अस्थिमार्दव : अस्थींची वाढ पूर्ण झाल्यानंतर प्रौढपणी त्यांना येणाऱ्या मऊपणाच्या विकारास ‘अस्थिमार्दव’ म्हणतात. अस्थींमध्ये कॅल्शियम योग्य प्रमाणात निक्षेपित (साका साचण्याची क्रिया) न झाल्यामुळे हा विकार होतो. बालपणी होणाऱ्या ⇨मुडदूस  या विकारासारखाच हा विकार असून त्याच प्रकारच्या कारणांनी होतो. अस्थींना टणकपणा येण्यासाठी कॅल्शियमाच्या शोषणाची व फॉस्फेटाच्या निक्षेपणाची जरूरी असते व या क्रियांसाठी ड जीवनसत्त्व आवश्यक असते. हे जीवनसत्त्व आहारात पुरेसे नसल्यास, पुरेसे असूनही स्निग्ध पदार्थांच्या चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक बदलांतील) बिघाडामुळे शोषिले न गेल्यास, गर्भिणीच्या शरीरातील गर्भाच्या वाढीला आवश्यक असलेले कॅल्शियम कमी पडल्यास अथवा अवटू व परावटू ग्रंथींच्या [ → अ‍वटु ग्रंथि परावटु ग्रंथि] विकारांमुळे कॅल्शियम कमी पडल्यास किंवा वृक्कविकारांमुळे (मूत्रपिंडाच्या विकारांमुळे) फॉस्फेटाचे प्रमाणाबाहेर विसर्जन झाल्यासही हा रोग होतो. या विकारात रक्तातील कॅल्शियम व फॉस्फेट यांची लवणे कमी झालेली असतात.

अस्थिमार्दव दर्शविणार्‍या श्रोणी व मांडीच्या अस्थी.

ड जीवनसत्त्वाची निर्मिती सूर्यप्रकाशातील जंबुपार किरणांमुळे (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरणांमुळे) होत असल्याने कमी सूर्यप्रकाशाच्या उ. चीनमध्ये, तसेच आहारात ड जीवनसत्त्व कमी असणार्‍या उ. भारतातील काही जमातींमध्ये हा विकार अधिक आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. विशेषत: गर्भारपणी हे प्रमाण वाढते. एकदा विकार झाला म्हणजे त्याची तीव्रता वाढत जाते व प्रसूती फार कष्टाची होते. श्रोणी ( धडाच्या तळाशी असलेल्या खोलगट हाडांच्या वलयामुळे तयार झालेली पोकळी ) आकुंचित झाल्यामुळे गर्भविमोचन ( गर्भ बाहेर पडण्याची क्रिया ) नैसर्गिक मार्गाने होणे अशक्य झाल्यास उदरपाटन ( पोट उघडण्याची शस्त्रक्रिया ) करावे लागते. पण गर्भारपण हे या रोगाचे मूळ कारण नव्हे. मूल अंगावर पीत असण्याच्या काळातही या रोगाचे प्राबल्य आढळते.

लक्षणे : पाठ व मांड्या दुखू लागणे हे लक्षण प्रमुख असते. सर्व शरीरात चमका मारतात. थंडीच्या दिवसांत या वेदना तीव्र होतात. वक्षस्थळ, मांड्या, पाय, दंड आणि पुरोबाहू (कोपर व मनगटयांमधील भाग) या ठिकाणच्या लांब अस्थी मऊ पडल्यामुळे त्या वाकतात व त्यामुळे विरूपता येते. पाठीतील व मानेतील मणक्यांमध्ये मऊपणा आल्यामुळे कुबड येऊन उंची कमी होते. श्रोणी व छाती येथील हाडेही मऊ पडल्यामुळे त्यांचा आकार विकृत होतो. मांडीच्या हाडाच्या ग्रीवेचा (मानेसारख्या भागाचा) कोन बदलल्यामुळे रोगी डुलत डुलत चालतो. आपोआप अस्थिभंग होतो. रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण फार कमी झाल्यास झटके येतात. रोगाच्या प्रगतावस्थेत रोग्याला अंथरूण सोडणे अशक्य झाल्यामुळे शय्याव्रण, पांडुरोग (ॲनिमिया) अथवा फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहयुक्त सूज) हे उपद्रव होतात.

क्ष-किरण परीक्षेने अस्थिमार्दवाचे निदान करणे सोपे होते. रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे कमी झालेले प्रमाणही निदानाला मदत करते.

चिकित्सा : ड जीवनसत्त्व (कॅल्सिफेरॉल) मोठ्या मात्रेने दिल्यास अस्थींमध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण लवकर होते. कॉड माशाच्या यकृताचे तेल, भरपूर प्रमाणात दूध, अंडी, लोणी आणि ताज्या पालेभाज्या यांमध्ये हे जीवनसत्त्व पुरेसे असल्यामुळे त्यांचाही उपयोग होतो. रोग्याला कोवळ्या उन्हात बसविल्यास सूर्यकिरणांमुळे त्वचेत ड जीवनसत्त्व उत्पन्न होते. जेथे सूर्यप्रकाश भरपूर नसेल तेथे जंबुपार किरणांचे विशेष प्रकारचे दिवे वापरतात. झटके येऊ लागल्यास कॅल्शियम भरपूर प्रमाणात टोचावे लागते. वृक्कविकारामुळे होणाऱ्या अस्थिमार्दवात ड जीवनसत्त्वाचा फारसा उपयोग होत नाही. तो प्रकार क्वचित आढळणारा व आनुवंशिक असतो.

ढमढेरे, वा. रा.

श्रोणी व मांड्या यांतील अस्थिमार्दव दाखविणारे क्ष-किरण-चित्र