अंडवृद्धि : (जलवृषण). ⇨ वृषण अथवा रेतवहरज्जूच्या (वृषणात उत्पन्न होणारा स्राव वाहून नेणारी नळी) भोवती किंवा जवळपास द्रवपदार्थ साठून राहिल्यास त्या विकाराला ‘अंडवृद्धी’, ‘जलवृषण’ अथवा ‘जलमुष्क’ असे म्हणतात. तेथेच रक्त अथवा पू साठून राहिल्यास त्यांना अनुक्रमे ‘रक्तवृषण’ आणि ‘पूयवृषण’ म्हणतात. अंडवृद्धीत साठलेला द्रवपदार्थ बहुधा रक्तरसात्मक असून त्याचा रंग पिवळसर असतो. त्याचे विशिष्ट गुरुत्व १·०१५ ते १·०२५ असून त्यात प्रथिनांचे प्रमाण पुष्कळ असते. अधिवृषणाच्या काही विकारांमध्ये या द्रवात शुक्राणू आढळतात. क्वचित या द्रवाचा रंग दुधासारखा पांढरा असतो.

अंडवृद्धी तीव्र अथवा चिरकारी (फार काळ टिकणारी) असू शकते. तीव्र प्रकार बहुधा संसर्गजन्य असून वृषणाच्या पूयप्रमेहाच्या अथवा क्षयरोगाच्या संसर्गाचा प्रसार परिवृषणापर्यंत (वृषणाच्या आवरणापर्यंत) झाल्यास दिसून येतो.

अंडवृद्धीचे मुख्यतः दोन प्रकार आहेत : (१) वृषणाभोवतीच्या परिवृषणात द्रव साठल्यास त्याला ‘अंडवृद्धी’ किंवा ‘जलवृषण’ म्हणतात (२) रेतवहरज्जूभोवती द्रव साठल्यास त्याला ‘जलरज्जू’ असे म्हणतात.

(१) अंडवृद्धी : अंडवृद्धीचे अनेक उपप्रकार आहेत.

(अ) जन्मजात : या उपप्रकारात वृषण मुष्कात उतरत असताना त्याच्या भोवताली असलेल्या परिवृषणाचा आणि पर्युदराचा संबंध तसाच कायम राहिलेला असतो त्यामुळे वृषणाभोवती साठलेला द्रव दाबून जठरात ढकलता येतो.

(आ) अर्भक-अंडवृद्धी : या उपप्रकारात परिवृषणाचा आणि पर्युदराचा संबंध जरी तुटलेला असतो तरी रज्जूभोवती त्याचा काही कमी-जास्त भाग तसाच रहात असल्यामुळे वृषणाभोवती द्रव परिरज्जूबरोबर वंक्षबंधापर्यंत (जांघेपर्यत) पसरलेला असतो.

(इ) द्विखंडात्मक : या उपप्रकारात अंडवृद्धी आणि पर्युदर या दोन्ही ठिकाणी द्रव्यसंचय असतो.

(ई) अर्जित : हा उपप्रकार बहुधा उत्तरवयात दिसतो. त्याचे कारण निश्चितपणे सांगता येत नसले तरी वृषणाला इजा झाल्यास किंवा मुष्क (वृषण ज्यात असतात ती पिशवी) सारखे फार लोंबल्यासारखे राहिल्यास हा उपप्रकार होत असावा असे मानतात. हाच उपप्रकार सर्वाधिक प्रमाणात दिसतो.

       लक्षणे : वृषणाचा आकार मोठा होतो काही वेळा तो फार मोठा झाल्यामुळे मुष्कामध्ये ओढ बसल्यासारखे दुखते. वृषणाच्या वरच्या बाजूस रेतवहरज्जू निराळी हाताला लागू शकते. आतील द्रव फार असले तर अंडवृद्धी टणक लागते परंतु त्यात स्पर्शतरंग असतो. खोकल्याच्या जोराबरोबर अंडवृद्धीमध्ये आवेग (ओढ) लागत नाही. असे आवेगलक्षण ⇨अंतर्गळामध्ये दिसते म्हणून त्या लक्षणाचा व्यवच्छेदक निदानासाठी उपयोग होतो. अंडवृद्धीवर तीव्र प्रकाश टाकला असता ती किंचित पारदर्शक दिसते. तिच्या पश्चभागी वृषण असते.

    (२) जलरज्जू : रेतवहरज्जूभोवतीच्या परिरज्जूमध्ये द्रव साठल्यास त्याला ‘जलरज्जू’ असे नाव असून त्याची सर्व लक्षणे अंडवृद्धीसारखीच असली तरी जल साठलेला भाग वृषणाच्या वरच्या बाजूस असतो.

    चिकित्सा : परिवृषणात जाड सुई घालून द्रव काढून घेतात, परंतु ते पुन: पुन्हा साठण्याची प्रवृत्ती असल्यामुळे वारंवार काढावे लागते. परिवृषणाच्या दोन्ही थरांना सूज आणून ते एकमेकांस चिकटून जावे म्हणून द्रव काढून घेतल्यानंतर त्याच सुईतून कॉर्‌बॉलिक अम्ल अथवा सोडियम मोऱ्हुएट यासारखे शोथकारक औषध घालण्यात येते. काही वेळा या पद्धतीने गुण येतो. परंतु निश्चित आणि कायम गुण येण्यासाठी शस्त्रक्रिया करून परिवृषणाचा भित्तिस्तर सोडवून काढून टाकणे अथवा तो उलटून शिवून टाकणे हाच उपाय योग्य आहे.

                   ढमढेरे, वा. रा.

      आयुर्वेदीय चिकित्सा : अंडवृद्धी सात प्रकारची असते. ज्या वृद्धीत पाणी साठते तिला ‘मूत्रवृद्धी’ म्हणतात. ती मूत्राचा अवरोध करण्याच्या खोडीने होते. अंडकोशावर सूज असते, तिच्यातले पाणी पखालीतल्या पाण्यासारखे चालताना हालते, लघवीला त्रास व वेदना होतात.

       उपचार : वृषण शेकून कापडाच्या पट्टयाने बांधावे, शिवण सोडून बाजूला व्रीहिमुख-शस्त्राने भोक पाडून त्यात नळी घालून स्राव होऊ द्यावा, स्राव झाल्यानंतर नळी काढून व्रणरोधक औषधे लावून पिशवीसारख्या स्थगिका-बंधात वृषण घालून बांधावे. लघवीला अडवण्याची खोड टाळावी.

                       जोशी, वेणीमाधवशास्त्री