जठरांत्र मार्ग : जठर, लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) मिळून बनलेल्या अन्नमार्गाला जठरांत्र मार्ग म्हणतात. हा मार्ग व त्याचे विकार यांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो, तिला जठरांत्रविज्ञान म्हणतात. या मार्गावरील काही विशिष्ट भागांना स्वतंत्र नावे देण्यात आलेली असली, तरी तोंडापासून गुदद्वारापर्यंत असणाऱ्या सलग अशा ⇨पचन  तंत्राचेच ते भाग आहेत. उदा., लघ्वांत्राच्या भागांना ग्रहणी, रित्कांत्र व शेषांत्र म्हणतात, तर बृहदांत्राच्या भागांना उंडुक, आरोही बृहदांत्र, अनुप्रस्थ बृहदांत्र, अवरोही बृहदांत्र, श्रोणीय वा अवग्रहाकृती बृहदांत्र, गुदांत्र व गुदमार्ग अशी नावे दिलेली आहेत [ → आंत्र ]. अन्नाचे पचन, शोषण व त्यातील निरुपयोगी पदार्थांचे उत्सर्जन ही महत्त्वाची कार्ये जठरांत्र मार्गात चालतात. त्यासाठी या मार्गाची रचना विशिष्ट प्रकारची असून त्याच्या कार्याला साहाय्य करणारी यकृत, अग्निपिंड इ. अनेक इंद्रिये आहेत. जठरांत्र मार्गाच्या तपासणीकरिता बेरियम सल्फेटमिश्रित अन्न देऊन केलेल्या क्ष-किरण परीक्षेचा तसेच जठर परीक्षक, अवग्रहाकृती बृहदांत्र परीक्षक, गुदांत्र परीक्षक, पर्युदर परीक्षक (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या आवरणाचा परीक्षक) इ. उपकरणांचा फार उपयोग होतो.

जठरांत्र मार्गाचे विकार : जठरांत्र मार्गात अनेकविध विकार संभवतात. या विकारांची विविध कारणे असून त्यांपैकी कित्येक विकारांची कारणे अजून अज्ञात आहेत. जठरांत्र मार्गाच्या विकारांपैकी काही विकारांची वर्णने इतरत्र आलेली आहेत [ → अंकुशकृमि रोग अतिसार आमांश जंत पट्टकृमि मलावरोध संग्रहणी वगैरे]. या मार्गातील महत्त्वाच्या आणि नेहमी आढळणाऱ्या इतर विकारांचेच त्रोटक वर्णन येथे केले आहे.

जठरांत्र मार्गाच्या विकारांत दिसणारी महत्त्वाची लक्षणे म्हणजे मळमळ, ओकारी, वेदना, मलावरोध, अतिसार वगैरे असून ती निरनिराळ्या रोगांत कमीअधिक प्रमाणात दिसतात. ज्वर, अशक्तपणा, पांडुरोग (ॲनिमिया) वगैरे लक्षणेही चिरकारी (दीर्घकालीन) विकारांत दिसतात.

या विकारांचे वर्णन विभागशः खाली दिलेले आहे.

जठरशोथ : (जठराची दाहयुक्त सूज). हा तीव्र व चिरकारी अशा दोन प्रकारांचा असू शकतो.

तीव्र जठरशोथ :  हा प्रकार काही क्षोभक पदार्थ पोटात गेल्याने होतो. अपघाती किंवा स्वेच्छेने (आत्महत्येसाठी) घेतलेली तीव्र अम्‍ले वा क्षार (अल्कली), दूषित अथवा कदान्न, अत्यशन (अतिशय खाणे), मद्यपान वगैरे कारणांनी तीव्र जठरशोथ हा विकार होतो. या क्षोभक पदार्थांमुळे जठराच्या श्लेष्मकलेला (आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत थराला) शोथ येऊन ते आवरण फुगलेले, लाल रंगाचे आणि जाड होते. त्यातील ग्रंथींचे कार्य बंद पडते.

तीव्र जठरशोथाची मुख्य लक्षणे म्हणजे उलट्या आणि वेदना ही होत. क्षोमक पदार्थ खाली आतड्यात उतरल्यास अतिसार होतो. अन्नद्वेष विशेष प्रमाणात असतो, परंतु सारखी तहान लागत राहते. क्षोमक पदार्थ उलटीवाटे पडून गेल्यानंतर आराम वाटू लागतो. तीव्र जठरशोथात बहुधा औषधांची जरूरी लागत नाही. पूर्ण विश्रांती देऊन जरूर तर क्षोभक पदार्थ बाहेर पडण्यासाठी उलटी होण्याकरिता गरम पाण्यातून मीठ अथवा सोडा देतात. पोटात पाण्याशिवाय दुसरे काही देत नाहीत. रोग्याला बरे वाटावयाला लागून जसजशी भूक वाढू लागेल तसतसे चहा, दूध, भात वगैरे पदार्थ हळूहळू वाढत्या प्रमाणात देऊन ४–६ दिवसांत नेहमीचा आहार देता येईल, अशी परिस्थिती येते.

चिरकारी जठरशोथ : तीव्र जठरशोथ वारंवार होत गेल्यास त्याचेच स्वरूप चिरकारी जठरशोथ असे होते. विशेषतः मदात्ययामध्ये (अतिशय मद्य पिण्यामुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेमध्ये) हा प्रकार दिसतो. दंतरोगामध्ये (पायोरिया) हिरड्यांतील पू जठरात जात राहिल्यामुळे जठरातील श्लेष्मकलेला चिरकारी शोथ येतो असे मानतात. काही कारणांनी जठरनिर्गमद्वारामध्ये रोध उत्पन्न झाल्यास अन्न जठरामध्ये अधिक काळपर्यंत साठून राहते. त्या अन्नामध्ये रासायनिक विक्रिया झाल्यामुळे अपायकारक आणि क्षोभक द्रव्ये तयार होतात, त्यांमुळेही चिरकारी जठरशोथ होतो. असा रोध निर्गमद्वाराजवळ कर्करोग अथवा पचनज व्रण (अम्‍लीय पाचक स्रावांमुळे झालेली जखम) झाल्यास होतो. जठरात अथवा ग्रहणीच्या पहिल्या भागात झालेला पचनज व्रण भरून येताना त्या ठिकाणी तंत्वात्मक ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) उत्पन्न होते. त्या तंतूंची आकसण्याची प्रवृत्ती असल्यामुळे निर्गमद्वार संकुचित होऊन रोध उत्पन्न होतो. असा रोध झाला म्हणजे द्वारातून अन्न खाली आतड्यात उतरत नाही. त्यामुळे जठरविस्तार व चिरकारी जठरशोथ होतो. जठरशोथाची सर्वच कारणे अजून ज्ञात नाहीत.

चिरकारी जठरशोथात जठरश्लेष्मकला प्रथम लाल, सुजल्यासारखी जाड, अतिपुष्ट अशी दिसते. पुढे त्या आवरणाची अपपुष्टी होऊन ते अगदी पातळ, पांढुरक्या रंगाचे दिसते. प्राकृतावस्थेतील (सर्वसाधारण अवस्थेतील) त्या आवरणावरील सुरकुत्या नाहीशा होतात.

सुरुवातीस विशेष लक्षात येण्यासारखी लक्षणे नसतात. जेवणानंतर पोटात जडत्व, फुगवटी, ढेकरा येणे आणि अस्वस्थपणा एवढीच लक्षणे दिसतात. उलटी होऊन गेल्यानंतर रोग्याला तात्पुरते हलके वाटते. क्षुधामांद्य, सकाळच्या वेळी मळमळ आणि ओकारी ही मदात्ययामुळे होणाऱ्या चिरकारी जठरशोथाची विशेष लक्षणे दिसतात. बहुदा मलावरोध असतो.

चिरकारी जठरशोथ-चिकित्सेत प्रथम शक्यतर मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मद्यपान, दंतरोग वगैरे कारणे नाहीशी करण्याचा प्रयत्न अगत्याचे आहे.जठरनिर्गमद्वार व्रणामुळे संकुचित झाले असल्यास शस्त्रक्रिया करून जठराचा रिक्तांत्राशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करावा लागतो. जठरनलिकेच्या साहाय्याने जठर सोड्याच्या पाण्याने दिवसातून एकदा धुतल्यास आराम वाटतो.

जठरव्रण : जठरव्रण हा पचनज व्रणाचा एक प्रकार आहे. या विकारात जठरात हायड्रोक्लोरिक अम्‍लाचे आधिक्य असते [ ⟶ पचनज व्रण].

जठर-कर्करोग : जठर-कर्करोग ४० वर्षांच्या पुढील वयातील पुरुषांत अधिक प्रमाणात दिसतो. त्याचे मूळ कारण अज्ञात असले, तरी पचनज व्रण आणि चिरकारी जठरशोथानंतर त्याचे प्रमाण अधिक दिसते.


जठर-कर्करोगाची लक्षणे अगदी मंद आणि सौम्य असल्यामुळे सुरुवातीस निदान करणे फार कठीण असते. निदान लवकर करणे या गोष्टीला फार महत्त्व आहे कारण अगदी प्रथमावस्थेतच शस्त्रक्रिया केली असता रोग बरा होण्याचा बराच संभव असतो. पचनासंबंधी पूर्वी कधी फारशी तक्रार नसणाऱ्या उतार वयाच्या मनुष्याला अपचन, पोटफुगी वगैरे लक्षणे दिसू लागली तर कर्करोगाचा संभव विशेषत्वाने लक्षात ठेवावयास हवा. भूक कमी होत जाणे, जेवणानंतर लगेच अथवा एक तासाच्या आत अस्वस्थता, बेचैनी आणि वेदना ही लक्षणे संशयास्पद मानली पाहिजेत. वेदना असह्य असून काही वेळाने आपोआप कमी पडतात. कर्करोग प्रगत झाल्यावर मात्र पोटात सारखेच दुखत राहते,जेवणानंतर हे दुखणे अधिक तीव्र होते. क्वचित प्रसंगी पचनज व्रणासारखीच लक्षणे दिसतात, म्हणजे जेवणानंतर दोन ते चार तासांनी पोटात वेदना सुरू होतात आणि दूध किंवा अन्न घेतल्याबरोबर त्या कमी होतात. अशा वेळी पचनज व्रण कर्करोग यांचे व्यवच्छेदक (वेगळेपणा ओळखणारे) निदान करणे फार कठीण होते. अशा वेळी जठरात उत्पन्न होणाऱ्या हायड्रोक्लोरिक अम्‍लासाठी विशेष परीक्षा केल्यास निदान होते. कारण कर्करोगात ते अम्‍ल अगदी कमी अथवा मुळीच नसते, उलट पचनज व्रणात ते प्राकृतावस्थेपेक्षाही पुष्कळच वाढलेले असते. क्ष-किरण परीक्षेचाही चांगला उपयोग होतो. कर्करोगाच्या प्रगतावस्थेत मळमळ आणि ओकारी ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. ओकारीमध्ये काळे रक्त पडते. ओकारी सारखी होत राहिल्यामुळे शरीर कृश आणि अशक्त बनते. वारंवार रक्तस्राव होत राहिल्यामुळे व नवीन रक्त तयार होण्याची क्रिया मंद पडल्यामुळे पांडुरोगाची सर्व लक्षणे दिसू लागतात. चेहऱ्यावर काळसर छटा दिसू लागते. केव्हा केव्हा पोटात दगडासारखी टणक अशी गाठ हाताला लागते. सर्व शरीरात–विशेषतः यकृतात–कर्करोगाच्या प्रक्षिप्त (एका इंद्रियापासून त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या दुसऱ्या इंद्रियात रोगाचे संक्रामण झाल्यामुळे निर्माण झालेल्या) गाठी उत्पन्न होतात.

शस्त्रक्रिया एवढा एकच उपाय कर्करोगावर आज उपलब्ध आहे. अगदी प्राथमिक अवस्थेत जठराचा दूषित भाग काढून टाकल्यास गुण येण्याचा संभव असतो. जठर आणि रित्कांत्र यांचे संमीलन करून अन्न आंत्रात उतरण्याची वाट मोकळी करून देतात. प्रक्षिप्त कर्करोगाच्या गाठी झाल्या असल्यास बहुधा तो असाध्य असतो. कर्करोगाच्या प्रगतावस्थेत लक्षणानुवर्ती चिकित्सा करण्याशिवाय अधिक काही करणे शक्य नसते [ → कर्करोग].

जठरनिर्गमद्वार-रोध : वर चिरकारी जठरशोथाच्या वर्णनात याचा उल्लेख आलाच आहे. त्याशिवाय नवजात अर्भकाच्या निर्गमद्वाराभोवतीचे स्नायू अतिपुष्ट झाल्यामुळे रोधाचा एक प्रकार दिसतो. त्या स्नायूचे घट्ट आकुंचन झालेले असल्यामुळे निर्गमद्वार उघडलेच जात नाही आणि पाजलेले दूध, पाणी वगैरे उलटून पडते. जन्मानंतर सु. ८–१५ दिवसांनी ओकारी हे लक्षण सुरू होते. ओकारी जोराने झाल्यामुळे ती लांबवर फेकली जाते. अन्नाभावी मूल अशक्त होत जाते. पोटात मध्यरेषेच्या किंचित उजव्या बाजूस गाठ लागते. जठरभित्तीत चालू असलेल्या क्रमसंकोच लहरी स्पष्ट दिसू लागतात.

या विकारात ॲट्रोपिनासारखी प्रतिसंकोची औषधे देऊन गुण न आल्यास शस्त्रक्रिया करून अतिपुष्ट स्नायूंचा छेद घेतल्यास रोग बरा होतो.

विभागीय शेषांत्रशोथ : हा रोग बहुधा तरुण वयाच्या पुरुषांत अधिक प्रमाणात दिसतो. शेषांत्राच्या शेवटच्या विभागात प्रथम सुरू होऊन तो शेषांत्राच्या इतर भागात व क्वचित बृहदांत्राच्या पहिल्या भागापर्यंत पसरतो. या विकारात शेषांत्र जाड होऊन त्याच्या श्लेष्मकलेवर व्रण उत्पन्न होतात. हे व्रण खोलपर्यंत चरत जाऊन पर्युदराला शोथ येतो. शेषांत्राची वेटोळी एकमेकांस चिकटल्यामुळे ⇨आंत्ररोध  होऊ शकतो. कित्येक वेळा चिकटलेल्या आंत्राच्या वेटोळ्यांतील व्रणाचा भेद होऊन दोन वेटोळ्यांमध्ये प्रत्यक्ष संबंध उत्पन्न होतो. व्रणामुळे आंत्रभेद झाल्यास पर्युदरशोथ आणि पर्युदरात स्थानिक विद्रधी (पूयुक्त फोड) उत्पन्न होतो. गुदद्वाराच्या भोवतीही व्रण उत्पन्न होऊन गुदाभोवती नाडीव्रण (भगंदर) होतो.

विभागीय शेषांत्रशोथाची लक्षणे विविध प्रकारांची असतात. काही वेळा रोगाची सुरुवात तीव्र स्वरुपात होऊन पोटात उजव्या बाजूस असह्य वेदना, ज्वर आणि बाजूचे स्नायू ताठ होतात. ही सर्व लक्षणे आंत्रपुच्छशोथासारखी (अपेंडिसायटीससारखी) असल्यामुळे निदान करणे कठीण होते. कित्येक वेळा रोगाची सुरुवात सौम्य प्रकारे होऊन अतिसार, पोटदुखी ही प्रमुख लक्षणे दिसतात. अतिसार हे लक्षण कायमचेच असते. मलोत्सर्गाच्या वेळी पोटात दुखते, मलातून रक्त पडते, अशक्तपणा, पांडूरोग, कृशता वगैरे गोष्टी हळूहळू वाढत जातात.

क्ष-किरण परीक्षेचा निदानाचा उपयोग होतो. सौम्य प्रकारात पूर्ण विश्रांती आणि मऊ, पचनास हलका असा आहार, जीवनसत्त्वे आणि लोह यांचा सुपरिणाम दिसतो. अलीकडे उपलब्ध झालेल्या अड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन (एसीटीएच) व कॉर्टिसोन या औषधांचा फार चांगला परिणाम दिसतो. जंतुसंसर्ग झाला असल्यास प्रतिजैव (ॲंटिबायॉटिक) आणि सल्फा औषधे यांचाही उपयोग होतो. या चिकित्सेने गुण न आल्यास शस्त्रक्रिया करून शेषांत्राचा दूषित भाग काढून टाकावा लागतो.

जठरांत्रशोथ : अन्नविषबाधेमुळे उद्‍भवणाऱ्या जठर आणि आंत्र (विशेषेकरून लघ्वांत्र) यांच्या शोथास जठरांत्रशोथ म्हणतात. अपथ्यकारक अन्न किंवा पेय यांच्या सेवनानंतर केवळ ४८ तासांच्या आत हा रोग होतो. विषमज्वर, आमांश, पटकी यांसारख्या सूक्ष्मजंतुजन्य रोगांचा, अन्न-अधिहर्षताजन्य (ॲलर्जीमुळे होणाऱ्या) विकृतींच्या, तसेच अपचनजन्य विकृतींचा समावेश जठरांत्रशोथात करीत नाहीत.

विषारी अन्नामध्ये मुळातच विषारी अशा काही कवक प्रकारांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या प्रकारांचा) व काही उष्ण कटिबंधी माशांचा समावेश होतो. काही रासायनिक पदार्थांच्या (उदा., अँटिमनी, जस्त वगैरे) मिश्रणामुळे अन्न विषारी बनते. ज्या वेळी कोणतेही सूक्ष्मजंतू मलात सापडत नाहीत त्या वेळी जठरांत्रशोथ बहुधा व्हायरसामुळे झालेला असतो. सूक्ष्मजंतुजन्य अन्नविषबाधा अधिक प्रमाणात आढळते व तीमध्ये दोन प्रकार ओळखले जातात : (१) विषजन्य आणि (२) संसर्गी. पहिल्या प्रकारात स्टॅफिलोकॉकस पायोजेनिस  नावाच्या सूक्ष्मजंतूचे बाह्यविष कारणीभूत असते. दुसऱ्या प्रकारात सालमोनेला  वंशातील सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. अशा प्रकारचा संसर्ग बहुधा दोनदा शिजविलेले मांसाचे प्रकार, दूध व कस्टर्ड, हवाबंद डब्यातील डबा उघडल्यानंतर लगेच न संपविलेले अन्न यांपासून होण्याचा धोका असतो. कस्टर्ड किंवा पुडिंग बनविण्याकरिता बदकाची अंडी वापरल्यास सालमोनेला संसर्ग होण्याची शक्यता असते. कारण बदक या सूक्ष्मजंतूचे वाहक असते. मोठ्या जेवणावळीकरिता शिजविलेले अन्न शिल्लक राहिल्यास ते संपेपर्यंत गरम ठेवण्याची पद्धतही धोकादायक असते.


एकाच कुटुंबातील किंवा वसतिगृहासारख्या संस्थेतील रहिवाशांपैकी दोन–चार माणसे या रोगाने पछाडण्याचा संभव असतो. अन्न घेतल्यानंतर अर्ध्या तासातच उलट्या होऊ लागल्यास बहुधा रासायनिक प्रकारची अन्नविषबाधा असण्याची शक्यता असते. ६ तासांच्या अवधीनंतर होणाऱ्या उलट्या विषजन्य प्रकार दर्शवितात, तसेच १२ ते ४८ तासांनंतर होणाऱ्या उलट्या बहुधा सूक्ष्मजंतू संसर्ग दर्शवितात. उलट्या, मळमळणे, ⇨आंत्रशूल (पोट दुखणे) ही लक्षणे सर्व प्रकारांत आढळतात. विषजन्य प्रकाराची सुरुवात एकदम आणि जोरदार असते व रोगी गलितगात्र, अवसन्न आणि निर्जलीकृत (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे) बनतो. त्याचे शारीरिक तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा कमी भरते. सूक्ष्मजंतू प्रकारात रोगाची सुरूवात हळूहळू होते व शारीरिक तापमान वाढलेले आढळते. लहान मुलांमध्ये ⇨आंत्रपुच्छशोथ, ⇨आंत्ररोध, ⇨आंत्रांत्रनिवेश  या रोगांची सुरुवातही उलट्या, अतिसार व पोटदुखी या लक्षणांनी होण्याची शक्यता असते, म्हणून हे रोग नसल्याची खात्री करून घेणे जरूर असते, कारण त्यांवरील इलाजामध्ये तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज संभवते. आजार सौम्य स्वरूपाचा असल्यास विश्रांती, ऊब आणि अक्षोभक पेये भरपूर प्रमाणात दिल्यास आराम पडतो. तीव्र आजारात रोग्यास रुग्णालयात ठेवणे आवश्यक असते.

प्रतिबंधक इलाजांमध्ये मलातील सालमोनेला सूक्ष्मजंतूंचा १ : २० कार्‌बॉलिक अम्‍ल वापरून नाश करतात. शिजविलेले अन्न फार काळ ठेवावयाचे झाल्यास प्रशीतकात ठेवणे हितावह असते. जठरांत्रशोथ पसरू नये म्हणून आचारी, वाढपी वगैरेची वैयक्तिक स्वच्छता आवश्यक असते.

आंत्रपुच्छशोथ : हा बहुधा तीव्र स्वरूपाचा असतो. अतितीव्र प्रकारात आंत्रपुच्छाचा कोथ (रक्तपुरवठा थांबल्याने होणारा ऊतकाचा मृत्यू) होतो. आंत्रपुच्छशोथाची चिकित्सा म्हणजे शस्त्रक्रियेने आंत्रपुच्छ कापून काढणे हीच होय. आंत्रपुच्छशोथाचा एक चिरकारी प्रकार आहे. तीव्र शोथ वारंवार होत गेल्यास आंत्रपुच्छाला घड्या पडून ते आजूबाजूच्या अंतस्त्यांशी (इंद्रियांशी) अभिलग्न होते. शस्त्रक्रियेच्या वेळी आंत्रपुच्छ काळजीपूर्वक सोडवून अलग करून घ्यावे लागते [ → आंत्रपुच्छशोथ].

बृहदांत्र-कार्य-विकृती : या प्रकारात बृहदांत्राच्या रचनेत काही बिघाड आढळून येत नाही, परंतु त्याच्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरण क्रियेत अनियमितता असते. मानसिक ताण व काळजीग्रस्त व्यक्तीमध्ये अशी विकृती आढळते. वारंवार विरेचक व सारक औषधे घेत राहिल्यानेही अशी विकृती संभवते. रोज शौचास झालेच पाहिजे या कल्पनेने कित्येक लोक अशी औषधे घेत राहतात. त्यामुळे बृहदांत्राचे वारंवार उद्दीपन झाल्यामुळे त्याच्या स्नायूंमध्ये अनियमितता येते.

या विकृतीत अस्वस्थता, पोटदुखी, शौच्याच्या बाबतीत अनियमितपणा वगैरे लक्षणे दिसतात. शौचास जाऊन आल्यावर स्वस्थता वाटत नाही, मलावरोध झाला असे वाटून विरेचक औषधे घेण्याची प्रवृत्ती होते, त्यामुळे विकार अधिकच बळावतो. शौचामध्ये श्लेष्म्याचे प्रमाण अधिक असते, तसेच अपानवायू (पोटातील वायू) सरण्याची प्रवृत्ती वाढलेली असते. पोटात गुरगुरणे, अपचन, अरुची, थकवा वगैरे आनुषंगिक लक्षणे दिसतात.

बृहदांत्रात रचनात्मक विकृती नाही याची खात्री करून घेण्यासाठी विशेष काळजीपूर्वक परीक्षा करावी लागते. रोग्याला त्याच्या विकृतीच्या मूळ कारणांची कल्पना देऊन काही रचनात्मक बिघाड नसल्याबद्दल आश्वासन द्यावे लागते. आहारात योग्य तो बदल करावा. तिखट, मसाले, तळलेले अथवा परतलेले पदार्थ वर्ज्य करावे. विरेचक आणि सारक औषधे बंद करावी. रोग्याच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने शांतक औषधे वापरतात. जरूर तर इसबगोलासारख्या औषधांचा उपयोग करून शौचास नियमितपणे होण्याची सवय लावावी.

चिरकारी व्रणीय बृहदांत्रशोथ : हा चिरकारी रोग तरुण वयात सु. २० ते ४० वर्षांच्या आधी सुरू होतो. या रोगात बृहदांत्राच्या श्लेष्मकलेवर लहान लहान व्रण उत्पन्न होतात. या रोगाचे कारण अज्ञात आहे. बृहदांत्राच्या अवरोही भागात व्रणांचे प्रमाण अधिक असते.

अतिसार, मलामध्ये रक्त आणि श्लेष्मा पडणे, ज्वर, पांडुरोग, कृशता आणि अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे दिसतात. व्रणांतून रक्तस्राव, आंत्रभेद वगैरे गंभीर उपद्रवही संभवतात. गुदद्वाराभोवती नाडीव्रण होतात. क्‍वचित या रोगाचा परिणाम म्हणून बृहदांत्र-कर्करोगही दिसतो.

या रोगाचे निदान कठीण आहे. अवग्रही-बृहदांत्र परीक्षकाच्या साहाय्याने बृहदांत्र-श्लेष्मकला तपासली असता तीवरील व्रण दिसू शकतात.

या रोगाची चिकित्सा लक्षणानुवर्ती असते. बृहदांत्रबस्ती देऊन श्लेष्मकला धुऊन काढल्यास तात्पुरता आराम वाटतो. एसीटीएच आणि कॉर्टिसोन या औषधांचा चांगला उपयोग होतो. नियमित आणी सौम्य आहार असावा. तिखट व मसाले वर्ज करावे. या चिकित्सेने बरे न वाटल्यास शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते.

चिरकारी वसा-शोषण-दोष : या रोगालाच उदरगुहारोग असे नाव आहे. हा रोग सहा महिने ते दोन वर्षे वयाच्या मुलांत आढळतो. क्षुद्रांत्रातून वसा-शोषण (स्निग्ध पदार्थांचे शोषण) नीट न झाल्यामुळे आहारातील वसात्मक पदार्थ आतड्यात साठून राहून त्यांचे रासायनिक विघटन होते. गहू व इतर धान्यांमधील ग्‍लुटेन नावाच्या पदार्थामुळे वसा-शोषण-क्रिया होऊ शकत नाही, असे अलीकडे निदर्शनास आलेले आहे. मूल अन्न खाऊ लागल्यानंतर या रोगाची लक्षणे प्रथम दिसू लागतात. पुरेसा आहार जात असूनही मुलाची वाढ खुंटते. वसाविद्राव (वसेत विरघळणारी) जीवनसत्त्वे शोषिली न गेल्यामुळे मुडदुसाची लक्षणे उत्पन्न होतात.

या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे मुलाला मलविसर्जन जास्त प्रमाणात होते. दिवसातून अधिक वेळा शौचास होतेच असे नाही, परंतु प्रत्येक वेळी मलाचे परिमाण फार असून तो पांढरट रंगाचा असतो. मलाला फेस फार असून अशोषित वसेमुळे त्याला फार दुर्गंधी असते. पोट खूप मोठे असून हातपाय अगदी बारीक असतात. अ, ब आणि ड जीवनसत्त्वे कमी पडल्यामुळे तशी लक्षणे दिसतात. मूल चिरचिरे आणि अशक्त दिसते.

आहारात ग्‍लुटेन नसलेले पीठ दिल्यास त्वरित गुण येतो. पूर्वी प्रथिन अधिक असलेला आणि कार्बोहायड्रेट व वसा कमी असलेला आहार देत. पिकलेल्या केळ्यातील कार्बोहायड्रेट चांगले पचते म्हणून अधिक पिकलेली केळी देत. साधारणपणे १८–२० वर्षांच्या वयाच्या सुमारास रोग आपोआप बरा होण्याची प्रवृत्ती असते.

बृहदांत्र-कर्करोग : हा रोग ४० वर्षांच्या पुढील वयात होतो. बृहदांत्रात मोड किंवा इतर अर्बुदे (ऊतकाच्या विकृत वाढीमुळे उत्पन्न झालेल्या निरुपयोगी गाठी) असल्यास त्या जागी हा रोग अधिक संभवतो. चिरकारी व्रणांचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. हा रोग बृहदांत्राच्या अवरोही भागात व गुदमार्गात अधिक प्रमाणात दिसतो. अवरोही भागातील कर्करोग आंत्राभोवती पसरल्यामुळे आंत्रसंकोच होऊन आंत्ररोध होऊ शकतो. आरोही आणि अनुप्रस्थ बृहदांत्रात हा रोग आंत्राच्या अक्षांशी समांतर पसरतो त्यामुळे त्या ठिकाणच्या कर्करोगात आंत्ररोध बहुधा होत नाही.


या रोगाची लक्षणे सुरुवातीस अगदी सौम्य असतात. कधी मलावरोध तर कधी अतिसार होणे, मलामध्ये रक्त व श्लेष्मा पडणे, वेदना ही लक्षणे दिसतात. अगदी क्वचित कर्करोगाची गाठ हाताला लागते. क्ष-किरण व अवग्रहाकृती बृहदांत्र परीक्षकाची निदानाला मदत होते. शस्त्रक्रिया करून दूषित भाग काढून टाकणे एवढा एकच उपाय उपलब्ध आहे. ही शस्त्रक्रिया जितक्या लवकर करता येईल तितका गुण येण्याचा संभव असतो म्हणून त्वरित निदान करणे या गोष्टीला फार महत्त्व आहे.

बृहदांत्र-विपुटिशोथ : बृहदांत्राला ज्या घड्या किंवा चुण्या पडलेल्या असतात त्यांच्यामधील बृहदांत्रविभाग विस्फारित झाल्यास त्याला विपुटी असे म्हणतात. या विपुटीमध्ये शोथ उत्पन्न झाल्यास पोटात दुखणे, अतिसार, मलातून रक्त व श्लेष्मा पडणे, ज्वर वगैरे लक्षणे दिसतात. हा रोग वयाच्या ४० वर्षांनंतर दिसतो. क्वचित आंत्रभेद व विद्रधी हे उपद्रव संभवतात.

प्रतिजैव औषधांचा उपयोग न झाल्यास शस्त्रक्रिया करून बृहदांत्राचा दूषित भाग काढून टाकतात.

संदर्भ : 1. Davidson, S. Mcleod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1971.

   2. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, Glasgow, 1973.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.