या अंधारात झोपून रहाणे श्रेयस्कर हे पृथ्वीवरील सर्वच मानवांच्या अप्रगतावस्थेपासूनचे अनुभवाचे ज्ञान व कदाचित यामुळेच जागृतीत अधिक ‘तोड’व सुषुप्तीत अधिक ‘जोड’ अशी अपचय-चय यांची शारीरिक व मानसिक दैनिक लय जगभर निर्माण झाली आहे. पण मनुष्याच्या वास्तव्याचा, भौगोलिक प्रदेश व त्याची संस्कृती यांचा थोडाफार परिणाम त्याच्या झोपेच्या पद्धतीवर होतो. उष्ण कटिबंधातील मानवांना, विशेषतः उन्हाळ्यात, थोडी भोजनोत्तर वामकुक्षी मानवते आणि त्यामानाने रात्री थोडी कमी झोप पुरते. उत्तर ध्रुवाकडील प्रदेशात वसंत ऋतूत झोप कमी घेऊन शिशिरात तिची भरपाई केल्यास चालते. रात्रपाळी करणाऱ्या लोकांना किंवा नटासारख्या व्यावसायिकांना आपली सुषुप्ति-जागृतीची दैंनदिन लयही फिरवून घ्यावी लागते आणि त्याचे त्यांना फार सायास होतात, असे दिसून येत नाही. या लयीचा काल मात्र अष्टौप्रहरांचाच राहतो. मनुष्याच्या जीवनव्यापारांची सर्वच्या सर्व परिस्थितीच बदलून टाकणे फार कठीण असल्याने ही अष्टौप्रहराची लय बदलता येईल की काय, हे ठरविणे अवकाश-यात्रींच्या बाबतीत इतर विषयांबद्दल केलेल्या अभ्यासाप्रमाणे विशेष अभ्यासावाचून ठरविणे दुष्कर आहे.


झोपेचा तैलबुद्धी किंवा जड बुद्धीशीही संबंध नसतो. कित्येक चलाख माणसांचे नऊ-नऊ तास झोप मिळाल्यावाचून निभत नाही, तर इतरांना चार-पाच तासांची झोपही पुरेशी होते, याउलट पुष्कळ अर्धवट व्यक्ती सारख्या अस्वस्थ असतात व फार थोडी झोप घेतात. झोप अधिक घेतल्यामुळे कुठली व्याधी उद्‌भवते असे नाही.  

झोपेत काही शिक्षण देणे शक्य होईल का, हा एक वादाचा विषय आहे. विद्युत् मस्तिष्कालेखनावरून ज्याला निद्राकाल म्हणता येणार नाही अशा काळात रेडिओ, फीतमुद्रक (टेपरेकॉर्डर) इत्यादींच्या साहाय्याने काही ज्ञान प्राप्त करून देता येते पण हे निद्रेतील ज्ञान म्हणावयाचे की नाही, हे विवाद्य आहे.

निद्रेच्या उपपत्तीबद्दलची मते व कल्पना : झोप कशी उत्पन्न होते याबद्दल अनेकांच्या अनेक कल्पना, तर्क आणि मते आहेत परंतु अजून झोपेबद्दल निश्चित व निर्णायक अशी उपपत्ती सांगता येत नाही. या विविध मतामतांतरातील काही महत्त्वाची मते थोडक्यात खाली दिली आहेत.

  

रक्तपरिवहन उपपत्ती : मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी पडल्यामुळे सर्व तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) कार्य मंदपणे चालते व त्यानंतर झोप लागते. पोटभर जेवण झाल्यानंतर जठराच्या रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन पुष्कळसे रक्त तिकडे गेल्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी पडते व त्यामुळे झोप येते, असे या उपपत्तीचे स्वरूप आहे. झोपी गेलेल्या व्यक्तीच्या त्वचेकडे जास्त रक्त गेल्यामुळे घाम येतो व रक्तदाब कमी पडतो. या गोष्टी या उपपत्तीला पोषक मानल्या जातात परंतु इतर कारणांनी मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला रक्तपुरवठा कमी झाल्यास झोप येतेच असे नाही. कदाचित मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे झोप येत असेल, अशी शक्यता दुर्लक्षिता येत नाही.

रासायनिक उपपत्ती : शरीरातील ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांना) फार काम पडल्यामुळे थकवा आला असता काही रासायनिक पदार्थ उत्पन्न होऊन त्यामुळे झोप लागते, अशी एक कल्पना आहे. या पदार्थांची मेंदूवर क्रिया झाल्यामुळे झाप येत असावी. स्नायूंचे कार्य फार जोराने व फार काळ झाले, तर दुग्धाम्लाचे (लॅक्टिक अम्लाचे) प्रमाण वाढते व त्यामुळे झोप येत असावी परंतु खुद्द दुग्धाम्ल रक्तातून गेल्यास मेंदूस जडत्व येते, हे सिद्ध झालेले नाही. तसेच कित्येक वेळा फार थकवा येऊनही झोप येत नाही, असा अनुभव येतोच.

संमोहनविष (हिप्नोटॉक्सिनी) या नावाचा पदार्थ मेंदूमध्ये उत्पन्न होऊन त्यामुळे झोप येत असावी, असा एक तर्क असून त्यावर आधारित असे प्रयोग करण्यात आले आहेत. झोपी गेलेल्या कुत्र्याच्या मेंदूभोवतीच्या आवरणातील द्रव पदार्थ दुसऱ्या जागृत कुत्र्याच्या मेंदूत घातला असता त्या दुसऱ्या कुत्र्याला झोप येते, असे प्रयोगान्ती दिसून आले आहे. परंतु असा द्रव पदार्थ त्या दुसऱ्या कुत्र्याच्या मेंदूत घातल्यामुळे तेथील दाब वाढून त्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणून झोप येत असणेही शक्य आहे.

अंतःस्त्रावी उपपत्ती : (ज्या ग्रंथींचा उत्तेजक स्त्राव एकदम रक्तात मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रंथींशी निगडित असलेली उपपत्ती). पोष ग्रंथीमध्ये (मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ग्रंथीमध्ये) जागृतावस्थेत ब्रोमीन या पदार्थाचे प्रमाण जास्त असते आणि झोपेत ते प्रमाण कमी होऊन मेंदूच्या मस्तिष्कसेतू या भागात मात्र जास्त दिसते. यावरून पोष ग्रंथीतील या अंतःस्त्रावी पदार्थामुळे झोप येत असावी, अशी एक उपपत्ती लावली असून या अंतःस्त्रावी पदार्थाला ‘ब्रोम हॉर्मोन’ असे नाव देण्यात आले आहे.

तंत्रिकीय उपपत्ती : तंत्रिका तंत्राचा एकक म्हणजे तंत्रिका-कोशिका (मज्जापेशी). या कोशिकेची रचना अशी असते की, मध्यभागी कोशिकाशरीर असून दोन्ही बाजूंस जीवद्रव्ययुक्त (कोशिकेच्या जीवनास आवश्यक असणाऱ्या जटिल द्रव्याने युक्त) फाटे फुटल्यासारखे असतात. या फाट्यांचा व शेजारच्या एकक कोशिकांच्या फाट्यांचा उपागम (संबंध प्रस्थापित) झाल्यामुळे तंत्रिका संवेदना पसरतात. हे फाटे एकमेकांस नुसते टेकलेले असल्यामुळे कोशिकाशरीर आकसले गेल्यास दोन एककांचा संबंध तुटतो व संवेदना पसरण्याची क्रिया बंद पडते. संवेदना अशी बंद पडल्यामुळे झोप येते, असा या उपपत्तीचा अर्थ आहे. थकवा आलेल्या कोशिका आकसलेल्या दिसतात, या गोष्टीवर ही उपपत्ती आधारलेली आहे परंतु यासंबंधी निश्चित असे काहीही सांगता येत नाही.

निरोध उपपत्ती : आय्. पी. पाव्हलॉव्ह या रशियन शास्त्रज्ञांनी अशी उपपत्ती सुचविली आहे की, तीच ती क्रिया सतत होत राहिल्यास मेंदूच्या सर्वोच्च केंद्रात निरोध (कार्य करण्याची असमर्थता) उत्पन्न होतो. ही निरोध स्थिती सर्व मेंदूवर पसरल्यामुळे झोप येते. कोणत्याही क्रियेत वैचित्र्य व भिन्नपणा नसेल, तर जो कंटाळा व नीरसता येते त्यामुळे हा अंतर्गत निरोध उत्पन्न होतो. त्या निरोधामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाऊन त्याचा परिणाम म्हणून झोप येते. कंटाळवाणे आणि सारख्याच आवाजात सारखे चालू असलेले व्याख्यान, गायन अथवा वाचन यांमुळे मेंदूच्या सर्वोच्च केंद्रात निरोध उत्पन्न होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे झोप, असे पाव्हलॉव्ह यांचे मत आहे. दैनंदिन व्यवहारात हा अनुभव आपणास नेहमीच येतो.

पाव्हलॉव्ह यांच्या या उपपत्तीमुळे झोपेत पडणाऱ्या स्वप्नासंबंधी काही प्रश्न सुटण्यास मदत होते. मेंदूच्या सर्वोच्च केंद्रात उत्पन्न झालेला निरोध सर्व केंद्रांत सारख्याच प्रमाणात पसरत नाही. त्यामुळे ज्या भागात त्या निरोधाचे प्रमाण कमी असते, त्या भागाचे कार्य चालूच राहते. विशेषतः स्मृतिकेंद्र असलेल्या मेंदूच्या भागात (कपालास्थीच्या खालच्या भागात) हा निरोध पोहोचला नाही, तर त्या केंद्रावरील सर्वोच्च केंद्राचे नियंत्रण नाहीसे झाल्यामुळे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी स्वप्नात दिसू लागतात. या केंद्राची स्मृती नीट व्यवस्थित मांडण्याची शक्ती मर्यादित असल्यामुळे अनेक स्मृती एकाच वेळी एकत्र येऊन त्यांचा घोटाळा होतो आणि त्यामुळे वेडीवाकडी स्वप्ने पडतात, हा अनुभव प्रत्येकाला आहे. पाव्हलॉव्ह यांच्या निरोध उपपत्तीमुळे स्वप्नांचा थोडासा उलगडा होऊ शकतो [⟶ स्वप्न].


तंत्रिका केंद्र उपपत्ती : मध्यमस्तिष्कामध्ये अभिवाहिनी मस्तिष्क केंद्राच्या (मेंदूच्या तिसऱ्या विवराच्या बाजूच्या भित्तीच्या वरच्या भागात असलेल्या मेंदूतील पांढऱ्या द्रव्याच्या पुंजक्याच्या, थॅलॅमसच्या) खालच्या भागांमध्ये अर्बुद (गाठ) किंवा शोथ (दाहयुक्त सूज) झाल्यास झोप येते, असा अनुभव आहे. निद्रारोग किंवा मस्तिष्कशोथ या रोगात झोप हे एक प्रमुख लक्षण असून त्या रोगामध्ये या केंद्राच्या खालच्या भागाला शोथ आलेला असतो. त्यावरून या जागी जागृतावस्था आणि निद्रा यांवर नियंत्रण करणारे केंद्र आहे अशी एक उपपत्ती लावण्यात आली आहे. मेंदूतील या भागात विजेचा प्रवाह सोडल्यास झोप येते, असे प्रयोगान्ती सिद्ध झालेले आहे. या केंद्राच्या शेजारीच स्वायत्त तंत्रिका तंत्रावर (इच्छानुवर्ती नसणाऱ्या स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या तंत्रिका यंत्रणेवर) नियंत्रण ठेवणारे केंद्र असून त्यांपैकी परानुकंपी तंत्रिका तंत्रामुळे (अरेखित स्नायू व शरीरातील स्नायू यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या भागामुळे) झोप येते. परानुकंपी तंत्रिका केंद्रास उत्तेजित केले असता झोपेत दिसणारी पुष्कळ लक्षणे उत्पन्न होतात. उदा., डोळ्यांतील बाहुल्यांचे आकुंचन, नाडीचे प्रमाण कमी होणे, त्वचेतील रक्तवाहिन्यांच्या प्रसरणामुळे जास्त स्वेदोत्पत्ती होणे वगैरे.

अभिवाही मस्तिष्ककेंद्राच्या खालच्या भागात असलेल्या या केंद्राला जागृतिकेंद्र अशी संज्ञा दिली असून हे केंद्र निरोधित होते तेव्हा झोप येते आणि हे केंद्र जेव्हा कार्यक्षम असते तेव्हा जागृतावस्था असते, असे मानण्यात येते. शरीरबाह्य म्हणजे प्रकाश, ध्वनी वगैरे आणि अंतर्गत म्हणजे स्नायू, इंद्रिये यांत उत्पन्न होणाऱ्या संवेदना या जागृती केंद्राकडे जातात आणि ते केंद्र उत्तेजित होऊन जागृतावस्था येते. उलट अशा संवेदना थांबल्या अथवा कमी पडल्या (उदा., अंधार, शांतता, स्नायुशिथिलता वगैरे) म्हणजे हे केंद्र निरोधित होऊन झोप येते.

या विषयांसंबंधी संशोधन चालूच असून सध्या तरी तंत्रिका केंद्र उपपत्ती ही सर्वसाधारणपणे जास्त मान्यता पावलेली आहे.

क्लाइटमन उपपत्ती : एन्. क्लाइटमन या शास्त्रज्ञांनी वर वर्णन केलेल्या दोन-तीन उपपत्तींचा साधण्याच्या दृष्टीने असे सुचविले आहे की, मेंदूच्या सर्वोच्च केंद्राकडे येणाऱ्या बाह्य आणि अंतर्गत अशा संवेदनांमुळे ते केंद्र कार्यान्वित असते. त्या केंद्राकडून अशाच संवेदना जागृतिकेंद्राकडे जात असल्यामुळे जागृतावस्था येत. क्लाइटमन यांचे मत असे आहे की, शरीरातील क्रिया सर्वांत जास्त कार्यक्षमतेने दोनप्रहरी आणि सर्वांत कमी कार्यक्षमतेने उत्तर रात्री व पहाटे चालतात. सर्वोच्च केंद्राकडे जाणाऱ्या संवेदना दोन प्रहरी जास्त असल्यामुळे त्या संवेदनांचा परिणाम म्हणून त्या वेळी जागृतावस्था जास्त कार्यक्षम असते, तर उत्तर रात्री याच्या उलट परिस्थिती असल्यामुळे कार्यक्षमता कमी असते, असे क्लाइटमन मानतात. या कल्पनेमुळे सर्वोच्च केंद्रबाह्य आणि अंतर्गत संवेदना, जागृतावस्थेची व निद्रावस्थेची लयबद्धता, जागृतिकेंद्र वगैरे अनेक कल्पनांचा व उपपत्त्यांचा समन्वय करता येतो.

निद्रानाश : मुळीच झोप न आल्यामुळे किंवा झोपू न दिल्यामुळे मृत्यू ओढवण्याइतकी परिस्थिती न आली, तरी मानसिक ताण येतोच. पुष्कळ दिवस झोप घेऊ न दिल्यामुळे माणूस वाटेल त्या आरोपांची कबुली देतो, हा त्या मानसिक ताणाचाच परिणाम असतो.

कुठल्याही प्रकारच्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक विकृतीत व्यक्तिव्यक्तींत भिन्नता आढळते, तथापि निद्रानाशामुळे उद्‌भवणाऱ्या विकृतींचे स्थूल वर्णन करता येते. अहोरात्र चार दिवस जागरण घडले असेल, तर प्रथम गुंगी येत, जडपणा वाढतो, झोपेचे क्षणिक चुटके अथवा डुलक्या-क्षण दोन क्षणाची झोप–वारंवार येतात. डोक्याला बंध घातल्यासारखे वाटू लागते. प्रारंभी दृष्टीभ्रम होतो, नंतर निराधार भ्रम (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी प्रत्याक्षात असलेल्यासारख्या वाटणे) व मिथ्यादर्शने (मृगजलासारखी दृश्ये) होऊ लागतात. क्वचित जागेपणीही घडत नसलेल्या एखाद्या प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याची भावना होते. शरीरातील बारीकसारीक व्यथांवर व व्याधींवर मन केंद्रित होते. आणखी एक दोन दिवस झोपेवाचून गेले म्हणजे मिथ्यादर्शनाप्रमाणे मिथ्याश्रवणे–काल्पनिक आवाज ऐकू येणे–सुरू होतात. दृष्टी टक लावल्यासारखी होते. व्यक्तीची वृत्ती संशयग्रस्त होते. असंभाव्य गोष्टी त्याला ठाम सिद्धांतासारख्या वाटू लागतात. त्याचे स्थलकालाचे भान हरपते, त्याला भोवतालच्या माणसांची ओळख पटत नाही. त्याचा चेहरा निर्विकार, एखाद्या मुखवटा घातलेल्या माणसासारखा होतो. प्रणालित संभ्रम विकृती (स्वतःचे अस्तित्व न विसरता हळूहळू भ्रमिष्टपणा वाढत जाणे) आणि ⇨ छिन्नमानस  या मानसिक विकृतींची चिन्हे दिसू लागतात. व्यक्तीला झोप घेऊ न देणे हा छळाचा प्रकार हल्ली काही देशांतून कबुलीजबाब मिळविण्यासाठी किंवा मेंदू प्रक्षालनासाठी (ब्रेन वॉशिंगसाठी) वापरला जातो.

एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी मानसिक विकृती सुप्त स्थितीत असेल, तर ती निद्रानाशामुळे प्रकटावस्थेत येते किंवा पूर्वी उपचार करून बरी झालेली विकृती फिरून डोके वर काढते.

जागृतावस्था फार वेळ राहिल्यास मेंदूतील सर्वोच्च केंद्रातील कोशिकांमध्ये विकृती निर्माण होते. त्या कोशिकांतील रंज्यद्रव्याचा (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर जटिल पुंजातील म्हणजे केंद्रकातील जाळे ज्याचे बनलेले असते आणि जे सहज रंग घेऊ शकते अशा द्रव्याचा) ऱ्हास होऊन सर्व कोशिका आक्रसून गेल्यासारख्या दिसतात.

निद्रानाश हे वास्तविक निद्राहानीचे अतिरंजित नाव आहे. हवी असेल तेव्हा व हवी असेल तेवढी झोप घेण्यास व्यक्ती असमर्थ झाली की, ती निद्रानाशाची तक्रार करू लागते. निरोगी व्यक्तींनाही एखाद्या रात्री झोप येत नाही ही गोष्ट तात्पुरती असेल, तर तिच्यापासून काही अपाय नसतो व त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असते. सातत्याने झोप न येण्याच्या तक्रारीचे मूळ भावनिक विकृतीत असते. दारुण चिंतेमुळे झोपेतून वारंवार जाग येते व पुन्हा झोप लागत नाही. तीव्र संताप अथवा चीड आली असेल, तर झोप येणे कठीण होते एकदा आली म्हणजे मात्र चांगली लागते. दडपून गेलेल्या व निरुत्साही व्यक्तीला अधिकाधिक लवकर झोपेतून जाग येते व पहाट होण्याच्या आधीच्या काळी तिचे मन अतिशय उद्विग्न करणाऱ्या व निराशाजनक विचारांनी ग्रासून जाते. नियमित आहार, व्यायाम इत्यादींनी निद्रानाशाची सामान्य तक्रार दूर करता येते. किरकोळ तक्रारी संध्याकाळपासून कॉफी, तंबाखू इ. उत्तेजक पदार्थ टाळल्याने बहुशः मिटतात. गंभीर तक्रारीसाठी तज्ञ वैद्याचा सल्ला घेणे हितावह असते.

थोड्याशा जागरणाचे दुष्परिणाम झोप मिळाल्यने जातात परंतु काही रोगांमुळे झोप येऊ शकत नसेल, तर शामके (तंत्रिका तंत्राची कार्यशीलता कमी करणारी द्रव्ये) व शायके (झोप आणणारी द्रव्ये) यांसारख्या औषधांनी अथवा संमोहनिद्रेनेही अशा व्यक्तींना झोप लागल्याने लाभ होतो.

तात्कालिक निद्रेतच चिरकालिक निद्रेची सुरुवात होणे–झोपेतच मृत्यू येणे–हे अतिशय लहान अर्भके आणि अतिशय वृद्ध व्यक्ती यात संभवते.


आयुर्वेदीय चिकित्सा : प्रथम शरीराची स्थिती व कारणे पहावीत. मलाविरोध असल्यास तो नाहीसा करावा. आरोग्यवर्धिनी दोन-दोन गुंजा जेवायला बसताना दोन-अडीच तोळे गरम तुपातून नियमाने द्यावीत. आम्ल पित्त इ. रोग असतील, तर त्यांचे उपचार करावेत, वातदुष्टी कारण असेल, तर पिंपळमूळ गरम तुपाबरोबर रात्री झोपताना द्यावे व कानात कोमट तेल घालावे. दररोज सकाळी अणुतेलाचे किंवा निर्गुड्यादी तेलाचे चार-चार थेंब कोमट करून नाकात घालावे. नारायण तेलाची पिचकारी देत असावी व अंगाला तिळाचे तेल किंवा नारायण तेल ह्यांचा अभ्यंग, विशेषतः डोक्याला करावा. रोग्याच्या आवडीप्रमाणे गोड किंवा आंबट पदार्थ त्याच्या खाण्यात अधिक प्रमाणात द्यावे. ह्या उपायांनीही झोप आली नाही, तर डोक्यावर तैल धारा किंवा ताकाची धारा ह्यांचा प्रयोग करावा. सूतशेखर मोरावळ्यातून द्यावा. पायाला गायीचे तूप चोळावे. मानसिक ताप हे कारण असेल, तर सहस्त्रपुटी अभ्रकभस्म अर्धी गुंज, रौप्यभस्म एक गुंज, रससिंदूर किंवा मकरध्वज / गुंज मोरावळ्यामधून दिवसा दोन वेळा व झोपताना द्यावा. संताप कारण असेल, तर मौक्तिक भस्म १ गुंज किंवा सुवर्णमाक्षिक, प्रवाळ समभाग किंवा कामदुधा ताण्यादी लोह दोन गुंजा दुधाची साय व साखर ह्यांमधून द्यावे किंवा आल्याचा रस व मोरावळा ह्यांतून द्यावे. पित्तामुळे जर झोप येत नसेल, तर गोड रेचक द्यावे. शंखस्थानी जळवा लावून रक्त काढावे. चंदन, अनंतमूळ दूधसाखरेमधून द्यावे. अश्वगंधा चूर्ण दुधामधून द्यावे. खडीसाखर, आवळकठी आणि सुंठ ह्यांचे चूर्ण पेज, आमटी ह्यांमधून किंवा चटणीसारखे जेवणामध्ये वापरावे. दूध, बासुंदी, दही इ. दुधाचे पदार्थ व उसाचा रस इ. इतर मधुर पदार्थ खावे. वर सांगितलेल्या मोती, प्रवाळ, सुवर्णमाक्षिक ह्यांच्या भस्मांचा उपयोग करावा. केशर, गायीचे तूप आणि साखर ह्यांचे चार-चार थेंब नाकात घालावे. चंदन, रक्तचंदन ह्यांचा लेप द्यावा. सुगंधी द्रव्ये नेहमी जवळ बाळगावीत. चंदनबलालाक्षादी तेलाचा अभ्यंग, विशेषतः डोक्याला करावा. गायीचे तूप पायाला चोळावे. खुरासनी ओवा द्यावा.

काही अनुत्तरित समस्या : झोपेसंबंधी अजूनही संपूर्ण ज्ञान झाले आहे, असे म्हणता येत नाही. झोपेची मूलभूत आवश्यकता अद्यापि अज्ञात आहे. दिवसा वापरून एखादा पदार्थ संपला म्हणजे त्याचा फिरून साठा होण्यासाठी झोप येते की जागृतावस्थेतच मेंदूत होणाऱ्या एखाद्या पदार्थाच्या संचयाचा झोपेत निचरा होतो? दिवस-रात्र आणि मानसिक व शारीरिक लयी यांचा कोणता परस्पर संबंध असतो? झोपेत देखील गाढ, हलकी, सावध असे अवस्थाभेद का असावेत? झोप हे स्वप्ने पडण्याचे वाहन की स्वप्न हे हलक्या झोपेत उद्‌भवलेले अनृतविश्व? झोपेतून जाग कशी येते? शेजारी नारोशंकरी घंटेचा आवाज झाला, तरी झोपेत व्यत्यय न येता एखाद्या मुलाच्या नुसत्या ‘ट्यांहा’ने जाग यावी हे कसे घडते? अवकाश-यात्रींच्या झोपेचे ‘अहोरात्र’ तेच राहील की आपोआप बदलेल? उन्मादी अवस्थेत स्वप्रेरणेने एका तऱ्हेची उन्मनी अवस्था प्राप्त होते. योगाभ्यासी व्यक्तीला लाभणारी समाधी व ही मिथ्या समाधी यांतील भेद कोणता? झोप व स्वप्ने यांच्या लयीत होणाऱ्या फरकातून मानसिक रुग्णांच्या स्थितींचे काही दिग्दर्शन होते का? व्यक्तीच्या निद्रेच्या आलेखांचा अभ्यास करून त्यांतील फरकामुळे एखाद्या आगामी मानसिक रोगाची पूर्वसूचना मिळत असेल का? इ. समस्यांवर अनेक शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

पहा : संमोहनविद्या स्वप्न.

संदर्भ :

1. Deutsch, A., Ed. The Encyclopaedia of Mental Health Vol. VI, New York, 1963.

2. Kleitman, N. Sleep and Wakefulness, Chicago, 1963.

3. Oswald, I. Sleeping and Waking : Physiology and Psychology, Amsterdam, 1962.

 कर्वे, ज. नी. ढमढेरे, वा. रा

आपटे, ना. रा. पटवर्धन, शुभदा अ.