धन्वंतरि : (१) आयुर्वेदाचा प्रवर्तक एक देव आणि त्या देवाचा मानावी अवतार काशीराज धन्वंतरी होय. शल्यतंत्र म्हणजे रोग बरे करणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया ज्या आयुर्वेदात सांगितली आहे, त्या आयुर्वेदाचा मुख्य उपदेशक. काशीच्या प्राचीन पुराणकालीन राजवंशातील हा आयुर्वेदाचा आचार्य असलेला धन्वंतरी राजा होय. हरिवंश, विष्णुपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, भागवत इत्यादिकांप्रमाणे भगवान विष्णूच्या अंशापासून निर्माण झालेला धन्वंतरी हा देव काशीच्या राजवंशात वाराणसी येथे मनुष्यरूपाने अवतरला. त्यानेच आयुर्वेद प्रवृत्त केला, असे म्हटले आहे. हरिवंशात ही वंशपरंपरा अशी सांगितली आहे.(१) काश, (२) दीर्घतपा, (३) धन्व, (४) धन्वंतरी, (५) केतूमान, (६) भीमरथ (७) दिवोदास. काही पुराणांत दिवोदासालाही धन्वंतरी म्हटले आहे.

सुश्रुतसंहिता या सुप्रसिद्ध मूलभूत आयुर्वेद ग्रंथाचा कर्ता सुश्रुत हा आचार्य असून त्याला व त्याच्याबरोबर अनेक आचार्यांना मनुष्यरूपाने अवतरलेल्या काशीराज धन्वंतरी देवाने हा आयुर्वेद उपदेशिला, असे त्यामध्ये म्हटले आहेत. म्हणजेच सुश्रुतसंहिता हा धन्वंतरीचा आयुर्वेद आहे.

वर उद्‌धृत केलेल्या पुराणांमध्ये संक्षेपाने वा विस्ताराने समुद्रमंथनाची कथा आली आहे. त्या कथेचे तात्पर्य असे : अमरत्व प्राप्तीकरिता देव व दानव यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. मंथन करीत असता लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, चंद्रमा इ. चौदा रत्ने निघाली. त्यांपैकी एक धन्वंतरी देव हा होय. एका हातात अमृतकलश घेऊन हा देव प्रकट झाला. पाण्यातून जन्मला म्हणून त्याला ‘अब्ज’ म्हणतात. भगवान विष्णूने त्याला वर दिला की, तू मनुष्यजन्म काशीराजाच्या घराण्यात घेतल्यावर जन्मतःच तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील; तुला यज्ञामध्ये यजमान देव समजून आहुती देतील; आणि तू अष्टांग आयुर्वेदाचा प्रवर्तक होशील.

स्वयंभू ब्रह्मदेवाने आयुर्वेद निर्मिला. ही आचार्यवंशाची परंपरा अशी : ब्रह्मा–प्रजापती–अश्विदेव–इंद्र–भरद्वाज–धन्वंतरी.

धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे आठ भाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) काय (शरीरविज्ञान), (२) बाल (बालवैद्यक), (३) ग्रह (भूतपिशाचादिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक), (४) ऊर्ध्वांग (शिरोभागात व तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक) (५) शल्य (शस्त्राघाताची चिकित्सा),  (६) द्वंष्ट्रा (विषचिकित्सा), (७) जरा (आरोग्य वाढविणारे रसायन), (८) वृष (वाजीकरण).

धन्वंतरीच्या नावावर आणखी दहा–बारा ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्या प्राचीनतेबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

(२) दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या (इ. स. ३७६–४१४) पदरी नवरत्ने होती, असे इतिहास सांगतो. त्यांपैकी एक धन्वंतरी होता. तो विद्वान कवी व वैद्यही होता. अकराव्या शतकातील भोज राजाच्या पदरी असलेल्या नवरत्नांमध्येही एक धन्वंतरी होता असे म्हणतात.

भालेराव, य. त्र्यं.