जेन्नर, एडवर्ड : (१७ मे १७४९–२६ जानेवारी १८२३). देवीप्रतिबंधक लस शोधून आधुनिक प्रतिरक्षाविज्ञानाचा (रोगप्रतिकारक शक्तीबाबतच्या अभ्यासाच्या शास्त्राचा) पाया घालणारे इंग्रज वैद्य. त्यांचा जन्म ग्लॉस्टरशर परागण्यामधील बर्कली येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षी सडबरी येथील शस्त्रवैद्य डॅनिएल लडलो यांच्याकडे शिकाऊ विद्यार्थी म्हणून त्यांनी वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केली. १७७० च्या सुमारास सुप्रसिद्ध शस्त्रवैद्य, शारीरविज्ञ व निसर्गवैज्ञानिक जॉन हंटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लंडन येथे वैद्यकाचा अभ्यास केला. १७७३ मध्ये ते बर्कली या जन्मग्रामी परतले व त्यांनी वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला.

एडवर्ड जेन्नर

बालवयापासूनच त्यांचे लक्ष निसर्गाकडे वळले होते. हंटर यांच्याकडे असताना त्यांच्या या विषयाच्या अभ्यासात भर पडली. १७७१ मध्ये कॅप्टन जेम्स कुक आपल्या सुप्रसिद्ध सागर संशोधन मोहिमेवरून परतल्यानंतर त्यांच्या सफरीतील सर जोसेफ बँक्स यांनी बरोबर आणलेला प्राणिसंग्रह जेन्नर यांनी सुव्यवस्थित मांडला होता. त्यांच्या या कार्याची एवढी प्रशंसा झाली की, कुक यांच्या पुढील सफरीवर जेन्नर यांना निसर्गवैज्ञानिक म्हणून पाठविण्याकरिता निवडण्यात आले परंतु त्यास नकार देऊन त्यांनी वैद्यकाचा अभ्यास पुढे सुरू ठेवला.

पौर्वात्य देशांत देवीच्या फोडांमधील द्रव्य निरोगी माणसास टोचून रोगास प्रतिबंध करण्याची कल्पना सुचली होती व तशी पद्धतही रूढ होती. इंग्लंडमध्ये पद्धतीचा शिरकाव अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून झाला होता. या पद्धतीमुळे या भयंकर रोगाच्या फैलावावर नियंत्रण बसे, परंतु ती अतिधोकादायक होती. कारण पुष्कळ वेळा निरोगी माणूस रोग होऊन मरे किंवा विद्रुप होई. या सुमारासच शेतकऱ्यांमध्ये विशेषेकरून दुग्धव्यावसायिकांमध्ये असा समज पसरला होता की, ज्या व्यक्तीला गायीच्या देवी हा रोग होतो, त्या व्यक्तीला देवी हा रोग होत नाही. हा समज जेन्नर यांना हंटर यांच्याकडे जाण्यापूर्वीपासून माहीत होता. हंटर यांच्याजवळ त्यांनी हा विषय बोलून दाखविला होता. हंटर यांनी बर्कली येथे परतल्यानंतर त्याविषयी अधिक निरीक्षण करण्यास व काही प्रयोग करण्यास जेन्नर यांना सुचविले होते.

इ. स. १७९६ मध्ये त्यांना एका गवळणीस गायीच्या देवी झाल्याचे आढळले. त्यांनी त्या गवळणीच्या हातावरील फोडामधील द्रव काढून आठ वर्षे वयाच्या एका मुलास टोचला, त्या मुलास गायीच्या देवी हा रोग झाला. त्यातून बरा झाल्यानंतर त्याच मुलास जेन्नर यांनी प्रत्यक्ष देवीच्या फोडातील द्रव टोचला, परंतु त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. या प्रयोगाने प्रभावित होऊन त्यांनी आणखी काही प्रयोग केले. स्वतःच्या मुलावरही प्रयोग करून बघितला.

इ. स. १७९८ ते १८०० या काळात त्यांनी या विषयावर निबंध लिहून प्रसिद्ध केले. सुरुवातीस अनेक वैद्यक व्यावसायिकांचा त्यांना विरोध होता परंतु सेंट जेम्स रुग्णालयाचे शस्त्रवैद्य हेन्री क्लाइन यांच्या प्रोत्साहनामुळे त्या रुग्णालयात जेन्नर यांची पद्धत (म्हणजे गायीच्या देवीच्या फोडातील द्रवाचा उपयोग करून माणसातील देवी ह्या रोगास प्रतिबंध करण्याची पद्धत) वापरण्यास सुरुवात झाली.

लंडन येथे १८०३ मध्ये रॉयल जेन्नेरियन सोसायटी स्थापन झाली व तिने देवीप्रतिबंध लस टोचणी पद्धतशीर सुरू केली. या सोसायटीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या अठरा महिन्यांत १२,००० व्यक्तींना लस टोचण्यात आली. देवीमुळे दगावणाऱ्यांची वार्षिक मृत्यूसंख्या २,०१८ वरून ६२२ इतकी घटली. १८०२ मध्ये पार्लमेंटने एका ठरावान्वये जेन्नर यांना १०,००० पौंडांची देणगी दिली. देवीप्रतिबंधक लस टोचण्याच्या कार्यास त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले होते. १८०६ मध्ये पार्लमेंटने त्यांना आणखी २०,००० पौंड दिले.

 त्याच सुमारास भारतात त्यांच्या कार्याकरिता गोळा करण्यात आलेले ७,३८३ पौंड त्यांना मिळाले. १८०४ मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी पुणे येथे आपल्या कुटुंबियांना देवीप्रतिबंधक लस टोचून घेतल्याचा उल्लेख आढळतो.

बर्कली येथे व्यवसाय करीत असतानाच जेन्नर यांनी सेंट अँड्रूज विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली होती. १८१३ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय एम्‌.डी.पदवीही दिली. त्यांनी लिहिलेले इन्क्वायरी इन टू द कॉज अँड इफेक्ट्स ऑफ द व्हेरिओली व्हॅक्सिनी  (१७९८) आणि ऑन द इन्फ्लूअन्स ऑफ आर्टिफिशियल इरप्शन्स इन सर्टन डिसीझेस  (१८२२) हे निबंध सुप्रसिद्ध आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतरणासंबंधीही एक निबंध त्यांनी रॉयल सोसायटीला सादर केला होता.

वैद्यकीय व्यवसायापासून मिळणाऱ्या त्या काळातील मोठ्या आर्थिक फायद्याकडे पाठ फिरवून आपले सर्व लक्ष व वेळ केवळ देवीप्रतिबंधक लस टोचण्यामध्ये घालविणारे हे महान शास्त्रज्ञ मेंदूतील रक्तस्त्रावामुळे बर्कली येथे मरण पावले.

पहा : देवी.                                                                     

        कानिटकर, बा. मो.