साब्रिन, आल्बर्ट ब्रूस : (२६ ऑगस्ट १९०६–३ मार्च १९९३). पोलीश-अमेरिकन वैद्य व सूक्ष्मजीववैज्ञानिक. ⇨बालऐपक्षाघाता विरुद्घची ( पोलिओविरुद्घची ) तोंडाने देता येणारी लस विकसित करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांच्या नावावरुनच या लशीला ‘साब्रिन लस’ असे नाव देण्यात आले. या लशीने अंतःक्षेपणाद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘सॉल्क लशी’ ची जागा घेतली. मानवातील विषाणुजन्य रोग, कर्करोग व टॉक्सोप्लाझ्मोसिस [टॉक्सोप्लाझ्मा गोंडी या आदिजीवांच्या ( प्रोटोझोआंच्या ) संसर्गाने उद्भवणारी गंभीर कावीळ वगैरे लक्षणे असलेली विकृती] यांविषयींच्या संशोधनासाठीही ते प्रसिद्घ आहेत.

 

साब्रिन यांचा जन्म पूर्वीच्या रशियन साम्राज्यातील व आता पोलंडमधील बेलिस्टॉक या गावी झाला. १९२३ मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेला गेले आणि ते १९३० मध्ये अमेरिकेचे नागरिक झाले. १९३१ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळविली. तेथे त्यांनी बालपक्षाघाताचे संशोधन सुरु केले. न्यूयॉर्क शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात निवासी डॉक्टर (वैद्य) म्हणून दोन वर्षे काम केल्यावर त्यांनी लंडन येथील लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन येथे संशोधन केले. नंतर ते न्यूयॉर्क शहरातील रॉक्‌फेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथे रुजू झाले (१९३५). तेथे शरीराबाहेर मानवी तंत्रिका ऊतकांमध्ये (मज्जासंस्थेतील समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहांमध्ये ) बालपक्षाघाताच्या व्हायरसाची वाढ होते, असे त्यांनी सर्वप्रथम दाखविले.

 

साब्रिन १९३९ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीच्या कॉलेज ऑफ मेडिसीनमध्ये बालरोगविज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक व याच महाविद्यालयाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल रिसर्च फाऊंडेशनमधील संसर्गजन्य रोगविषयक विभागाचे प्रमुख झाले. नंतर ते बालरोगविज्ञानातील संशोधनविषयक प्राध्यापक झाले. या महाविद्यालयात असताना त्यांनी बालपक्षाघाताचा व्हायरस नाकावाटे व श्वसनसंस्थेमधून शरीरात प्रवेश करतो, ही प्रचलित उपपत्ती खोडून काढली आणि बालपक्षाघात मुख्यत्वे पचनमार्गाचा संसर्ग असतो, असे त्यांनी दाखविले.

 

मृत किंवा हतप्रभ (रोगोत्पादक शक्ती क्षीण केलेल्या, परंतु जिवंत) व्हायरस तोंडावाटे दिल्यास, मारलेल्या व अंतःक्षेपणाद्वारे दिलेल्या व्हायरसापेक्षा बालपक्षाघातविरोधी रोगप्रतिकार शक्ती अधिक दीर्घकाळ टिकून राहील, असे गृहीततत्त्व त्यांनी मांडले. बालपक्षाघाताच्या व्हायरसाच्या तीन प्रकारांपैकी प्रत्येकाचे वाण त्यांनी वेगळे काढले (१९५७). हे प्रकार प्रत्यक्ष रोग उद्‌भवण्याच्या दृष्टीने पुरेसे सबळ नव्हते. मात्र ते ⇨ प्रतिपिंडाच्या निर्मितीला प्रेरणा देणारे होते. हे हतप्रभ वाण तोंडाने देण्याविषयीचे प्राथमिक स्वरुपाचे प्रयोग त्यांनी नंतर केले. तसेच मेक्सिको, नेदर्लंड्स व रशिया येथील वैज्ञानिकांबरोबर सहकार्य करुन त्यांनी याविषयीचे अध्ययन केले. अखेरीस मुलांवर व्यापक प्रमाणावर या लशीच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या. यातून या नव्या लशीचा प्रभावशाली गुण अंतिमतः निर्णायक रीतीने प्रत्ययास आला. तोंडाने देता येणारी ही ‘साब्रिन लस’ द्यायला अमेरिकी शासनाने १९६० साली परवानगी दिली आणि नंतर जगभरच ही लस बालपक्षाघाताविरुद्घची प्रमुख संरक्षक उपाय झाली.

 

साब्रिन यांनी बालपक्षाघाताचा ‘बी व्हायरस’ वेगळा केला. त्यांनी ⇨वालुमक्षिका ज्वर वडेंग्यू ज्वर यांवरील लशी संशोधनाद्वारे विकसित केल्या. तसेच व्हायरसांविरुद्घची रोगप्रतिकारकक्षमता कशी विकसित होते, याचे अध्ययन केले. त्यांनी तंत्रिका तंत्राला बाधक ठरणाऱ्या व्हायरसांचे अनुसंधान केले, शिवाय कर्करोगामधील व्हायरसांच्या कार्याचा अभ्यासही केला.

 

साब्रिन १९७१ साली सिनसिनाटी विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक झाले. तसेच ते १९७४–८२ दरम्यान चार्ल्सटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलायनामध्ये संशोधन प्राध्यापक होते.

 

वॉशिंग्टन(डी. सी.), अमेरिका येथे त्यांचे निधन झाले.

 

पहा : बालपक्षाघात.

ठाकूर, अ. ना.