शवपरीक्षा : मृत शरीराच्या म्हणजे शवाच्या अंतर्गत व बाह्य भागाच्या शास्त्रीय तपासणीला शवपरीक्षा म्हणतात. शवाचे बाहेरून काळजीपूर्वक निरीक्षण करतात. तसेच शरीर, त्यातील महत्त्वाचे अवयव व संरचना यांचे विच्छेदन करून परीक्षण करतात. रोगाचे कारण, स्वरूप, त्याचे शरीरावर झालेले परिणाम, शरीरात रोगामुळे झालेल्या बदलांची व्याप्ती व क्रम आणि अशा प्रकारे रोगप्रतिक्रियेची क्रमवार झालेली प्रगती व यंत्रणा या गोष्टी शवपरीक्षेद्वारे उघड होतात. अनैसर्गिक कारणांनी झालेल्या संशयस्पद मृत्यूच्या बाबतीतही शवपरीक्षा करतात. यामुळे मृत्यूचे कारण, वेळ वगैरे गोष्टी उघड होतात.

इतिहास : रोगाच्या अभ्यासासाठी पहिली मानवी शरीरविच्छेदने इ. स. पू. ३०० मध्ये अँलेक्झांड्रियाच्या हीरॉफिलस व ⇨ एरासिस्ट्राटस या वैद्यक शास्त्रज्ञांनी केली. मात्र रुग्णाच्या तक्रारी दिसू शकतील व जाणवू शकतील अशी रोगलक्षणे आणि रुग्णाच्या मृत्यूनंतर शरीरात आढळलेला रोगग्रस्त भाग यांच्यामधील परस्परसंबंध निश्चित करण्याचे काम सर्वप्रथम ⇨ गेलेन या ग्रीक वैद्यक तज्ज्ञाने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या अखेरीस केले. शवपरीक्षेचा मार्ग खुला करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तथापि मध्ययुगात मानवी शरीरविच्छेदनास परवानगी नव्हती.

शरीररचना व शरीरांतर्गत क्रिया यांची व्यवस्थित माहिती होण्यासाठी व रोगाच्या मुळाशी जाण्यासाठी शवपरीक्षा करणे आवश्यक आहे, हे शास्त्रज्ञांना तेराव्या शतकापासून पटू लागले. कोणास कळू न देता पुरलेले शव बाहेर काढून त्याची परीक्षा करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी होत असत. मात्र तेराव्या शतकात दुसऱ्या फ्रेडरिक राजाने दर दोन वर्षांनी मृत्यूदंड दिलेल्या दोन गुन्हेगारांची शवे वैद्यकीय विद्यालयांना ज्ञानार्जनासाठी द्यावीत, असा आदेश काढला. यांपैकी एक विद्यालय सालर्नो येथील होते.

प्रबोधान काळात (सु. चौदावे ते सतरावे शतक) शरीररचनाशास्त्राचा पुनर्जन्म झाला, हे ⇨ अँड्रिअस व्हेसेलिअस यांच्या De Humani Corporis Fabrica (१५४३) या ग्रंथावरून उघड होते. या ग्रंथामुळे प्राकृत व अप्राकृत वा विकृत शरीररचनांमधील भेद स्पष्ट होऊ शकला. ⇨ लिओनार्दो दा व्हींची यांनी तीस शवांचे विच्छेदन करून अप्राकृत शरीररचनांची नोंद केली. तसेच ⇨ मायकेलअँजेलो यांनीही अनेक शवविच्छेदने केली होती.

मृत्यूस कारणीभूत झालेली चूक किंवा अपराध सिद्ध करण्यासाठी पहिली न्यायवैद्यकीय किंवा कायदेशीर शवपरीक्षा बोलोन्यातील न्यायाधीशाच्या सूचनेवरून १३०२ साली करण्यात आली. केवळ मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी फ्लॉरेंन्स येथील वैद्य आंतोन्यो बेनीव्ह्येनी यांनी पंधराव्या शतकात १५ शवपरीक्षा केल्या. मृत व्यक्तींमध्ये जिवंतपणी असलेली रोगलक्षणे व त्यांनी काढलेले काही निष्कर्ष यांचा परस्परसंबंध जोडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. पोप पाचवे अलेक्झांडॅर यांचे आकस्मित व अनपेक्षित रीतीने निधन झाले. या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांच्या देहाची शवपरीक्षा करण्यात आली होती. (१४०१). सोळाव्या व सतराव्या शतकांत शवपरीक्षांचे प्रमाण वाढत गेले आणि त्यांच्याविषयीचे अहवाल संकलित करून छापण्यात आले. यांपैकी जिनीव्हा येथील तेओफिल बॉन्ये (१६२०–८९) यांचे विकृत शारीरविषयक पद्धतशीरपणे केलेले संकलन सर्वोत्कृष्ट होते. त्यासाठी त्यांनी ३,००० शवपरीक्षांमधील निरीक्षणे अभ्यासली होती. यातून प्रेरणा घेऊन ⇨ जोव्हान्नी बास्तीस्ता मोगोन्ये यांनी आपला ग्रंथ (इं. शी. ऑन सीट्स अँड कॉझेस ऑफ डिसीजेस अँज इंव्हिस्टिगेटेड बाय अँनॉटमी) प्रसिद्ध केला (१७६१). या ग्रंथात त्यांनी अंदाजे ७०० रुग्णांच्या रोगलक्षणांची त्यांच्या शरीरांचे निरीक्षण करून काढलेल्या निष्कर्षांशी तुलना केली होती. या ग्रंथामुळे शवपरीक्षेतील निष्कर्षांच्या आधारे रोगांचे अनुसंधान (बारकाईने अध्ययन) करण्यास प्रारंभ झाला. मोर्गान्ये हे आधुनिक विकृतिविज्ञानाचे जनक मानले जातात. यानंतरच्या मॅथ्यू बेली यांच्या द मॉर्बिड अँनॉटमी ऑफ सम ऑफ द मोस्ट इंपॉर्टट पार्टस ऑफ द ह्यूमन बॉडी (१७९४) या ग्रंथाने या विषयात कळस गाठला. हा ग्रंथ आधुनिक विकृतिविज्ञानाचे पाठ्यपुस्तक म्हणता येईल. विविध निरीक्षकांनी विशिष्ट प्रकारच्या अनेक निदानीय व विकृतिवैज्ञानिक बाबींच्या व्याख्या तयार केल्या. अशा प्रकारे शवपरीक्षेविषयीच्या आधुनिक वैद्यकीय वाटचालीचा मार्ग खुला झाला.

व्हिएन्ना येथील कार्ल फोन रोकिटान्स्की (१८०४–७८) यांच्यामुळे स्थूल शवपरीक्षा म्हणजे नुसत्या डोळ्यांनी पाहून केलेली शवपरीक्षा प्रगत होण्यास साहाय्य झाले. फ्रेंच शरीररचनाशास्त्रज्ञ व शरीरक्रियावैज्ञानिक मारी-फ्रांस्वा-ग्झेव्ह्ये बीशे (१७७१ –१८०२) यांनी रोगाचा अभ्यास करताना विविध सामान्य तंत्रे (संस्था) व ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकांचे-पेशींचे-समूह) यांच्या कार्यावर भर दिला. ⇨ रूडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो (१८२१ – १९०२) या जर्मन विकृति-वैज्ञानिकांनी कोशिकीय (पेशीविषयक) विकृतिवैज्ञानिक तत्त्व मांडले. त्यानुसार कोशिकांमध्ये होणारे बदल हे रोगाची माहिती करून घेण्यासाठी आधारभूत असतात. विकृतिविज्ञानाला व शवपरीक्षेला हे तत्त्व लागू पडते. केवळ विकृतिवैज्ञानिक शरीररचनाशास्त्रावर (म्हणजे रोगग्रस्त ऊतकाच्या संरचनेच्या अभ्यासावर) भर देण्याच्या वृत्तीविरुद्ध त्यांनी धोक्याचा इशारा दिला. उलट त्यांनी शरीरक्रियावैज्ञानिक विकृतिविज्ञानावर म्हणजे रोगाच्या अनुसंधानातील जीवाच्या कार्याच्या अभ्यासावर भर दिला. या तत्त्वामुळे शवपरीक्षेची उपयुक्तता वाढली.

संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्याने शवपरीक्षेतून मिळणारे रोगग्रस्त अवयवांचे भाग बारकाईने अभ्यासणे शक्य झाले. अवयवातील कोशिका व त्यांतील संरचना आणि रक्तवाहिन्या यांमध्ये कशा पद्धतीने फरक होत जातात, यांसंबंधी अधिकाधिक माहिती उपलब्ध होत गेली. अशा प्रकारे शवपरीक्षेत सूक्ष्मदर्शक हे अतिशय उपयुक्त साधन ठरले.

आधुनिक शवपरीक्षेचे क्षेत्र पुष्कळ व्यापक झाले आहे. आता तिच्यात विशेषीकृत मूलभूत विज्ञानांमधील सर्व माहिती व साधने यांचा उपयोग करून घेण्यात येतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने दिसू शकणाऱ्या संरचनांचे परीक्षणही शवपरीक्षेत आता केले जाते. तसेच रेणवीय जीवविज्ञानातील तंत्रेही (उदा., डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल –डिएनए – ठसे) शवपरीक्षेत वापरतात.

शवपरीक्षेचे उद्देश : सर्वसाधारणपणे शवपरीक्षेचे उद्देश दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे वैद्यकीय ज्ञानवर्धनासाठी व दुसरे न्यायवैद्यकीय (कायदेशीर) कारणांसाठी. दोहोंसाठी तज्ज्ञाची गरज असते.

ज्ञानवर्धनासाठी शवपरीक्षा : ही शवपरीक्षा करावयाची झाली, तर मृत्यू आकस्मिक अथवा संशयास्पद स्थितीत झालेला नाही याची खात्री करणे आवश्यक असते. तसेच मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांची शवपरीकेसाठी लेखी परवानगी मिळविणे, हेही आवश्यक असते.


रोगग्रस्त शरीरातील अवयवाला किंवा अवयवांना कितपत इजा झाली आहे याचा अभ्यास करणे, तसेच एका अवयवाच्या रोगामुळे दुसऱ्या अवयवांची हानी झाली असेल, तर तिचाही शोध घेणे हे शवपरीक्षेचे उद्देश असतात. शवातील अवयवांत झालेल्या बदलांवरून रुग्ण जिवंत असताना रोगाचे निदान बरोबर झाले होते की नाही, हे समजण्यासही शवपरीक्षा उपयुक्त ठरते. यामुळे त्या रोगविषयीच्या सर्वसाधारण वैद्यकीय ज्ञानात भर पडते. निदानातील चूक उमगली म्हणजे भावी काळात अशा रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे सोपे जाते. अशा प्रकारे निदान व उपचार यांतील चुका शवपरीक्षेने लक्षात येतात. तसेच नवीन रोग व रोगाची नवीन तऱ्हा यांना आळा घालणे आणि भावी अध्ययनाला मार्गदर्शन करणे या दृष्टीनी प्रत्येक शवपरीक्षा महत्त्वाची व उपयुक्त असते. विकृती व मृत्यू यांविषयीची सांख्यिकीय माहिती काळजीपूर्वक केलेल्या शवपरीक्षांमुळे अधिक बिनचूक होते व तिचे मोलही वाढते. अशा शवपरीक्षांमुळे पुष्कळदा संसर्गकारक जीवाची व साथींची प्रथम सूचना मिळते. रुग्णालयात दाखल झाल्यावर रोगनिदान न होताच रुग्ण २४ तासांच्या आत मृत्यू पावला, तर रोगनिदानासाठी शवपरीक्षा उपयुक्त ठरते. वैद्यकीय ज्ञानाचे मूल्यमापन करण्याकरिता व वैद्यकीय शिक्षण मिळण्याकरिता व्यावसायिकांच्या दृष्टीने शवपरीक्षा महत्त्वाची असते.

न्यायवैद्यकीय शवपरीक्षा : आजारपण, वार्धक्य वगैरेंमुळे नैसर्गिक मृत्यू येतो व अशा मृत्यूची शवपरीक्षा करणे कायद्याने बंधनकारक नसते. मात्र अनैसर्गिक कारणांनी आलेल्या संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत न्यायवैद्यकीय शवपरीक्षा होणे गरजेचे असते. आत्महत्या, खून, गळफास, मुकामार, मादक पदार्थांचे अतिसेवन, अपघात, विषबाधा, बुडणे, जळणे, गुदमरणे अतिरक्तस्राव, लहान मुलाच्या श्वासनलिकेत गोटी, शेंगदाणा किंवा वाटाणा अडकून गुदमरणे, विजेचा धक्का बसणे इ. अनेक कारणांमुळे अनैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. रुग्णालयात व शस्त्रक्रियेच्या वेळी होणारा आकस्मित मृत्यू, कारागृहातील कैद्याचा मृत्यू यांबाबतीत न्यायाधीश, अपमृत्युनिर्णेता (कोरोनर) यांसारखी योग्य ती अधिकारी व्यक्ती शवपरीक्षा करण्याचा लेखी आदेश देते. न्यायवैद्यकीय शवपरीक्षा मुख्यत्वेकरून न्यायव्यवस्थेला मदत करण्यासाठी केली जाते.

न्यायवैद्यकीय शवपरीक्षेत केवळ मृत्यूचे कारण व वेळ यांचाच विचार होत नाही. यापलीकडे जाऊन मृत्यूच्या वेळी सभोवतालची सर्व वस्तुस्थिती प्रस्थापित होणे गरजेचे असते. यात मारक किंवा प्राणघातक नसणाऱ्या सर्व वास्तव गोष्टीही येतात. शरीरविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण आपोआप उघड होत नाही. हे कारण ही स्वतंत्र अशी मूर्त बाब नसते. ते मृत्यू या घटनेविषयीचे एक मत असते. असे असल्याने कधीकधी अर्थ लावण्याच्या बाबतीत मतभिन्नता होऊ शकते. मात्र न्यायवैद्यकीय शवपरीक्षेत काटेकोर, तपशीलवार वर्णने, मापने व लेखी पुरावे आवश्यक असतात.

न्यायवैद्यकीय खटल्याच्या संदर्भात मृत्यूच्या वेळच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून केलेले मूल्यमापन महत्त्वाचे असते. मृत्यूची तऱ्या (उदा., आत्महत्या) प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे मूल्यमापन उपयुक्त असते. मृत्यूच्या वेळचे दृश्य व परिस्थिती यांतून संशयातील पुरावा मिळू शकतो. न्यायवैद्यकीय शवपरीक्षेत छायाचित्रीय, कागदोपत्री पुरावा महत्त्वाचा असतो. ही शवपरीक्षा नेहमी पूर्ण व्हावी लागते. म्हणजे तिच्यामुळे मृत्यूच्या इतर कोणत्याही संभाव्य कारणाची शक्यता उरता कामा नये. मृत व्यक्तीची ओळख पटणे व तिच्या शरीरातून घेतलेल्या सर्व नमुन्यांची ओळख पटणे महत्त्वाचे असते. शक्यतोवर मृत्यूची वेळ व रक्तगट या गोष्टी प्रस्थापित कराव्या लागतात. न्यायवैद्यकीय शवपरीक्षा प्रत्यक्ष चालू असताना लघुलेखकाला किंवा म्हणणे नोंदविणाऱ्या साधनाला परीक्षकाने माहिती सांगणे गरजेचे असते. अशी नोंद हा पुष्कळदा कायदेशीर पुरावा ठरतो व म्हणून ही नोंद परिपूर्ण व बिनचूक असावी लागते. शवपरीक्षेच्या ठिकाणी कोणी हजर राहावे याचेही नियम असून अनधिकृत व्यक्तीला तेथे प्रवेश नसतो.

शवपरीक्षेची पद्धत : शवपरीक्षा मृत्यूनंतर जितक्या लवकर करता येईल, तितकी करणे हितावह ठरते. कारण जसाजसा विलंब होत जातो, तसतसा शरीरातील अवयवांवर बाहेरील व शरीरातील सूक्ष्मजीवांचा प्रभाव पडून अवयव सडत जातात. शवपरीक्षेसाठी स्वतंत्र खोली व भरपूर उजेड यांची आवश्यकता असते. त्यासाठी एक सोयीस्कर टेबल आणि शरीराचे छेद घेण्यासाठी धारदार सुऱ्या, कात्र्या, छिन्नी, हातोडा, तसेच अवयवाचे तुकडे ठेवण्यासाठी फॉरमॅलीन असलेल्या बाटल्या आणि रक्त, जठर, परिमस्तिष्क द्रव्य इ. ठेवण्यासाठी बाटल्या या सर्वांची सोय केलेली असते.

शवपरीक्षेच्या पद्धतीमध्ये विसाव्या शतकात थोडाच बदल झाला आहे. पहिल्या टप्प्यात शरीराच्या बाह्य भागाची तपासणी करून काही अप्राकृत गोष्टी वा ⇨ अभिघात झाला आहे का ते पाहतात. नंतर शरीराच्या अंतर्गत भाग व त्यातील अवयव यांचे काळजीपूर्वक वर्णन करतात. अखेरीस जादा तपासणी केली जाते. उदा., कोशिका व ऊतके यांचे सूक्ष्मदर्शकाने केलेले परीक्षण.

डोके, कान, नाक, डोळे, मान, त्वचा, शरीरावर मार लागल्याच्या खुणा, हाडांची व अवयवांची स्थिती वगैरे गोष्टी बाह्य निरीक्षणात काळजीपूर्वक पाहतात. शरीरविच्छेदन करताना एका विशिष्ट प्रकारचे छेद घेतात. धडासाठी इंग्रजी वाय (Y) अक्षराच्या आकाराचा छेद घेतात. या अक्षराच्या वरील दोन भुजांच्या छेदांची सुरूवात काखेपासून किंवा खांद्याच्या बाह्य भागापासून करतात. हे छेद उरोस्थीच्या तळापाशी शरीराच्या मध्यरेषेपर्यंत नेतात. मग तेथून एक छेद (वायचा उभा दंड) उदराच्या खालील भागापर्यंत घेतात. यानंतरच्या शवपरीक्षेच्या व छेद घेण्याच्या पद्धतीच्या बाबतीत निरनिराळी मते आहेत. एका पद्धतीत प्रत्येक अवयव स्वतंत्रपणॆ काढून घेऊन मग त्याचे छेदन करून अभ्यास करतात. गट पद्धतीमध्ये छातीतील सर्व अवयव एका गटात व उदरातील सर्व अवयव दुसऱ्या गटात परीक्षणासाठी काढून घेतात मान, डोके व बाहू यांच्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहिन्या बांधून ठेवतात. मानेतील अवयवांची जागच्या जागीच काळजीपूर्वक तपासणी करतात अथवा ते खालील बाजूने काढून घेतात. कवटीच्या सभोवार आडवा छेद घेऊन छिन्नी-हातोड्याने कवटी उघडतात.

सर्वसाधारणपणे गटागटाने अवयव काढून घेण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे. यामुळे त्यांच्यातील कार्यात्मक परस्परसंबंधांतील अडचणी निश्चित करता येतात. छाती व उदर यांतील इंद्रिये नीट तपासल्यावर छातीतून हृदय बाहेर काढून त्यातील कप्प्यांचे निरीक्षण करतात. दोन्ही फुफ्फुसे बाहेर काढून गरज वाटल्यास सूक्ष्मदर्शकीय तपासणीसाठी हृदयाचे व फुफ्फुसांचे छोटे भाग काढून घेतात. उदरातील जठर, यकृत, प्लीहा (पानथरी), अग्निपिंड, आतडे तसेच ओटीपोटातील वृक्क (मूत्रपिंड), गर्भाशय, गर्भनलिका, अंडवाहिन्या, अंडाशय, अष्ठिला ग्रंथी, वृषण वगैरे अवयवांचे नीट निरीक्षण करतात. संशयास्पद अवयवांचे तुकडे पुढील परीक्षणासाठी वेगळे काढतात. शेवटी मेंदूचे परीक्षण करतात. प्रथम आहे त्या स्थितीत त्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करतात. त्यावरील पटल फाडतात. त्यामुळे पृष्ठभागावरील विकृती लक्षात येऊ शकते. मग मेंदूचा खालील भाग कवटीपासून मोकळा करून घेऊन संपूर्ण मेंदू कवटीपासून उचलून बाहेर ठेवतात. मग त्याचे दहा-बारा आडवे छेद घेतात. यातून मेंदूतील रक्तस्राव व अन्य विकृती लक्षात येतात. गरज असल्यास मेरुरज्जूही काढून घेतात.

सर्वसाधारणपणे शवपरीक्षेत हातापायांचे छेद घेण्याची गरज नसते. मात्र रुग्णाला अस्थिरोग झाला असेल किंवा न्यायवैद्यकीय शवपरीक्षा पूर्ण करण्यासाठी जखमा झालेल्या हातापायांची पूर्ण परीक्षा करावी लागते.


प्रत्येक अवयवाचा बाह्य व छेदलेला भाग, तसेच त्याच्या वाहक संरचना (उदा., रोहिण्या, लसीकावाहिन्या, तंतुमय ऊतक, तंत्रिका – मज्जातंतू इ.) यांचे परीक्षण करतात. शिवाय गरजेनुसार ⇨ ऊतक संवर्धन, रासायनिक विश्लेषण व इतर अध्ययनांसाठी अवयवांचे नमुने घेतात. हे काम पूर्ण झाल्यावर लगेचच अवयव परत शरीरात ठेवतात व सर्व छेद काळजीपूर्वक शिवतात. शवपरीक्षेची कोणतीही ओंगळ खूण मागे राहणार नाही अशा रीतीने शरीराचे पुनःस्थापन झाल्यावर शव नातेवाइकांच्या ताब्यात देतात. न्यायवैद्यकीय शवपरीक्षेतील शवावर पोलिसांच्या संमतीनंतर अंतिम संस्कार करतात.

शरीराच्या समग्र परीक्षेनंतर आढळलेल्या गोष्टीवरून मिळालेले निष्कर्ष एकमेकांशी ताडून पाहतात आणि विकृतिवैज्ञानिक निष्कर्षांची यादी तयार करतात. या यादीतील शरीररचनाशास्त्रीय निदाने तात्पुरती किंवा हंगामी स्वरूपाची असतात. या निदानांचे गट करून महत्त्वानुसार त्यांची क्रमवार मांडणी करतात. यासाठी सूक्ष्मदर्शकीय अभ्यासाचाही उपयोग करतात.

ऊतकवैज्ञानिक, रासायनशास्त्रीय, सूस्मजंतुवैज्ञानिक आणि व्हायरसविषयक अशी सर्व परीक्षणे व अध्ययने पूर्ण झाल्यावर शरीररचनाविषयक तात्पुरत्या निदानांमधील त्रुटी किंवा चुका सुधारून घेतात आणि नंतर अंतिम निदान व मृत्यूचे अंतिम कारण नमूद करतात. शवपरीक्षेच्या अहवालाच्या अखेरीस शवपरीक्षेच्या विश्लेषणाविषयीचे निवेदन असते. या निवेदनात निष्कर्ष व नीदानीय तपशील यांचा परस्परसंबंध विशद केलेला असतो. याला ‘निदानीय विकृतिवैज्ञानिक परस्परसंबंध’ म्हणतात. शवपरीक्षेचा अहवाल योग्य त्या अधिकारी व्यक्तीकडे दिला जातो.

मृत्यूची वेळ ठरविणे : हाही न्यायवैद्यकीय शवपरीक्षेतील महत्त्वाचा भाग असतो. मात्र पुष्कळदा मृत्यूची अचूक वेळ ठरविणे अवघड असते. यासाठी निश्चित असे नियम नाहीत. शरीराची सर्वसाधारण स्थिती, शरीराची कृशता वा स्थूलता, कपडे, सभोवतालाच्या हवेचे किंवा बुडून मेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पाण्याचे तापमान इ. सर्व गोष्टी मृत्यूची वेळ ठरविताना विचारात घ्याव्या लागतात. शरीरातील उष्णता घटणे, शरीर सडू लागणे, शरीर कठीण होत जाणे, त्वचेचा रंग बदलत जाऊन जांभळट छटा (प्रेतकळा) येणे या क्रिया मृत्यूनंतर ठरावीक कालावधीपर्यंत राहतात. मृत्यूची वेळ अंदाजे ठरविण्यासाठी त्यांची मदत होते. त्वचा, स्नायू, हृदय, फुफ्फुसे इत्यादीमधील कोशिकांत होणारा बदल, रक्त गोठण्याची क्रिया यांमुळे असे बदल होत जातात. उदा., शरीर थंड होण्यास ३ ते १२ तास लागतात. गुरुत्वाने रक्त खाली जाण्याच्या क्रियेने त्वचेचा रंग बदलत जातो व ही क्रिया १२ तासांत पूर्ण होते. स्नायू ताठर होऊन शवकाठिण्य येण्यासाठी २ ते ३ तास लागतात. शरीराचा वरचा भाग लवकर कठीण होतो, तर पिळदार स्नायू उशिरा ताठर होतात. उष्णता व आर्द्रता यांमुळे शरीर सडण्याची क्रिया अधिक जलदपणे घडते. थंड प्रदेशात याला उशीर लागतो. पाण्यात बुडालेला देह लवकर कुजू लागतो, तर जमिनीत गाडला गेलेला देह उशिरा कुजतो. मृत व्यक्तीच्या शेवटच्या जेवणाची वेळ माहीत असल्यास जठर व लहान आतड्यातील अन्नाचे पचन कितपत झाले आहे, यावरून मृत्यूच्या वेळेविषयी अंदाज बांधता येतो. अर्थात व्यक्तीपरत्वे व अन्नाच्या प्रकारानुसार पचनाचा काळ भिन्न असू शकतो. मृत्यूनंतर केसांची वाढत होत नाही. अखेरची दाढी केव्हा केली होती हे माहीत असल्यास केसांच्या झालेल्या वाढीवरून मृत्यूची वेळ बरीच अचुकपणे ठरविता येते.

शवपरीक्षेविषयी समाजाचा दृष्टिकोन : नेत्रदान, रक्तदान, देहदान, अवयवदान यांविषयी समाजात जशी आस्था आहे, तशी शवपरीक्षेविषयी नाही. शवपरीक्षेविषयीचे समज व गैरसमज, स्थितिशील वृत्ती, अंधश्रद्धा, देहविटंबनेसारख्या समजण्याजोग्या चुकीच्या भावना वगैरेंमुळे शवपरीक्षेला विरोध होतो. न्यायवैद्यकीय शवपरीक्षेला पर्याय नसतो, म्हणून तिला मान्यता द्यावी लागते. अर्थात या बाबतीतही पळवाटा शोधून शवपरीक्षा टाळण्याकडे समाजाचा कल असतो. ज्या शवपरीक्षेत एखाद्याच अवयवाचे निरीक्षण करावयाचे असते, अशा शरीरविच्छेदनालाही नातेवाईक मोठ्या कष्टाने तयार होतात. अर्थात न्यायवैद्यकीय नसलेल्या किंवा केवळ ज्ञानवर्धनासाठी करावयाच्या शवपरीक्षांनाही लोकांची सहजासहजी मान्यता किंवा परवानगी मिळत नाही.

पहा : गुन्हाशोधविज्ञान न्यायवैद्यक मृत्यू रोगनिदान.

संदर्भ :  1. Berghouse, G. and Others, Eds., DNA Technology and Its Forensic Application, 1990.

2. Buris, L. Foresic Medicine, 1993.

3. De Forest Gaenessien, R. E. Forensic Science : An Introducation to Criminalistics, 1995.

4. Saferstin, R. Criminalistics : An Introduction to Forensic Science, New York, 1987.

गोगटे, म. ग.