औषधि रसायनशास्त्र : औषधी पदार्थ आणि औषधे यांचा रसायनशास्त्रदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शाखेला ‘औषधी रसायनशास्त्र’ असे म्हणतात. या शास्त्राची माहिती फार प्राचीन काळापासून होती. आज कित्येक प्राचीन आयुर्वेदीय औषधे भारतात वापरली जात आहेत. भारतीय वैद्य जे ‘सर्पगंधा’ औषध वापरीत, त्यापासून सर्पासील हे आधुनिक औषध बनविण्यात आलेले आहे. तथापि भारतीयांनी त्याचे रासायनिक गुणधर्म ठरविण्यापेक्षा उपरुग्ण (प्रत्यक्ष रोग्यावर उपचार करण्याच्या) पद्धतीपुरताच त्याचा उपयोग केला. एकोणिसाव्या शतकात एफ्‌. डब्ल्यू. ए. सर्टुर्नर या जर्मन औषध विक्रेत्याने अफूपासून प्रथम मॉर्फीन हा अर्क काढला. त्यानंतर बऱ्याच शास्त्रज्ञांचे लक्ष वनस्पतींमधील क्रियाशील औषधिघटक शोधून ते वेगळे काढण्याकडे वेधले गेले. त्याचा परिणाम म्हणून अनेक अल्कलॉइडे, ग्‍लायकोसाइडे, कार्बोहायड्रेटे, बाष्पनशील (लवकर उडून जाणारी) आणि इतर तेले इ. औषधिघटक शोधून काढले गेले. या औषधिघटकांच्या औषधी गुणधर्मांचा व रासायनिक घटकांचा अभ्यास करण्यात आला. औषधी रसायनशास्त्राला केव्हा केव्हा वनस्पति-रसायनशास्त्र असेही म्हणतात. आजपर्यंत ज्ञात असलेल्या वनस्पतींपैकी अघ्या ३ टक्के वनस्पतींचे या दृष्टीने संशोधन झालेले आहे. इतर वनस्पतींतील क्रियाशील घटक शोधून काढणे, त्यांचा अभ्यास करून त्यांच्यापासून उपयुक्त औषधे तयार करणे व ती वापरण्यास योग्य अशी करणे हे कार्य आजही चालू  आहे.

औषधांची गुणवत्ता, त्यांचा प्रभाव व योग्य अशी मात्रा ठरविणे इ. बाबतींत अन्वेषण (शोध घेणेसंशोधन) करण्यास औषध-अधिनियमांमुळे फार मदत होते.

रसायनशास्त्राच्या विविध शाखा व त्याचा इतर भौतिक व जैव शास्त्रांशी असलेला संबंध या गोष्टींचेही औषधी रसायनशास्त्रात फार महत्त्व आहे. रसायनशास्त्रातील अनेक विक्रिया व पद्धतींपैकी कोणत्या औषधीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत हे ठरविणे फार कठीण आहे. काही वेळा रासायनिक प्रक्रियेमध्ये थोडासाच बदल केला तर दुसरे महत्त्वाचे पदार्थ मिळू शकतात. उदा., अल्कोहॉलापासून ईथर हे गुंगी आणणारे औषध तयार करताना त्या प्रक्रियेत थोडासाच बदल केला, तर एथिलीन हा महत्त्वाचा औद्योगिक पदार्थ मिळू शकतो. काही महत्त्वाची औद्योगिक रसायने ज्या टप्प्यांनी बनविण्यात येतात त्या टप्यांतच काही औषधे मिळतात. उदा., ॲडिपोनायट्राइलाचे हायड्रोजनीकरण (हायड्रोजनचा समावेश) करून डायॲमिनोहेक्झेन (कृत्रिम तंतू तयार करताना लागणारा पदार्थ) संश्लेषित (कृत्रिम रीतीने) केले जाते. हायड्रोजनीकरण प्रक्रियेने जे वरील रूपांतर होते तशाच प्रकारे स्ट्रेप्टोमायसिनाचे डायहायड्रोस्ट्रेप्टोमायसिनामध्ये रूपांतर करता येते.

औषधी रसायनशास्त्रात पुढील गोष्टीचा अंतर्भाव होतो : (१) खनिज, वनस्पतिज, प्राणिज किंवा सूक्ष्मजीवजन्य या नैसर्गिक पदार्थांतून मिळणाऱ्या घटकांपासून औषधीदृष्ट्या क्रियाशील संयुगे वेगळी करणे, ती द्रव्ये शुद्ध स्वरूपात मिळवून त्यांचे औषधी गुणधर्म तपासणे किंवा शोधून काढणे. तसेच  त्या द्रव्यांचा चिकित्सेतील व निर्देश मिश्रणातील उपयोग ठरविणे. (२) नैसर्गिक पदार्थापासून उपलब्ध  होऊ न शकणाऱ्या औषधिद्रव्यांचे संश्लेषण करणे तसेच एखाद्या नैसर्गिक पदार्थात असलेल्या अशुद्ध  औषधिघटकांपासून शुद्ध औषधी वेगळी काढणे, एखादे औषधिद्रव्य आर्थिकदृष्ट्या परवडणारे  नसल्यास ते औषधिद्रव्य कृत्रिम पद्धतीने संश्लेषित करणे. (३) उपलब्ध नैसर्गिक पदार्थांपासून साध्या  रासायनिक पद्धतीने योग्य व प्रभावी अशी चिकित्सायोग्य औषधिद्रव्ये अर्धसंश्लेषित करणे. (४) अनुकूलतम क्रिया करणारी औषधिद्रव्ये शोधून काढून त्यांच्यापासून स्थिर औषधिमिश्रणे कौशल्याने  तयार करणे. (५) निर्देश मिश्रणातील रासायनिक व जैवविरोधी गुणधर्म शोधून काढणे. (६) गुणवत्ता  व मात्रा यादृष्टीने औषधिद्रव्यांची प्रायोगिक सुरक्षितता व मानके (मान्यप्रमाणे) ठरविणे तसेच  औषधिद्रव्यांची एकसूत्रता व चिकित्सेच्या दृष्टीने खात्री करून घेणे. (७) रोगप्रतिबंध, वेदनानाश व  रोगपरिहार यांकरिता, तसेच ज्या रोगासाठी खास गुणकारी औषधे नाहीत त्यासाठी नवीन औषधे  तयार करणे व त्यासाठी रसायनशास्त्राची मदत घेऊन अशा नवीन औषधांत सुधारणा करून त्याचा चिकित्सेत उपयोग करणे.

पहा : औषधनिर्मिती औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम औषधि क्रियाविज्ञान.

संदर्भ : 1. Beckett, A. M. Stelake, J. B. Practical Pharmaceutical Chemistry, New York, 1962,

     2. Soine, T. O. Charles, O. W., Ed., Roger’s Inorganic Pharmaceutical Chemistry, Philadelphia, 1961.

जमदाडे, ज. वि.